Halloween Costume ideas 2015
January 2021


कोणत्याही देशाच्या भौतिक प्रगतीसोबत नैतिक प्रगती झाली नाही तर त्या राष्ट्राचे काय होते हे अमेरिकेतील गेल्या दोन महिन्यात घडलेल्या घडामोडीवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल. डोनाल्ड ट्रम्प सारख्या अपात्र व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च पदावर निवडण्याची चूक अमेरिकन नागरिकांना महागात पडली आणि पाहता-पाहता महासत्तेचा लंबक अमेरिकेकडून चीनकडे सरकला. अमेरिका फर्स्ट या घोषणेने आपल्या कारकिर्दीची सुरूवात करून अमेरिकन नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग पेटवत ट्रम्प यांनी जोमाने कामाची सुरूवात केली. मात्र लवकरच त्यांचे खरे रूप उघडकीस आले. अंधराष्ट्रवादाच्या दावणीला नागरिकांना बांधून त्यांच्यात  उभी फूट पाडून ट्रम्प या आठवड्यात 20 जानेवारीला पायउतार झाले. परंतु त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अमेरिका ज्या कारणामुळे महासत्ता होती त्या कारणालाच एवढे जायबंदी करून टाकले की  बायडन-हॅरिस जोडीला अमेरिकन समाजाला पुन्हा एक करून देशाला पुन्हा सुपर पॉवर बनविण्यामध्ये आपले सर्वस्व झोकून द्यावे लागेल, यात शंका नाही. 

राष्ट्रवादाच्या नावाखाली गोर्‍यांच्या मनातील सुप्त वंश श्रेष्ठत्वाच्या भावनेला गोंजारून काळ्यांसह इतर नागरिकांच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्‍नचिन्ह उभा करून ट्रम्प यांनी देशामध्ये उभी फूट पाडून आपली दुसरी टर्म निश्‍चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिकेच्या सुजान जनतेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यात त्यांना मोलाची साथ दिली ती मीडिया,पोलीस आणि कोर्टाने. हे सर्व सांगण्याचे कारण असे की, गेल्या चार वर्षे अमेरिकेमध्ये ज्या राष्ट्रवादाचे नाव घेऊन ट्रम्प यांनी देश चालविला त्याच राष्ट्रवादाचे तेवढ्याची ताकदीने नाव घेऊन आपल्या देशात केंद्र सरकार गेल्या सहा वर्षे सत्तेत आहे. ट्रम्पना दूसरी टर्म मिळाली नाही पण भाजपला ती मिळाली. अमेरिका आणि भारत यांच्यामधील राजकीय परिस्थिती जरी एकसारखी असली तरी लोकतांत्रिक मुल्यांच्याबाबतीत अमेरिकेच्या प्रशासकीय संस्थांनी ज्या जबाबदारीचा परिचय जगाला करून दिला, त्याबाबतीत आपल्या देशातील प्रशासकीय संस्था या तशीच कामगिरी करतील काय? आक्रमक राष्ट्रवादातून निर्माण झालेल्या उन्मादित ऊजेर्र्मुळे भारतात 2024 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या लोकतांत्रिक संस्था अमेरिकन लोकतांत्रिक संस्थेसारखेच धाडस दाखवून लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतील काय? याबद्दल संशय समाजमाध्यमावर आतापासूनच व्यक्त केला जात आहे.

अमेरिकेमध्ये फॉक्स न्यूज वाहिनी वगळता बाकी सर्व वाहिन्यांनी राष्ट्रपती ट्रम्प हे पदावर असतांना त्यांचा जोरदार विरोध केला. अनेकवेळा पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांची आणि राष्ट्राध्यक्षांची शाब्दीक चकमक सुद्धा उडाली. एका वर्तमानपत्राने तर रोज राष्ट्रपती कितीवेळेस खोटं बोलतात याची गिनतीच सुरू केली. 3 नोव्हेंबरची राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी असतांनासुद्धा त्यावर अनाठायी प्रश्‍नचिन्ह उभे करण्याच्या सर्व प्रयत्नांना मीडिया आणि सर्व संस्थांनी दाद दिली नाही. फॉक्स न्यूजने सुद्धा शेवटी-शेवटी आपल्या ट्रम्प समर्थनाच्या धोरणामध्ये बदल केला. कोर्टानी ट्रम्प समर्थकांद्वारे दाखल केलेल्या सर्व याचिका कठोरपणे खारीज केल्या. सुरक्षा संस्थांनीही सत्याची साथ दिली. 6 जानेवारीच्या कॅपिटल हॉलवरील हल्ल्यानंतर देशाचे वातावरण एकदमच बदलले आणि 37 टक्के एवढ्या कमी लोकप्रियतेसह ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावे लागले. 

याउलट आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या सोयीने निर्णय देण्यास सुरूवात केली. एका राज्यसभेच्या जागेसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आपल्या पदावर असतांना सरळ-सरळ सरकार धार्जीनी भूमिका घेतली. सीबीआयच्या पहिल्या दोन क्रमांकाच्या दोन अधिकार्‍यांनी एकमेकाविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप लावून गदारोळ उडवून दिला. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनातील नेते बधत नाहीत हे पाहून एनआयएने त्यांना नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली. सरकारने आंदोलकांशी एकीकडे वार्ता चालू ठेवत दुसरीकडे त्यांना आतंकवादाशी जोडणार्‍या वाहिन्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. 

या सर्वावर कडीकेली ती अर्णब गोस्वामीच्या व्हॉटस्अ‍ॅप संदेशाच्या सार्वजनिक झाल्याच्या घटनेने. मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामीविरूद्ध दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रामध्ये 500 पानाची व्हॉटस्अ‍ॅप देवाण-घेेवाणीचा लेखाजोखा कोर्टात पुरावा म्हणून सादर केला. त्यात अर्णब गोस्वामी आणि बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल)चे पूर्व कार्यकारी अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील संवाद नमूद केलेला आहे. या संवादामध्ये अनेक गोष्टी आक्षेपार्ह आहेत. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे अर्णब गोस्वामीला 26 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पूर्व सूचना होती. हे त्या चॅटमधून स्पष्ट झालेले आहे. शिवाय, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 40 सैनिकांच्या घटनेचा उल्लेखही दोघांच्या व्हॉटस्अ‍ॅप संवादामध्ये अशा पद्धतीने आलेला आहे की, त्या घटनेमुळे दोघांनाही हर्षोल्हास झाल्याचे स्पष्ट होते. याशिवाय, अर्णब गोस्वामी प्रधानमंत्री कार्यालयसहीत सर्व मंत्री आपले आहेत, असा दावा करतांना त्यात दिसतो. बालाकोटच्या घटनेची माहिती फक्त 5 लोकांना होती. त्यात स्वतः पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे सामिल होते. यांच्यापैकीच कोणीतरी ही माहिती अर्णबला पुरविली असावी. त्यासाठी अर्णब आणि माहिती पुरविणारी व्यक्ती दोघांनाही राष्ट्रदोहाच्या खटल्याखाली अटक करून तुरूंगात टाकणे आवश्यक आहे. परंतु सरकार असे करणार नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेला आहे. 

या सर्व घडामोडींवरून आपल्या देशातील मीडिया सहीत इतर सर्व प्रशासकीय संस्था ह्या कशा सरकारधार्जिन्या आहेत हे स्पष्ट होते. एकतर्फी राष्ट्रवादाने त्यांना आंधळे करून टाकले असून, कोणत्याही परिस्थितीत ते भाजपची साथ सोडणार नाहीत. मग त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेशीही तडजोड करावी लागली तरी हरकत नाही, हे स्पष्ट होते. लोकशाहीच्या दृष्टीने ही फार चिंताजनक बाब आहे. 

भौतिकता आणि नैतिकता

अमेरिका असो का आपला देश, दोघांनीही नेत्रदिपक अशी भौतिक प्रगती केलेली आहे. परंतु नैतिक प्रगतीच्या बाबतीत दोन्ही देशातील नागरिक हे मागे पडलेले आहेत. भारतीय नागरिकांना तर महान प्राचीन भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा असतांनासुद्धा त्यांच्यामध्ये नैतिक व अध्यात्मिक शक्ती आश्‍चर्यकारकरित्या लयाला जात असल्याचे चित्र एव्हाना स्पष्ट झालेले आहे. प्रगतीच्या नावाखाली सर्वच क्षेत्रामध्ये अधोगती होत आहे. चित्रपट, मालिका, संगीत, इंटरनेटवरील अश्‍लिल सामुग्रीसह ओटीटी प्लेटफॉर्मवर दाखविल्या जाणार्‍या कार्यक्रमांनी लोकांच्या लैंगिक भावनांना गैर मार्गाने प्रोत्साहन देण्याचे काम सुरू केलेले आहे. लॉकडाऊनमुळे रिकाम्या बसलेल्या लोकांना या कार्यक्रमांनी इतके उत्तेजित केले की त्यातील काही लोक लैंगिकदृष्ट्या विकृत झाले आणि महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांच्या गुप्तांगामध्ये रॉड घालून आतडे बाहेर काढण्यापर्यंत काहींची मजल गेली. केरळमध्ये तर एका 17 वर्षीय मुलीवर तब्बल 44 लोकांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. 

एकंदरित ही सर्व परिस्थिती, लोकांची नैतिकता रसातळाला गेल्यामुळे निर्माण झालेली आहे यात वाद नाही. या उद्भवलेल्या मानवनिर्मित आपत्तीला पोलीस, वकील, कोर्ट, दोषारोप पत्राने नियंत्रित करता येत नाही, हे सुद्धा सिद्ध झालेले आहे. या सर्व परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी जनतेमध्ये नैतिक मुल्य रूजविण्याची गरज आहे. हे सत्य लक्षात आल्याने जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रने 22 जानेवारीपासून ’अंधारातून प्रकाशाकडे’ या शिर्षकाखाली एक मोहिम सुरू केलेली आहे जिच्याद्वारे 6 कोटी लोकांपर्यंत नैतिकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

कुरआनमध्ये ईश्‍वराने म्हटलेले आहे की, ‘’तुमच्यात एक गट असा असणे आवश्यक आहे जो लोकांना सद्वर्तनाचे आवाहन करून चांगुलपणाचा आदेश देईल. तसेच दुराचाराला प्रतिबंध करेल, असेच लोक यशस्वी होतील” (सुरे आले इम्रान आयत नं. 104).

या आयातीमध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करत जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने आपल्या राज्यातील लोकांना सद्वर्तनाचे आवाहन करत दुराचारापासून लांब राहण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या स्थापनेपासूनच म्हणजे 1948 पासून जमाअते इस्लामी हिंद ने देशहितामध्ये जनकल्याणाची अनेक कामे केेलेली आहेत. मग ते नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांची मदत करणे असो की जातीय दंगलीमध्ये होरपळलेल्या सर्वधर्मियांची मदत करणे असो. याशिवाय जमाअते इस्लामीने वेळोवेळी अनेक मोहिमा राबवून लोकांना शांती आणि सद्भावनेने राहून देशाची प्रगती करण्याचे आवाहन केलेले आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या गाबा स्टेडियमवर झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये ऋषभ पंत (हिंदू) याने 89 तर शुभमन गिल (शिख) याने 91 धावा काढल्या व त्यांना मुहम्मद सिराज (मुस्लिम) याने ऑस्ट्रेलियाचे पाच विकेट काढून मोलाची साथ दिली. आणि हिंदू, मुस्लिम व शिख खेळाडूंच्या या युतीने भारताला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करून दिला. एकतेचे हे सुत्र फक्त खेळापुरतेच मर्यादित नसून, हे सुत्र सर्वच क्षेत्रात भारताला महासत्ता बनविण्यासाठी आवश्यक आहे, हे जरी आपल्या देशाच्या नीतिनिर्मात्यांच्या लक्षात आले तरी पुरेसे आहे. 

सध्याची परिस्थिती आणि मुसलमान

समुद्रामध्ये जहाजाची जी स्थिती असते तीच समाजामध्ये मुस्लिमांची असते. ज्याप्रमाणे जहाज शेकडो टन सामानाचे ओझे घेऊन आरामशीर तरंगत हजारो किलोमीटर चालतो, त्याचप्रमाणे जगात मुस्लिम सुद्धा आपल्या नैतिक शक्तीरूपी जहाजाचा वापर करून जगातील इतर समुदायांचे शेकडो टन ओझे घेउन सुखरूप मार्गक्रमण करू शकतात. मात्र जहाज आणि मुसलमान यांच्यामध्ये दूसरे साम्य असे आहे की, जहाज तोपर्यंत यशस्वी प्रवास करू शकतो जोपर्यंत त्याच्या आत समुद्राचे पाणी येत नाही. जर का ते पाणी आत आले तर जहाजही बुडते आणि मालही बुडतो. ठीक याच पद्धतीने जमीनीवर पसरलेल्या अनैतिक कृत्यरूपी पाणी मुसलमान जोपर्यंत आपल्या चारित्र्यामध्ये येऊ देत नाही, तोपर्यंत तो यशस्वीपणे नैतिकमुल्यांची जपणूक करत जीवन जगू शकतो व इतरांना नीतिमान जीवन जगण्यासाठी प्रेरित करू शकतो. मात्र जमिनीवर पसरलेल्या अनैतिक कृत्याचे पाणी त्याच्या जीवनामध्ये आले तर तोही बुडतो आणि सोबत इतर समाजांनाही घेऊन बुडतो. मुस्लिम समाजामध्ये जशी-जशी वाईट प्रवृत्ती शिरकाव करत जाईल तशी-तशी त्याची नेतृत्व क्षमता कमी होत जाते. म्हणून इतर समाजांच्या नैतिक प्रशिक्षणाची जबाबदारी आपली आहे हे ओळखून जमाअते इस्लामी हिंदने अनेक वेळेस अनेक सकारात्मक पावले उचललेली आहेत, असे करण्याची क्षमता मुस्लिम समाजामध्ये कुरआन आणि हदीसमुळे निर्माण झालेली आहे, एवढे निश्‍चित.


- एम.आय. शेख

 

America

सध्याच्या काळात सामग्री पेक्षा त्याची पॅकिंग जास्त आकर्षक असते. अमेरिकी विद्वान आपल्या सभ्यतेला नटवून सजवून असे प्रस्तुत करतात की त्यांच्या उणीवादेखील शोभनीय दिसू लागतात आणि विरोधकांच्यात कितीही गुण असले तरी त्यांना कलंकित केले जाते. आणि म्हणूनच तिथल्या एखाद्या माथेफिरूने आपल्या चिमुकल्या मुलांना त्यांच्या आईला पिस्तुलने ठार केले तर त्या माणसातली मानसिकता तपासली जाते. तो कसा वैफल्यग्रत होता. एकटेपणाने त्याच्या डोक्यावर विपरित परिणाम झाले असतील म्हणून त्याने आपल्याच मुलबाळ व पत्नीला ठार मारले असेल अशा गोष्टी घडविण्यात आल्या. त्याच ठिकाणी एखाद्या मुस्लिमाने दारू पिऊन एक जरी मारले तर त्यासाठी त्याच्या समुदायाला दोषी ठरवले जाते. 

6 जानेवारी 2021 अमेरिकेतील कॅपिटल हिल या संसदेच्या इमारतीवर ट्रम्प समर्थक गुंडानी जेव्हा सशस्त्र हल्ला केला तर सार्‍या जगाने त्यावर आश्‍चर्य व्यक्त केले. काही विद्वान यामागील कारणे शोधू लागले. या दंगलखोरांमध्ये एका माणसाच्या हातात कनफेडरेशनचा ध्वज होता ज्यामुळे या हिंसक घटनेमागचे वास्तव जगासमोर आले.

एप्रिल 1861 पासून 1865 दरम्यान, अमेरिकेत भयंकर यादवी माजली होती. याचे कारण असे की कनफेडरशेन म्हणजेच अमेरिकेतील दक्षिणेकडील प्रांताच्या संघानं उत्तरेकडील प्रांतापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. गुलामी व्यवस्था अशीच चालू राहावी असे कॉनफेडरेशन  मधील प्रांतांचा आग्रह होता. कॅपिटल हिलवर ज्या हिंसक दंगलखोरांनी हल्ला केला होता त्यांनी अजूनही गुलामी व्यवस्था कायम ठेवण्याची मानसिकता सोडलेली नव्हती. स्वतःला जगातील सर्वात सुसंस्कृत आणि सभ्य समजल्या जाणार्‍या अमेरिकेत 9 लाख लोक या यादवीत मारले गेले. नंतर अमेरिकेतील उत्तरी प्रांतांच्या युनियन फौजांनी ह्या रक्तरंजीत यादवीला नियंत्रणात आणले. 

गेल्या वर्षी काळ्या जॉर्ज फ्लायड याची पोलिसांकडून केल्या गेलेल्या हत्येनंतर वंशवादाचा प्रतीक असलेल्या या ध्वजावर बंधने घालण्यासाठी निदर्शने झाली होती पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे निमित्त करून ही मागणी फेटाळली होती. याचा अर्थ असा की माणसांनी माणसांनाच गुलाम बनवण्याचा अधिकार त्यांनी बहाल केला होता. ट्रम्प यांच्या या भूमिकेसाठीच वंशवादी लोकांचे त्यांना मोठे समर्थन प्राप्त आहे. गेली दीडशे वर्ष त्यांना या रोगासाठी दिलेल्या लोकशाहीच्या औषधाने त्यांच्यावर काहीएक परिणाम झाला नाही. संधी मिळताच आपल्या प्रिय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थनार्थ कॉनफेडरेशनचा तोच झेंडा घेऊन सर्व शक्तीनिशी अमेरिकेतील संसदेमध्ये त्यांचे समर्थक दाखल झाले. असे म्हटले जात आहे की कॅपिटल हिलवर 1814 मध्ये ब्रिटेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर ही सर्वात मोठी घटना आहे. पण हे सत्य नाही. कॅपिटल हिलवर यापूर्वी लहान मोठ्या हिंसक कारवाया होत राहिल्या. यात दुसर्‍या राष्ट्राकडून करण्यात आलेला 1814 चा तो एकच हल्ला होता ज्यात ब्रिटिश सैन्यांनी  वॉश्िंगटन डीसीमध्ये दाखल होऊन कॅपिटल हिल सहित व्हाईट हाऊसवरही हल्लाकरून काँग्रेसची (तेथील लोकसभा) लायब्ररी आणि सर्वोच्च न्यायालयाला आग लावली होती. 1841 साली अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या काळात तत्कालीन राष्ट्राध्यक्षांकरवी बँकिंग व्यवस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला असता खाजगी क्षेत्रातील बँकांच्या कर्मचार्‍यांना कॅपिटल हिलसमोर आंदोलन करत दगडफेक केली होती. तसेच गुलामी प्रथेच्या देशातील भवितव्य काय या प्रश्‍नावर चर्चा करत असताना एकासिनेटच्या सदस्यावर काँग्रेसच्या दुसर्‍या सदस्याने काठीने मारले होते. पण त्यासाठी त्याला आपला राजीनामा देणे भाग पडले होते. पण त्याच सदस्याला पुन्हा निवडून देऊन तेथील जनतेनी जणू गुलामी प्रथेला आपला पाठिंबा दर्शविला होता. ज्यावरून अमेरिकी जनतेला मानसिक विकार समजता येते.

अमेरिकी नागरिकांच्या या वृत्तीमुळे त्यांनी अमेरिकेने इतर देशांविरूद्ध जगभर छेडलेल्या युद्धामागची अत्याचारी मानसिकतेची जाणीव होते. गेली दीडशे वर्ष अमेरिकेच्या इतर राष्ट्रावरील जुल्मी अत्याचारांना तेथील जनतेनी पाठिंबा दिलेला आहे. 1915 साली एरिक मॉन्टरनेही दारूने भरलेल्या तीन कांड्यांनी सिनेटच्या एका कक्षात विस्फोट घडवून आणला. याचे कारण होते पहिल्या जागतिक युद्धात अमेरिकेने ब्रिटनला शस्त्रांचा पुरवठा केल्याच्या विरोधात मेेक्सिकन शरणार्थींच्या प्रश्‍नावर चर्चेदरम्यान 1950 साली पोर्टिकोच्या स्वांतत्र्यासाठी प्रतिनिधी सभा चालू असताना हल्ला करण्यात आला होता. यात 5 सदस्य जखमी झाले होते. तशीच एक घटना 1971 मध्ये व्हिएतनाम प्रश्‍नावर तिथल्या डाव्यांनी कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. त्यानंतर कॅपिटल हिलच्या सुरक्षेत वाढ करून व्हिडिओ कॅमेरे लावण्यात आले होते. या इमारतीत प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. 1983 मध्ये सशस्त्र मार्कशिस्ट कम्युनिस्टांनी लेबनान आणि ग्रेनाडा देशांत अमेरिकी लष्करी हस्तक्षेपाविरूद्ध सिनेटच्या बाहेर बॉम्ब पेरले होते यात जीवित हानी झाली नव्हती मात्र एक भिंत क्षतीग्रस्त झाली होती. या घटनेनंतर कॅपिटल हिलवर येणार्‍या सामान्य पर्यटकांसाठी बंदी लावण्यात आली. 2001 मध्ये दोन विमानाद्वारे वर्ल्ड ट्रेड सेंटरला उध्वस्त केले होते. तसेच पेनन्सिल्वेनिया येथे चौथे विमान जमीनीवर पडला असता त्याची तपासणी केल्यास असे आढळून आले की, त्याचे लक्ष कॅपिटल हिल होते. या घटनांद्वारे जे अमेरिकी नागरिक स्वतःला सभ्य आणि शांतता प्रेमी उदारमतवादी असल्याचा दावा करतात त्यांचा हा दावा किती खोटा आहे हेच सिद्ध होते. वंशवाद, गुलामीची प्रथा आणि भांडवलवादी व्यवस्थेला ते लोक किती महत्त्व देतात हेच सिद्ध होते. आणि शेवटी ट्रम्प समर्थकांनी हिंसेचा जो हैदोस कॅपिटलवर मांडला होता त्याचे कारण त्यांची वाईट वृत्तीच होती हे स्पष्ट आहे. 

आपण किती सभ्य, आपले विचार किती उच्च कोटीचे याचा मुखवटा परिधान केलेल्या मुखवट्यातून सदैव दिसत आला आहे. पण त्याच वेळेला इतर राष्ट्रांना ते किती तुच्छ समजत आले आहेत याचा पुरावा देखील समोर येत असतो. 2010 मध्ये वर्जिनिया येथील एका हॉटेलात काम करणार्‍या गॅली कार्टरला हॉटेलात खान-पान केल्यानंतर त्याने महिलेला टिप दिले नाही. एवढ्यावरच न थांबता त्या दाम्पत्याने तिच्या हातात एक चिठ्ठी दिली त्यात लिहिले होते ”तुमची सेवा उत्तम होती पण आम्ही काळ्या लोकांना टिप देत नसतो” त्यांना टिप द्यायची नव्हती यात वाद नसला तरी त्या सेविकेची मानहानी करणं यावरून गोर्‍या लोकांची मने किती वंशवादी आहेत हेच सिद्ध होते. आणि आपला अहंकार व्यक्त करताना त्यांना काही गैर देखील वाटत नाही. त्यांना लाज तर येत नाही उलट यात त्यांना गर्व वाटतो. काही लोकांनी त्या सेविकेच्या मनधरणीसाठी एक मोहिम चालविली होती. हॉटेल मालकानं या घटनेची निंदा करत म्हटले होते की, आणि त्यासाठी त्यांनी राजकीय वातावरणाला जबाबदार धरले होते आणि  अमेरिकेत ही आग अजून तरी नियंत्रणात आहे पण कॅपिटललिच्या घटनेनंतर त्यांचे मत बदलले असेल. 

युनोमधील इतर देशांनी देखील याची दखल घेतली होती. 2019 साली मानवी अधिकारांच्या विषयावर युनोच्या जेनेव्हा येथे 42 व्या सभेमध्ये पाश्‍चात्य देशांमधील वंशवाद, वंशिक भेदाभेद आणि परराष्ट्रामधील त्या देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी जाणार्‍याच्या मानवी अधिकारांवर चर्चा झाली आणि चायनाचे युनोमधील स्थायी सदस्य छिनशो यांनी अरब राष्ट्रे, रशिया, पाकिस्तान, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका सहित इतर 50 देशांचे प्रतिनिधीत्व करित पाश्‍चात्य देशांमध्ये अल्पसंख्यांक आणि शरणार्थ्यांच्या विरोधात वाढत असलेल्या द्वेषाच्या वातावरणासाठी चिंता व्यक्त केली होती. इस्लामिक संघटनेच्या वतीने पाकिस्तानच्या प्रतिनिधीने मुस्लिम द्वेष, धार्मिक असहिष्णुता आणि उजव्या अतिरेकी विचारधारेच्या संघटनांना दोषी ठरवले होते.

पण या कारवायांमुळे हे प्रश्‍न कायमचे संपणार नाहीत या समस्येवर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आजपासून 1442 वर्षापूर्वी मानवजातीला संबोधून मानवी सभ्यतेसाठी समता, बंधुभाव यावर सविस्तर शिकवणी दिल्या आहेत त्याची अंमलबजावणीच या समस्येवर उपचार आहे.


- डॉ. सलीम खान

 

candle light

मी एक कुरआनचा अभ्यासक व उपासक आहे. मला कुरआनबद्दल जी आवड निर्माण झाली त्यामध्ये माझ्या बालपणाचे मित्र उस्मान बिन सईद चाऊस यांचा मोलाचा वाटा आहे. आम्ही दोघे समवयस्क आणि एकाच गल्लीत राहणारे. मी त्यांचे जीवन जवळून पाहत होतो. आम्ही दोघेही साक्षर होतो. त्यांचे क्षेत्र अध्यात्माचे क्षेत्र होते आणि माझ्या जीवनाचे सुत्र खाओ-पीओ-मौज करो असे होतो. आम्ही रोज एकमेकांना भेटत होतो. पण फक्त नमस्कारापुरता संबंध होता. पुढे चालून मला थोडी समज आल्यावर त्यांची जीवनपद्धती पाहून मला आश्‍चर्य वाटायचे की फारशी भौतिक संसाधने नसताना त्यांची जीवनशैली अतिशय चांगल्या दर्जाची होती. सातत्याने हे पाहून मी एक दिवशी त्यांना विचारले की,  चाऊस साहेब आपली जीवनशैली अतिशय चांगली आहे. त्याग, श्रम, प्रेमळ आचरण यांचा त्यात समावेश आहे. या सर्वांसाठी तुम्हाला ऊर्जा कोठून मिळते? तेव्हा त्यांनी सांगितले की, मला ही ऊर्जा कुरआनमधून मिळते. त्यावर आश्‍चर्यचकित होवून मी त्यांना असे म्हणालो की, कुरआनबद्दल समाजाची तर वेगळीच भावना आहे. जशी की कुरआन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करते, हिंसाचार शिकविते, महिलांवर अत्याचार करण्याची शिकवण देते इत्यादी. त्यावर त्यांनी अगदी शांतपणे उत्तर दिले की, पाटील साहेब आज कुरआनचे भाषांतर जवळ-जवळ प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. आपल्याला जी भाषा येते त्यात कुरआन वाचा आणि आपणच ठरवा की कुरआन काय म्हणते ते? आणि तेव्हापासून मी कुरआन वाचण्यास सुरूवात केली व आजतागायत वाचतच आहे. 

कुरआनबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे, कुरआनामध्ये असे म्हटलेले आहे की, जो कोणी माणूस अज्ञानकाळामध्ये असतांना ज्या काही चुका, पाप करतो त्याला क्षमा करण्यात येते. माझ्या मते ही सोय अन्य कुठल्याही जीवन पद्धतीमध्ये नाही. 

कुरआनच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्ये असे की, सुरे अलबकराच्या आयत क्र. 153 मध्ये असे म्हटलेले आहे की,  हे श्रद्धावंतांनों ! सहनशिलता आणि भक्तीच्या माध्यमातून  मदत प्राप्त करा. निश्‍चितपणे ईश्‍वर सहनशिलता ठेवणार्यांच्या सोबत आहे. ही शिकवण आजपासून 1442 वर्षांपूर्वी दिली गेली,  जी की अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा माणसाला आशेचा किरण दाखवते व माणसाच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करते व तग धरून राहण्यास प्रेरित करते. मी जेव्हा समग्र कुरआनवर दृष्टी टाकतो तेव्हा वाटते की, या दिव्य ग्रंथामुळे जगातील सर्व मानवजातीसाठी 1442 वर्षापूर्वीच प्रकाश निर्माण झालेला आहे. मग अंधार आहे कुठे? आज जर अंधार असेल तर त्याचा अर्थ आपण कुरआनच्या शिकवणीकडे डोळेझाक केल्यामुळे तो निर्माण झालेला आहे. हे माझे स्पष्ट मत आहे आणि यावर मी ठाम आहे. तरी समस्त ईश्‍वर भक्तांनी यावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.


- किशन जयवंतराव पाटील 

मो.9175793247



समाज व्यवस्थेत राजकीय पक्षात लोकशाही मतभेद आणि आदर्शवाद गृहीत धरण्यात आलेले असले, तरी या लोकशाहीच्या राजकारणाला जेव्हा कुरघोड्यांच्या राजकारणाचा वास येऊ लागतो तेव्हा मात्र ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी राजकारण करायचे त्या नागरिकांचे हित बाजूला पडते की काय, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडणार्‍या राजकीय विविध घटनांवर नजर टाकली तर अशा प्रकारच्या राजकारणाची अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍याच्या निमित्ताने या अहितकारी राजकारणाला अधिकच वेग आल्याचे दिसते. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला महाराष्ट्रात मात्र आपली सत्ता टिकवता आली नसल्याने गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकारला काम करता येऊ नये, यासाठी भाजपच्या पातळीवर सतत प्रयत्न करण्यात येत होते. महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयाची तुलना भाजप सरकारच्या निर्णयांशी केली जात होती. या सर्व कालावधीमध्ये एखादा मुद्दा जरी बरोबर असला तरी तो मुद्दा कोणी मांडला आहे, या विषयाला प्राधान्य देऊन त्या बरोबर आणि योग्य मुद्याला बगल देण्याचे काम सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनीही केले. या कालावधीमध्ये महाराष्ट्रात ईडी आणि एनसीबी या दोन संस्थांनी सक्रिय होऊन मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याने या कारवाईमागे केंद्रातील भाजप सरकार असल्याची टीका महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांनी केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांच्या मालमत्तांची ईडीने केलेली चौकशी आणि सरनाईक यांच्या पुत्रांना चौकशीसाठी पाठवण्यात आलेले समन्स हे या कुरघोडीच्या राजकारणातील ताजे उदाहरण मानावे लागेल. प्रताप सरनाईक यांच्या विषयावरील हा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती सहा महिन्यांमध्ये आपले अहवाल सादर करणार आहे. सरकारवर सतत टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी यांना शांत करण्यासाठी ठाकरे सरकारने टाकलेले हे पाऊल आहे, असेच मानावे लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी आणि वैयक्तिक टीका करणारे भाजपचे नेते नारायण राणे यांचीही काही जुनी प्रकरणे उकरून काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसिद्ध होत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा संबंध असलेल्या एका बँकेच्या चौकशीचाही विषय मध्यंतरी समोर आला होता. म्हणजेच एखाद्या पक्षाने केलेल्या क्रियेला दुस्या पक्षाने दिलेली प्रतिक्रिया अशा प्रकारचे हे कुरघोडीचे राजकारण आता जास्तच वेगाने पुढे चालले आहे. याच कुरघोडीच्या राजकारणाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौराकडे पाहावे लागेल. मुंबईतील चित्रनगरीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात चित्रनगरी निर्माण करण्यासाठी आदित्यनाथ यांनी हा दौरा केला आणि त्यासाठी बॉलीवूडमधील लोकांशी चर्चा केली. गेली शंभर वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीचे केंद्रस्थान असलेले मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून हे पाऊल टाकले आहे, अशी ही कुजबुज आता सुरू झाली आहे. अर्थात, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी चित्रनगरीची उभारणी केली तरी त्याचा परिणाम मुंबईसारख्या जगातील एक नंबरच्या चित्रपटसृष्टीवर होईल, असे मानणे बालिशपणाचे ठरेल. जर बिहारमध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टी पेक्षाही लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असेल तर उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यांमध्ये अशाप्रकारे चित्रीकरणाची सोय करणारी चित्रनगरीची उभारणी म्हणजे मुंबईला स्पर्धा आहे, असे मानता येणार नाही. जर चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि बिहारमधील भोजपुरी प्रदेश आपल्या भाषेतील चित्रपटसृष्टी विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतील, तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईने मराठी चित्रपटसृष्टी विकसित करण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित केले तर ते जास्त योग्य ठरेल, असे वाटते.साहजिकच केवळ कुरघोडीच्या राजकारणाचा एक भाग म्हणूनच योगी आदित्यनाथ यांच्या दौ्याकडे पाहून काहीही साध्य होणार नाही. या कुरघोडीच्या राजकारणात सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष यांच्यानिमित्ताने जे विषय समोर येत आहेत त्यापैकी कोणताही विषय सामान्य नागरिकांच्या हिताचा नाही याची जाणीव या राजकीय पक्षांनी करून घेण्याची गरज आहे


- सुनीलकुमार सरनाईक

(भ्रमणध्वनी - 7028151352)

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्काराने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)



अंधार म्हणजे नेमके काय? अंधाराला आपण काळोख ही म्हणतो. ही एक अशी स्थिती असते ज्यात प्रकाश नसतो. अंधारात नेमके काय घडते? हे बघण्यासाठी प्रकाश लागतो. माणसाचे डोळे त्याच्या निर्मात्यानं अशा पद्धतीने बनविलेले आहेत की ते प्रकाशातच बघू शकतात. प्रकाशाचे किरण त्यांच्या डोळ्यात पडणे आवश्यक आहे अन्यथा तेे बघूच शकत नाहीत.

अंधार कोणाला आवडतो का? नाही ना? का बरं? लहानपणी लाईटी गेल्यावर खूप भिती वाटायची. आज ही लाईटस गेल्यावर जीव कासावीस होतो, असे का? मानव हा अंधाराला पसंत करत नाही म्हणून असे घडते.  हे त्याच्या प्रवृत्तीमध्ये सामील आहे. तो प्रकाशाला पसंत करतो म्हणून आपण बघतो. अंधार किंवा अंधकार असं नाव कोणी आपल्या बाळाचा ठेवत नाही, उलट प्रकाश नावाचे कितीतरी व्यक्ती आपणास भेटतील. 

अंधारामध्ये वस्तू असतात पण त्यांना बघू शकत नाही. आपण डोळे असून आंधळ्या सारख त्यांना हात लावून फक्त चाचपडू शकतो आणि ह्या चाचपडण्यात आपल्या हाती जे काही लागते त्याची ओळख चुकू शकते. आपण सगळे नऊ महिने आईच्या पोटात अंधारातच राहून आलो आहोत पण त्या निर्माणकर्त्याची किमया बघा हे आपल्याला कळालं सुद्धा नाही, नाही तर तेथेही कोण राहिले नसते. 

एक गोष्ट सांगते, एक लहानसा मुलगा असतोे, तो घराच्या दाराला वडील आणि भिंतीला आई असे समजून त्यांना पुजायला लागतो. त्याचा दृष्टिकोण हा की भींत नसती तर घराचे अस्तित्व नसते आणि दार नसते तर घरात शिरताच आले नसते. आई-वडिल त्याला खूप समजवितात की अरे आम्ही तुला जन्माला घातलो, तुला लहानाचे मोठे केले. तू आजारी पडला तरी आम्ही तुझी काळजी घेतली आणि तू आम्हाला सोडून ह्या निर्जिव वस्तूंना आई-वडिल का मानतो? पण व्यर्थ! त्याच्या लहानशा डोक्यामध्ये ही बाब येत नाही. आई-वडिल आपला मुलगा लहान आहे आज न उद्या जेव्हा त्याची बुद्धी परिपक्व होईल तेव्हा त्याला सत्य कळेल असे म्हणत त्याचे खानपिने बंद करत नाहीत किंवा त्याच्या सुखसुविधांमध्येही काही फरक करत नाही. उलट त्याला आठवण रहावी म्हणून त्याच्यावर अधिक प्रेम करतात. त्याला अधिकच्या सवलती देतात. आता सांगा तो मुलगा अंधारात आहे का प्रकाशात? बरोबर! तो त्याच्या स्वतःच्या निर्माण केलेल्या विचारांच्या अंधारात आहे आणि म्हणून सत्याला बघू शकत नाही. अशीच व्यथा मानवजातीची आहे, जगात कित्येक माणसे स्वयंनिर्मित विचारांच्या अंधारात आहेत. अंधार हा अमर्याद आहे पण प्रकाश एकच असतो. 

आपण कोण? एक प्राणीच! पण मानवाला त्याच्या निर्माणकर्त्याने उत्कृष्ट बुद्धी दिली, दुसर्‍या प्राण्यासारखं फक्त खावून पिवून आपले कुटुंब वाढवून मरून जाण्यासाठी नव्हे तर ही बुद्धी दिली त्याला आपल्या निर्मात्याला ओळखण्यासाठी, माणसांशी माणुसकीनेे वागण्यासाठी, आई-वडिल नातेवाईक, शेजार्‍यांचे हक्क अदा करण्यासाठी, आपल्या अवतीभोवती पसरलेल्या निसर्गाचे परीक्षण करण्यासाठी, वेगवेगळे शोध लावण्यासाठी. पण माणूस आजपर्यंत आपल्या निर्मात्याला ओळखण्यात चूक करत आला आहे. कोणी सूर्याला, कोणी झाडांना तर कोणी इतर प्राण्यांना, कोणी निर्जीव वस्तूंना तर कोणी आपल्यासारख्या माणसालाच निर्माणकर्ता मानतो, पण का खरचं ते आपले निर्माणकर्ते आहेत का? 

खरे पाहता समस्त सौरमंडळाला निर्माण करणारा एकच ईश्‍वर आहे. पुरावा हा की आपले डोळे, कान, नाक, हात-पाय सारखेच, आपल्या शरिराची रचना अ‍ॅनॉटॉमी एकच, फिजीओलॉजी (शरीराचे कार्य) एकसारखे चालते, शरीरामधल्या पेशीही सारख्याच. जन्माला येण्याची प्रक्रिया (प्रोसेस)ही सारखी च. मग आपला ईश्‍वर का बरं वेगवेगळे? 

माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करत चांगले शोध लावले, त्याच्या शोधांना एकविसाव्या शतकात तर जणू पंखच लागले, विमानाचा शोध, कॉम्प्युटर सेटेलाईट, अ‍ॅन्ड्रॉईड फोन वगैरे. माणसांने माहिती आणि तंत्रज्ञानात उच्चांक गाठला पण सभ्यतेमध्ये निच्चांक (उदा. हातरस कांड, बदायुकांड वगैरे.)

माणूस आपला निर्मितीचा उद्देश विसरला. त्याने आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूंचे तर खोल परीक्षण केले पण स्वतःला विसरून गेला. मी कोण आहे? कोठून आलो? माझा निर्माण करणारा कोण? त्याने मला ह्या दुनियेत का पाठविले? मला इथे किती वर्ष रहायचे? मरून मी कोठे जाणार? मेल्यानंतर ही जीवन आहे का? स्वर्ग आणि नर्क अस्तित्वात आहेत का? असे कितीतरी प्रश्‍न असतील आणि त्यांची उत्तरे प्रत्येकजन वेगवेगळे देतो. कारण? माणसाचा स्वयंविचाराचा अंधार त्याच्या बुद्धीला सिमीत करून ठेवतो आणि ते त्यापलीकडे काही विचार करू शकत नाही.

निर्माणकर्त्याला शोधण्याचा प्रयत्नही काही बुद्धीजीवींनी केला. बिगबँगचा प्रयोग करून गॉड पार्टिकल चा शोध लावण्यासाठीपण प्रयत्न केले. माणसाला वाटलं गॉड एक प्रकाशाचा कण आहे आणि आपण त्याला कॅप्चर करू शकू, पण समस्त विश्‍वाचा निर्माणकर्ता आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला या जगात पहायला मिळणार नाही का? तो स्वतः सांगतो की मी तुम्हाला या दुनियेत नाही दिसणार. मरणोत्तर जीवनामध्येच माणसाला ईश्‍वराचे दर्शन होईल. तो एकच असेल यातही वाद नाही. त्याने माणसांना दुनियेत सांगितलेल्या सत्यमार्गावर आपले जीवन व्यतित केेले तर माणसाला स्वर्ग मिळेल. त्याला एक कारण हे ही आहे की, आपले इवलुशे डोळे ईश्‍वराला पाहण्यास सक्षम नाहीत. भर दुपारी उन्हात सूर्याला पाहू शकत नाही तर सूर्याच्या निर्माणकर्त्याला कसे पाहू शकतो?

आपली बुद्धी इतकी कमी की आपण तो कसा असेल यासंबंधीचे विचारही करू शकत नाही. तो आपला ईश्‍वर (समस्त विश्‍वाचा) एकमेव आहे. आदीपासून आहे, नेहमी राहणारा आहे, त्याला न आई न वडिल, न भावंड न पत्नी, न मुलगा न मुलगी न कोणी नातेवाईक. आपली बुद्धी विचारते हे कसे शक्य? सांगा बरं सूर्याला आई आहे का? वडिल आहे का? लेकरं का? नातेवाईक आहेत का? मग त्याच्या निर्माणकर्त्याला ही नाही आणि त्याला गरजही नाही आणि त्या निर्माणकर्त्याने फक्त निर्माण करून सोडले नाही तर शिस्तही लावली. सूर्य ठरावीक वेळेवर निघतो, ठरावीक वेळेवर मावळतो, चंद्र ही वेळेचे पालन करतो, रात्रं-दिवस बरोबर एकमेकांच्या मागे येतात. 

कितीही मोठे पीर असो किंवा महाराज, ते सूर्याला तासभर उशीरा काढू शकत नाहीत किंवा त्याला एक दिवस सुट्टी देऊ शकत नाहीत, मग आपण पीरांना किंवा महाराजांना का बरे मानतो? माणूस काय निर्माण करू शकतो? आपण डासांना मारू शकतो, प्लास्टिकचा डास निर्माण करू शकतो पण खरोखरचा नाही. एक मुंगीही आपण निर्माण करू शकत नाही, माणसासारखे दिसणारे आणि काम करणारे रोबोट आपण तयार केलेत पण अजूनही आपण खूप मागे आहोत. आपल्याकडे त्याने निर्माण केलेल्या अनंत जीवांना मोजण्यासाठी आपण सक्षम नाही. इनफिनाईट म्हणून आपण सोडून देतो. 

एकाच जमीनीतून गोड-गोड आंबे, कडू-कडू कारले येतात. आंब्याच्या झाडाखाली साखर कोणी टाकली, फुलांना वेगवेगळे रंग कोण देतो? मनमोहक वास कोण देतो? मधमाशीला मध निर्माण करण्याचे तंत्र कोणी शिकविले? पशुंना आपल्या  आधीन कोण केले? (उदा. बैल, घोडे वगैरे). वेगवेगळ्या फळांना बघा प्रत्येकाची चव निराळी, डाळींबाचे दाने, मक्याच्या कणसातले दाणे कसे बरोबर ओळीने सजवलेले. ही पॅकिंग करणारा कोण? एका बियाचे 100 हून अधिक दाणे देणारा कोण?

आपण स्वतः त्याच्या निर्मितीचे उत्कृष्ट उदाहरण आहोत. कधी विचार केलात! अशुद्धपाण्याच्या थेंबापासून माणसाची निर्मिती करणारा, त्याला आईच्या पोटात नऊ महिने ठेवून पोसणारा, ठराविक वेळेवर जन्माला घालणारा. त्याबाबत ठामपणे एखादा स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा सोनोग्राफी मशीन सांगू शकत नाही की, एवढं वाजून एवढ्या मिनिटाला एवढ्या सेकंदाला हे बाळ जन्म घेईल. या जन्माचा वेळ माहित न मृत्यूचा, न जीवनाचा उद्देश मग हे जगणे कशासाठी? फक्त जास्तीत जास्त पैसे कमवून मोठमोठे बंगले बांधून विश्‍वभ्रमण करून आत्महत्या करून मरून जाण्यासाठी? लोक जगातल्या सर्व सुखसुविधांचा उपयोग करून ही आत्महत्या का करतात? त्यांना समाधान का नसते त्याचे उत्तर निर्माणकर्त्याचा नकार, जीवनाचा स्पष्ट उद्देश माहित नसणे, पारलौकिक जीवनाचा इन्कार इ. होऊ शकते. 

त्या एकमेव निर्माणकर्त्याने आपल्याला निर्माण करून आपल्यासाठी एक मॅन्युअल ही दिले. ग्रंथाच्या रूपात आणि ते ग्रंथ शिकविण्यासाठी वेळोवेळी संदेशवाहकही पाठविले. हे जीवन एक परीक्षागृह आहे. येथे कोणी सुखी राहण्यासाठी आलेले नाही . प्रत्येकाच्या जीवनात काही न काही परीक्षेचे क्षण आहेतच. गरज आहे त्या परीक्षेला हसत-खेळत सामोरे जाण्याची. यशस्वी कोण? जे न बघता आपल्या निर्मात्याला मानतील. कुरआनचे वाचन करून, समजून, प्रत्यक्षात आपले जीवन व्यतीत करतील. अंतिम संदेशट्याने सांगितलेल्या संदेशावर आचरण करतील आणि अत्यंत अल्पजीवनानंतर येणार्‍या कायमच्या वास्तव्याच्या  ठिकाणासाठी कष्ट करतील. तेच खरे यशस्वी आणि हुशार व्यक्ती होत. 

हा एक मार्ग आहे आपल्याला स्वैराचाराच्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा. सांगा कोण आहे तयार अंधारातून प्रकाशाकडे येण्यासाठी?


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935



मुळातच आम्ही मराठी. मराठी म्हणजे पक्के मराठी ! इतके पक्के की आम्ही मराठी मराठीतच बोलतो आणि मराठीतच लिहितो.( काहींना तर आपलं हिंदी भाषण इंग्रजीत लिहून घ्यावं लागतं तेव्हा कुठे ते हिंदीतून वाचता येतं ! जाऊ द्या, आता दोस्ताना आहे. जास्त बोलता येत नाही.) शाळेत असतांना तर आम्ही काही वर्षांपर्यंत इंग्रजी विषयाची उत्तर पत्रिकाही मराठीतूनच लिहीत होतो, पण आमचे मास्तर बहुदा मराठी द्वेष्टे असावेत, आमचं मराठी प्रेम त्यांना आमचा मुर्खपणा वाटायचा आणि ते दरवर्षी आम्हाला त्याच वर्गात ठेवत असत. शेवटी हेडमास्तरांनी आम्हाला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे मग आम्ही इंग्रजीची उत्तर पत्रिका इंग्रजीतच लिहिण्याचा कटू निर्णय आपल्या मर्जी विरुद्ध घेतला. (आपल्या मर्जी विरुद्ध दुसऱ्याच्या मर्जीने निर्णय घेण्याची ती सवय आता चांगलीच कामाला येतेय.) आम्हाला मराठी सोडून दुसऱ्या भाषांची इतकी चीड होती की एखाद्या दुकानावर गुजराथी पाटी दिसली की आमचे अंटरपंटर ती ताबडतोब फोडून टाकत असत. तसे आम्ही आमच्या बाळराजेंना इंग्रजी माध्यमात शिकविले, (सौभाग्यवतींच्या मर्जीने घेतलेला निर्णय ! मागे लागलेली सवय आली की नाही कामाला ?) पण त्यांना कडक समज दिली होती, की आमच्या समोर घरचा अभ्यास करायचा नाही. किंबहुना तुमची ती इंग्रजी भाषेतली वह्यापुस्तकंसुद्धा आमच्या नजरेसमोर नको यायला. मुळातच आम्ही मराठी असल्यामुळे आमचा स्वभाव तसा कडकच आहे, पण सत्तेसाठी कोणासोबत राहायचं किंवा कोणाला सोबत घ्यायचं असलं की स्वभावाला थोडी मुरड घालावीच लागते ना ? मागची पाच वर्षे आम्ही अशीच आमच्या मराठी बाण्याला मुरड घातली होती. आता गेल्या वर्षभरापासून परत तेच करतोय. मित्र चांगले नसले की असंच होतं ! असो.

मुळातच आम्ही मराठी. मराठी म्हणजे पक्के मराठी. इतके पक्के की आमच्या घरात फक्त मराठी पदार्थच बनवले जायचे, आणले जायचे आणि अर्थातच खाल्ले- खिलवलेही जायचे. पण मागे एक गुजराथी गृहस्थ आमच्या पिताश्रींशी त्यांंचे घरोब्याचे संबंध होते असं सांगून आमच्या घरी येऊ जाऊ लागले. त्यांच्या आदरातिथ्यासाठी मागवलेला खमण ढोकळा आम्हालाही आवडू लागला. किंबहुना मी तर म्हणेन की, तो हळूहळू आमच्या घरात स्थिरावला ते थेट पाच वर्षे ! आता  कुठे वर्षभरापूर्वी त्याला ( म्हणजे खमण ढोकळ्याला !) घराबाहेर काढला तर आता 'जलेबी ने फाफडा' घरात घुसू पाहतोय. काय करावं काही कळत नाहीये. आता मला सांगा आपण कोणाला 'आपडा' वाटू लागलो तर त्याचा ' जलेबी ने फाफडा' खायला काय हरकत आहे ?  मी तर म्हणेन की त्याचा 'जलेबी ने फाफडा' आपण खायलाच हवा ! का खाऊ नये ? किंबहुना मी तर म्हणेन की आजच्या तारखेला वारंवार हात धुणे आणि मुखपट्टी वापरणे हे जीव वाचविण्यासाठी जितकं गरजेचं आहे त्याहूनही जास्त गरजेचं आहे (मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी) ' जलेबी ने फाफडा' खाणं ! पुढे मागे मुंबई महानगरपालिकेपुढे 'जलेबी ने फाफडा'चे स्टॉल टाकण्यासाठी प्रोत्साहनपर योजना सुरू करण्याचा विचार आहे. हे ही असो.

जाता जाता -  नेहमीप्रमाणेच जर  आपल्या मर्जी विरुद्ध दुसऱ्याच्या मर्जीने निर्णय घ्यावा लागला आणि औरंगाबादचं संभाजीनगर करता आलं नाही, (मित्र चांगले नसले की असंच होतं !) तर औरंगाबाद फक्त मराठीतच (किंवा सद्य परिस्थिती पाहता फार फारतर गुजराथीत) लिहावं, इंग्रजी अजिबात लिहू नये असा अध्यादेश काढावा असा विचार करतोय. मराठी बाण्याला किती दिवस मुरड घालणार ? आपण का सत्तेसाठी लाचार आहोत की काय ? पुन्हा हे ही असो.

- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक, 

संपर्क-७८७५०७७७२८


प्रकाशाचे महत्त्व काय? हे अंधार झाल्यावर कळते. अंधार पडायला लागला की जीवनाची गती कमी होऊन जवळपास थांबते. लाईट गेल्यावर पेटवलेली एक काडीसुद्धा किती उपयोगाची हे आपल्याला माहित आहे. प्रकाश नसेल तर कित्येकदा गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अंधारात तर पानांची नुस्ती सळसळ ऐकूनच भीती वाटते. ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या गंभीर स्वरूपाची असते. पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि चिखल पसरलेला असतो. अशा रस्त्यावरून दिवसाही चालणे तसे कठीणच असते मात्र अंधाऱ्या रात्री पाण्यातून, चिखलातून वाट कशी काढावी ते सूचत नाही.  पुढेही जाता येत नाही अन् मागेही वळता येत नाही. काय करावं ते कळत नाही.

  मनात प्रकाशाचा अभाव असल्यावर पत्नीच्या फक्त वाईट सवयी दिसतात आणि मन प्रकाशमय असेल तर पत्नीने न बोलताही तिच्या डोळयातल्या भावना, संवेदना पतीला दिसू लागतात. मग तो वैतागुन, भडकून तक्रार करत नाही की, " मी जसं सांगतो तसं तू करत नाही आणि काय करावं ते स्पष्ट बोलतही नाही. खूप टेन्शन देतेस तु ". दुसरीकडे बायकोला आपल्या अधिकारांची मर्यादा दिसत नाही. मग तिची कुरकुर सुरू होते. " घरात माझं काही चालतं का? मी बोलते तसं करता का कधी तुम्ही? आणि स्पष्ट बोलून काय करू? तुमचा पारा चढतो अन घर डोक्यावर घेतात. आई-वडील तक्रार करत असतात की " काय झालं या पिढीला ते कळतच नाही हो! आजकालची पोरं ऐकतच नाही. आमच्या काळात बघा कसं होतं." असं बोलताना आई-वडिलांना हे दिसत नाही की, कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण मुलांना नैतिक शिक्षण देण्यात, त्यांच्यावर संस्कार करण्यात आपण किती मागे पडलो.

मग अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं? जेणेकरून अंधारं दूर होतील. आणि माणसांचा जीवन प्रवास सुखद आणि आनंददायी बनेल?

कुरआनातील अध्याय नंबर 14 ज्याचे नाव सूरह इब्राहीम आहे त्यातील पहिल्या आयतीचा अर्थ आहे, 

अलीफ लाम रा. (हे पैगंबर) हा एक ग्रंथ आहे, जो आम्ही तुमच्यावर अवतरित केला आहे. (कशासाठी?) अशासाठी की तुम्ही तुमच्या पालनकर्त्याच्या हुकुमाने लोकांना अंधःकारातून बाहेर काढून प्रकाशात आणावे. त्याच्या मार्गावर जो प्रभावशालीही आहे,गुण वैशिष्ट्यांनीही युक्त आहे.

हा आहे तो महान उद्देश ज्याकरिता पवित्र कुरआन अवतरित केले गेले. म्हणजे लोकांना काल्पनिक श्रद्धा आणि दुराचाराच्या दाट अंधकारातून बाहेर काढावे आणि खरी श्रध्दा व विश्वासाच्या आणि सदाचाराच्या तेजस्वी प्रकाशात आणावे.

या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. खरी श्रध्दा आणि विश्वास कुणावर ठेवलं पाहिजे? उत्तर अगदी सोपं आहे. माणसाने कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्विकारू नये. आपल्या विवेकबुद्धीने तपासूनच श्रद्धा ठेवावी, पण कुणावर?

प्रत्येक अशा प्रसंगाची आठवण करा जेंव्हा आपण मोठ्या संकटात, अडचणीत सापडतो. किंवा आपला जीव धोक्यात येतो, किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती जेंव्हा अंतिम घटका मोजत असते आणि भले भले डॉक्टरही जिथे हात टेकतात. जेंव्हा सगळे पीर, अवलीया, देवी-देवतांना हाका मारूनही काही उपयोग होत नाही. तेंव्हा आपोआप कुणाला मदतीसाठी हाक मारतो? "हे ईश्वरा!, Oh God!, या अल्लाह! आपण आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराला स्मरण करून याचना करू लागतो. अशा वेळी फक्त आस्तिकच नाही तर नास्तिकही भयभीत होऊन नम्र बनतो. 

जीवन सुरळीत चालू असेपर्यंत माणसाला आपले ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याचा फाजील गर्व वाटत असतो पण एकूण संपत्ती, सामर्थ्य, सर्व साधनं, माध्यमं निकामी ठरल्यावर स्वाभाविकपणे त्याच्या तोंडातून निघते की " हे ईश्वरा ! हे अल्लाह! दया कर. तूच रक्षणकर्ता आहे. तूच संकटमोचक आहे. दुःखहर्ताही तूच आणि सुखकर्ताही तूच आहे. त्यावेळी महत्त्वपूर्ण बाब ही असते की अशा प्रत्येक प्रसंगी माणूस त्या सर्वांना विसरतो, ज्यांना ईशकृपेमध्ये सहभागी समजून आत्तापर्यंत ज्यांची भक्ती केली. आणि ज्यांच्या समोर नतमस्तक होत राहिला. 

अशा प्रसंगी प्रार्थना करताना माणसाच्या ध्यानीमनी फक्त ईश्वर असतो. एकमेव ईश्वर जो साऱ्या जगांचा पालनकर्ता, स्वामी आहे. अशा वेळी माणूस कोणत्याही पीर- अवलीयाकडे मदतीची याचना करत नाही. कोणत्याही देवीदेवताची, संताची त्याला आठवण येत नाही, किंवा ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही शक्तीकडे, वस्तूकडे माणूस धाव घेत नाही. माणसाच्या ध्यानीमनी फक्त ईश्वर असतो. एकमेव ईश्वर, अल्लाह जो साऱ्या जगांचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, स्वामी, शासक आहे. पण ईश्वर जेंव्हा त्याला संकटातून मुक्त करतो तेव्हा माणूस मागील सर्वकाही विसरून परत आपल्या शक्ती-सामर्थ्यांचा गर्व करू लागतो. पुन्हा त्याला उन्माद चढतो. ईश्वराच्या मर्जीविरुद्ध, आदेशांविरूध्द द्रोह करू लागतो. ईश्र्वराचे उपकार विसरून जेंव्हा माणूस कृतघ्न बनतो तेंव्हा त्याच्या मनात पुन्हा अहंकार भरण्यास सुरुवात होते आणि लोभ, द्वेष, ईर्ष्या, निराशा यासारखे रोग त्याच्या मनाचा ताबा घेतात.

मनाची अवस्था ही खुल्या मैदानात पडलेल्या लहानशा तिनक्यासारखी असते. ज्याला वारा इकडून तिकडे हेलकावे देत असतो. एका अवस्थेत राहूच देत नाही. म्हणूनच आपल्या आसपास किंवा जगामध्ये जे काही घडतं, त्याचा प्रभाव मनावर पडत असतो. मग अशा स्थितीत आपण काय करावं? जेणेकरून आपले मन निरोगी राहील. याचे उत्तर कुरआनच्या आयतीमध्ये मिळते. अध्याय नंबर 64 सूरह अत-तगाबूनच्या 11व्या आयतीत सांगितले गेले आहे. 

" जो कोणी अल्लाहवर श्रद्धा ठेवतो, अल्लाह त्याच्या मनाला मार्गदर्शन करतो " (64/11)

म्हणजे त्याच्या मनाला भटकंतीसाठी सोडत नाही. आणि सूरह नंबर 65 अत-तलाकच्या तिसऱ्या आयतीत सांगितले गेले आहे.

"जो कोणी अल्लाहवर विश्वास ठेवेल अल्लाह त्याच्यासाठी पुरेसा आहे " (65/3)

एकमेव ईश्वरावर विश्वास ठेवणारा हेच मानतो की जे संकट येऊन कोसळले आहे त्याचे निवारण त्या एकमेव ईश्वरा खेरीज अन्य कोणीही करू शकत नाही म्हणून तो संकटासमोर, कठीण परिस्थिती समोर एखाद्या मजबूत पाषाणासारखा उभा राहतो. एकेश्वरवादीच्या मनात फक्त अल्लाहचे भय असते, म्हणूनच त्याच्या मनातील सर्व प्रकारचे भय निघून जातात.  तो हा विचार करतो की नफा-नुकसान सर्वकाही अल्लाहने निर्धारित केलेले आहे मग लबाडी का करावी? म्हणून तो कुणाला धोका देत नाही. आणि कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवत नाही. एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणारा माणूस भाग्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण हातावर हात धरून बसत नाही. तर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. मग कितीही अपयश आले तरीही तो हाच विचार करतो की जे काही घडलं ते अल्लाहने निर्धारित केलेल्या भाग्यानुसारच घडलं. अल्लाहचा प्रत्येक निर्णय उद्देशपूर्ण असतो. या अपयशातही जरूर माझ्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी भलाईचा पैलू असेल. मी आणखीन प्रयत्न करेन पण खचून जाणार नाही आणि निराशही होणार नाही. एकेश्वरवादीचा हाच विश्वास आणि एकमेव ईश्वर, अल्लाहवर असलेली त्याची श्रद्धा त्याला मानसिक समाधान देते. मग मोठमोठ्या संकटातून, दुःखातून, आघातातून, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याला दिसू लागतात. म्हणूनच तर खरा एकेश्वरवादी कधीही आत्महत्येचा करत नाही.

बंधू आणि भगिनींनो, कुरआन हा ग्रंथ जसे एका व्यक्तीला अंधकारातून बाहेर काढतो आणि प्रकाशात आणत़ो, तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कुरआन प्रकाशमय मार्ग दाखवतो. कौटुंबिक वाद का निर्माण होतात? पती म्हणतो " घरात माझी सत्ता चालेल! " तर पत्नी म्हणते " मी म्हणेन ती पूर्व दिशा ! " पती पत्नीचे हक्क काय? दोघांचे अधिकार किती? आणि मुख्य म्हणजे दोघांची कर्तव्ये कोणकोणती? हे जाणून न घेता प्रत्येक जण हक्कांच्या नावावर लढतोय पण कर्तव्यांचं काय? अल्लाह जो नवरा-बायको दोघांचा निर्माणकर्ता आहे, जो दोघांचा शुभचिंतक आहे, जो दोघांवर प्रेम करतो. त्याचे मार्गदर्शन घेऊन सुखानं संसार करण्याची गरज वाटत नाही का? 

अल्लाहने आपल्या लाडक्या मेसेंजरला 'उज्ज्वल दिवा' का म्हटले आहे?. कारण मूहम्मद (स) साहेबांच्या चरित्रात अंधारामध्ये भटकणाऱ्या जगाला लख्ख दिसणारी प्रकाशवाट मिळाली. ज्ञानाचा प्रकाश उजळल्याने मनातील अंधार दूर करणे सोपे झाले. ज्ञानाचा प्रकाश उजळला. पैगंबर साहेबांनी जगासमोर विश्व रहस्यांचा आणि नैसर्गिक घटनांचा स्पष्ट सिद्धांत मांडला. ईश्वरावर श्रध्दा आणि विश्वासाचे स्वरूप कसे असावे हे पटवून दिले. मनुष्य आणि ही सृष्टी यांच्यातील संबंध काय? आणि ती कोणती 'मुल्ये' आहेत? ज्यांच्या आधारे ही सृष्टी टिकलेली आहे हे स्पष्ट केले. या सृष्टीत माणसाचे स्थान काय? त्याच्या जगण्याचा उद्देश काय? हे निदर्शनास आणले. माणसांच्या खऱ्या गरजा कोणत्या?  आणि त्या कशा प्राप्त कराव्यात? ह्या बाबतीत मार्ग निश्चित केले. कठीण आणि अत्यंत गुंतागुंतीच्या समस्यांना आणि जीवनात येणाऱ्या चढ उतारांना कसं सामोरं जावं हे शिकवले. आणि तेही अगदी स्पष्ट भाषेत आणि स्वाभाविक शैलीत, अशा प्रकारे की माणसाच्या मनात खोलवर जाऊन रुजतात.

आदरणीय अंतिम प्रेषित साहेबांची शिकवण कयामत येईपर्यंत म्हणजे न्यायाच्या दिवसापर्यंत जगातील प्रत्येक मानवासाठी, प्रत्येक देशासाठी आणि प्रत्येक काळासाठी एक उज्ज्वल दिव्याप्रमाणे आहे. त्यांच्यामुळेच अंधारात भटकणाऱ्या जगाला सुविधापुर्ण आणि सुरक्षित मार्ग मिळाला. ज्याचा सुखद अनुभव आजही त्या मार्गाने जाणाऱ्यांना होतो. पण त्यांनी दिलेल्या शिकवणीकडे जर दुर्लक्ष केले तर निश्चितच मानवतेला अंधारातच भटकावे लागेल. हा स्पष्ट संदेश सर्वप्रथम आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना देतो. स्वतःला मूहम्मद (स) साहेबांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्या प्रत्येक मुस्लिम बांधवाला आम्ही नेहमीच अपील करतो की त्याने कुरआन व हदीसनूसार आपले जीवन व्यतीत करावे. आणि स्वतः दिव्यासारखे बनून जगात पसरलेल्या अंधकारांना मिटवण्यासाठी, दृढनिश्चयाने प्रामाणिक प्रयत्न करावे.

अंधारातून प्रकाशाकडे यायचं असेल, तर सैतानी मार्ग, ईशद्रोहाचे मार्ग सोडावे लागतात. ईश्वराने प्रत्येकाला नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतच राहावं लागतं. शिरजोरी करता येत नाही. अधिकारांचा गैरवापर न करता सदुपयोग कसा होईल हे बघावं लागतं. दंडेलशाही, इच्छाभक्ति सोडून मनमानीला आळा घालावा लागतो. हे मान्य नसेल तर भटकण्याशिवाय पर्याय नाही.रस्त्यावरून गाडी चालवताना कोणता मार्ग योग्य? आणि कोणता धोकादायक यासंबंधी स्पष्ट इशारा देणारे बोर्ड समोर असूनही जर माणूस बेफिकीरीने जात असेल तर पुढे अडचणीच्या वाटा तर येणारच. लुटमारही होऊ शकते आणि अपघातही होतात. 

मरणोत्तर जीवनात कयामतच्या दिवशी जेंव्हा संपूर्ण मानवजातीला अल्लाहच्या न्यायालयात हजर केले जाईल. जिथे प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांचा जाब द्यायचा आहे. त्यावेळी मृत्यू येईपर्यंत जो अनेकेश्वरवादीच राहीला, त्याला माफी नाही. त्याच्याशिवाय अल्लाह आपल्या कृपादृष्टीने ज्या ज्या माणसांच्या एकंदरीत कामगिरीवर प्रसन्न होऊन, त्यांच्या अपराधांना दुर्लक्ष करून क्षमा करेल आणि स्वर्गात दाखला देईल, ते आहेत यशस्वी लोकं. अल्लाहचा प्रकोप आणि नरकाग्निपासून जे सूटतील ते आहेत खरी सफलता प्राप्त करणारे. सर्व प्रेषितांनी वास्तविक मुक्ती यालाच म्हटले आहे.

पहिलं काम आहे श्रद्धा :- संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता, मालक, पालक असलेल्या अल्लाहवर त्या एकमेव ईश्वरावर श्रद्धा ठेवावी. त्याच्या अस्तित्वात आणि गुणांमध्ये कुणालाही भागीदार ठरवू नये. अनेक ईश्वरांची कल्पना करून त्यांची भक्ती करणाऱ्याला माफ केले जाणार नाही. हे खुद्द ईश्वराने कुरआनमध्ये म्हटले आहे.

 दुसरे आहे सत्कर्म :- दुराचार सोडून सदाचाराचा मार्ग धरावा. प्रत्येकाला त्याचे हक्क द्यावे आणि आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडावीत.

तिसरे :- आपण स्वतःसाठी जो श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग निवडला त्याची शिकवण, उपदेश एकमेकाला करत राहणे. एकमेकांच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे. वाईट गोष्टींना किमान मनात तरी वाईटच समजावे, आणि ते मिटवण्याकरता प्रयत्न करत राहावे. जास्त मागे न जाता फक्त या शंभर वर्षांचा इतिहास बघा. स्वार्थापोटी लाखो निरपराध माणसं युद्ध ,दंगली आणि इतर भेदभावाच्या नावावर मारली गेली. 'मुलगी नको' असे म्हणत गर्भावस्थेत कित्येक जीव घेतले गेले. याविरोधात किती लोकांनी आवाज उठवला? जाणीवपूर्वक किती प्रयत्न केले?  कित्येक महिला आणि निरागस मुला-मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला.पण लोकं आपापल्या दूनीयेत मग्न. जणु काही शेजारच्या घराला लागलेली आग माझ्या घरापर्यंत पोहोचणार नाही. 

आणि चौथे :- हे की, ही वाटचाल करताना आपल्यावर कितीही संकटे आली, कसल्याही अडचणी निर्माण झाल्या,  कितीही कष्टांना तोंड द्यावे लागले आणि कोणताही त्याग करावा लागला तरी त्यासाठी लागणारी सहनशीलता, धैर्य, आणि संयम आपल्या अंगी बाळगणे.

आपण प्रार्थना करू या की हे अल्लाह! तू प्रसन्न होईल अशा मार्गावर चालण्याची आम्हाला शक्ती दे. आमीन


- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636  

औरंगाबाद



१ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी घोषित करण्यात आली होती. परंतु दारूबंदी घोषित झाल्यानंतर अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली.हीच परीस्थिती गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील दिसून येते.महाराष्ट्रात वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर या तिन जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली आहे.परंतु असे म्हटले जाते की महाराष्ट्रात सर्वात जास्त अवैध दारूविक्री ही दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैधरित्या होत असते व होत आहे.या जिल्ह्यात सरकार दरवर्षी करोडो रुपयांची अवैध दारू पकडते तरीही अवैध दारूचा धंदा कमी होण्यापेक्षा वाढत आहे. मग दारू बंदीला काय अर्थ? सरकारला दारू बंदी करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी घोषित केली पाहिजे. तेव्हाच दारूबंदीला महत्त्व येईल.महाराष्ट्रातील जनतेपुढे प्रश्न आहे की फक्त तिन जिल्ह्यातच दारू बंदी का?

चंद्रपूर जिल्ह्यात सरकारने २०१५ मध्ये दारू बंदी घोषित केली. त्यावेळी भाजपा सरकार होती. आता महाराष्ट्रात कॉंग्रेसची सरकार आहे.त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदीच्या बाबतीत राजकारण होतांना दिसून येते. आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटवीण्याकरिता वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब सुरू असल्याचे दिसून येते. मी यावर हेच सांगु इच्छितो की महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यांचा भेदभाव न करता संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी जाहीर करावी किंवा दारू विक्री खुली करावी.

महाराष्ट्र सरकारने कोव्हीड-१९ च्या काळात सर्वप्रथम प्राधान्य दारू विक्रीला दिले. कारण दारू विक्रीमुळे सरकारची तिजोरी भरत असते व भरत आहे. सरकारला दारू विक्री करायचीच आहे तर मग मोजक्या जिल्ह्यात दारूबंदी का असावी? हा गंभीर प्रश्न आहे. आजही महाराष्ट्रात दारूबंदी व दारू विक्री वर मतभेद मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून दारूबंदीची मागणी उठत आहे. परंतु सरकार यावर मौन आहे. सर्वसामाण्य व्यक्ती दारूबंदीच्या समर्थनार्थ पूर्णपणे उभा आहे. परंतु सरकारला मुळातच दारूबंदी नको आहे. तरीही सरकारने महाराष्ट्रात अनेक दारू बंदीचे मोठमोठे ऑफिसेस उघडल्याचे आपल्याला पहायला मिळतात. मग सरकारने असा खेळ सर्वसामान्यांशी का करावा? २४ मे १९३४ मध्ये महात्मा गांधींच्या आदेशाचे पालन करून कलार समाजाने आपल्या पारंपरिक व्यवसायावर "बहिष्कार" टाकला आणि महाराष्ट्रातील संपूर्ण कलार समाज स्वतंत्र लढ्यात तुटून पडला. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारचे काम होते की कलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय परत करने. परंतु सरकारने विश्र्वासघात केला आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की कलार समाजाला फक्त १ टक्के दारूचे परवाने मिळाले बाकी ९९ टक्के परवाने राजकीय पुढारी व त्यांच्या आप्तांना देण्यात आले आणि सरकारने दारूच्या व्यवसायाचे "राजकारण" केले व भेसळयुक्त दारू बनवायला सुरुवात झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी सुध्दा झाली.

कलार समाजाने अनेकदा आवाज उचलला की सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावी अन्यथा कलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय परत करावा. जर महाराष्ट्रात दारू बंदी होती असेल तर कलार समाज त्याचे स्वागतच करेल. त्याचप्रमाणे सरकारने दारू व संपूर्ण नशेली पदार्थ (तंबाखू, खर्रा, सिगारेट, बीडी) यांच्या विरोधात केंद्र व राज्य सरकार नेहमी अभियान छेडत असते व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला सांगत असते की कोणतीही नशा घातक आहे याकरिता सरकारने मोठ-मोठी ऑफिसेस खोललेली आहे व अनेक सामाजिक संस्थासुध्दा कार्यरत आहे यामुळे कॅन्सर सारखे रोग होतात असे सांगण्यात येते. मग सरकार या वस्तुच्या विक्रीला प्रथम प्राधान्य का देतात?

दारूबंदीचे ऑफिस आणि नशाबंदीचे ऑफिस कशासाठी? फक्त सरकारी तिजोरी भरण्यासाठी काय? सरकारला आर्थिक अडचण दूर करायची असेल तर सर्वप्रथम राजकीय पुढाऱ्यांच्या व भ्रष्टाचाऱ्यांच्या "तिजोरीवर धाडी" टाकणे आवश्यक आहे. यामुळे राज्य सरकारची तिजोरी तर भरेलच या व्यतिरिक्त दुप्पटीने पैसा जमा होईल ही सत्य परिस्थिती आहे. दारू ही अत्यावश्यक वस्तू नाही त्यामुळे दारू विक्री करीता सरकारने जास्त उतावीळ होने घातक सिध्द होऊ शकते. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की दारूबंदी किंवा दारूविक्रीवर समीक्षा करण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी केली तर याचे सर्वच स्तरातून स्वागत होईल.


- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो.नं.९३२५१०५७७९



वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यामागे अफगाणिस्तान आणि उसामा बिन लादेन यांना जबाबदार धरून त्यावेळच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी धमकी दिली होती की आम्ही अमेरिकेची धाक आणि धमक हल्लेखोरांना दाखवून देऊ. अमेरिकेच्या धमकीला अफगाणिस्तानने काहीच किंमत दिली नव्हती. उसामा बिन लादेनला अमेरिकेच्या स्वाधीन करण्याचा दबाव आणि दडपण आणल्यानंतरची ही गोष्ट, अफगाणिस्तानवर कितीही दडपण आणले तरी ते बिन लादेनला अमेरिकेच्या हवाली करणार नाही हे स्पष्ट केले होते.

अमेरिकेच्या त्या धाक आणि दपटशाला कुणी कवडीचीही किंमत दिली नव्हती, पण तिथल्याच राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची लक्तरे जगाच्या चव्हाट्यावर टांगली. आजवर कोणत्या सत्ताधाऱ्याने, राजाने आपल्याच सत्तेच्या केंद्रावर स्वतःच लोकांना हल्ला करण्याची चिथावणी दिली नसेल ती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आणि तिथल्या नागरिकांनी आपल्याच सत्ताकेंद्रावर म्हणजेच कॅपिटल हिलवर दहशदवादी हल्ला करून जगाला दाखवून दिले की महान दहशतवादी देश आणि प्रजा अमेरिकेशिवाय इतर कोणीही नाही. अमेरिकेतील गुन्हे तपासणी संस्थेने (FBI) अशी चेतावणी दिली आहे की अमेरिकेत सर्वत्र मोठ्या हिंसेच्या घटना घडू शकतात. म्हणजे फक्त कॅपिटल हिलवर हल्ला करून दहशतऴादी थांबणार नाहीत तर देशात सर्वत्र हिंसा आणि अराजकता माजवणार आहेत, हे स्पष्ट आहे. याचे कारण असे की ज्या लोकांनी ट्रम्प यांच्या सांगण्यावरून हिंसाचार माजविला आहे त्यांना सध्याच्या अमेरिकेतील लोकशाही व्यवस्था आणि तिथल्या राजकीय व्यवस्थेत, तिथल्या काळ्या लोकांची भागीदारी नको आहे. ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले आहे की राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात त्यांची मते विरोधी पक्षाने चोरलेली आहेत, म्हणजे मतदान हा साऱ्या नागरिकांचा समान अधिकार नाही. तो फक्त वंशवादी गोऱ्या लोकांचा अधिकार आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना स्पष्ट सांगितले होते की तुमची पळवलेली मते तुम्ही परत आणा. यासाठी त्यांनी कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. 1861-64 पर्यंत गुलामी प्रथेचे समर्थक आणि विरोधक यांच्यात चाललेले गृहयुद्ध संपले. त्यात  लाखो लोक ठार झाले तरी गुलामी प्रथेच्या बाजूने असलेल्या मानसिकतेतून ट्रम्प यांनी पुन्हा स्पष्टच इशारा दिलेला आहे की भविष्यात तिथले देशभक्त आणखीन मोठ्या ताकदीने असे हल्ले करू शकतील.

आता अमेरिकेने आधी आपल्या देशाची घटना, लोकशाही, समता, उदारमतवादाकडे जास्त लक्ष द्यावे, इतर देशांवर या मूल्यांची जोपासना करण्याच्या बाता मारू नये. खरे पाहता अमेरिकेला या मूल्यांत काहीही रस नाही. त्याला इतर देशांना आधी उद्ध्वस्त करायचे आहे. कोट्यवधींची हत्या करायची आहे आणि मग त्यांना गुलाम बनवायचे आहे. त्यांनी आपल्या देशांतर्गत गुलामी प्रथेला थांबवले असले तरी ती प्रथा त्यांना जगभर रुजवायची आहे, हे साऱ्या राष्ट्रांनी समजून घ्यावे आणि आता तरी अमेरिकेच्या धमक्या, धाकाला भीक घालू नये.

या घटनेसाठी ट्रम्प यांनाच फक्त देशी धरता येत नाही. त्यांच्या कृत्यांना त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. हा ट्रम्प यांचा खाजगी अजेंडा नसून गोऱ्या वंशवादी राजकारण्यांचा तो भविष्याचा कार्यक्रम आहे, ज्याकडे ट्रम्प यांनी स्वतः बोट दाखवले आहे. भविष्यात तिथले देशभक्त म्हणजे गोरे वंशवादी आणखी ताकदीने हिंसक कारवाया करतील तेव्हा अमेरिकेने आता आपल्या देशभक्तांना आवर घालावा, जगभरातील राष्ट्रांची चिंता करू नये. ज्यांनी संसदेवर हल्ला केला होता त्यांनी आपल्या हातात जे ध्वज घेतलेले होते ते तिथल्या गुलाम प्रथेचे समर्थक होते आणि संसदेवर सशस्त्र हल्ला करत असतानाही कॅपिटल हिलवर पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कोणतीच कारवाई केली नाही. त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले नाही. म्हणजे त्यांना त्यांचेसुद्धा समर्थन होते हे स्पष्ट आहे. अशीच घटना आपल्या देशातही घटली होती. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त होताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. याचा अर्थ अमिरका असो की भारत की आणखीन कोणते राष्ट्र साऱ्या जगात अशा मानसिकतेचे लोक आहेत ज्यांना असे वाटते की सत्ता आणि व्यवस्थेवर फक्त त्यांचाच अधिकार आहे. बाकीच्या सर्व लोकांनी त्यांची गुलामी पत्करावी.

याच मानसिकतेतून आज भारतात अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. ज्या देशातील 70 टक्के जनता फक्त कृषी आणि कृषिसेवांबर जगत आहे त्यांना त्यांच्या व्यवसायातून नामोहरम करण्यासाठी भांडवलदारांच्या सोयीसाठी कायदे केले जातात. त्यामागे अमिरकी वंशवादी भांडवलदारी परंपरेचीच मानसिकता आहे, हे उघड आहे. तसे नसते तर गेल्या दोन महिन्यांपासून लाखो लोकांनी आपली घरेदारे, व्यवसाय-धंदे, शेतीवाडी सोडून रस्त्यावर बसले आहेत त्यांची मागणी मान्य करायला आपल्या सरकारने नकार दिला नसता. आज जे अमेरिकेत घडले उद्या तेच भारतातही घडणार का अशी चिंता सर्वत्र व्यक्त केली जात आहे. तसे काही घडलेच तर मग देशाचे भवितव्य काय असेल याचा सर्वांनाच अंदाज असेल. म्हणून वेळीच याची दखल घेऊन शेतकरी आंदोलनाला साऱ्या नागरिकांनी समर्थन द्यावे. त्यांच्या बाजूने उभे राहावे यातच सर्वांचे हित आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Quran

अल्लाहने मानवाला बुद्धी दिली आहे ज्याद्वारे तो ज्ञानप्राप्ती करतो. त्याला विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती बहाल केली आहे, ज्याद्वारे तो चांगल्या आणि वाईटाची पारख करू शकतो. खरे आणि खोटे ओळखण्याची जन्मजात कुव्वत माणसाला लाभलेली आहे. या साऱ्याबरोबरच त्यास इच्छा, योजना, अधिकार आणि स्वातंत्र्यही दिलेले आहे. विचार आणि विवेकाचा उपयोग करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मानवाला दिले गेले आहे. माणूस शिकला सवरलेला नसला तरी या सर्व उपजत गोष्टींमुळे चूक आणि बरोबर, खरे आणि खोटे, चांगले आणि बाईट याबद्दलची पारख त्याला आपसुकच येते. प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणत्या न कोणत्या वळणावर त्याच्या निर्मितीबाबतचे प्रश्न पडतातच. त्याचबरोबर मरणोपरांत आपले काय होईल हाही प्रश्न अधूनमधून छळत असतो. प्रत्येक माणूस आपले ज्ञान, आपले विचार आणि विवेकानुसार या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. माणूस अशिक्षित असला तरी त्याला त्याच्या निर्मात्याचा ध्यास असतो.

जगातील सारी विश्वविद्यालये अलिकडच्या काळात म्हणजे गेल्या आठ-दहा शतकांत प्रस्थापित झालेली आढळतात. मग त्यापूर्वी सारे लोक अज्ञानी होते काय? किंबहुना आधुनिक विज्ञान हे अलीकडच्या दोन-तीन शतकांत प्रस्थापित झाले आणि प्रगल्भ झाले असे म्हणता येईल. म्हणजेच मानवाच्या निर्मितीपासूनच अल्लाहने प्रत्येक मानवाला मग ती स्त्री असो की पुरुष बुद्धी, विवेक, आकलन, वैचारिक बैठक, निर्णयक्षमता त्याचबरोबर स्वातंत्र्यही दिले आहे.

आधीपासूनच श्रद्धावंत आणि नास्तिक यांचे आपले आपले हेवेदावे आणि विचार आहेत. आधुनिक विज्ञानवादी ही सारी सृष्टी कोणी निर्माण केली नसून ती स्व: निर्माण झालेली आहे असे मानतात. तर श्रद्धावंत या सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे असा दृढ विश्वास बाळगून आहेत. खरे पाहता विश्वातील प्रत्येक वस्तू नियमांच्या व बंधनांच्या अधीन आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आपापल्या कक्षेत नियमबद्ध भ्रमण करीत असून ते आपला वेग तसूभरही कमीजास्त करू शकत नाहीत. वस्तु: अंतरिक्षातील सर्व लहानमोठ्या ग्रहापासून पृथ्वीतलावरील अगदी सूक्ष्म जीव-जंतू असो की अणु-रेणू असो सर्वांना त्यांना घालून दिलेल्या नियमातच रहावे लागते. खुद्द मानवदेखील निसर्गनियमांच्या अधीन आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू, प्राणीमात्र, जीवजंतू, वनस्पती यांच्यासाठीही काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसारच त्यांची उत्पत्ती होते आणि क्षतीही. ईश्वरी नियमानुसारच सारे सजीव त्यांना घालून दिलेल्या काळाच्या मर्यादेत जिवंत राहून जगतात आणि मरणही पावतात. साक्षात मानवाच्या जीवनाचा आढावा घेतल्यास तोसुद्धा या नियमांच्या अधीन आहे असे सिद्ध होते. किंबहुना जो माणूस स्व:च्या ताकदीवर आणि हिमतीवर गर्व करतो त्याच्या श्वासोच्छवास, हृदयाचे आकुंचन प्रसरण, चालत असताना हातांची होणारी लयबद्ध हालचाल, त्याची पचनसंस्था इतकेच काय त्याच्या पापण्यांची उघडझाप सुद्धा त्याच्या हातात नाही.

काय आहे अंधार?

एखादा इसम आपल्या जन्मदात्या मातापित्याच्या अस्तित्वालाच मानत नसेल तर अशा माणसास आपण काय म्हणाल? ही सारी सृष्टी अशीच किंवा आपोआपच निर्माण झालेली नसून या सृष्टीचा एक निर्माता आहे असा ठाम विश्वास श्रद्धावंताचा आहे. नास्तिक आणि आधुनिक विज्ञानवादी या सिद्धान्तांना मानत नसले तरी ते आपल्या दाव्यास सिद्धही करू शकलेले नाहीत. विश्वातील बहुतांशी लोक ईश्वराचे अस्तित्व मानतात, कारण श्रद्धा ही मानवी स्वभाव आहे. बहुतांशी लोक कोणा न् कोणावर श्रद्धा बाळगून असतात. काहींची श्रद्धा देवावर, गुरू, बुवा, बाबा, पीर, फकीर, ऋषीमुनी, देवी-देवता, प्राणिमात्र इतकेच नव्हे तर पंचमहाभुतातील अग्नी, वायू, जल, आकाश, ग्रह-तारे, चंद्र, सूर्य यापासून ते थेट सैतान, राक्षसावरही असते. जो तो आपल्या मर्जीनुसार, परंपरेनुसार किंवा त्याला झालेल्या साक्षात्कारानुसार आपली श्रद्धा ठेवतो. आपण ज्याला पूज्य मानतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे काय? याचा आपला विवेक वापरून जो विचार करत नाही तो खरा अंधारात आहे. डोळे असून आंधळा आहे, ज्ञान असून अज्ञानी आहे, ऐकू येणारा असून बहिरा आहे. जगातील असे कोट्यावधी लोक अशा अंधाराच्या खाईत आपले जीवन व्यतीत करीत आहेत. खरा ईश्वर कोण, आपला निर्माता कोण, आपल्या निर्मितीचा उद्देश काय, मरणानंतर आपले काय होईल? असे प्रश्न या अंधारातल्या लोकांना पडत नसतील? मानवाच्या स्व:च्या मर्यादा आहेत. असे असूनसुद्धा माणूस ‘अश्रफुल मखलुकात’ म्हणजेच अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. सृष्टीतील सर्व सजीवांपैकी केवळ मानवाला बुद्धी मिळाली आहे ज्याद्वारे तो विचार करू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला स्व:चे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे. आपल्या हिताचे आणि अहिताचेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे. अशी बुद्धिमत्ता, वैचारिक पातळी, निर्णयप्रक्रिया आणि स्वातंत्र्य हे मानवाशिवाय कोणत्याही प्राण्यास नाही, त्यामुळेच तर मरणोपरांत जीवनात ऐहिक जीवनातील पापपुण्यांचा हिशेब फक्त मानवाचाच घेतला जाईल, इतर प्राण्यांचा नाही. त्यामुळे आपण माणूस म्हणून जगताना आपल्या निर्मात्यास ओळखण्याची, त्याची उपासना करण्याची, त्याच्यावर श्रद्धा बाळगण्याची किंवा न बाळगण्याची मुभा अल्लाहने मानवाला दिली आहे. सृष्टीतल्या इतर सर्व गोष्टी जसे सूर्य, चंद्र, तारे, आकाश, धरणी, झाडेझुडपे इतकेच काय सर्व प्राणीसुद्धा अल्लाहचीच उपासना करतात. अल्लाहची उपासना करण्याचे व न करण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे.

खरे तर अल्लाहने मानवाची निर्मिती अल्लाहच्या उपासनेसाठीच केलेली आहे. कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे, ’’आणि आम्ही (अल्लाहने) जिन्न आणि मानव यांना आमच्या उपासनेसाठी निर्माण केले आहे.’’ (कुरआन, 51:56) याचा अर्थ मानवाची निर्मितीच मुळात अल्लाहच्या उपासनेसाठीच झालेली आहे. परंतु त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता आणि विवेक याचा वापर करून अल्लाहची उपासना करायची की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्यदेखील दिलेले आहे. तसेच सृष्टीत अशी अनेक चिन्हेही दाखवलेली आहेत ज्यातून अल्लाहच्या अस्तित्वाचे प्रकटीकरण होते.

तुम्ही अल्लाहची उपासना करा किंवा न करा तो तुम्हाला तुम्ही जिवंत असेपर्यंत दाणापाणी देण्याची व्यवस्था करतो. त्याने तुमची निर्मिती केली आहे त्यामुळे तुम्हाला दाणापाणी देण्याची जबाबदारीही घेतली आहे. प्रथम मानवाच्या निर्मितीपासून अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीस विविध प्रकारे मार्गदर्शनही केलेले आहे. विश्वाच्या विविध स्थळी आणि वेळी आपले पैगंबर पाठवून मानवाला असे ठाम आणि स्पष्टपणे सांगितले की, ’’अल्लाहशिवाय उपासनेयोग्य कोणीच नाही.’’ हा एकमेव संदेश देण्यासाठी आणि मानवाला सन्मार्ग दाखविण्यासाठी विविध ग्रंथांचे वेळोवेळी अवतरणही केले. आता इतके सर्व स्पष्ट सांगितलेले असताना जर एखाद्या व्यक्तीने अल्लाहचा इन्कार केला अथवा त्याची उपासना नाकारली तर तो खरेच इतक्या लख्ख आणि स्वच्छ प्रकाशातही गडद अंधाराच्या अधिपत्याखाली नाही काय? त्यामुळे प्रत्येक माणसाने आपण ज्याची पूजा करतो, ज्यांची उपासना करतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे की नाही याची तपासणी केली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा हा अंधार अधिकाधिक गडद होत जाऊन आपण त्यात सामावले जाऊ हे जाणून घेतले पाहिजे. हा जाणून घेण्याचा काळ केवळ आपल्या मृत्यूच्या काळापूर्वीची वेळ आहे. त्यानंतर मात्र या अंधारातून उजेडाकडे जाणे शक्य नाही. याचा अर्थ असा होतो की जे अल्लाहवर विश्वास ठेवतात, त्याची उपासना करतात, त्याला आपला निर्माता मानतात आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या सन्मार्गावर मार्गक्रमण करतात त्यांनाच मरणोपरान्त जीवनात जन्नत मिळणार आहे. यात महत्त्वाची अट अशी की, अल्लाहशिवाय इतर कोणाचीच उपासना त्यांनी करू नये आणि त्याच्या उपासनेत कोणासही भागीदार बनवू नये. त्याचबरोबर प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत असे मानणे आणि सत्कार्य करणेही अत्यावश्यक आहे. नेमके हेच कलमा-ए-तौहीदमध्ये म्हटलेले आहे. ते असे- लाइलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलल्लाह अर्थात- अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही (उपासनेयोग्य) आणि मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.

जो यावर विश्वास ठेवत नाही, अल्लाहची उपासना करीत नाही तो खऱ्या अंधारात आहे. आपण उच्च विद्याविभूषित असलो तरी धर्माच्या बाबतीत कधीच खोलवर जात नाही. वाडवडिलांपासून किंवा पारंपरिकदृष्ट्या जे धार्मिक संस्कार आपल्यावर होतात तेच आपण बरोबर मानून त्याचीच अंमबजावणी करतो आणि तसेच संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीवर करतो. हेच आपल्यावर केलेले संस्कार योग्य आणि बरोबर आहेत की नाही याची तपासणी करणे आपले कर्तव्य नाही काय? किंबहुना डोळस असून शुद्ध आंधळेपणाने आपण त्यावर आचरण करतो. खरे तर हा आपला बौद्धिक अंधार आहे. आपल्या ईश्वराला ओळखण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा कधीच वापर करत नाही. ही आपली बौद्धिक दिवाळखोरी नाही का?

जे अल्लाहची उपासना करणार नाहीत, त्यास आपला निर्माता मानणार नाहीत, अशा व्यक्ती जे त्रिवार सत्य आहे ते लपवतात अथवा त्याचा इन्कार करतात अशांनाच काफीर असे संबोधले जाते. हे त्रिवार सत्य म्हणजे अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव निर्माता, मालक, पालनकर्ता आहे आणि केवळ तोच उपासनेच्या लायक आहे. किंबहुना साऱ्या सृष्टीने फक्त त्याची उपासना करणे हा त्याचा हक्क आहे. मरणोपरांत जीवनात अल्लाहची उपासना न केल्यामुळे, त्यास आपला निर्माता मानण्यास इन्कार करणारे तोट्यात राहतील. नरकाग्नीत त्यांना शिक्षा दिली जाईल आणि त्यातून ते बाहेर कधीच येणार नाहीत. कुरआन मजीदमध्ये असा उल्लेख आहे की, जे अल्लाहचा इन्कार करतात त्यांनी इहलोकी जीवनात कितीही सत्कार्य केले तरी पारलौकिक जीवनात ती सर्व सत्कार्ये मृगजळाप्रमाणे असतील. परंतु अल्लाह कोणावरही अन्याय कधीच करीत नाही. त्याचा इन्कार करणाऱ्यासही त्याच्या सत्कार्याचा योग्य तो मोबदला तो याच जीवनात देतो, मग तो मोबदला त्याच्या संपत्तीच्या स्वरूपात असेल, प्रसिद्धीच्या स्वरूपात असेल, आरोग्याच्या स्वरूपात असेल किंवा त्याच्या मुलांबाळांच्या स्वरूपात असेल.

‘कुफ्र’ या शब्दाचा खरा अर्थ लपवणे किंवा झाकणे असा आहे आणि जो मनुष्य अल्लाहच्या सत्याचा इन्कार करणारा आहे तो श्रद्धाहीन आहे. त्यालाच काफीर असे म्हटले जाते. कुफ्र हे एक घोर अज्ञान आहे आणि अल्लाहशी अनभिज्ञ असणे यापेक्षा मोठे अज्ञान काय असू शकते? खरे तर कुफ्र एक अत्याचार आहे. कृतघ्नता आहे. अल्लाहशी प्रतारणा, विद्रोह आहे. त्यामुळे मनुष्याने वेळीच या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या निर्मात्यास अर्थात अल्लाहला ओळखून त्याच्या उपासनेच्या उजेडाकडे आपले पाऊल टाकले पाहिजे. तरच आपल्याला मरणोपरांत जीवनात खऱ्या अर्थाने यश प्राप्त होईल.

प्रकाशाच्या वाटा

कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

‘‘जे ईमानधारक आहेत त्यांचा मित्र अल्लाह आहे. तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशाकडे आणतो.‘‘ (कुरआन, 2:257)

खरे तर अंधाराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारांनाही वेगवेगळे पदर आहेत. या उलट प्रकाश हा एकमेवाद्वितीय आहे. एकदा प्रकाशाची किरणे आली की कोणत्याही प्रकारच्या अंधकाराला जागाच उरत नाही. परंतु हा उजेड प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारचे अडथळे मात्र दूर केले पाहिजेत. कारण अंधार करण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. उदा. तुम्ही डोळे बंद करा अंधार होईल, तुम्ही पडद्याआड व्हा अंधार होईल किंवा अशी कोणतीही गोष्ट करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत उजेड पोहचणार नाही. परंतु तुम्ही डोळे उघडले तर समोर उजेड दिसेल. उजेडाच्या साऱ्या वाटा केवळ अल्लाहपासून सुरू होतात, कारण तोच या सृष्टीचा निर्माता आहे आणि पालनकर्ताही. अल्लाहने म्हटले आहे,

’’अल्लाह श्रद्धावंताचा मित्र आहे आणि श्रद्धाहीनांचा कोणी वाली नाही.‘‘ (कुरआन, 47:11)

या संदेशाद्वारे अल्लाह हे सांगू इच्छितो की जे अल्लाहवर श्रद्धा ठेवून त्याची उपासना करून श्रद्धावंत झाले आहेत त्यांना त्याने त्याच्या खऱ्या उजेडात आणले आहे. त्यांच्या आयुष्यभर ते त्या प्रकाशाच्या झगमगाटात राहतील. हा प्रकाश ईमानाचा आहे, श्रद्धेचा आहे. हा उजेड दाखवण्यासाठी अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीसाठी वेगवेगळे पैगंबर पाठविले. वेगवेगळ्या धर्मग्रंथांचे अवतरण वेगवेगळ्या वेळी केले. कुरआन मजीद हा ग्रंथ अवतरित करून अल्लाहने कयामतपर्यंत सकल मानवजातीला उजेडाचा स्रोत निर्माण करून दिला आहे. म्हणून अल्लाह कुरआन मजीदमध्ये म्हणतो-

’’हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे जेणेकरून तुम्ही मानव समाजास अंधारातून प्रकाशाकडे आणाल हे अल्लाहच्या आज्ञेने आणि त्या सर्वशक्तिमान अल्लाहच्या मार्गाकडे.‘‘ (कुरआन, 14:1)

याचा अर्थ असा होतो की अल्लाह आपला निर्माता आहे आणि त्याने सर्व पैगंबरांना आज्ञा दिली की त्यांच्या अनुयायांना अंधारातून प्रकाशाकडे आणा. वरील आयतीत अल्लाहने दोन गोष्टींचा उहापोह केला आहे तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि त्यानंतर अल्लाहच्या मार्गावर मार्गक्रमण. उजेडाकडील प्रवास म्हणजे अल्लाहवर श्रद्धा आणि सन्मार्ग होय. आणखी एका ठिकाणी कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

’’अल्लाह आकाशांचा आणि पृथ्वीचा प्रकाश आहे.‘‘ (कुरआन, 24:35)

या आयतीद्वारे अल्लाहने स्पष्ट केले आहे की तोच खऱ्या प्रकाशाचा स्रोत आहे. त्यामुळे जे अल्लाहची मर्जी प्राप्त करण्यासाठी शांततामय सन्मार्गावर चालतात त्यांना अल्लाहच श्रद्धाहीनतेच्या अत्यंत खोल आणि काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी मदत करतो आणि त्यानुसार मार्गदर्शनही करतो.

उजेडाची ही वाट अत्यंत खडतर असली तरी ज्यास अल्लाहची मर्जी प्राप्त होते त्यास ती सहज साध्य होते. प्रकाशाची ही वाट त्याचे इहलोकातील जीवनच फक्त सुखी, समृद्ध, समाधानी करत नाही तर परलोकातही त्यास जन्नतच्या स्वरूपात कायमस्वरूपी उजेडप्राप्ती होते. हा प्रकाश त्यानंतर कधीही न संपणारा आहे. खरे तर या जीवनरूपी परीक्षेचे ते फलितच आहे. यासाठी आपल्या बुद्धीचा, सद्सद्विवेकाचा, विचारशक्तीचा वापर करून आपल्या अंतापूर्वी आपल्या निर्मात्यास ओळखले की तो सर्वशक्तिमान अल्लाह आपल्याला या जीवनातच वेढणाऱ्या काळ्याकुट्ट अंधारातून आणि मरणोपरांत नरकाग्नीच्या यातनेपासून वाचवेल. त्यामुळे आता आपणच ठरवायचे आहे की कायमस्वरूपी अंधारात आणि नरकाग्नीत राहण्यासाठी कोणाही ऐऱ्यागैऱ्याची पूजा उपासना करायची की सर्वशक्तिमान विश्वनिर्मात्याप्रती सश्रद्ध होऊन सन्मार्गावर चालून त्याची उपासना करून इहलोक आणि परलोकातही प्रकाशाचा मार्ग धरून यशाचे वाटेकरी व्हायचे.

बंधूभगिनीनो! आपण सारे एकाच आदम आणि हव्वाची लेकरे आहोत. आपले आयुष्य केवळ खाणेपिणे, उठणे-बसणे, झोपणे-जागणे, कमावणे-खाणे, चंगळमस्ती करणे यासाठी नसून आपल्या खऱ्या निर्मात्यास ओळखून त्याची उपासना करण्यासाठी आहे. जो अल्लाहला नाकारून इतरांना पूज्य मानतो तो खऱ्या अंधारात आहे आणि अशा स्थितीत त्याचा मृत्यू झाल्यास तो नरकाग्नीच्या खाईत लोटला जाईल आणि कायमस्वरूपी शिक्षा भोगेल. जो अल्लाहसाठी आपले सर्वस्व वाहील, फक्त त्याचीच उपासना करेल आणि त्याच्या प्रेषितांच्यामार्फत दाखविलेल्या मार्गावर चालेल तो अक्षय प्रकाशाच्या लखलखाटात राहील. त्यास जन्नत अर्थात स्वर्गप्राप्ती होऊन तिथला तो कायम निवासी राहील. आता आपण ठरवायचे की अंधारात गुरफटून राहायचे की प्रकाशाशी हातमिळवणी करायची. 



- डॉ. इकबाल मिन्ने

(लेखक : औरंगाबादचे रेडिओलॉजिस्ट असून, विख्यात साहित्यिक आहेत. संपर्क मो.- 7040791137)



जगात सगळ्यात जास्त घृणेचा सामना सत्य बोलणार्‍यांना करावा लागतो. इस्लाम सत्य आहे आणि त्या सत्याचा परिचय जगाला करून देणारे मुसलमान सत्य बोलतात म्हणून घृणेस पात्र ठरतात. 

कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि हा जगातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. समस्त मानवजातीला ”अंधारातून प्रकाशाकडे” नेण्याचा कुरआनचा उद्देश आहे. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे 22 ते 31 जानेवारी दरम्यान राबविल्या जाणार्‍या ”अंधारातून प्रकाशाकडे” या मोहिमेचा असा अर्थ काढला जावू शकेल की या मोहिमेदरम्यान, मानवाच्या अप्रगत अवस्थेतून प्रगत अवस्थेपर्यंतच्या आजपावेतोच्या स्थित्यंतराबद्दल चर्चा करण्याचा मानस असेल. परंतु येथे एवढा मर्यादित अर्थ नाही, कारण साधारणपणे प्रगती म्हणजे भौतिक प्रगती असा अर्थ काढला जातो. मात्र भौतिक प्रगती म्हणजेच सर्व काही नाही. मनुष्य जेव्हा भौतिक आणि नैतिक अशा दोन्ही प्रगती साध्य करतो तेव्हाच त्याचा सर्वांगीन विकास झाला अशी कुरआनची संकल्पना आहे. 

ही प्रगती साध्य करण्यासाठी खिलाफत अर्थात शासन ही संस्था उदयास आणली गेली. खिलाफत व्यवस्थेच्या अगोदर आणि त्यानंतर सुद्धा या व्यवस्थेव्यतिरिक्त शासनाचे अनेक प्रकार अस्तित्वात आले आणि लयास गेले. आज सर्वात जास्त लोकप्रिय शासन व्यवस्था म्हणजे भांडवलशाही लोकशाही व्यवस्था होय. यालाच कल्याणकारी लोकशाही असेही म्हटले जाते. या व्यवस्थेत संसाधनांची मालकी व्यक्तीची असल्या कारणाने याला सर्वश्रेष्ठ शासनप्रणाली समजली जाते. शीत युद्धानंतर जगात जवळ-जवळ सर्वच देशात ही शासन व्यवस्था अस्तित्वात आहे. मात्र कुरआनला अपेक्षित असलेली संतुलित प्रगती साध्य करण्यामध्ये ही व्यवस्थाही पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते. यात समग्र भौतिक आणि नैतिक प्रगती तर सोडा फक्त भौतिक प्रगती सुद्धा सर्वांची सारखी होत नाही. यात अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, गरीब, अतिगरीब अशी सामाजिक उतरंड अस्तित्वात आल्याचे दिसून येते. 

प्रेषितपूर्व काळातील अंधार

ये जब्र भी देखा है तारीख की नजरोंने 

लम्हों ने खता की थी सदीयों ने सजा पायी

आदिमानव अवस्थेपासून सातव्या शतकात येईपर्यंत जगात पूर्णपणे अंधार दाटलेला होता. राजे प्रजेला कस्पटासमान लेखत होते, ते प्रजेला स्व:ला सजदा (वंदन)  करण्यास भाग पाडत होते, माणसाची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत होती, स्त्रियांना कवडीची किंमत नव्हती, त्यांचा जन्मच अशुभ मानला जाई, त्यांना जन्म:च जीवंत पुरले जाई त्या काळात महिलांच्या बाबतीत ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे विचार अतिशय विकृत होते. तरतुलीयन नावाच्या ख्रिश्‍चन विचारकाचे महिलासंबंधीचे मत असे होते की, ”ती सैतानाची प्रवेशद्वार आहे. ती वर्जित वृक्षाकडे पुरूषाला घेऊन जाणारी आहे. ईश्‍वरीय कायद्यांना तोडणारी आणि पुरूषांना नष्ट करणारी आहे.”क्राईस्टोम नावाच्या ख्रिश्‍चन विचारकाचे स्त्रीच्या बाबतीत मत असे होते की, ती एक आवश्यक वाईटपण आहे. एक जन्मजात वासना, एक आवडणारे संकट, एक पारिवारीक संकट, एक नष्ट करणारी प्रिती, एक सजली सवरलेली आफत आहे” (संदर्भ : परदा, पृष्ठ क्र. 16). त्या काळात वेश्या व्यवसाय सुरू होता, छोट्या-छोट्या कारणांनी युद्धे होत होती, ती वर्षानुवर्षे चालत होती, अंधश्रद्धा प्रत्येक समाजात व्याप्त होती, मूर्तीपूजेचा जोर होता, पुरोहित वर्गाचे वर्चस्व होते, उच्चनीचतेची भावना प्रबळ होती, गरीबांना काडीची किंमत नव्हती, त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होत होते, बळी तो कानपीळीचे तत्व सर्वत्र समान पद्धतीने लागू होते. खोटे बोलण्याला चातुर्य समजले जाई, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार व्याप्त होता, भारतात तर अस्पृश्यतेसह चातुवर्ण व्यवस्था, सतिप्रथा आणि देविदासी प्रथा जोरात सुरू होती, दारू  पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त होती, समाजामध्ये जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जाई, त्यावर बायकोला डावावर लावण्याइतपर्यंत मजल जाई, लूटमार सामान्य बाब होती, विधवांचे हाल होते, पुनर्विवाहाला परवानगी नव्हती, तिला वारसा हक्क देण्याबद्दल कुठल्याच समाजात विचारसुद्धा करण्यात येत नव्हता.

इ.स.वी.च्या सातव्या शतकात जगात जेवढा अंधार दाटला होता तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच अंधार आज 21 व्या शतकातही दाटलेला आहे. हे खरे आहे काय? तसे पाहता सकृतदर्शनी तर जगात चोहिकडे रोशनाई आहे, प्रकाशाने जग उजळून निघाले आहे, घर, रस्ते, मॉल सगळे एलईडीच्या झगमगाटाने उजळत आहे, मानवाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स करण्यापर्यंत प्रगती साधलेली आहे, तंत्रज्ञानाने जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावलेले आहेत, एवढ्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत की, आज सामान्य माणसाला ज्या सोयी उपलब्ध आहेत, त्या पूर्वीच्या काळात राजा-महाराजांना सुद्धा उपलब्ध नव्हत्या. अन्नधान्यांचे अतिरिक्त उत्पादन होत आहे, कारखाने दिवसरात्र चालू आहेत, उद्योगधंद्यांनी चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनाचे पूर्वीचे सर्व किर्तीमान उध्वस्त केलेले आहेत, छोट्या दुकानापासून मोठ्या मॉल्समध्ये जीवनावश्यक वस्तूच काय चैनीच्या वस्तूंचीही रेलचेल आहे. एवढेच नव्हे तर मनोरंजनाची अत्याधुनिक साधने मानवाचे मन रिझविण्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत. महिलांना जमीनीपासून अवकाशापर्यंत मुक्त संचार करण्याची सोय आहे. त्यांना आर्थिकरित्या समर्थ करण्यासाठी समाजाने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. मग जमाअते इस्लामी हिंदला असे का वाटत आहे की आज समाजामध्ये अंधार दाटला आहे व समाजाला प्रकाशाकडे नेण्याची गरज आहे? 

या प्रश्‍नाचे उत्तर असे आहे की जग आज जरी दैदिप्यमान दिसत असेल तरी या डोळे दिपवणार्‍या प्रगतीमध्येच मानवतेची अधोगती लपलेली आहे. अंधार युगात राजे प्रजेला कस्पटासमान लेखत होते, आजही सत्ताधारी जनतेला कस्पटासमानच लेखत आहेत. याचे ताजे उदाहरण दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आहे. 40 दिवसांपेक्षा जास्त कडाक्याच्या थंडीत शेतकरी बसलेले असून, 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा या न त्या कारणाने बळी गेलेला आहे. तरी सुद्धा शासनकर्ते त्यांची दखल घेण्यास तयार नाहीत. म्हणजेच ते जनतेला कस्पटासमान लेखत आहेत. व्याजाच्या माध्यमातून गरीबांची कष्टाची कमाई भांडवलदार लूटत आहेत. माणसांची गुलाम म्हणून खरेदी विक्री जरी होत नसली तरी त्या गरीब मजुरांची अवस्था गुलामापेक्षा फारशी वेगळी नाही. स्त्रीयांना त्या काळातही कवडीची किंमत नव्हती आणि आजही नाही. त्या काळात वेश्याव्यवसाय सुरू होता आजही सुरू आहे. त्या काळात स्त्रियांना जन्मताच जीवंत गाडले जाई आजही भ्रुणहत्या केली जाते. किंबहुना त्या जन्म घेणारच नाहीत, याचे गर्भलिंग परीक्षण करून व्यवस्था केली जाते. त्या काळात युद्ध सुरू होती आजही युद्ध सुरू आहेत. ती वर्षानुवर्षे चालत होती आजही वर्षानुवर्षे चालत आहेत. तेव्हाही मनुष्यबळाची हानी होत होती आजही होत आहे. त्या काळी अंधश्रद्धा व्याप्त होती आजही व्याप्त आहे. त्या काळी मुर्तीपूजेचा जोर होता आजही आहे. त्याकाळी पुरोहित वर्गाचे वर्चस्व होते; आजही आहे, उच्चनीचतेची भावना प्रबळ होती; आजही आहे, गरीबांना किंमत नव्हती; आजही नाही. त्या काळी गरीबांवर अत्याचार होत होते; आजही होत आहेत. त्या काळी खोटे बोलण्याला चातुर्य मानले जाई आजही मानले जाते. त्याकाळी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार व्याप्त होता; आजही आहे. फरक एवढाच झालेला आहे की, भ्रष्टाचाराच्या आणि अत्याचाराच्या पद्धती ह्या सभ्य झालेल्या आहेत.  

मानवकल्याण म्हणजे काय? 

इस्लामचे पहिले आणि शेवटचे उद्देश मानवकल्याण आहे. या जगातही आणि परलोकातही माणसाचे कल्याण व्हावे यासाठी 1 लाख 24 हजार प्रेषितांना अल्लाहने पृथ्वीवर वेळोवेळी आपला संदेश देऊन पाठविले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी मानवकल्याण कशाला म्हणायचे हे अगोदर निश्‍चित केले गेले पाहिजे. कारण दारूविक्रीशी संबंधित व्यक्तींना दारूच्या व्यवसायात तर वेश्याव्यवसायाशी संबंधित व्यक्तींना वेश्या व्यवसायात तर सिनेसृष्टीतील व्यक्तींना सिनेसृष्टीत मानवकल्याण आहे असे प्रामाणिकपणे वाटत असेल. पण कुठलाही समजदार व्यक्ती याला मानवकल्याण म्हणणार नाही. मग मानवकल्याण म्हणजे शेवटी आहे तरी काय? तर त्याचे उत्तर असे की, इस्लाम केवळ धर्म नाही तर ती जीवन जगण्याची एक परीपूर्ण ईश्‍वरी व्यवस्था आहे व ईश्‍वरनिर्मित असल्यामुळे त्रुटीमुक्त आहे. या जीवन पद्धतीमध्ये दिल्याप्रमाणे ’साध्य’ म्हणजे मानवकल्याण आणि ’साधन’ म्हणजे शरियत होय. जगात सुरू असलेल्या सर्व मानवविरोधी कृत्यांचा त्याग करून अल्लाहने दिलेल्या पद्धतीचा अंगीकार करणे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडून जाणे होय. ती कृती कोणती आणि तो प्रकाश कोणता या प्रश्‍नाचे उत्तर कुरआनमध्ये खालीलप्रमाणे दिलेले आहे. 

”आणि घोषणा कर की, सत्य आले आणि असत्य नष्ट झाले. असत्य तर नष्ट होणारच आहे” (सुरे बनीइसराईल आयत नं. 81) 

  कोंबडा झाकल्याने उजाडायचे राहत नाही आणि कितीही खोटा प्रचार केला तरी इस्लाम सत्य धर्म असल्याची जाणीव प्रामाणिक लोकांना होतेच आणि ते त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत. जीवनाचा उद्देश न ओळखता सृष्टीकर्त्याच्या सृष्टीत निरूद्देश जगणे म्हणजे कृतज्ञ बणून जगणे होय. असे जीवन जगणारे लोक संतुष्ट राहूच शकत नाहीत. ते कायम असंतुष्ट असतात. अब्जावधींची संपत्ती, मोठमोठे बंगले, गाड्या, विमाने असून सुद्धा ते समाधानी राहत नाहीत. मरेपर्यंत चैनीच्या वस्तू गोळा करत राहणे आणि एक दिवस सगळे सोडून मरूण जाणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्देश असते. अशा परिस्थितीत सत्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय निरूद्देश जीवनाला सार्थकत्व प्राप्त होत नाही. सत्य लक्षात आल्याशिवाय, असत्याचा नाश होत नाही, अशा परिस्थितीत प्रश्‍न निर्माण होतो की सत्य काय आहे? तर त्याचे उत्तर आहे, सत्य अल्लाह आहे आणि त्याने ठरवून दिलेली जीवन पद्धती आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. 

याशिवाय, कुरआनमध्ये दुसर्‍या ठिकाणी म्हटलेले आहे की, ” जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांचा समर्थक व सहायक अल्लाह आहे आणि तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणतो आणि जे लोक द्रोहाचा मार्ग अवलंबितात त्यांचे समर्थक व सहायक तागूत (सैतानी पद्धत) आहेत. आणि ते त्यांना प्रकाशापासून ओढून अंधाराकडे घेऊन जातात. हे नरकाग्नीमध्ये जाणारे लोक आहेत जेथे हे सदैव राहतील.” (सुरे बकरा आयत नं. 257). जे लोक अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर श्रद्धा ठेवतात त्यांना अल्लाहकडून अदृश्य पद्धतीने मदत प्राप्त होते. त्यांच्या जीवनातून हराम आणि अपवित्र गोष्टी नष्ट होतात व त्या जागी हलाल आणि पवित्र गोष्टींचा समावेश होतो. म्हणजेच ते अंधकारातून प्रकाशाकडे येतात व आपले जीवन सार्थक करतात. जे अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांनी दिलेल्या जीवन पद्धतीचा इन्कार करतात आणि आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतात ते षड्रिपूंच्या आहारी जाऊन या जीवनामध्येही अयशस्वी होतात आणि मरणोपरांत नरकाग्नीमध्ये फेकल्या जातात. 

जगात सगळ्यात जास्त घृणेचा सामना सत्य बोलणार्‍यांना करावा लागतो. इस्लाम सत्य आहे आणि त्या सत्याचा परिचय जगाला करून देणारे मुसलमान सत्य बोलतात म्हणून घृणेस पात्र ठरतात. त्यांचा दुस्वास केला जातो. त्यांच्यावर आतंकवादाचे आरोप केले जातात. प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्रे काढली जातात. रात्रंदिवस प्रसार माध्यमातून त्यांची बदनामी केली जाते. मुन्शी प्रेमचंदनी यांनी म्हटलेले आहे, ”खुदगर्जी में इन्सान पागल हो जाता है.” इस्लाम सोडून इतर जीवन पद्धतीमध्ये जगणारी माणसं साधारणपणे खुदगर्ज अर्थात स्वार्थी जीवन जगत असतात. इतके की वेड्यासारखे वागू लागतात. आज जगामध्ये सकृतदर्शनी जरी प्रगतीचा प्रकाश दिसत असला तरी हे वरवरचे वेष्टन आहे आत डोकाऊन पाहता सर्वत्र अंधकार आहे. या अंधकाराला आपल्या जीवनातून घालवायचे असल्यास पूर्वगृह सोडून इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. 

मुस्लिमांची जबाबदारी

माणसाच्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी इस्लाम सक्षम आहे. हे जरी खरे असले तरी हा संदेश जगापर्यंत पोहोचविण्यात मुस्लिम समाज कमी पडलेला आहे. हे मान्य करावेच लागेल. जोपर्यंत मुस्लिमांमधील बहुसंख्य लोक सर्वप्रथम आपल्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा व्यवहारिकरित्या नायनाट करणार नाहीत तोपर्यंत त्यांना हा संदेश दुसर्‍या समाजापर्यंत प्रभावीरित्या पोहोचविता येणार नाही. प्रेषितांच्या जीवनाचा उद्देश नैतिकरूपाने श्रेष्ठ समाज निर्माण करणे हा होता. त्यासाठी मुस्लिम समाजाने आपल्यामधील नैतिक अ:पतनाची सर्व कारणे सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे. मात्र हे करत असतांनाच अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा ईश्‍वरीय संदेश जगाला देण्याचेही कर्तव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे. कारण कित्येकदा संदेश देणार्‍यांपेक्षा संदेश ऐकणारे जास्त सक्षम असतात आणि त्या संदेशाला स्वीकारताना व प्रत्यक्ष जीवनात राबविताना त्याला फारसे कष्ट करावे लागत नाहीत. शिवाय, कुरआनहाची ही शिकवण हीच आहे की, ”तथापि उपदेश करीत रहा कारण उपदेश श्रद्धावंतांसाठी लाभदायी आहे” (सुरे अज्जारियात आयत नं. 55) म्हणून कुरआनच्या शिकवणीचा हा उपदेश सतत करत राहिल्याने आपल्या जीवनातून अंधकार दूर करण्याबरोबर दुसर्‍यांच्या जीवनातूनही तो दूर जाईल, यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत. 



- एम.आय. शेख

(लेखक सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक असून, शोधनचे स्तंभलेखक आहेत. मो.9356727219 )



प्रकाश हा जीवनातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे आणि मानवजातीच्या काळात चांगुलपणा, सौंदर्य, दृष्टी, जीवन आणि आनंद याचं प्रतीक आहे. प्रकाश आपल्या आजूबाजूचा परिसर उजळून टाकतो आणि आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे आपल्याला समजू देतो. शारीरिकदृष्ट्या समजून घेण्याची ही क्षमता आपल्याला पुढं काय आहे याचा अंदाज घेण्याची ताकद देते. दृश्यमानता आपल्याला सहजपणे नेव्हिगेशन करू देते. अंधार हे अज्ञानाचं प्रतिनिधित्व करते, ज्यामुळे ज्ञानाचा अभाव, भाकीत करण्यास किंवा बुद्धिमान अंदाज करण्यास असमर्थता निर्माण होते. अत्यंत कमी दृश्यमानता असताना विमानतळे बंद करावी लागतात. जर तुम्ही कधी दाट धुके, जोरदार वादळ किंवा अगदी अनलिट रस्त्यावर गाडी चालवली असाल, तर दृष्टीच्या अभावामुळे आत्मविश्‍वास कसा नाहीसा होतो हे तुम्हाला कळेल. 

शारीरिक प्रकाशाप्रमाणेच आपल्या अस्तित्वासाठी आणि कल्याणासाठी आध्यात्मिक प्रकाश महत्त्वाचा आहे. यामुळे आपल्याला आपला परिसर समजून घेण्यासाठी योग्य साधनं उपलब्ध होतात जेणेकरून आपण योग्य दृष्टीने जीवनाचे निर्णय घेऊ शकतो. आध्यात्मिक प्रकाशाच्या अभावामुळे आध्यात्मिक अंधार आणि अंधत्व येते ज्यामुळे आपण घाबरतो आणि पुढं पाहू शकत नाही आणि त्यामुळे आपलं जीवन सर्वोत्तम दिशेनं नेऊ शकत नाही. आध्यात्मिक प्रकाशाशिवाय जीवन अनुभवणं म्हणजे शारीरिक अंधारात जगण्यासारखं आहे. आंतरिक प्रकाश किंवा मार्गदर्शनाशिवाय ज्ञान, समज आणि आकलनाच्या अभावामुळे गोष्टी झाकल्या जातील. याचा नैसर्गिक परिणाम म्हणजे असुरक्षितता आणि अज्ञाताची भीती यामुळे घाईघाईनं आणि हानिकारक निर्णय घेतले जातात.

आज आपण वेगानं आणि आध्यात्मिक आंधळेपणानं जीवन जगत असलो तरी आपण दुखावत आहोत. आपण अर्धवट आणि आत्म्याच्या अंधारात घाईघाईनं निर्णय घेत आहोत आणि त्यामुळे आपण अडखळतो आणि पडतो. पुढे काय होणार आहे हे आपल्याला दिसत नाही. असे करण्याकरता आपण आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा देणारा प्रकाशाचा स्रोत शोधला पाहिजे. इस्लाम धर्म सर्वशक्तिमान निर्माणकर्त्याचा संदेश आहे या मूलभूत श्रद्धेवर आधारित आहे. त्याचे दैवी संदेश किंवा खुलासे मानवजातीला नकाशा, मार्गदर्शन, प्रकाश आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूचा सामना करण्याचे ज्ञान देतात. आपण इथे का आहोत, आपण कुठे जात आहोत, मृत्यूनंतर काय होईल आणि त्यासाठी स्वत:ची तयारी कशी करावी हे त्यातून दिसून आले आहे. या ज्ञानामुळेच प्रकाश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. प्रकटीकरण हे ज्ञान, मार्गदर्शन, प्रकाश, दया आणि यश यांचे संपूर्ण पॅकेज आहे. 

एकदा का आपल्याला हे मार्गदर्शन मिळाले की जीवन अधिक स्पष्ट होते. अज्ञात ओळखले जाते आणि भविष्य कमी भयंकर बनते. भूप्रदेश अपरिचित असला तरी तो कसा हाताळायचा हे आपल्याला कळेल. भविष्याचा अंदाज बांधता येत नसला तरी, आपल्या मार्गात जे काही आहे ते हाताळण्यासाठी स्व:ला सज्ज करण्याची साधनं आपल्या बोटावर मोजण्याइतकी आहेत. अल्लाहचा एक गुण असा आहे की तो प्रकाश आहे. त्याचे मार्गदर्शन प्रकाश आहे आणि ईश्‍वराचे खुलासे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात त्याचे मध्यस्थ, देवदूत प्रकाशापासून बनवले जात आहेत. संदेष्टे आणि दूत चंद्रासारखे आहेत, आपल्या निर्माणकर्त्याकडून प्रकाश परावर्तित करतात आणि पसरवतात. हा अनंत प्रकाश आहे, जो कधीही कमी होणार नाही.

आज आपल्यासमोर राजकीय स्वरूपाचेही संकट आहे : लोकशाही आणि उदारमतवादी मूल्यांमधील वाढती तूट, उजव्या विचारसरणीच्या लोकसंख्येचा उदय आणि जगाच्या अनेक महत्त्वाच्या भागांत मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य दडपून टाकणे.

धार्मिक पुढार्‍यांना पूल बांधणे, अडथळे तोडणे, समजूतदारपणाच्या संवादाला प्रोत्साहन देणे आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणे हे एक अनोखे अभियान आहे. जेव्हा आपण एकमेकांवर हल्ला करतो तेव्हा आपण भारताचं सामंजस्याचं कापड फाडून टाकत असतो. सर्व कायदे न्याय्य आणि समान पद्धतीनं अंमलात आणण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची आहे. सांप्रदायिक शांती आणि सामंजस्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी ते सकारात्मक पावलं उचलू शकतात. सर्व भारतीयांना एकच कुटुंब म्हणून बांधून ठेवणारं बंधन मजबूत करण्यासाठी काय करता येईल याची योजना त्यांनी विकसित करण्याची गरज आहे. त्यांनी विश्‍वासांमध्ये समज, सहकार्य आणि सभ्यतेसाठी आवाजाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

उदाहरणार्थ, अंधारातून प्रकाशाकडे या अभियानासारखे कार्यक्रम प्रायोजित करून आणि वांशिक, धार्मिक आणि सामाजिक-आर्थिक दरी कमी करणार्‍या योजना आणि कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करून नागरिक नेते नेतृत्व करू शकतात. तणाव दूर करण्यात आणि आपल्या तरुणांना सहकार्य आणि संवादाची गरज समजून घेण्यास मदत करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. एकतेच्या संदेशाच्या अद्वितीय फायद्यांना प्रोत्साहन देऊन ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात: आम्ही एकत्र मजबूत आहोत. अजून बरंच काम करायचं आहे. पण सांप्रदायिक शांती आणि सामंजस्याच्या वातावरणाची कल्पना करून या कार्याची सुरुवात झाली पाहिजे.  कल्पना केल्याने तसे होणार नाही, पण कल्पना न केल्याने ते अशक्य होईल. या 21व्या  शतकात, जेव्हा जगभरातील लोकशाही इतकी वादळे फाडली जात आहेत, तेव्हा विधायक नागरिकांच्या सहभागाची नितांत गरज आहे ज्यामुळे सध्याची वाटचाल बदलते. तुमची शैक्षणिक शिस्त किंवा व्यवसाय कोणताही असो- तुमच्याकडे तांत्रिक कौशल्य आणि नैतिक ताकद आहे.

अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ओढ कायमच मानवाला वाटत आलीय. भोवताली दाटलेल्या अंधारातून मानव प्राण्यानं प्रकाशाची वाट सभोवतालला दाखवली आणि सुरू झाला अखिल जीवसृष्टीचा प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. सूर्यास्तानंतर काळोखात अदृश्य होणारी पृथ्वी प्रकाशाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. तिच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या मानवप्राण्यानं अग्नीच्या शोधाबरोबर एक संस्कृती उदयाला आणली जी प्रकाशवाट बनली. कालांतरानं या प्रकाशवाटेवर चालता चालता हाच मानवप्राणी उन्मत्त झाला. सृष्टीला झुगारुन देऊ लागला. फक्त मानवी पर्यावरणाचा विचार करु लागला. भवताल विसरला. आणि सुरू झाला एक प्रवास विनाशाचा. पृथ्वीच्या विनाशाचा. आणि यात हात होता फक्त माणूस प्राण्याचा. या विनाशात बळी जातेय जीवसृष्टी.

आज आपल्या देशातही जातधर्माच्या नावावर चाललेलं ध्रूवीकरण माणसाला माणूस या एकाच जातीनुसार जगायला देत नाही. सर्वत्र अंधकार गडद होतोय. ज्ञान लोपत चाललंय की काय अशी भीती वाटतेय. ज्ञानाबरोबरच भाषा, संस्कृती सगळंच लयास चाललंय. मानव्य लुप्त होतंय आणि जातीधर्माच्या नावाखाली सत्तेचा अमानवी खेळ सुरू आहे. परस्पर विश्‍वास, प्रेम संपवण्यात सत्ताधार्‍यांना यश आलंय आणि देश अराजकतेकडे लोटला गेलाय. सत्तेबरोबर आलेली झुंडशाही वाढलीय आणि अर्थकारण व समाजकारण राजकारणाने मातीत मिळवलंय. हे सगळं नेहमीच टिकून राहिले आहे आणि कायम राहील. कोणताही आनंद कायमस्वरूपी नाही, कोणतेही :ख तात्पुरते नाही. काळामुळे :खाची तीव्रता कमी होते, पण काळानंतर सुख आपोआप :खात बदलते.

मुसलमान असण्याचे उत्कट सत्य म्हणजे प्रकाश मिळविण्यासाठी प्रकाशात जाणं, प्रकाशानं जगणं, प्रकाशात मरणं आणि प्रकाशात पुनरुत्थान होणं. काळोख एक तात्त्विक श्रेणी नाही तर बर्‍याचदा गरीबी, क्रौर्य किंवा सहानुभूती, दया किंवा करुणेचा अभाव यासारख्या शारीरिक अभिव्यक्तींसह एक अंतर्ज्ञानी श्रेणी आहे. हे ईश्‍वराची अनुपस्थिती किंवा दैवी भ्रष्टाचाराचे वैशिष्ट्य आहे. आम्ही अनुभवतो आणि सामना करतो. एखाद्या व्यक्तीला प्रकाशाचा हेतू किंवा अंतर्ज्ञानी इच्छा असू शकते. तरीही, त्यांनी प्रकाशलेल्या आगीत अंधत्व येते. अग्नीचे दिवे धार्मिक वक्तृत्व, भौतिक संपत्ती, कायदा, सार्वजनिक उपासना किंवा प्रतिष्ठा असू शकतात. मानव बहुतेक वेळा विसरतो की खरा प्रकाश आतील प्रकाशाद्वारे प्राप्त होतो आणि खरे मार्गदर्शन केवळ एखाद्याच्या आत्मीयतेमुळे आणि भगवंताशी संबंधामुळे येते. जोपर्यंत ते जबाबदार नाहीत तोपर्यंत ईश्‍वर प्रकाश काढून घेत नाही.

चिंताग्रस्त आणि निरंतर विचारपूस करण्याच्या निरंतर अवस्थेत मनुष्य अस्तित्वात आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चाचणी व संकटासाठी तो अस्वस्थतेनं ग्रस्त असतो आणि तो अल्लाहची कृपादृष्टी गमावलेल्या व्यक्तीसारखा बनला आहे. तथापि, कोणताही मनुष्य कृपेशिवाय आणि प्रकाशाची शक्यता सोडल्याशिवाय राहात नाही. 

अल्लाह एखाद्याच्या मार्गावर आपल्या कृपेची चिन्हे पाठवतो. उदाहरणार्थ, एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू, नोकरी गमावणे किंवा घटस्फोट घेण्यासारख्या संकटाचा सामना करताना, अल्लाहच्या अधिक प्रार्थना करून किंवा कुरआन इत्यादी वाचून एखादी व्यक्ती प्रतिक्रिया देऊ शकते, तथापि, जर एखाद्याचा अंतर्गत प्रकाश नसेल तर शारीरिक इंद्रियांऐवजी अं:करणाद्वारे ते जिथं दिसतात तिथंच विकसित झाले तर ते प्रकाशामध्ये चालतात आणि त्रास कमी झाल्यावर अंधारात आणि जुन्या सवयींमध्ये परत जाऊ शकतात तेव्हा थोड्या काळासाठी ते ईश्‍वराच्या जवळ जाऊ शकतात.

मुसलमान कशासाठी? कारण मुसलमान प्रकाशातली माणसं आहेत आणि खरा मुस्लिम प्रकाश सोडतो. हा प्रकाश ईश्‍वराचे वैशिष्ट्य असलेल्या प्रत्येक गोष्टीत प्रकट होतो. जर एखादा मुस्लिम इस्लामी वैशिष्ट्ये प्रकट करीत नसेल तर तो त्या व्यक्तीसारखा असतो ज्याने अग्नी पेटविला, परंतु तरीही तो अंधारातच आहे. खरे मार्गदर्शन करणारा मुसलमान होण्यासाठी, आपल्यातील अंतर्गत प्रकाश आपल्यापासून उत्पन्न झाला पाहिजे आणि आपल्या वागण्यातून दिव्यतेची वैशिष्ट्ये दिसून यायला हवीत. आपण दया, करुणा, न्याय आणि समतेची छाप जगावर सोडली पाहिजे. अंधारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अल्लाहच्या हाताने स्पर्श करणे जेणेकरून प्रकाश आतमध्ये वाढू शकेल आणि आपण यापुढे अंधकार, चिंता किंवा भौतिक जगाच्या विचलित्यांमुळे त्रस्त होणार नाही तर आपले हृदय अल्लाहकडे आहे. मृगजळ नव्हे तर प्रकाश शोधा. आग पेटवू नका त्यामुळे आपण नंतर अंध बनू.

समकालीन मन आपल्या डोळ्यांसमोर उद्भवणार्‍या सध्याच्या संकटाचा आरसा बनते, ते पवित्र आणि संवेदनशील किंवा भौतिक जगाच्या पलीकडे जे आहे ते अनेक प्रकारे अभेद्य बनलंय. एकेकाळी पारंपरिक किंवा आधुनिक जगात ओळखल्या जाणार्‍या वास्तवाची उच्च पातळी समजू शकत नाही. हे जग अधिकाधिक गुंतागुंतीच्या गोंधळात वाढत चाललंय, त्यामुळे आपल्यासमोर येणारी परिस्थिती थांबली नाही तर वास्तवाची ही उच्च पातळी पुन्हा एकदा ओळखली जाऊ शकते. या दृष्टिकोनातून, दैवी प्रकाशाची सामूहिक दृष्टी पूर्ववत करण्यासाठी या युगात उतरणारा अंधार शुद्ध करण्यासाठी रूपकात्मक ज्ञान आवश्यक आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटलंय : हृदय चार प्रकारचं आहे : चमकणार्‍या दिव्यासारखे स्पष्ट हृदय; झाकलेले आणि बांधलेले हृदय; उलटं हृदय; आणि शस्त्रांनी भरलेलं हृदय. स्वच्छ अं:करणाच्या बाबतीत, हे श्रद्धेचं हृदय आहे ज्यावर प्रकाशानं भरलेला दिवा आहे. जग एक अंधकारमय ठिकाण असू शकतं. युद्ध, लोभ, वांशिक द्वेष, जुलूम... हे मोठ्या प्रमाणावर सामाजिक अज्ञानाचे अभिव्यक्ती आहेत. कधी-कधी असं वाटतं की जग अंधाराच्या शक्तींनी खाल्लं जातंय, नाही का? मग आपल्याला वैयक्तिक :ख, दुरुपयोग आणि स्वार्थ होतो- सर्वात जवळच्या पातळीवर आध्यात्मिक अंधाराचे प्रकटीकरण. हे आजार आपल्या मैत्रीवर, आपल्या घरात आणि स्व:च्या हृदयात आदळत असल्यामुळे त्यांना जागतिक संकटांपेक्षाही कठीण जाते. या सगळ्यातून आमचा आश्रय हा अल्लाहचा प्रकाश आहे.

खालील एक दुआ (प्रार्थना) आहे जी पैगंबर मुहम्मद (स.) करत असत : हे अल्लाह, माझ्या हृदयात आणि माझ्या जिभेच्या प्रकाशात, माझ्या कानात, माझ्या नजरेत, माझ्या वर, माझ्या खाली, माझ्या उजव्या व डाव्या बाजूला आणि माझ्या समोर व मागं प्रकाश ठेव. माझ्या आत्म्याला प्रकाशात स्थान दे. माझ्यासाठी प्रकाश वाढव. माझ्यासाठी प्रकाश बनव आणि मला प्रकाश बनव. हे अल्लाह, मला प्रकाश दे आणि माझ्या मज्जातंतूंमध्ये प्रकाश ठेव आणि माझ्या शरीरात, माझ्या रक्तात, माझ्या केसांत, माझ्या त्वचेत प्रकाश ठेव. हे अल्लाह, माझ्यासाठी माझ्या कबरीत प्रकाश बनव... आणि माझ्या हाडांमध्ये प्रकाश ठेव. मला प्रकाशात वाढव, मला प्रकाशात वाढव, प्रकाशात वाढव. मला प्रकाशावर प्रकाश दे.

हे लक्षात घेतले पाहिजे की या प्रकाशाची त्वचा, केस किंवा डोळ्यांच्या रंगाशी काहीही संबंध नाही. हा अल्लाहच्या प्रकाशाचा संदर्भ आहे. त्वचेचा प्रकाश आणि अंधार यांची तुलना चारित्र्याच्या चांगुलपणाशी आणि वाईटतेशी केली जाते. एखाद्या व्यक्तीची त्वचा गडद असू शकते, तरीही ती  अल्लाहच्या प्रकाशानं भरलेली असू शकते, जेणेकरून नूर तिच्या चेहर्‍यावरून चमकू शकेल. आणि एखादी व्यक्ती हाडासारखी पांढरी असू शकते, पण पूर्णपणे वाईट असू शकते. जो कोणी वेगळा विश्‍वास ठेवतो तो गोंधळलेला आणि आध्यात्मिकरीत्या हरवलेला असतो. अशा भ्रष्ट विचारसरणींपासून अल्लाह आपले संरक्षण करू शकतो.

जगाच्या अंधारातून आपण अल्लाहच्या प्रकाशात आश्रय घ्यायला हवा. व्यावहारिक उपयोगात, अल्लाहचा प्रकाश शोधणं याचा अर्थ आपण कुरआनचं मार्गदर्शन घेणं (जे प्रकाशाचं प्रकटीकरण आहे). आपण पैगंबरांवर प्रेम करतो आणि त्यांच्या प्रकाशरूपी शिकवणींचं आचरण केलं पाहिजे. आपण आपल्या उपासनेत उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपण अल्लाहच्या प्राण्यांशी दयाळूपणे वागण्याचा प्रयत्न करायला हवा- आपण दररोज आपल्या नकारात्मक भावनांविरुद्ध संघर्ष करायला हवा आणि आपण जगाला अधिक चांगले स्थान देण्याचा प्रयत्न करायला हवा. या अं:कारात दडलेला आहे प्रकाश, जो होत जाईल हळू-हळू मोकळा!! अंधाराचं जाळं विरळ होत जाईल आणि समतेची प्रकाशवाट प्रशस्त होईल. अंधारातून प्रकाशाकडे जातानाचं साक्षीदार असणार आहोत आपण सर्वचजण. म्हणूनच थोडा जोर आता लावावाच लागेल.



- शाहजहान मगदुम

(लेखक शोधनचे कार्यकारी संपादक आहेत. मो. :  8976533404)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget