Halloween Costume ideas 2015

साधू संत परतति त्यांच्या घरा, तोचि दिवाळी दसरा।।


'साधू संत येति घरा । तोचि दिवाळी दसरा ।।' हे कोणाचं वचन असेल ते असो, पण या वचनाने आम्हाला लहानपणापासून फार म्हणजे फारच छळलं आहे आणि आताही छळतंच आहे. वचनांचं आणि आमचं काय वैर आहे ते आम्हाला माहीत नाही, ( कदाचित वचनं नागपूरकर असतील ! हो, असूही शकतात !) पण वचन मग ते एखाद्या संताचं असू देत की कोणातरी असंताने आम्हाला बंद दाराआड दिलेलं असू देत, त्याने कायमच आम्हाला छळलं आहे. तुम्हाला सांगतो, शाळेत गुरुजींनी हे वचन कोणाचं म्हणून विचारल्यावर आम्ही शिवाजी महाराजांपासून ते थेट जवाहरलाल नेहरूंपर्यंत आम्हाला माहीत असलेली कमीतकमी पंचवीस तरी नावं सांगितली, पण गुरुजींचं समाधान काही होईना. प्रत्येक चुकीच्या नावावर एक छडी मारून बहुतेक गुरुजींचेच हात दुखून आले असावेत, कारण शेवटी जेव्हा आम्ही 'आईन्स्टाईन !' असं उत्तर दिलं तेव्हा गुरुजींनी हातातली वेताची छडी फेकून आमच्या पाठीत जोरदार धपाटा हाणला. तेव्हापासून या वचनाचा आम्ही भयंकर म्हणजे भयंकरच धसका घेतला होता, ( आमच्या त्या गुरुजींनीही त्या प्रसंगानंतर आमच्या अगाध ज्ञानाचा इतका भयंकर धसका घेतला की नंतर त्यांनी आम्हाला कधीच कोणताच प्रश्न विचारला नाही. अगदी शाळेत जायला उशीर झाला तरी उशीर का झाला म्हणूनही विचारलं नाही !) इतका भयंकर की, नंतर आम्ही आयुष्यात कधी दिवाळी साजरी केली नाही, की कधी कोणा साधूच्या दर्शनालाही गेलो नाही. असो.

तर हे सर्व आठवण्याचं कारण असं की, मागच्याच आठवड्यात कानी एक वार्ता आली, की उत्तरप्रदेशातून एक साधू आमच्या मुंबापुरीत येतोयं. आम्ही हादरलो. शाळेतला तो मार आठवला. साधूला आमच्या मुंबापुरीत येण्यापासून थांबवणं गरजेचं होतं. आम्हाला आमच्या दारात साधू संतही नको होते, दिवाळीही नको होती आणि त्या शाळेतल्या आठवणीही नको होत्या ! नंतर आमच्या गुप्तचर यंत्रणेने वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून आणि पाहून सांगितले की तो साधू नाही तर संधीसाधू आहे आणि दिवाळी विसरा, तो तर आपलं दिवाळं काढायला येतोयं ! आम्ही सावध झालो. (हल्ली आम्ही फार लवकर सावध व्हायला लागलो आहोत. याचे सर्व श्रेय आमच्या नागपूरकर मित्राला जाते. राजकारण असो की आयुष्य, गाफील राहून चालत नाही, हे त्यानेच आम्हाला शिकविले ! अजूनही एक नाव आहे, पण ते नंतर कधीतरी सांगीन.) आम्ही ताबडतोब आमच्या चिरंजीवांना पाचारण केलं. येणाऱ्या संकटाची त्यांना कल्पना दिली. बॉलीवूड गेलं तर आपल्या 'नाईट लाईफ'च काय, या विचाराने चिरंजीव हादरले.मागे एकदा एका मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांचा जीव गुदमरला होता, तसाच आता गुदमरतोय असं त्यांच्याकडे पाहून वाटू लागलं. त्यांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून त्यांची रवानगी ताबडतोब एका 'नाईट क्लब'मध्ये केली. संपादकांना बोलवून या साधुच्या येण्यावर ताबडतोब एक 'रोखठोक' अग्रलेख लिहिण्याची आज्ञा केली. यदाकदाचित तो साधू न बोलावताही आपल्याला भेटण्यासाठी आलाच तर आपले भगवे कपडे त्याच्या भगव्या कफनीपेक्षा मळके वाटू नयेत म्हणून नवे कोरे भगवे कपडे मागवून घेतले. तो बाहेरगावाहून आला आहे म्हणून त्याला होम क्वारंटाईन करता येईल का याचा अंदाज घेतला , पण असं करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच अंगाला कापरं भरल्यामुळे तो विचार मनातून कापरासारखा उडून गेला. कोणीतरी मजुरांचे लोंढेच्या लोंढे ट्रकांमध्ये भरून माझ्या मुंबापुरीत आणून सोडतोयं आणि विमानात बसवून सर्व फिल्मी सिताऱ्यांना दूर कुठेतरी घेऊन चाललायं असं दृश्य डोळ्यांंसमोर येऊ लागलं. माझ्या मुंबापुरीची अवस्था आता ' नाव सोनुबाई ----' अशी होणार या कल्पनेने जीव 'त्या' पहाटे झाला होता तसा घाबराघुबरा होऊ लागला.  शेवटी जे व्हायचे ते होवो असा विचार करून झोपी गेलो. सकाळी उठलो.वर्तमानपत्रात बातमी होती, ' बॉलीवूड म्हणजे काय पर्स आहे का की उचलून नेईन - योगी आदित्यनाथ ' पट्टदिशी खिडकीपाशी गेलो. उगवत्या सूर्याला नमस्कार करून एकशे आठ वेळा 'ओम आदित्याय नमः'चा जप केला. डोक्यात नवीनच वचन घोळत होतं, 

'साधू संत परतति त्यांच्या घरा। तोचि दिवाळी दसरा ।।'

-मुकुंद परदेशी

मुक्त लेखक,  संपर्क-७८७५०७७७२८


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget