Halloween Costume ideas 2015

सूरह अल् आअराफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(३८) ....उत्तरादाखल फर्माविण्यात येईल, प्रत्येकासाठी दुप्पटच यातना आहेत परंतु तुम्ही जाणत नाही.३० (३९) आणि पहिला गट दुसऱ्या गटाला सांगेल (जर आम्ही दोषास पात्र होतो) तर तुम्हाला आमच्यावर कोणते श्रेष्ठत्व प्राप्त होते, आता आपल्या कमाईचा परिणाम म्हणून प्रकोपाचा आस्वाद घ्या.३१ (४०) खात्री बाळगा,ज्या लोकांनी आमची वचने खोटी लेखली आणि त्यांच्या विरोधात शिरजोरी दाखविली आहे त्यांच्यासाठी आकाशाची दारे कदापि उघडली जाणार नाहीत. त्यांचा स्वर्गामध्ये (जन्नतमध्ये) प्रवेश तितकाच अशक्य आहे जितका सुईच्या छिद्रातून उंटाचे जाणे. अपराध्यांना आमच्यापाशी असाच बदला मिळत असतो. (४१) त्यांच्यासाठी नरकाचेच अंथरूण असेल व नरकाचेच (जहन्नमचेच) पांघरूण असेल. हेच आहे फळ जे आम्ही अत्याचारींना देत असतो. (४२) याच्या उलट ज्या लोकांनी आमची वचने मान्य केली आहेत आणि सत्कृत्ये केली आहेत - आणि याबाबतीत आम्ही प्रत्येकाला त्याच्या ऐपतीप्रमाणेच जबाबदार ठरवीत असतो, हे स्वर्गात वास करणारे आहेत जेथे ते सदैव राहतील. (४३) त्यांच्या मनात एक दुसऱ्यांविरूद्ध जी मलीनता असेल ती आम्ही दूर करू.३२ त्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते सांगतील, ''स्तुती फक्त अल्लाहकरिताच आहे ज्याने आम्हाला हा मार्ग दाखविला. आम्ही स्वत: मार्ग प्राप्त करू शकलो नसतो जर अल्लाहने आमचे मार्गदर्शन केले नसते. आमच्या पालनकर्त्याने पाठविलेले प्रेषित खरोखर सत्यच घेऊन आले होते.'' त्यावेळेस वाणी ऐकू येईल, ''हा स्वर्ग (जन्नत) ज्याचे तुम्ही वारस बनविले गेले आहात तो तुम्हाला त्या कृत्यांच्या मोबदल्यात मिळाला आहे, जी तुम्ही करीत राहिला होता.''३३ 


३०) म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येक लोकसमुदाय कोणाच्या मागे होता तर कोणाच्या पुढेही होता. एखाद्या लोकसमुदायाच्या पूर्वजांनी वारसात भ्रष्ट चिंतन आणि दूषित कर्म सोडले असेल तर स्वत: तेसुद्धा आपल्या मागल्यांसाठी याच प्रकारचा वारसा सोडून जगाचा निरोप घेतील. एखाद्या राष्ट्राची मार्गभ्रष्ट होण्याची जबाबदारी त्याच्या पूर्वजांवर येते तर त्याच्या मागल्यांच्या (नंतरची पिढी) मार्गभ्रष्टतेची जबाबदारी बहुतांश स्वत:वर येते. यामुळे सांगितले की प्रत्येकासाठी दुप्पट शिक्षा आहे. एक शिक्षा स्वत: मार्गभ्रष्टता स्वीकारण्याची आणि दुसरी शिक्षा दुसऱ्यांना मार्गभ्रष्ट करण्याची. एक शिक्षा आपल्या अपराधासाठी आणि दुसरी शिक्षा दुसऱ्यांसाठी अपराधरूपी वारसा सोडण्यासाठीची.हदीसमध्ये याविषयीचा तपशील आला आहे,''ज्याने एखाद्या नवीन मार्गभ्रष्टतेची (बिदअत) सुरवात केली जी अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांना अप्रिय आहे, अशा स्थितीत त्याच्यावर त्या सर्व गुन्ह्यांची जबाबदारी येईल ज्यांनी ज्यांनी त्याने घडविलेल्या नवीन पद्धतीचे अनुकरण केले असेल. शिवाय त्याने स्वत: केलेल्या कर्माच्या जबाबदारीत कमी केली जात नाही.'' दुसऱ्या हदीसकथनात आहे, ''जगात जो मनुष्य अन्यायाने ठार केला जातो त्याच्या अन्यायपूर्ण हत्येचा एक भाग आदमच्या त्या पहिल्या मुलावर येतो ज्याने आपल्या भावाची हत्या केली होती. कारण मनुष्याच्या हत्येंचा मार्ग सर्वप्रथम त्यानेच दाखविला होता.'' यावरून हेसुद्धा माहीत झाले की प्रत्येकजण आपल्या नेकी (सदाचार) आणि पाप (दुराचार) करण्याला केवळ आपल्या व्यक्तित्वापर्यंतच जबाबदार नाही तर यासाठीसुद्धा जबाबदार आहे की त्याच्या सदाचाराचा आणि दुराचाराचा प्रभाव इतरांच्या जीवनात कसा पडला होता. उदाहरणासाठी व्यभिचारी मनुष्य घेऊ या. ज्या लोकांच्या शिक्षण-प्रशिक्षणाने ज्यांच्या सोबतीने, ज्यांची वाईट उदाहरणे पाहून आणि प्रलोभनांनी त्या व्यक्तीमध्ये व्यभिचार करण्याची दुष्टता वाढली ते सर्वजण त्याचे व्यभिचारी बनण्यात सहभागी आहेत. आणि स्वत: त्या लोकांनी वरून जिथून कोठून हा वारसा प्राप्त् केला तिथपर्यंत त्याची जबाबदारी पोहचते. या दुष्ट प्रवृत्तीला त्या माणसाने पूर्वजांकडून वारसात प्राप्त् केली त्या सर्वांचा यात वाटा असतो. तसेच ज्याने ही दुष्टता प्रथम सुरू केली आणि मनुष्याच्या मनोकामनेला पूर्ण करण्याचा हा वाममार्ग दाखविला होता, तसेच तो स्वत: या व्यभिचाराला जबाबदार आहे. त्याला भल्याची आणि वाईटाची ओळख करून देण्यात आली होती, त्याच्यात अंतरात्म्याची शक्ती होती, त्याला आत्मसंयमाची शक्ती प्रदान केली होती. त्याला सदाचारी लोकांपासून भल्याबुऱ्याचे ज्ञान दिले होते. त्याच्यासमोर सदाचारी लोकांचे उदाहरण होते. त्याला व्यभिचाराच्या दुष्परिणांमाची जाणीव होती. यापैकी एकाही गोष्टीचा त्याने लाभ घेतला नाही आणि स्वत:ला आंधळया कामवासनेच्या आहारी केले. कोणत्याही पद्धतीने त्याला कामनापूर्ती हवी होती. हा त्याच्या हिशेबाचा भाग आहे जो त्याच्याशी संबंधित आहे. मग हा मनुष्य त्या वाईटाला ज्याला त्याने  कमविले आहे आणि वृद्धिगंतसुद्धा केले आणि दुसऱ्या लोकांत या दुष्टतेला प्रसारीत केले; अशामुळे त्याला गुप्त्रोग जडतो आणि तो आपल्या संततीला वारसात देतो. तसेच अनेक पिढ्यांत त्याला संक्रमित करून अनेकांचे जीवन बरबाद करतो. कुठेतरी आपले वीर्य गाळतो आणि ज्या मुलाचे पालनपोषण करण्याची स्वत:ची जबाबदारी होती, त्याला दुसऱ्यासाठी अवैध भागीदार, त्याच्या मुलाबाळांत बळजबरीने भागीदार बनवितो. त्याच्या वारसात नाहक हकदार बनवितो. अधिकारहननाची ही साखळी पिढ्यान् पिढ्या चालतच राहाते. एखाद्या युवतीला फूस लावून तिच्याशी व्यभिचार करतो आणि तिच्यात दुष्ट गुणांना उभारतो. पुढे ते पिढ्यान् पिढ्या चालत जाते. कित्येक घरे बर्बाद होतात. आपली संतती, आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी तसेच समाजासमोर आपल्या चारित्र्याचे एक वाईट उदाहरण ठेवतो. ही व्यभिचारी व्यक्ती अशा प्रकारे अगणित लोकांचे चारित्र्यहनन करीतच राहाते आणि हा दुष्ट प्रभाव नंतरच्या पिढ्यांमध्ये प्रभाव टाकतच जातो.हा सर्व बिघाड त्या व्यभिचारी व्यक्तीने समाजात फैलावला आहे. न्यायाची अपेक्षा आहे की हे सर्व त्याच्या हिशोबात लिहिले जावे आणि त्या वेळेपर्यंत लिहिले जात राहावे जोपर्यंत त्याचा हा दुष्टताक्रम जगात चालत राहील. याचप्रकारे सदाचाराच्या प्रति विचार केला जावा. सदाचारी वारसा आमच्या पूर्वजांकडून मिळाला त्याचा मोबदला आणि पुण्य त्या सर्वांना मिळाले पाहिजे ज्यांनी प्रारंभापासून ते आजतागायत सदाचाराला वृद्धिंगत करीत राहिले आहेत. या वारसाला वाढविण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आमच्या सदाचाराचा जो प्रभाव आम्ही जगात सोडून जाऊ त्याससुद्धा आमच्या हिशेबात तोपर्यंत अंकित होत राहिले पाहिजे जोपर्यंत हा प्रभाव शिल्लक राहील आणि हा क्रम मानवजातीत चालत राहील आणि जगवासीं त्यापासून लाभान्वित होत राहतील. मोबदल्याची आणि फलनिष्पत्तीची ही स्थिती कुरआन स्पष्ट करीत आहे. प्रत्येक बुद्धीवान मनुष्य स्वीकार करील की खरा आणि पूर्ण न्याय याच स्थितीत शक्य आहे. या वास्तविकतेला चांगल्याप्रकारे समजून घेतले तर याने त्या लोकांचे भ्रम दूर होतील ज्यांनी पूर्ण फलनिष्पत्तीसाठी याच जगाला पर्याप्त् समजले आहे आणि त्या लोकांचे भ्रम दूर होतील ज्यांना वाटते की मनुष्याला त्याच्या कर्माचे पूर्ण फळ आवागमनच्या (पुनर्जन्माच्या) रूपात मिळते. खरे तर या दोन्ही घटकांनी मनुष्याच्या कर्माच्या, त्याच्या प्रभावाच्या आणि परिणामाच्या व्यापकतेला समजून घेतलेच नाही तसेच न्यायोचित फळ आणि त्यांच्या अपेक्षांनासुद्धा जाणून घेतले नाही. एक मनुष्य आपल्या पन्नास-साठ वर्षाच्या जीवनकाळात जे बरेवाईट कृत्य करतो, त्यांच्या जबाबदारीत अनेक पिढ्या संमिलित आहेत. या जगाला सोडून गेल्यास आणि आज त्यांना याचा मोबदला मिळणे अशक्य आहे. मग या व्यक्तीचे चांगले आणि वाईट कर्म ज्यांना तो आज करत आहे, त्याच्या मृत्यूपश्चात ते नष्ट होणार नाहीत. त्या कृत्यांचा प्रभावाचा क्रम पुढील पिढ्यांपर्यंत चालत राहील. तसेच हजारो, लाखो आणि करोडो मनुष्यांपर्यंत पोहचला जाईल. या मनुष्याच्या हिशोबाचा खाता तोपर्यंत उघडलेला असेल जोपर्यंत हा प्रभाव चालत व वाढत जाईल. कशाप्रकारे हे संभव आहे की आजच या जगाच्या जीवनात त्या व्यक्तीला त्याच्या कमाईचा पूर्ण मोबदला मिळावा जेव्हा की त्याच्या कमाईच्या प्रभावाचा लाखावा हिस्सासुद्धा प्रकट झाला नाही. या जगाचे सीमित जीवन आणि त्याची सीमित संभावना प्रारंभापासून अपर्याप्त् आहे की, एखाद्याला त्याच्या कर्माचा पूर्ण मोबदला जगातच मिळेल. तुम्ही अशा व्यक्तीविषयी विचार करा की त्याच्या  एका अपराधाने तो जगात महायुद्धाचा भडका उडवितो आणि त्याच्या या दुष्टकृत्याचे दुष्परिणाम हजारो वर्षापर्यंत अब्जावधी लोकांना भोगावे लागतात. काय मोठ्यातली मोठी शारीरिक, नैतिक, आध्यात्मिक किंवा भौतिक शिक्षा या जगात आहे ज्याने त्या माणसाला न्यायपूर्ण शिक्षा दिली जाईल? अशाचप्रकारे जगातील मोठ्यातला मोठा पुरस्कार ज्याची कल्पना आपण करू शकता तो एखाद्या व्यक्तीसाठी पर्याप्त् आहे जो आयुष्यभर मानवकल्याणासाठी काम करत राहिला आणि हजारो वर्षांपासून अगणित लोक त्याचा फायदा घेत राहिले आहेत. कर्म आणि फळाच्या या पैलूला ज्याने जाणले त्याला विश्वास होईल की कर्मफाळासाठी एक दुसरेच जग अपेक्षित आहे. जिथे समस्त मागील पुढील पिढ्या जमा होतील. सर्व मनुष्यांची खातेवही बंद झाली असेल. हिशेब घेण्यासाठी अल्लाह न्यायाच्या आसनावर आसनस्थ असेल. तसेच कर्माचे पूर्ण फळ आणि मोबदला प्राप्त् करण्यासाठी तिथे असीम जीवन आणि बक्षीस व शिक्षेच्या असीम संभावना असतील. अशाप्रकारे आवागमनावर (पुनर्जन्म) विश्वास ठेवणाऱ्यांची एक मौलिक चूक दुरुस्त केली जाईल. ज्यामुळे ते आवागमनाच्या (पुनर्जन्म) चक्रातफसत गेले. त्यांनी या सत्याला जाणले नाही की या सीमित जीवनाच्या कर्माच्या फळप्राप्तीसाठी असीम जीवनाची आवश्यकता आहे. पन्नास-साठ वर्षाचे जीवन समाप्त् होताच एक दुसरा नंतर तिसरा (असे अनेक पुनर्जन्म) दायित्वपूर्ण जीवन याच जगात सुरू झाले आणि या जीवनांमध्ये आम्ही अधिक काम करत जावे ज्यांचे चांगले व वाईट फळ आम्हाला मिळणे आवश्यक आहे. अशा स्थितीत हिशेब पूर्ण होण्याऐवजी अधिक वाढतच जाईल आणि हिशोब पूर्ण होण्याची वेळ कधीच येणार नाही.

३१) नरकवासीयांच्या या पारस्परिक वादविवादाचा कुरआनमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे. (पाहा, सूरह ३४, आयत ३१ आणि ३३) यात सांगितले गेले, ''तुम्ही पाहू शकाल त्या घटनेला जेव्हा की हे अत्याचारी आपल्या प्रभुसमोर उभे राहातील आणि एकदुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करीत असतील. जे जगात कमजोर होते ते मोठ्या लोकांशी म्हणतील की जर तुम्ही नसते तर आम्ही ईमानधारक (मोमीन) झालोच असतो. ते मोठे बनून राहिलेले लोक या छोट्या लोकांना उत्तर देतील, ''काय आम्ही तुम्हाला मार्गदर्शनापासून रोखून धरले होते जेव्हा की मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त् झाले होते? नाही! तुम्ही स्वत: दोषी होता.'' तुम्ही कधी मार्गदर्शनाचे इच्छुक होता? आम्ही तुम्हाला  जातीवाद,  भौतिकवाद   आणि  जगातील  इतर  मार्गभ्रष्टता आणि दुष्कर्मात टाकले तेव्हा तुम्ही स्वत: अल्लाहशी विमुख आणि जगाचे पुजारी होता. म्हणून तुम्ही ईशवादाकडे बोलविणाऱ्यांना सोडून आमच्या बोलाविण्याकडे आकृष्ट झाला होता. म्हणून जबाबदारी आमच्या एकट्याची नाही, तुम्हीसुद्धा बरोबरीने जबाबदार आहात. आम्ही मार्गभ्रष्टतेकडे आकृष्ट करणारे होतो तर तुम्ही त्याचे खरेदी करणारे होते.

३२) म्हणजे जगाच्या या सदाचारी लोकांत गैरसमजुती, विचारभेद असतील तर परलोकात दूर केले जातील. त्यांची मने एकमेकांशी साफ केले जातील, ते सर्व निष्ठावान मित्राच्या रूपात स्वर्गात दाखल होतील. त्यांच्यापैकी एखाद्याला हे पाहून दु:ख होणार नाही की हा माझा विरोधक होता तसेच हा  तर माझ्याशी जगात भांडत होता आणि त्याने तर माझ्यावर सतत टीकाच केली होती. आज तो मनुष्यसुद्धा या पाहुणचारात माझ्या समोर हजर आहे. याच आयतचे पठण करून आदरणीय अली (रजि.) यांनी सांगितले होते, ''मला आशा आहे की अल्लाह माझ्या व उस्मान व जुबैर व तलहा (रजि.) यांच्या दरम्यान सफाई (समेट) घडविल.'' या आयतला आम्ही अधिक व्यापक दृष्टीने पाहिले तर या निर्णयाप्रत येऊ शकतो की सदाचारी लोकांवर या जगाच्या जीवनात जे डाग लागले होते, अल्लाह त्या डागांसह त्यांना स्वर्गात दाखल करणार नाही. परंतु स्वर्गात दाखल करण्या अगोदर आपल्या कृपेने त्यांना पवित्र करील आणि ते पवित्र जीवनासह स्वर्गात दाखल होतील.

३३)  हा एक अत्यंत सूक्ष्म मामला आहे जो तिथे घडणार आहे. स्वर्गातील लोक यावर फुलून जाणार नाहीत की त्यांनी सदाचार केला त्यामुळे त्यांना स्वर्ग मिळाला. याऐवजी त्यांची जिव्हा त्या वेळी अल्लाहची स्तुती, प्रशंसा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात व्यस्त राहील. ते सांगतील की ही सर्व आमच्या पालनकर्त्या प्रभुची कृपा आहे, अन्यथा आमची काय योग्यता! दुसरीकडे अल्लाह त्यांच्यावर आपल्या अगणित उपकारांना दाखवित बसणार नाही तर अल्लाह त्यांना उत्तरादाखल स्पष्ट करील की तुम्ही हा स्वर्ग आपल्या कर्माच्या बदल्यात प्राप्त् केला आहे. ही तुमच्या कष्टाची कमाई आहे  जी  तुम्हाला  देण्यात  आली  आहे. हे भिकेचे तुकडे नाहीत तर तुमच्या कष्टाचा मोबदला आहे आणि तुमच्या कामाची मजुरी आहे. ही प्रतिष्ठेची उपजीविका तुम्ही तुमच्या कष्टाने कमविली आहे. मग हा विषय आणखी सूक्ष्म केला आहे की अल्लाह आपल्या उत्तराचा  उल्लेख या स्पष्टीकरणाने करीत नाही की आम्ही अशाप्रकारे सांगू. परंतु उत्तरात अल्लाह अत्यंत दयाशीलतेने स्पष्ट करतो की उत्तरादाखल हा आवाज येईल. वास्तविकपणे हाच मामला जगात अल्लाह आणि त्याच्या सदाचारी दासांमध्ये आहे. अत्याचाऱ्यांना जी उपजीविका जगात मिळते ते त्यावर गर्व करतात आणि सांगू लागतात की हे आमच्या कष्टाचे आणि योग्यतेचे फळ आहे आणि ते अशाप्रकारे अधिकच घमेंडी आणि गर्विष्ठ बनतात. याविरुद्ध सदाचारींना अल्लाहचे जे बक्षीस जगात मिळते ते त्यास अल्लाहची कृपा समजतात आणि अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांना अल्लाह जितके जास्त अनुग्रहित करतो तेव्हढे जास्त ते नम्र, दयाळु, स्नेही आणि उदार बनत चालतात. परलोकातसुद्धा सदाचारी लोक आपल्या सदाचारांवर गर्व करीत नाही की आम्ही तर निश्चितच स्वर्गातच जाऊ परंतु आपल्या उणिवांवर आणि भूलचुकींवर क्षमा मागतात. आपल्या कर्माऐवजी अल्लाहच्या कृपेची आणि दयेची याचना करतात. हे नेहमी ईशभय बाळगून असतात की आमचा हिशेब कसा घेतला जाईल. बुखारी आणि मुस्लिम या हदीसग्रंथात नमूद आहे.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``हे खूप जाणून असा, तुम्ही आपल्या कर्मानेच फक्त स्वर्ग प्राप्त् करु शकत नाही.'' लोकांनी विचारले, ``हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) काय आपणसुद्धा?''  पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले  ``होय, मीसुद्धा!  शिवाय  याचे की अल्लाह  आपल्या  दयेचा आणि कृपेचा माझ्यावर वर्षाव करील.''


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget