Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(४८) मग हे पैगंबर (स.)! आम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ पाठविला जो सत्य घेऊन आला आहे आणि `अलकिताब' (पूर्वकालीन ईशग्रंथ) पैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध आहे त्यातील  सत्य प्रमाणित करणारा७८ व त्याचा संरक्षक व त्याची निगा राखणारा आहे,७९ म्हणून तुम्ही अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसारच लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि  जे सत्य तुमच्यापाशी आले आहे त्यापासून पराङ्मुख होऊन त्यांच्या इच्छेचे अनुकरण करू नका - आम्ही तुम्हा (मानवा)पैकी  प्रत्येकासाठी एकच शरिअत (जीवनाचा कायदा) व एकच  कार्यप्रणाली निश्चित केली.८० जर तुमच्या अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकच लोकसमूह (उम्मत) बनवू शकत होता परंतु त्याने हे यासाठी केले की जे काही त्याने तुम्हा  लोकांना दिले आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. म्हणून चांगुलपणात एक दुसऱ्यापेक्षा सरस ठरण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हा सर्वांना अल्लाहकडेच परत जावयाचे आहे, मग तो  तुम्हाला सत्यस्थिती दाखवून देईल ज्यामध्ये तुम्ही मतभेद करीत राहिला आहात.८१
(४९) तर८२ हे पैगंबर (स.)! तुम्ही अल्लाहद्वारे अवतरित केलेल्या कायद्यानुसार या लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा व त्यांच्या इच्छाआकांक्षाचे अनुकरण करू नका. सावध राहा  की या लोकांनी तुम्हाला संकटात गुंतवून त्या मार्गदर्शनापासून यत्विंâचितदेखील पराङ्मुख करता कामा नये, जे मार्गदर्शन तुमच्याकडे अल्लाहने अवतरित केले आहे, मग जर हे  यापासून पराङ्मुख झाले तर समजा की अल्लाहने यांच्या काही अपराधांची शिक्षा म्हणून यांना संकटात गुंतवून टाकण्याचा इरादाच केला आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे की या  लोकांतील बहुतेक फासिक अवज्ञा करणारे आहेत.


७८) येथे एका महत्त्वपूर्ण तथ्याकडे संकेत आहे. याला अशा पद्धतीनेसुद्धा व्यक्त केले जाऊ शकत होते की मागील ग्रंथांपैकी जे काही मूळ आणि सत्य रूपात शिल्लक आहेत, कुरआन  त्यांची पुष्टी करतो. परंतु अल्लाहने मागील ग्रंथाऐवजी `अल किताब' शब्द वापरला आहे. याने या रहस्याचा उलगडा होतो की कुरआन आणि इतर सर्व ईशग्रंथ जे वेगवेगळया काळांत  आणि वेगवेगळया भाषेत अल्लाहने अवतरित केले होते, ते सर्व ग्रंथ एकच ग्रंथ आहेत. एकच त्यांचा लेखक आहे, एकच त्यांचा आशय आणि उद्देश आहे, एकच त्यांची शिकवण आहे  आणि एकच ज्ञान आहे जे त्यांच्याद्वारा मानवजातीला दिले गेले. फरक आहे तर तो वर्णनशैलीचा, जी एकच उद्देशासाठी विभिन्न श्रोत्यांनुसार विभिन्न ढंगाने आत्मसात केली गेली होती.
७९) कुरआनला `अल किताब'चे रक्षण करणारा आणि देखरेख करणारा म्हणण्याचा अर्थ होतो की त्याने सर्व शिकवणींना ज्या मागील ईशग्रंथात दिल्या होत्या, त्यांना आपल्यात  उल्लेखित करून सुरक्षित केल्या आहेत. आता त्यांच्या सत्यशिकवणींचा कोणताच भाग नष्ट होऊ शकणार नाही.
८०) येथे संदर्भविरहीत हटून एक नवीन विषयाला हात घातला आहे. त्याचा उद्देश एक प्रश्नाचे स्पष्टीकरण करणे आहे जे वरील व्याख्यानाने एखाद्याच्या मनात भ्रम निर्माण करू   शकते. प्रश्न आहे की जेव्हा सर्व पैगंबर आणि सर्व ईशग्रंथांनी सांगितलेली जीवनपद्धती (दीन) एक आहे आणि हे सर्व एकदुसऱ्यांचे समर्थन आणि पुष्टी करतात; तर मग शरीयतच्या  तपशीलानंतर (धार्मिक शास्त्रात) आपसात भेद का आहे?
८१) हे वरील प्रश्नाचे पूर्ण उत्तर आहे. या उत्तराचे विवरण खालीलप्रमाणे
(१) फक्त शरीयत (धर्मशास्त्र) च्या भिन्नतेला याचा पुरावा ठरविणे चुकीचे आहे की या शरीयती विभिन्न स्त्रोतांपासून जन्माला आलेल्या आहेत. खरेतर अल्लहनेच विभिन्न राष्ट्रांसाठी विभिन्न काळात आणि विभिन्न परिस्थितीत भिन्न भिन्न नियम बनविले.
(२) नि:संदेह हे संभव होते की प्रारंभीच सर्व माणसांसाठी एक नियम तयार करून सर्वांना एकच उम्मत (समुदाय) बनविले असते. परंतु अल्लाहने वेगवेगळया पैगंबरांच्या धर्मशास्त्रात  (शरियत) अंतर ठेवले. यामध्ये अनेक निहीत हितांसह एक मोठे निहीत हित हेसुद्धा होते की अल्लाह या पद्धतीने लोकांची परीक्षा घेऊ इच्छित होता. जे लोक सत्यधर्म आणि त्याचा  आत्मा आणि वास्तविकतेला समजून आहे आणि जीवनधर्मातल्या नियमांच्या महत्त्वाला जाणतात; ते पक्षपाताच्या भावनेशी ग्रस्त नाहीत. ते सत्याला ज्या स्थितीत आहे जाणून घेतात  आणि सत्याचा स्वीकार करतात. त्यांना अल्लाहने पूर्वी पाठविलेल्या आदेशांच्या जागी आता पाठविलेल्या आदेशांचे पालन करण्यात काही संकोच वाटत नाही. या विपरीत जे लोक  जीवनधर्माच्या आत्म्याशी अनभिज्ञ आहेत आणि नियमांना आणि त्यांच्या विवरणांनाच मूळ धर्म समजून बसले आहेत, तसेच जे अल्लाहकडून आलेल्या जीवनधर्मावर स्वत:च्या  मनमानी गोष्टींना जोडून त्यावर अडीग आहेत आणि पूर्वग्रहदूषित आहेत; असे लोक त्या सर्व मार्गदर्शनांना रद्द करू लागतात जे नंतर अल्लाहने अवतरित केले आहे. या दोन्ही  प्रकारच्या लोकांत अंतर करण्यासाठी ही कसोटी आवश्यक होती. म्हणून अल्लाहने शरियतींमध्ये भिन्नता ठेवली.
(३) सर्व शरियतींचा मूळ उद्देश सदाचार आणि भलाई प्राप्त् करणे आहे. हे प्राप्त् त्याच वेळी होणे शक्य आहे ज्या वेळी अल्लाहने आदेश दिला तर त्याचे पालन व्हावे. म्हणून जे लोक  मूळ उद्देशावर लक्ष ठेवून आहेत त्यांच्यासाठी धर्मशास्त्रातील भिन्नताआणि व्यवस्थेतील अंतरावर भांडण करण्याऐवजी ते उद्देशप्राप्तीसाठी कार्यमग्न राहतात. ज्यास अल्लाहने मान्यता दिली आहे.
(४) जे अंतर मानवाने आपल्या अडिगता, पूर्वाग्रह, दुराग्रह आणि स्वत:च्या बुद्धीने निर्माण केले त्यांचा अंतिम निर्णय विद्वानांच्या सभेत होऊ शकत नाही की युद्धभूमीत. अंतिम निर्णय  तर अल्लाह स्वयं करील. त्यावेळी सत्य वेगळे केले जाईल आणि लोकांना कळून चुकेल की ज्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्यात सत्य किती आणि असत्य किती आहे.
८२) येथून पुढे तेच व्याख्यान आहे जे वरून चालत आले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget