Halloween Costume ideas 2015

भारत बचाव

एम.आय.शेख - 9764000737
भारतातील मुस्लिम धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत कोणापेक्षाही कमी नाहीत. ”बादशाह अकबरच्या राजवटीत जेव्हा सर्व भारत प्रथमच राजकीयदृष्ट्या सुसंघटित झाला. तेव्हा मौलाना जमालुद्दीनच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ अकबरच्या भेटीस गेले व तेथे मौलाना जमालुद्दीन म्हणाला की, आता तुम्ही देशात शरिया कायदा लागू करावा. त्यावर बादशाह अकबरने त्याला स्पष्टपणे नकार देवून भारताच्या धार्मिक विविधतेस धक्का लागू देणार नसल्याचे त्यांना ठणकावून सांगितले होते.” (संदर्भ : लोकमत, संपादकीय 10 मार्च 2015 पान क्र. 6).
    ज्याला जुलमी म्हणून इतिहासकारांनी बदनाम केले त्या औरंगजेब बादशाहाच्या काळात एक अशी घटना घडली होती की, काशी (बनारस) मध्ये एक पंडित राहत होते. त्यांना एक सुंदर मुलगी होती. तिचे नाव शकुंतला होते. तिच्यावर औरंगजेबच्या सेनापतीची वाईट नजर पडली आणि त्याने पंडितला सात दिवसात त्या मुलीला पाठवून दे असा आदेश दिला. मात्र शकुंतलेला व पंडितला हे मान्य नव्हते. शकुंतलेने औरंगजेब बादशाहकडे तक्रार केली. त्यानंतर बादशाहाने गावी येवून त्या सेनापतीला चार हत्तींना बांधून चारी दिशेंना हत्ती पळविले व सेनापतीचे चार तुकडे केले व त्या ठिकाणी असलेल्या चबुतऱ्यावर दोन रकात सलाते शुक्राना अदा केली व पाणी ग्रहण केले. पंडितांनी औरंगजेबच्या या न्यायाने प्रभावित होवून त्या चबुतऱ्यावर मस्जिद बांधली त्या मस्जिदीला ’धनेडा’ मस्जिद म्हटले जाते. ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहे.
    बहुतांशी मुस्लिम बादशाहांनी भारतावर जे राज्य केले ते इस्लामी नव्हते मात्र ते अन्यायकारीही नव्हते. मात्र 1947 नंतर देश स्वतंत्र झाला आणि जे-जे पक्ष सत्तेत आले त्यांनी मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचे कधी परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या चार वर्षापासून तर मुळीच नाही. फाळणीची शिक्षा निरपराध मुस्लिमांना दिली गेली व दिली जात आहे.
    इतिहासात अनेकवेळा देशाची फाळणी झाली. अफगानिस्तान, भुटान, श्रीलंका, म्यानमार, सिक्कीम हे राज्य तुटून वेगळे झाले. त्यांच्याबद्दल काही बोलले जात नाही. मात्र 1947 च्या फाळणीचा वचपा विश्वासाने येथे राहिलेल्या निरपराध मुस्लिमांवर काढला जातो.
    हिंदू धर्मातील अन्यायकारी वर्णव्यवस्थेला कंटाळून अनेकवेळा अनेकांनी इतर धर्मात प्रवेश केला. मूलनिवासी असलेल्या भारतीयांनी हिंदू धर्म सोडून कधी इस्लाममध्ये तर कधी ख्रिश्‍चन धर्मामध्ये प्रवेश केला. सगळ्यात मोठे धर्मांतर तर दस्तुरखुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली घडवून आणले. मात्र दक्षिण पंथीयांच्या निशाण्यावर कायम मुस्लिम राहिलेले आहेत. वास्तविक पाहता प्रत्येक धर्मामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक असतात. मुस्लिमांमध्ये दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन जन्माला आले तसेच अशफाकउल्ला खान आणि एपीजे कलामही जन्माला आहे. ब्राह्मणांमध्ये जसे नथुराम गोडसे जन्माला आला तसेच हेमंत करकरेही जन्माला आले. म्हणून बहुसंख्य समाज व राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की, कोणाला किती महत्व द्यावे? कोणावर किती संशय घ्यावा. मुठभर वाईट चारित्र्याची माणसे मुस्लिमांमध्ये निपजली म्हणून 20 कोटी मुस्लिमांना सरसकट वाईट समजून त्यांना सातत्याने वाईट वर्तणूक दिल्याने कोणाचेच भले होणार नाही. सहनशिलतेचीही मर्यादा असते. एकदा का ती संपली तर मग माणसाला कोणाचीच भिती वाटत नाही, याची राज्यकर्त्यांनी जाणीव असू द्यावी. काँग्रेसच्या काळात जरी दलित व मुस्लिमांवर अत्याचार झाले, दंगली झाल्या, भेदभाव झाला तरी काँग्रेसने  कधी त्याचे समर्थन केले नाही किंवा लोकतांत्रिक संस्थांना कधी नुकसान पोहोचविले नाही. मात्र गेल्या चार वर्षात दलित आणि मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारामागे सरकारची मुकसंमती होती, हे ठळकपणे अधोरेखित झालेले आहे. एवढेच नव्हे तर या काळात निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या संस्थांना ज्याप्रमाणे कमकुवत करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, त्यामुळे लोकशाही टिकणार की नाही अशी सार्थ भिती जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे जिची अभिव्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतून झालेली आहे. एवढेच नव्हे तर न्या. चेलमेश्‍वर आणि न्या. जोसेफ कुरियन यांनी पुन्हा मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा यांना पत्र लिहून मागच्या आठवड्यात देशाची लोकशाही धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली आहे. ही भितीदायक स्थिती आहे.
    भाजपची निवडणूक नीति पाहता पोटनिवडणुका वगळता सर्व निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने मोठ्या प्रमाणात सामाजिक ध्रुवीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, याची खात्री पटते. रविशकुमार म्हणतात त्याप्रमाणे लोकांच्या मनात जातीयतेचे विष भिनलेल्या झुंडीच्या झुंडी देशभरात तयार करण्यात भाजपाला कमालीचे यश प्राप्त झालेले आहे. माध्यमांच्या व विशेषकरून समाजमाध्यमांच्या माध्यमाने या झुंडींचे रूपांतर काही तासातच हिंसक समुहात करण्यात या लोकांनी प्राविण्य मिळविलेले आहे. त्यातूनच मग दादरीच्या अखलाकपासून ते आसनसोलच्या सिबगतुल्लाह पर्यंतच्या अनेक निरपराध मुस्लिमांचा बळी या झुंडीनी घेतला आहे. याच मालिकेत एक नवीन सुन्न करणारी घटना 10 जानेवारी 2018 रोजी जम्मूच्या कठुआ शहराच्या रसाना गावामध्ये घडली होती. जी नेहमीप्रमाणे सिंगल कॉलम बातमी बनूण विस्मरणात गेली होती. मात्र 9 एप्रिल रोजी या घटनेने असे काही वळण घेतले की, संपूर्ण देश हादरून गेला. देशच नव्हे तर अंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची नोंद घेण्यात आली.
    संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी करणाऱ्या या घटनेचा तपशील एव्हाना वाचकांना माहित झालेला आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करणे योग्य होणार नाही.
    2012 साली निर्भयावर झालेल्या क्रूर हिंसक आणि सामुहिक बलात्काराचा तपशील समजल्यावर अवघा देश हादरला होता. वाटले होते की, यापेक्षा जास्त क्रौर्य करणे शक्यच नाही. मात्र 9 एप्रिलला रासनाच्या आठ वर्षाच्या आसिया (नाव बदललेले) वर ज्या प्रकारचे लैंगिक अत्याचार झाले, ज्यांनी केले, ज्या कारणासाठी केले व ज्यांनी त्याचे समर्थन केले ते पाहून निर्भयावर झालेल्या अत्याचारापेक्षाही खालची पातळी आपल्या समाजातील काही लोक गाठू शकतात याची प्रचिती आली.
    कठुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींच्या बलात्कारानंतर माध्यमांनी ठळकपणे आसियाचे नाव प्रकाशित केले. याउलट उन्नावमध्ये बळी पडलेल्या मुलीचे नाव आजही बहुतेकांना माहित नाही. एवढेच नव्हे तर 2012 साली लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या निर्भयाचे खरे नाव आजसुद्धा बहुतेकांना माहित नाही. असे असतांना आसियाचेे नाव ठळकपणे प्रसिद्ध करण्यामागे माध्यमांचा काय हेतू होता? हे सहज समजू शकते. कायद्याने पीडितेचे नाव न प्रकाशित करण्याचे बंधन कलम 228 (अ) भादंविप्रमाणे असतांनासुद्धा या मुलीचे नाव प्रकाशित करण्यामागे हाच हेतू होता की, बहुसंख्य लोकांनी शांत बसावे.
    ही घटना का झाली?
      दक्षिणपंथी विचारांच्या संघटनांनी गेल्या अनेक दशकापासून एक खोटा प्रचार चालविलेला आहे की, या देशात मुस्लिमांची संख्या वेगाने वाढत आहे. एकवेळ अशी येईल की, हिंदू आपल्याच देशात अल्पसंख्यांक होतील. या अनाठायी भितीने बहुतेक सामान्य हिंदू बांधव कायम ग्रासलेले असतात. त्यापैकीच एक सांझीराम ही व्यक्ती आहे. जम्मूच्या महसूल विभागात अधिकारी या पदावरून निवृत्त झालेल्या 60 वर्षीय सांझीरामला कायम ही भिती सतावत होती की, जम्मू सुद्धा एक दिवस मुस्लिम बहुल होवून जाईल. म्हणून रासना भागात मुस्लिम बक्करवाल समाजाच्या वस्तीलाच सांझीराम याचा विरोध होता. आपल्या जमिनीवर बक्करवाल नागरिकांचे घोडे, मेंढ्यांना चरायला देवू नका आणि इतर कोणतीही मदत त्यांना करू नका, असे सांझीरामने हिंदू लोकांना बजावून ठेवले होते. गेल्या डिसेंबरमध्ये अब्दुल रशीद बक्करवाल यांच्या बकऱ्या सांझीरामने ताब्यात ठेवून एक हजार रूपयांचा दंड घेऊन त्या परत केल्या होत्या. शिवाय, घराशेजारच्या जंगलात बकऱ्या चारविल्या म्हणून मुहम्मद युसूफ बक्करवाल याला एक हजार रूपयाचा दंड केला होता. बक्करवाल लोकांनी रासनामध्ये घरे घेऊ नयेत असाही त्याचा आग्रह होता. त्याच्या या आग्रहाला न जुमानल्यामुळे बक्करवालांना कायमची अद्दल घडविण्यासाठी त्यानेच आपल्या वाममार्गाला लागल्यामुळे शाळेतून काढून टाकलेल्या पुतन्या संतोष याचा उपयोग केला. त्याची नजर मुहम्मद युसूफच्या आठ वर्षीय मुलीवर होती. तिचे हालहाल करून ठार मारल्यास बक्करवाल घाबरून आपल्या गावातून निघून जातील, अशी त्याला खात्री होती. ही कामगिरी त्याने आपल्या पुतन्यावर सोपविली. पुतन्याने त्याचा एक मित्र परवेशकुमार उर्फ मन्नू याच्या मदतीने आसियाचे अपहरण केले व बलात्कार केला व सांझीरामला याची कल्पना दिली. तेव्हा सांझीरामने तिला मंदिरामध्ये घेऊन येण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे आसियाला मंदिरामध्ये सात दिवस कोंडून ठेवून अत्याचार करण्यात आले. 
आरोपींची नावे
    (1) सांझीराम (सेवानिवृत्त महसूल अधिकारी), (2) संतोष (सांझीरामचा पुतन्या), (3) प्रवेशकुमार उर्फ मन्नू, (4) विशाल जनगोत्रा (सांझीरामचा मुलगा), (5)तिलकराज (पोलीस कॉन्स्टेबल), (6) आनंद दत्ता (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक), (7) सुरेंद्र कुमार (विशेष पोलीस अधिकारी), (8)  दीपक खजुरिया (विशेष पोलीस अधिकारी).
    निर्भयाच्या घटनेनंतर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी देशभर आंदोलन झाले. मात्र या घटनेनंतर आरोपींना शिक्षा होवू नये यासाठी कठुआ बार असोसिएशनच्या वकीलांनी व कठुआच्या नागरिकांनी हिंदू एकता मंच नावाची संस्था स्थापन करून तिरंगा हातात घेवून यातील आठही आरोपींना सोडण्यासाठी प्रचंड जनआंदोलन केले. इतके की, बळाचा वापर करून सुद्धा 9 एप्रिलला कोर्टात दोषारोप सादर करण्यासाठी पोलिसांना सहा तास या लोकांशी झूंज द्यावी लागली. या ठिकाणी एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की, स्वत:च्या मुलाला ठार केल्यानंतरही आसनसोलच्या इमाम रशीदींनी मुस्लिमांना शांत राहण्याचे आवाहन केले. याउलट कठुआमध्ये चिमुरडीच्या बलात्कार व हत्तेतील आरोपींना सोडविण्यासाठी तिरंगा हातात घेवून काही लोकांनी आंदोलन केले. सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर उशीरा का होईना आसियाला मोठ्या प्रमाणात देशभरातील हिंदू बांधवांचे समर्थन मिळाले. ही समाधानाची बाब आहे.
    या घटनेच्या तपासासाठी दोन हिंदू पंडितांचे फार मोठे योगदान लाभलेले आहे. एक - अ‍ॅड. दीपिका राजावत तर दूसरे एस.एस.पी. रमेश झाल्ला. अ‍ॅड. दीपिका यांनी जम्मू कश्मीर उच्च न्यायालयात धाव घेवून याप्रकरणी तपासासाठी क्राईम ब्रँचची एसआयटी गठित करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली, परिणामी त्यांना धमक्या देण्यात आल्या. इतक्या की त्यांनी स्वत:वर बलात्कार होण्याची किंवा जीवे मारण्याची शक्यता सार्वजनिकरित्या बोलून दाखविली.
न्याय मिळण्याची शक्यता कमीच
    प्रचंड जनाक्रोश होवूनही व पंतप्रधानांनी या संदर्भात न्याय होईल, अशी ग्वाही देवूनही याप्रकरणी न्याय होईल याची शक्यता कमीच वाटते.
कारण - 1. पंतप्रधान यांनी अखलाकच्या हत्तेनंतर लोकसभेमध्ये त्यासंबंधी भाष्य केले होते. परंतु, अद्याप अख्लाकच्या हत्येत दोषी असणाऱ्यांवर कार्यवाही झालेली नाही व त्यानंतरही सातत्याने मॉब लिंचिंगच्या घटना घडत गेल्या. म्हणून आसियाच्या प्रकरणातही कारवाई होईल व न्याय मिळेल, याची शक्यता कमीच.
    2. आरोपींच्या मागे रासना ते कठुआ तसेच जम्मूमधील बहुसंख्य लोकांचे समर्थन आहे. संपूर्ण बार त्यांच्या बाजूने उभे आहे. तिरंगा झेंडा आणि राष्ट्रवादाची शक्ती उभी आहे. म्हणून या प्रकरणात न्याय मिळेलच याची शक्यता कमी आहे. मागच्याच आठवड्यात हैद्राबादच्या मक्का मस्जिद स्फोटामधील सर्व आरोपी निर्दोष सुटले. त्यात मॅजिस्ट्रेटसमोर गुन्ह्याची कबुली देणारे स्वामी आसीमानंदही सुटले. तसेच काही या गुन्ह्यात झाल्यास आश्‍चर्य वाटू नये.
उपाय
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”आम्ही सर्व लोकांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रंथात ज्याचे वर्णन केले आहे अशा आमच्या अवतरलेल्या स्पष्ट मार्गदर्शनाला जे लपवितात त्यांचा अल्लाह सुद्धा धिक्कार करतो आणि धिक्कार करणारेही त्यांचा धिक्कार करतात.” (सुरे बकरा आयत नं. 159).
    मुस्लिमांनी कुरआनचे मार्गदर्शन हे सर्वांसाठी आहे व ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, याची हवी तेवढी काळजी घेतलेली नाही. म्हणजे दावतचे काम प्रभावशाली पद्धतीने केलेले नाही. म्हणून भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर मुस्लिमांच्याबद्दल तिरस्कार पसरलेला आहे. यापासून सुटका करण्यासाठी कुरआनचेच मार्गदर्शन उपयोगी पडणारे आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ” तथापि जे लोक या प्रवृत्तीपासूनच परावृत्त होतील व सुधारणा करतील आणि स्पष्टपणे विवेचन करतील त्यांना मी क्षमा करतो आणि मी क्षमावंत आणि दयावंत आहे.” (सुरे बकरा आयत नं.160).
    अर्थात कुरआनचे मार्गदर्शन सार्वजनिक करणे, सत्यमार्ग सर्वांना दाखविणे यातूनच लोकांचे गैरसमज दूर होतील, मुस्लिमांविषयी असलेला तिरस्कार दूर होईल व कठुआसारखे प्रकार भविष्यात होणार नाहीत. हे दावतचे महान कार्य करण्याची अल्लाह आपल्या सर्वांना समज देवो आमीन.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget