Halloween Costume ideas 2015

भाजपचे (कर)नाटक

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १०४ जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष बनला. दुसरीकडे सत्तास्थानी  असलेल्या काँग्रेसला मतदारांनी अनपेक्षितपणे धक्का दिला आहे. काँग्रेसला ७८ आणि निधर्मी जनता दलाला (निजद) ३८ जागा  मिळविता आल्या. केपीजेपी आणि एका अपक्ष उमेदवाराला विजय मिळविता आला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारा  ११३ हा जादुई आकडा पार करणे कोणालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी  आता सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला असून घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू  असताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपालाच सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. या निर्णयामुळे काँग्रेसने संताप व्यक्त   केला. काँग्रेसचे सर्व आमदार अज्ञातस्थळी रवाना झाले, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने सावधगिरी पाळल्याचे म्हटले जाते. जनता  दल सेक्युलर (जेडीएस) चे नेता एच डी कुमारस्वामी यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना १०० कोटींची आणि मंत्रीपदाची ऑफर देत  असल्याचा भाजपवर आरोप केला. त्यामुळे घोडेबाजाराने किती उच्चांक गाठला आहे याची प्रचिती येते. जेडीएस आणि काँग्रेसमध्ये  युती झाली असू त्याच्याकडे बहुमत आहे. जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. देशात २०१९ साली होऊ  घातलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्या निवडणुकांत सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी (की लचका तोडण्यासाठी?) आपल्या इथल्या  विविध राजकीय पक्षांचा हिडीस तमाशा सुरू झाला आहे. आपल्या देशात आपण संसदीय लोकशाही राज्यपद्धती स्वीकारून आता ७०  वर्ष झाली किंवा होतील. आपली राज्यपद्धती ब्रिटीशांच्या संसदीय राज्यपद्धतीवर आधारलेली आहे. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक येते, पुन्हा भावनांना हात घालणारी भाषणे, जात किंवा धर्म धोक्यात आल्याचा बागुलबुवा पक्षाने ठोकल्या, की तेच मतदार पुन्हा तीच  चूक करतात आणि मग हाच खेळ पुन्हा पुढच्या पाच वर्षांसाठी सुरु होतो. राजकारण आणि सत्तेच्या खेळात संधिसाधू राजकारण  करताना मतदारांच्या कौलाचा काहीही विचार केला जात नाही. सोयीचे राजकारण करताना भाजपने नीतिमूल्यांची निर्लज्जपणे थडगी बांधून टाकली आणि या असल्या दळभद्री-सत्तांध राजकारणाचे बेशरमपणे समर्थनही केले आहे. पुरोगामी-प्रतिगामी, लोकशाही  विरोधी, लोकहितवादी, लोकसेवक, विकासाचे राजकारण या साऱ्या शब्दांचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून जनतेची फसवणूक  करणाऱ्या याच सत्तांधांनी जनतेच्या आशा अपेक्षांचीही कशी होळी केली आहे. हे आपण गेली चार वर्षे उपभोगत आहोत. लोकसभा २०१९च्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीकडे पाहिले गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  देशातील प्रमुख पक्ष असणार्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही गेले काही दिवस कर्नाटकमध्ये ठाण मांडल्याचे बघायला  मिळाले. या निमित्ताने गेले काही दिवस तापलेले वातावरण, एकमेकांवर केले गेलेले दोषारोप, ओढलेले ताशेरे, या निमित्ताने  वृत्तवाहिन्यांवर झडलेल्या चर्चा यातच मागचे काही दिवस सरले. ही निवडणूक म्हणजे काँग्रेससाठी क्षीण झालेली शक्ती पुन्हा  मिळवण्याचा प्रयत्न होता तर भाजपसाठी विजयाची खंबीर पाश्र्वभूमी तयार करण्याचा कसोशीचा प्रयत्न होता. त्यामुळेच या  राज्याच्या निवडणुकीचा ज्वर देशभर जाणवला. या निवडणुकांच्या निमित्ताने आपणही असा प्रयत्न पाहिला. यावेळी ५६ इंच छाती असणाऱ्यांची जीभही घसरली आणि कारकिर्दीच्या प्रारंभीच्या टप्प्यात असणाऱ्या नेतृत्वाने स्वत:च्या तोंडाने आपल्याला पंतप्रधान  बनण्याची इच्छा असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याचीही चांगलीच चर्चा झाली. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता होती. विधानसभा  निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाटेचा भाजपला फायदा झाला. कर्नाटकात १९ टक्के मुस्लिम, १८ टक्के एससी, एसटी,१७ टक्के  लिंगायत आणि १२ टक्के वोक्कलिंग समाजाची मते आहेत. ही जातनिहाय आकडेवारीही काँग्रेससाठीच अनुकुल असताना प्रत्यक्षात  भाजप तेथे वरचढ ठरली याचाच अर्थ आता जातनिहाय गणिते मांडून निवडणुकांचे भाकित करण्याचा जमाना गेला आहे. गोवा,  मेघालय अशा ठिकाणी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने जी तत्परता दाखवली, चपळाई दाखवली ती पाहता  कर्नाटकातही त्याचीच पुनरावृत्ती करणे हा बहुमत न मिळाल्यास भाजपचा पर्याय असू शकतो. लोकशाहीबद्दलचा आदर, धर्म आणि  राज्यसंस्थेच्या कार्यकक्षा विभिन्न असल्याबद्दलची श्रद्धा (आपल्याकडे सेक्युलर या संकल्पनेचे वाटेल तसे अर्थ काढले जातात) आणि  परस्परांचा आदर राखत शांततापूर्वक सहजीवनाचे मूल्य न रुजलेला हा समाज पुन्हा गुलामगिरीच्या बेड्यात कसा अडकेल?  याबाबतची चिंता पूर्वीच्या धोरणी हितचिंतकांना होती. दुर्दैवाने त्यांच्या या सावधानतेच्या इशाऱ्याकडे तेंव्हा दुर्लक्ष झाले. ज्याची  फलनिष्पत्ती म्हणून काही मूठभर स्वार्थी धोरणी लोकांनी लोकशाहीच्या प्रारूपाशी केलेला व्यवहार आजच्या पिढ्यांना सोसावा लागत  आहे. 
-शाहजहान मगदुम
(मो. ८९७६५३३४०४  Email: magdumshah@gmail.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget