Halloween Costume ideas 2015

‘आरोपी बचाव’ भाजपची नवी घोषणा

-कलिम अजीम, अंबाजोगाई
भारतात यापूर्वी कधी बलात्काराचं जाहीर समर्थन झालं असावं असं माझ्या ऐकिवात नाही, किंबहूना नसेलच; पण सध्या भारतात ‘देशभक्ती’च्या नावाखाली ते केलं जातंय. इतकंच नव्हे तर मोर्चे काढून आरोपींना अडकवू नये अशा धमक्या देत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. हिंदू वकील आणि एसएसपी मृत आसिफाचा खटला चालविण्यासाठी पुढे आल्याने अचानक हा मुद्दा राष्ट्रवादी करण्यात आला. हाच मुद्दा भावनेच्या भरात भाजपत्रस्तांनी उचलून देशभर आंदोलने सुरू केली आणि भाजपला हवं असलेलं हिंदू-मुस्लिम दूहीचं राजकारण यशस्वी झालं. रामराज्याच्या धर्मयुद्धासाठी बलात्कार आणि हत्या कशा नैतिक आहेत, याची जाहीर वाच्यता सुरू झाली आहे. या भाजपच्य षड्यंत्राला मुस्लिम बळी पडले असून ठिकठिकाणी संघटनेतर्फे स्वतंत्र मोर्चे आणि निषेध सभा घेण्यात येत आहेत. तीन महिन्यांपासून आसिफाच्या न्यायदानासाठी लढणारे एका झटक्यात हिंदू झाले आहेत. भाजपच्या सत्ताकृपेने निर्माण झालेली ही दरी कथित रामराज्याच्या संकल्पनेचा उदय म्हणावा लागेल का? असा प्रश्न मोहल्यातील मोर्चे पाहून निर्माण झाली आहे.
कठुआमधील पीडित बकरवाल कुटुंबाची बाजू घेणारे (हिंदू) एसएसपी व वकील न्यायदानासाठी हट्टी झाले, यामुळे भाजपने त्याला राष्ट्रवादाचा रंग दिला. आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होताच अजेंड्याप्रमाणे जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. या जाहीर भूमिकेनंतर मानवतेविरूद्धचा गुन्हा अचानक हिंदू-मुस्लिम झाला. मोर्च्यातून दिल्या गेलेल्या घोषणा केवळ बलात्काराच्या समर्थनासाठी नव्हत्या तर रामराज्याच्या स्थापनेच्या धर्मेयुद्धासाठी होत्या. खोऱ्यात जम्मू विरूद्ध काश्मीर अशी राजकीय विभागणी आहे. जम्मूत हिंदू बहुसंख्य तर काश्मिरात ते अल्पसंख्य आहेत. जम्मूतून बकरवाल (मेंढपाळ) मुस्लिमांना हुसकावून लावण्यासाठी चिमुरड्या आसिफाचा बळी घेण्यात आला. काश्मिरीद्वेष आणि त्यात मुस्लिमविरोधी अजेंडा राबवून देशभरात हा मुद्दा हिंदू-मुस्लिम म्हणून पेटवण्यात येत आहे. घटना घडून तीन महिने उलटले आहेत, या तीन महिन्यांत मृत आसिफासाठी न्यायादानासाठी काश्मिरी पंडित असलेले नागरिक कुठल्याही प्रसिद्धीशिवाय झटत होते. पण बलात्काराच्या समर्थनार्थ दिलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणेमुळे हा मुद्दा देशभरात चर्चेत येऊन राजकीय वादंग निर्माण झालं.
या राजकीय वादळानंतर फेसबुकवरील भाजपभक्ताच्या कॉमेंट वाचल्या तर हे ‘धर्मयुद्धा’साठी हे वादळ पेटवलं जात आहे हे लक्षात येईल. सामाजिक कार्यकर्ते व खटला लढवणाऱ्या एसएसपी, वकिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. बलात्कार समर्थक संस्कृतीचे पाईक जघन्य गुन्ह्याला नैतिक म्हणत त्यात जात-धर्म खेचून त्याची हिंदू-मुस्लिम अशी वर्गवारी करत आहेत. अशा अराजक वृत्तीमुळे इतर देशातील प्रसारमाध्यमे ‘तुमचा प्रवास विकृतीकडे’ अशा बातम्या मुख्य मथळ्याखाली लावत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची छी: थू: होताना चौकीदार असलेले प्रधानसेवक ‘मगरमच्छ के आँसू’ गिळत कारवाईचं पोकळ आश्वासन देत आहेत.
उन्नाव व कठुआ बलात्काराबद्दल देशभरात भयंकर राग व्यक्त केला जात आहे. दोन्ही गुन्ह्यात थेटपणे भाजप व हिंदुत्ववादी संघटनेचे समर्थक सामील आहेत. या आरोपींना वाचवण्यासाठी देशभरात हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा उघडल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे सरकार व त्यांचे मंत्री मागच्या सरकारमध्ये झालेल्या अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्याचा पाढा वाचून दाखवायची स्पर्धा लागलेली आहे. एका अर्थाने सरकार गुन्ह्याचे पॅरामीटर्स मोजपट्टी लावून मोजत आहे. यावरून सरकारची नैतिकता किती खालच्या दर्जाची आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
भाजपने सत्तेत येण्यापूर्वी ‘बेटी बचाव’ची घोषणा दिली होती. कोणापासून बेटी बचाव असं त्या वेळी सांगण्यात आलं नव्हतं. पण देशात घडणाऱ्या अलीकडच्या काही घटना पाहता भाजपच्या घोषणेचा नेमका अर्थ अभिप्रेत झाला आहे. त्यांनी या घोषणेचा नेमका शोधायला भारतीय जनतेला मदत केली आहे. त्यामुळे मतदार बंधुनी जागे होऊन ‘आमच्या घरी लहान मुली राहातात बीजेपी सदस्यांनी इकडे येऊ नये’ असे बोर्ड लावले आहेत.
भाजपच्या योगी-भोगी पदाधिकाऱ्यांना घाबरून अनेक ठिकाणी ‘बेटी छुपाओ’च्या घोषणा दिल्या जात आहेत. अनेक शहरांत ‘भाजपकडून बेटी बचाव’ असे पोस्टर्स हातात घेऊन लोकं रस्त्यावर उभे ठाकले आहेत. बॉलीवूडमध्येही संतापाची मोठी लाट उसळली असून सेलिब्रिटींनी ‘मी हिंदू आहे’, ‘मी भारतीय आहे’ असे पत्रके घेऊन भाजपच्या ‘आरोपी बचाव’ नीतीचा निषेध केला आहे. भाजपच्या ‘आरोपी बचाव’ भूमिका व बलात्कारी सत्ता-संस्कृतीविरोधात  देशात हडकंप माजला आहे. शाळा, कॉलेज, सभा-संमेलनं, चौक, मार्केट, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालये, इंटरनेट सगळीकडे भाजपच्या या धोरणाचा निषेध सुरू आहे.
इतका हाहाकार माजली असतानाही भाजप बचाव मोडमध्ये आहे. उन्नावच्या घटनेत हायकोर्टाला आदेश द्यावे लागले की आरोपीला अटक करा, पण राज्याच्या भगव्या वेषधारी सरकारने आरोपीला सीबीआयच्या सुरक्षित झोनमध्ये आसरा देऊ केला आहे. यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी थेट आरोपीला वाचवण्याची मोहीम उघडल्याचं भाजपच्याच आमदाराने उघड केलं आहे.
उन्नाव व कठुआची घटना देशात 'आरोपी बचाव' सत्ता-संस्कृती रुजत आहे याचे उदाहरण आहे. कठुआत आरोपीने मंदिसारख्या पवित्र ठिकाणी आठ वर्षाच्या चिमुरडीला कैद करून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. इतकंच नव्हे तर या गुन्ह्यात आपला मुलगा व पुतण्याला सामील करून त्यांच्याकडून लहान बालिकेवर अत्याचार करवून घेतला. इथपर्यंत ही मालिका थांबली नाही तर मुलीला संपवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांनीदेखील मुलीला ठार मारण्यापूर्वी भोगण्याची इच्छा व्यक्त करून ती पूर्ण केली. अशा प्रकारे त्या आठ वर्षाच्या अबोध बालिकेला क्रूर सैतानांनी मंदिरात संपवलं. इतक्या क्रूरपणे त्या बालिकेला ठार मारण्यात आले.
मुस्लिमांना देशातून हाकलून लावणे, त्यांच्या संपत्तीची हानी करणे, त्यांना त्रास देणे, वेळप्रसंगी त्यांना ठार मारणे असं उदिष्ट्ये काही धर्मवादी बाळगून आहेत. याच हेतूसाठी त्यांनी आपलं राजकीय, सामाजिक जीवन समर्पित केलं आहे. त्याचाच भाग म्हणून देशात गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाजाविरोधात हेट क्राईमचा कट रचला जात आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात हेट क्राईमच्या तब्बल ३७ घटना घडविण्यात आल्या. यात ११ मुस्लिमांना ठार मारण्यात आलं आहे. तर गोरक्षकांनी मॉब लिंचिंग करून २६ मुस्लिमांना संपवलं आहे. आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलने या वाढत्या हेच क्राइमवर चिंता व्यक्त केली होती. राजसमंद व कठुआची घटना हेट कार्ईमचा कळस होती. मुस्लिमांच्या हत्येचं मिरवणुका-रॅल्या काढून उदात्तीकरण करणे हेट क्राईमला मान्यता मिळाल्याचे सोदाहरण होतं. क्रूरपणे हत्या करून त्याचे समर्थन करणारा गट उघडपणे बाहरे येणे हे मुस्लिमविरोधात वातावरण भडकवत ठेवण्याचं एक षडयंत्र आहे.
लहान मुलीची हत्या मुस्लिमद्वेषी सूडभावनेपोटी झाल्याचं सिद्ध आहे. असं असलं तरी पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी सर्वप्रथम हिंदूच पुढे आले आहेत. कुठलंही जात-धर्म पुढे न करता त्यांनी चिमुरड्या आसिफाच्या कुटुंबीयाला कायदेशीर मदत व सहकार्य दिलं. वकील असो वा एसएसपी यांनी प्रयत्न करून खटला जलदगती चालविला जावा यासाठी विषेश प्रयत्न केले. बार काऊंसिलच्या धमकीला भीक न घालता वकील सक्षमपणे उभ्या आहेत. थोडक्यात  काय तर आरोपीविरोधात पोलीस व वकील उभे राहिल्यानं स्थानिक भाजप पुढाऱ्यांनी मुद्दा हिंदू-मुस्लिम केला. आज ही घटना मानवतेच्या दृष्टिकोनातून नव्हे तर हिंदू-मुस्लिम प्रश्न समजून पाहिली जात आहे. जे हिंदुत्ववाद्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात चार्जशीट दाखल करताच ही समस्या राष्ट्रीय करून वातावरण हिंदू विरुद्ध मुस्लिम करण्यात आलं.
आठ वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या करण्याला धर्मयुद्धाचा रंग देण्यात आला आणि संघ-भाजपला हवा असलेला अजेंडा सर्व भारतीयांनी भावनेच्या ओघात उचलला. तीन महिन्यांपासून केवळ निनावी लोकं कुठल्याच प्रसिद्धीविना कायदेशीर प्रक्रिया रेटत होते, पण मोर्चे-आंदोलनामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की निषेध करू नये पण, तो पॉलिटिसाईज होता कामा नये. पण दुर्दैवीने तो राजकीयच केला जातोय.
उन्नावची घटना कठुआ प्रकरणामुळे हिंदू-मुस्लिम झाली आहे. या निमित्ताने संघ भाजप उघडा पडला आहे. रामराज्याची संकल्पना लेकीबाळी अब्रूवरून रचली जात असेल तर सर्वांना एकदा विचार करावाच लागेल. कठुआत बलात्काराचा बचाव करताना मॉब ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होता. याचा अर्थ आठ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून क्रूर पद्धतीने हत्या करणे धर्मयुद्धाचा भाग आहे का? ज्या पद्धतीने मृत मुलीचा खटला घेणाऱ्या वकिलाला वकिलांनीच खटला सोड नसता जीवे मारू अशी धमकी रामराज्याचा भाग आहे का? रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांनी शस्त्रे घेऊ नाचणे, ड्युटीवर असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे, राम राज्याच्या स्थापनेची पोचपावती होती का?  काही वेळासाठी असं मानू या की इथंपर्यत ठीक आहे, पण हे संघवादी कुठले रामराज्य आणू पाहत आहे? मुलींच्या अब्रूची लक्तरे फाडणे, जात आणि धर्माच्या नावाने सामान्य जीवांना क्रूर पद्धतीने ठार मारणे, मानवजातींपेक्षा गायींना अधिक महत्त्व देणे, विज्ञान व विवेक नाकारून मूलतत्त्ववाद, अनिष्ठ रुढीपरंपरा लादणे हीच का रामराज्याची संकल्पना? राजकीय नेत्यांना असं रामराज्य हवं असेल तर भारतीय नागरिकांनी जरा थांबून विचार करण्याची गरज आहे. थोडसं स्तब्ध होऊन आपण कुठे जात आहोत हे शांतचित्ताने समजून घेण्याची गरज आहे. खरंच विज्ञान आणि विवेक नाकारणारे राम राज्य अभिप्रेत असेल तर लोकशाही मूल्यांची ओरड कशाला? संसदीय लोकशाही चालवण्याचं ढोंग कशाला करता?
गेल्या २५ वर्षांत देशाचं समाजकारण रामाच्या नावाने गढूळ करण्यात आलं आहे. गेल्या चार वर्षांत कुठलाही मुद्दा हिंदू राष्ट्राशी जोडून हिंदू विरूद्ध मुस्लिम भडकवण्यात आला. प्रसारमाध्यमे, ब्यूरोक्रट्स, शाळा, कॉलेज, विद्यापीठे, शासनात रामराज्याची कल्पना संचारली आहे. आता प्रशासकीय विभागामध्येही रामराज्ये रेटण्याचं काम सुरू झालं असून, राजसमंद आणि कठुआसारख्या घटना घडवून त्या राज्याची पायाभरणी केली जात आहे. हत्या आणि बलात्काराला राजकीय मान्यता देण्याची भाषा सुरू आहे. येत्या काळात धर्मायुद्धाच्या नावाने घरात घुसून आया-बहिणीचे वस्त्रहरण केले जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. धर्माच्या नावाने दरोडे घालण्याची परवानगी मागितली जाईल, रामराज्याच्या नावाने खंडणी उकळणे अधिकृत करण्याची मागणी केली जाईल. हवंय ना असं रामराज्य..! हीच का रामराज्याची संकल्पना?
गेल्या वर्षी जून महिन्यात झारखंडमध्ये दोन हिंदू तरूणांची हिंसक झुंडीने हत्या केली. ते दोन तरूण आम्ही हिंदू आहोत आम्हाला मारू नका अशा गयावया करत होते. पण उन्मादी झुंडीच्या डोक्यात रक्त संचारलं होतं, कारण काहीच वेळापूर्वी त्यांनी ४ मुस्लिम तरुणांची हेट क्राईममधून खांबाल बांधून हत्या केली होती. त्यामुळे झुंडीला या तरुणांना ठार मारायचेच होते. त्यामुळे झुंड ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती. अखेर त्या दोघांना त्यांच्या पत्नी व मुलांसमोर ठार मारले. मानवद्वेष ही वृत्ती काम राज्याची देणं असेल तर कुणाला हवंय हे हिंदू राष्ट्र?
भगवान रामाच्या नावाने सुरु झालेला हा हेट क्राईमचा प्रवास कुठे घेऊन जाईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, मानवेताला काळिमा फासवणारी बलात्कार व हत्यची घटना पॉलिटीसाईज करून हिंदू-मुस्लिम रंग देणे, रामराज्य व हिंदूराष्ट्राची पायाभरणी भगवान रामाला मान्य आहे का? भगवान रामाच्या नावाने आमच्या आया-बहिणीवर जर बलात्कार होत असेल व त्याचे समर्थन केले जात असेल तर नक्कीच आम्हा सर्वांना शांत मनाने विचार करण्याची गरज आहे.
कलीम अजीम, अंबाजोगाई

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget