(१५४) त्या दु:खानंतर मग अल्लाहने तुम्हांपैकी काही लोकांवर अशी समाधानाची स्थिती पसरविली की ते पेंगू लागले.११२ पण एक दुसरा गट ज्याच्यापाशी सर्व महत्त्व केवळ आपल्या स्वत:च्या फायद्याचेच होते, अल्लाहच्या बाबतीत तर्हेतर्हेचे अज्ञानपूर्ण विचार करू लागला जे संपूर्णपणे सत्याविरूद्ध होते. हे लोक आता म्हणतात, ‘‘या आदेश देण्याच्या कार्यवाहीत आमचादेखील काही वाटा आहे?’’ यांना सांगा, ‘‘(कोणाचाही कसलाही वाटा नाही) या कामाचे सर्व अधिकार अल्लाहच्या हातात आहेत’’ वास्तविक पाहाता या लोकांनी आपल्या मनात जी गोष्ट लपवून ठेवली आहे ती तुमच्यासमोर प्रकट करत नाहीत. त्यांचा खरा उद्देश हा आहे की, ‘‘जर नेतृत्वाचे अधिकारांत आमचा काही वाटा असता तर तेथे आम्ही मारले गेलो नसतो.’’ यांना सांगा, ‘‘जर तुम्ही आपल्या घरातदेखील असता तर ज्या लोकांचा मृत्यू लिहिलेला होता ते स्वत: होऊन आपल्या मृत्यू-स्थानाकडे निघून आले असते.’’ आणि हा प्रसंग ओढवला तो अशासाठी होता की जे काही तुमच्या मनांत लपलेले आहे, अल्लाहने त्याची परीक्षा घ्यावी आणि जे काही तुमच्या हृदयात आहे. ते साफ करून टाकावे. अल्लाह मनांची स्थिती चांगलीच जाणतो.
(१५५) तुमच्यापैकी जे लोक सामन्याच्या दिवशी पाठ दाखवून गेले होते त्यांच्या या डळमळण्याचे कारण असे होते की, त्यांच्या काही उणिवांमुळे शैतानने त्यांचे पाय डळमळीत केले होते. अल्लाहने त्यांना माफ केले, अल्लाह फार क्षमाशील व सहनशील आहे.
(१५६) हे ईमानधारकांनो, काफिर (अधर्मी)प्रमाणे गोष्टी करू नका ज्यांचे आप्तेष्ट व नातेवाईक एखादे वेळी जर प्रवासाला जातात अथवा युद्धात सामील होतात (आणि तेथे एखाद्या अपघाताला बळी पडतात) तर ते म्हणतात की जर ते आमच्याजवळ असते तर मारले गेले नसते अथवा त्यांची हत्या झाली नसती. अल्लाह अशा तर्हेच्या गोष्टींना त्यांच्या मनांतील शल्य व दु:खाचे कारण बनवून टाकतो.११३ एरवी खरे पाहता मारणारा व जीवन देणारा तर अल्लाहच आहे आणि तुमच्या सर्व कृतीचा तोच निरीक्षक आहे.
(१५७) जर तुम्ही अल्लाहच्या मार्गात मारले गेला अथवा मेला तर अल्लाहची जी कृपा व क्षमा तुमच्या वाट्यास येईल ती त्या सर्व वस्तूपेक्षा जास्त उत्तम आहे, ज्या हे लोक जमा करतात.
(१५८) आणि मग तुम्ही मरा अथवा मारले जा कोणत्याही परिस्थितीत तुम्हा सर्वांना एकवटून अल्लाहकडेच रुजू व्हावयाचे आहे.
(१५९) (हे पैगंबर (स.)!) ही अल्लाहची मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभावी ठरला आहात. एरवी जर तुम्ही एखादे वेळी शीघ्रकोपी स्वभावी व निष्ठूर असता तर हे सर्वजण तुमच्यापासून विभक्त झाले असते. यांचे अपराध माफ करा, यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा, आणि धर्म-कार्यात यांनासुद्धा सल्लामसलतीत सहभागी ठेवा. मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लाहवर भरोसा करा, अल्लाहला ते लोक प्रिय आहेत जे त्याच्या भरवशावर काम करतात.
(१६०) अल्लाह तुमच्या मदतीला असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही आणि जर त्याने तुम्हाला सोडून दिले तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकेल? तर मग जे खरे ईमानधारक आहेत त्यांनी अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे.
(१६१) कोणत्याही नबीचे हे काम असू शकत नाही की त्याने अपहार करावा११४ - आणि जो कोणी अपहार करील तो आपल्या अपहारासहित पुनरुत्थानाच्या दिवशी (कयामत) हजर होईल, - मग प्रत्येक जीवाला त्याच्या कमाईचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावर काहीही जुलूम होणार नाही.
११२) हा एक असा विचित्र अनुभव होता जो त्या वेळी इस्लामी सैन्याच्या काही लोकांना आला होता. माननीय अबू तलाहा (रजि.) जे त्या लढाईत सामील होते, स्वयं वर्णन करतात की त्या स्थितीत आमच्यावर अशी ग्लानि आच्छादित झाली होती की तलवार हातातून निसटत होती.
११३) म्हणजे या गोष्टी वास्ताविकतेवर आधारित नाहीत. सत्य तर हेच आहे की अल्लाहचा निर्णय एखाद्याच्या टाळल्याने टळत नाही. परंतु जे लोक अल्लाहवर ईमान राखत नाही आणि सर्व काही आपल्या प्रयत्नांवर आणि उपायांवर आश्रित समजतात; त्यांच्यासाठी अशाप्रकारचे अनुमान दु:खदायी बनतात आणि ते पश्चात्ताप करू लागतात की असे न करता तसे
केले असते तर हे न घडता ते घडले असते.
११४) ज्या धनुष्याधाऱ्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी खिंडीत सुरक्षेसाठी नियुक्त केले होते, त्यांनी जेव्हा पाहिले की युद्धसंपत्ती गोळा केली जात आहे तेव्हा त्यांना वाटले की आता सारी युद्ध संपत्ती (गनीमत) त्याच लोकांना मिळेल जे लोक त्यास गोळा करीत आहेत आणि आम्ही गनीमत वितरणाच्या वेळी त्यापासून वंचित राहू. याच कारणाने त्यांनी आपली जागा
सोडली होती. युद्धसमाप्तीनंतर जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे परत आले तेव्हा त्यांनी त्या लोकांना बोलावून अवज्ञेचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी (सैन्याने) असे बहाणे प्रस्तुत केले जे अतिफुटकळ होते. यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``खरे हे आहे की तुम्हाला आमच्यावर विश्वास नव्हता. तुम्ही विचार केला की आम्ही तुम्हाला धोका देऊ आणि तुम्हाला हिस्सा देणार नाही.'' या आयतचा संकेत याचकडे आहे. अल्लाहच्या कथनाचा हा अर्थ आहे की जेव्हा तुमच्या सेनेचे कंमांडर स्वत: अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) होते आणि सर्व त्यांच्या हातात होते. तेव्हा तुमच्या मनात ही शंका कशी आली की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हातात तुमचे हित सुरक्षित राहणार नाही? काय अल्लाहच्या पैगंबरांपासून तुम्ही ही अपेक्षा ठेवता की जो माल त्याच्या निगरानीत असेल तो ईमानदारी आणि न्यायोचित पद्धतीऐवजी दुसऱ्या पद्धतीने वितरीत होऊ शकतो?
Post a Comment