Halloween Costume ideas 2015

अस्वस्थ गाठोडं...

काही घटना, प्रसंग आठवणींच्या पलिकडे जात नाहीत. विस्मृतीच्या अडगळीतूनही गच्च धुक्यातून वाट सापडावी, तशा त्या सापडतात. सुखद किंवा दुःखद असे कप्पे न करता त्या सहज दुधावरच्या साथीसारख्या तरळत राहतात. या आठवणींना सल असते-नसते. कोणत्या भावनांचा रंग यांना द्यावा नाही कळत - पण या जगण्याचं तत्वज्ञान मांडत राहतात.
    अगदी परवा कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणं झालं, एक शहर, महाराष्ट्र-कर्नाटक सिमा प्रश्‍नांवरून भिजत ठेवलेल्या घोंगड्याच गाव... भाषिक अस्मितेच्या, प्रांतिक अस्तित्वाच्या झगब्यात स्वतःची कट्टरता दाखवणारं सुंदर शांत (?) शहर. सकाळी दहाला शार्प शहरी स्टँडवर उतरून संयोजकांना बोलावून घेतलं. ’एनजीओ’ म्हणून ’महिला सक्षमीकरणा’वर कार्य करणारी तरूण मंडळीची कर्तबगार संस्था... अवघ्या दहाच मिनिटात त्यांनी मला रिसिव्ह केलं. दुचाकी किंवा इतर वाहन नसल्याने मी सरळ त्यांच्या सोबत ऑटोरिक्शाकडे धावलो. सर्वसाधारण पेहराव्यातून मुस्लिम दिसणारा युवक कानडी बोलत होता. आम्ही आमचे ठिकाण-पत्ता सांगितला. ’साठ’ रूपयाच्या भाडेवर आम्ही अ‍ॅटो केली.
    हॉलमधील साध्या विषयावरील चर्चासत्रात मराठी-कानडी अशा दोन्ही भाषेतून काही मनोगत झाली. मतमतांत्तरे आणि बौद्धिक समाधान माणून मी परतीला निघालो. दुपारचे चारेक वाजलेले. ऑक्टोबर हिटला सुरूवात. मी स्टॅण्डपर्यंत जाणारी रिक्षा घेतली. यावेळी माझ्यासोबत सकाळचेच दोघेजण सोबतीला. मी मराठी बोलणार्‍या ऑटोवाल्यांना बोलावलं. ”सेनेच्या नावाने केसरी रंगाचा स्टॉप’ होता. रिक्शावाल्याच्या गळ्यात गंडेदोरे आणि वाढलेल्या दाढीने कपाळी नाम ओढलेला. ’किती होईल भाडे?’- मी, चाळीस रूपये- तो ”आम्ही तिघे मागे बसलो. आमच्यातला एक म्हणाला सकाळी साठ रूपये सांगितले. स्टॅण्डवरून एकाने इथपर्यंत... त्यावर रिक्शावाल्यानं जरा मोठ्यानं उत्तर दिलं. बहुतेक तुम्ही मामूच्या स्टॉपवरून आलात, मुस्लिम आहेत ते, तसंच करतात. तुम्ही ’जय महाराष्ट्र’ म्हणालात म्हणून मी दहा कमीच सांगितले तुम्हाला. भाषेचा अभिमान हाय आम्हांला. त्याच्या उत्तराने माझ्या सोबतच्या दोघांना कसेतरी वाटले. चेहर्‍यावरून तरी एवढेच दिसतच होते. ते दोघेही कानडी भाषिक आणि मी मराठी मुसलमान!! ऑटोवाल्याला आम्ही तीघे मराठीच वाटलो.
    दूसरा प्रसंग, मराठी प्राथमिक शाळेतला... शहर महाराष्ट्रातलं... गच्च लोकसंख्येचे श्रीमंत शहर.. विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने सहज सुत्रसंचालक म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सगळी तयारी सुरूय. येणार्‍या पालकांची व्यवस्था करण्यात शिपाई कर्मचारी वर्ग गुंतलेला. सत्ताधारी पक्षाचे मंत्री वगैरे लवाजम्याची वाट पाहत मान्यवर शिक्षक स्टाफ, मुख्याध्यापक वगैरे सगळे धावपळीत. मुख्याध्यापकांच्या केबीनमध्ये एका सातवीच्या विद्यार्थ्याला मॅडम खूप रागवत होत्या. त्याच्या आई-वडिलांची कार्यक्रमाला अनुपस्थिती होती म्हणून त्या मुलासोबत त्याचे चाचा आलेले होते. त्यांनाही केबीनमध्ये बोलावण्यात आले. मॅडम यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना विसंवाद-मग वाद वाढला. केबीनबाहेर मोठ्याने आवज येऊ लागला. मी ऐकत उभा होतो शांत. शेजारून जाणार्‍या शिपायाने कंमेट केली,” तुमचेच लोक”... सगळे असेच. मी स्टेजवर आलो सरळ. उगीच माईक व्यवस्थित लावल्या सारखा केला. मांडव सजावट करणार्‍या ’मुल्ला डेकोरेशनवाल्याला बोलावलं जवळं, तो म्हणाला दरवर्षी इथलं काम मलाच मिळंतय, शिक्षक स्टाफ प्रेमळ आहे, मदत करतात सारे फक्त बिर्याणी मागतात तेव्हा आणून द्यावी लागते बस्स. फटाके फुटावेत धुसमुसत तशा अनेक प्रसंगाची आठवमाळ फुटू लागलीय पण या शेवटच्या प्रसंगाने तर मी फुटलोच...
    शासकीय कामाचा अतिरिक्त भाराने वैतागलेले शिक्षक मित्र, मतदार यादी, नवीन नाव नोंदणी किंवा पटसंख्या वाढविण्यासाठी गल्ली वस्त्यांतून भेटीचा कार्यक्रम अशी आखणी होत होती.
    कुठल्यातरी जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मी प्रमुख वक्ता म्हणून हजेरी लावली. सगळा स्टाफ आपल्या कामात व्यस्त. मी गुपचुप स्टाफरूममध्ये ओळखीच्या शिक्षक मित्रासोबत सगळ्या आडनावाचे शिक्षक कामात व्यग्र. कार्यक्रमाला तासभर अवकाश होता अजून. स्टाफरूम मध्ये खुर्च्या नवीन आणलेल्या बहुतेक. तेवढ्या एक मॅडम आत आल्या, आणि बिस्मिल्ला म्हणत खुर्चीवर बसल्या. बाकीचे सगळे वेडावल्यासारखे किंवा वेडेवाकडे... माझं फळ्यावर प्रमुख पाहूणे म्हणून लिहिलेलं ठळक अक्षरांत नाव. मोठे डोळे करून पाहत बसलो...
    थोड्यावेळची शांतता आणि त्यांच्यामध्ये गप्पा सुरू झाल्या. म. ’देसाई, कुठला एरिया मिळालाय” फॅक्टरी जवळचा...” तुम्हाला हो मराठे सर” मला मोठ्या मशिदीपासून दर्ग्यापर्यंत तीन गल्ल्या” ” म्हणजे अतिरेक्यांच्यात फिरणार म्हणा तुम्ही? कुणीतरी तरूण शिक्षक मध्येच बोलला. मघाशी ’बिस्मील्ला’ म्हणणार्‍या शिक्षिका ताडकन उठून बाहेर गेल्या. मघाची सारी तोंड सरळ झाली.. माझ्या चेहर्‍यावर काही नाही दिसत मी शांत... कार्यक्रम सुरू झाला. स्वागत परिचय संपेपर्यंत धावत-घाईत कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचावर आले. माझ्याजवळची खुर्ची सरकावून बसले... राम म्हणत, चेहा रूमालाने पुसून घेतला. मला नथूरामाची गोळी आणि बापूंचा हे राम दोन्ही धाडकन् लागले.
    मी जयंतीवर बोलायला उभा राहिलो. पहिल्यांदा म.गांधी सोबतचे खान अब्दुल गफारखान आठवले. पण विषारी पेरणीचं पीक काळजां वाहू देणार्‍या माणसांसमोर मी मर्यादा पाळली. ’सरहद गांधी’ मी बोलण्यातून हद्दपार केले.
    रिक्शावाला, शिपाई, मॅडम, मुल्ला मांडववाला... बिस्मिल म्हणणारी स्त्री शिक्षिका, रामराम म्हणत खुर्चीवर बसणारे प्रमुख अध्यक्ष ही अपसमजांचे प्रतिक प्रतिनिधी.
    मी मौन अहिंसक माकडासारखा तिन्ही वेळा कान, तोंड, डोळे उघडे असून निःशब्द बहिरा आंधळा... लेखणीतून गोंधळ पाझरतो.. अधूनमधून काळजाला भिजवत... अस्वस्थ पाऊस बरसत राहतो.
 
- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 9923030668
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget