Halloween Costume ideas 2015

देश नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू

- मुंबई (नाजीम खान) 
देशात नशेच्या आहारी जावून लाखो लोक आपले जीवन उध्वस्त करीत आहेत. त्यामुळे नशायुक्त पदार्थांवर बंदी आणणे व लोकांचे मन परिवर्तन करून देश नशामुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू, असे प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी केले.
    जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे ’नशेचा नाश देशाचा विकास’ या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी अंधेरी वेस्ट मधील मेअर हॉल मुंबई येथे 2 ऑक्टोबर रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर विशेष आमंत्रित म्हणून ब्रह्मकुमार तपस्विनी, नशाबंदी महाराष्ट्राचे अमोल मडामे, मौ.अतिकुर्रहमान कास्मी, अब्दुल हफिज भाटकर, मुंबई शहर जेआयएचचे सचिव हुमायूं होते. महेफूज सिद्दीकी जोगेश्‍वरी यांनी कुरआन पठण करून कार्यक्रमास सुरूवात झाली.
    पुढे बोलताना तौफिक असलम खान म्हणाले, नशा आणणार्‍या पदार्थांवर उदा. दारू, गांजा, तंबाखू इत्यादीवर शासकीय प्रतिबंध लादून काहीही साध्य होणार नाही, असे प्रयोग मागेही झालेले आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्ही याची मागणी करणार नाही. आम्ही या पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी करूच पण याशिवाय, लोकांनी स्वयंस्फूर्तीने या गोष्टींचा त्याग करावा, यासाठी या अभियाना दरम्यान जनजागृती करण्याचा आमचा माणस आहे व हे काम फक्त मोहिमेपुरते राहणार नसून पुढेही सुरूच राहील. नशाबंदीसाठी या क्षेत्रात काम करणार्‍या सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांचीही मदत घेण्यात येईल. आमचा खरा उद्देश लोकांचे मन परिवर्तन करणे आहे. प्रास्ताविकात मजहर फारूख म्हणाले, नशेचा नाश केल्याशिवाय देशाचा खरा विकास होणार नाही. आपला देश हा जगातील सर्वात तरूण देश आहे. युरोपमध्ये माणसे उतारवयाकडे झुकलेली आहेत. आमची अशी धारणा आहे की, केवळ विकासाचे नारे देवून विकास होणार नाही. विकास करण्यासाठी नशामुक्त असणारी, सुदृढ आरोग्य असणारी, काम करणारी युवा पिढी आवश्यक आहे. असे झाले तरच आपल्या देशाचा खरा विकास होईल, अन्यथा नाही. या मोहिमेत जमाअत महाराष्ट्रात समग्र नशाबंदी करण्याचा आग्रह शासनाकडे करेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन जमाअततर्फे देण्यात येईल. राज्यात कुठे-कुठे दारू आणि तत्सम नशा आणणार्‍या पदार्थांची विक्री किती प्रमाणात आणि कशी होते, यासंबंधीचीही माहिती आम्ही मोहिमे दरम्यान, गोळा करणार आहोत. ही माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या शितकालीन अधिवेशनामध्ये शासनाला सादर करून संपूर्ण नशाबंदीची मागणी करण्यात येईल. शिवाय महाराष्ट्रात टोबॅको फ्री झोन निर्माण करण्यासाठीही सरकारकडे मागणी करण्यात येईल. आज शाळा, महाविद्यालयांच्या अगदी जवळपास तंबाखू आणि गुटख्यांच्या पुढ्या सर्रास उपलब्ध होतात. हे सगळं बंद व्हायला पाहिजेत. शाळा, महाविद्यालयांच्या आसपास तंबाखू विकणार्‍यांना परवानगी देण्यात येवू नये, तसेच खाण्याचीही परवानगी नसावी. याची मागणी जमात करणार आहे. तंबाखूला नशा आणणारा पदार्थ म्हणून आपण मान्यता देत नाही म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार अगदी सहज होत आहे आणि याला तरूण बळी पडतात.
    मंचावरील उपस्थितांची समयोचित भाषणेही झाली. आभार हुमायू यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. 
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget