Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१६२) बरे हे कसे शक्य आहे की जो मनुष्य नेहमी अल्लाहच्या मर्जीप्रमाणे वागणारा आहे तो त्या माणसाप्रमाणे कृत्ये करील जो अल्लाहच्या कोपाने वेढला गेला आहे, आणि ज्याचे  अंतिम ठिकाण जहन्नम(नरक) आहे, जे अत्यंत वाईट स्थान आहे?
(१६३) अल्लाहपाशी दोन्ही प्रकारच्या माणसात कित्येक पटीचा फरक आहे आणि अल्लाह सर्वांच्या कृत्यांवर नजर ठेवतो.
(१६४) खरे म्हणजे ईमानधारकांवर अल्लाहने तर हे फार मोठे उपकार केले आहे की त्यांच्या दरम्यान खुद्द त्यांच्याचपैकी एक अशा पैगंबराला उभे केले जो त्याची संकेतवचने त्यांना  ऐकवितो, त्यांच्या जीवनाला सावरतो आणि त्यांना ग्रंथ व विद्वत्तेची शिकवण देतो. वास्तविक पाहाता हेच लोक यापूर्वी उघडपणे मार्गभ्रष्ट झाले होते.
(१६५) आणि ही तुमची काय स्थिती आहे की जेव्हा तुमच्यावर संकट कोसळले तेव्हा तुम्ही म्हणू लागला की हे कोठून आले?११५ वस्तुत: (बदरच्या युद्धात) याच्यापेक्षा दुप्पट संकट  तुमच्याकरवी (विरूद्ध पक्षावर) कोसळलेले आहे.११६ हे पैगंबर (स.)! यांना सांगा, हे संकट तुम्ही स्वत:च ओढून घेतले आहे,११७ अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे.११८
(१६६, १६७) जी हानी युद्धाच्या दिवशी तुम्हाला पोहोचली ती अल्लाहच्या आज्ञेने होती आणि ती यासाठी होती की अल्लाहने पाहावे की तुमच्यापैकी कोण ईमानधारक आहे आणि दांभिक  कोण? ते दांभिक की जेव्हा त्यांना सांगण्यात आले, ‘‘या, अल्लाहच्या मार्गात युद्ध करा किंवा कमीतकमी (आपल्या शहराचे) रक्षण तरी करा,’’ तेव्हा म्हणू लागले, ‘‘जर आम्हाला माहीत  असते की आज युद्ध होईल तर आम्ही अवश्य तुमच्याबरोबर आलो असतो.’’११९ ही गोष्ट जेव्हा ते सांगत होते तेव्हा ते ईमानपेक्षा कुफ्रच्या अधिक जवळ होते. ते आपल्या मुखाने अशा  गोष्टी सांगतात ज्या त्यांच्या मनामध्ये नसतात, आणि जे काही ते हृदयात लपवितात अल्लाह त्याला चांगलेच जाणतो.
(१६८) हे तेच लोक आहेत जे स्वत: तर बसून राहिले आणि यांचे जे भाईबंद लढावयास गेले आणि मारले गेले त्यांच्या संबंधाने यानी सांगून टाकले की जर त्यांनी आमचे म्हणणे ऐकले  असते तर मारले गेले नसते. यांना सांगा की जर तुम्ही आपल्या या वचनांत खरे असाल तर स्वत: तुमचा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा त्याला टाळून दाखवा.
(१६९) जे लोक अल्लाहच्या मार्गात ठार झाले त्यांना मृत समजू नका, ते तर खरे पाहता जिवंत आहेत,१२० आपल्या पालनकर्त्यापाशी उपजीविका प्राप्त करीत आहेत,
(१७०) जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यावर ते प्रसन्न व खूश आहेत,१२१ आणि समाधानी आहेत जे ईमानधारक त्यांच्या पाठीमागे जगात राहिले आहेत आणि  अद्याप तेथे पोहचलेले नाहीत, त्यांच्यासाठीदेखील कोणत्याही भयाचे अथवा दु:खाचे कारण नाही.
(१७१) ते अल्लाहचे बक्षीस व त्याच्या कृपेबद्दल आनंदी व प्रसन्न आहेत आणि त्यांना कळून आले आहे की, अल्लाह ईमानधारकांचा मोबदला वाया घालवीत नाही.


११५) वरिष्ठ साहबा (रजि.) तर निश्चितच वस्तुस्थितीला चांगले समजून होते आणि संभ्रमात पडू शकत नव्हते. परंतु साधारण मुस्लिम समजत होते की जेव्हा अल्लाहचे पैगंबर  मुहम्मद (स.) आमच्यात आहेत आणि अल्लाहची मदत आणि समर्थन आमच्या बाजूने आहे तर कोणत्याच स्थितीत शत्रू आम्हाला पराजित करू शकत नाही. म्हणून उहुद युद्धात  मुस्लिमांचा पराजय झाला तर त्यांच्या आशा भंग झाल्या आणि ते स्तब्ध होऊन विचारू लागले की हे काय झाले? आम्ही अल्लाहच्या दीन (धर्म)साठी युद्ध करीत होतो, त्याच्या मदतीचे  वचन आम्हाला होते, अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) स्वत: मैदानात होते आणि तरीही आम्ही पराजित झालो? आणि पराजित झालो अशा लोकांशी जे अल्लाहच्या दीन (धर्म)  संपविण्यास आले होते? या आयती याच विस्मयाला नष्ट करण्यासाठी अवतरित झाल्या होत्या.
११६) उहुद युद्धात मुस्लिमांची सत्तर माणसे शहीद झाली. या विपरीत बदर युद्धात शत्रूचे सत्तर सैनिक मुस्लिमांच्या हस्ते मारले गेले होते आणि सत्तर सैनिक कैद करण्यात आले  होते.
११७ ) म्हणजे ही विपत्ती तुमच्या चुकांचा आणि उणिवांचा परिणाम आहे. तुम्ही संयमाला आपल्या हातातून सोडले होते. काही कामे ईशभयविरुद्ध केली होती, आदेशाच्या विरुद्ध  वागलात, संपत्तीच्या मोहात अडकला, आपसात तंटा व मतभेद केले, मग का म्हणून विचारता की हे संकट कोठून आले?
११८) म्हणजे अल्लाह तुम्हाला विजय देण्याची शक्ती ठेवतो तर तो तुम्हाला पराजयसुद्धा देण्याची शक्ती ठेवून आहे.
११९) अब्दुल्लाह बिन उबई जेव्हा तीनशे दांभिकांना घेऊन मधूनच परत फिरला तेव्हा काही मुस्लिमांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला आणि साथ देण्यास राजी करण्याचा प्रयत्न  केला. उत्तरात तो म्हणाला की आज युद्ध होणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही परत जात आहोत. जर आजच युद्ध सुरु झाले असते तर आम्ही सर्वजण नक्कीच  तुमच्याबरोबर आलो असतो.
१२०) तपशीलासाठी पाहा, सूरह २ (अल्बकरा) टीप. १५५)
१२१) हदीस संग्रह `मुस्नद अहमद' मध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कथन आहे की जी व्यक्ती सत्कर्मे करून जगाचा निरोप घेते त्याला अल्लाहजवळ आनंदमय आणि सरस जीवन  प्राप्त् होते की यानंतर तो कधीही जगात परत येण्याची इच्छा करीत नाही. शहीद याला अपवाद आहे. शहीद इच्छितो की परत परत जगात जावे आणि पुन्हा पुन्हा ते रसास्वादन, सुखानुभूती आणि आनंद प्राप्त् करत जावा जे अल्लाहच्या मार्गात प्राणार्पण करताना त्याला प्राप्त् होते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget