Halloween Costume ideas 2015

महसूल महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची?

थोडीसी पी हमने थोडी उछाल दी
इस तरह हमने जवानी निकाल दी
    ही वर्षापूर्वी माझा एक मित्र जद्दा विमानतळावर फक्त या कारणासाठी अटक झाला होता की, त्याच्या लगेजमध्ये खोकल्याच्या औषधाची बाटली सापडली होती व तिच्यामध्ये अल्कोहोलची अल्पशी मात्रा होती. पृथ्वीच्या पाठीवर नशाबंदी फक्त एकदाच यशस्वी झाली आणि ती प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या आदेशाने झाली. आजही मक्का आणि मदिनामध्ये कुठल्याही प्रकारचा नशा करणे शक्य नाही. 
    दारू किंवा तत्सम नशा आणणार्या पदार्थांना इस्लाममध्ये हराम घोषित करण्यात आले आहे. काही श्रद्धावान मुस्लिम आजही अल्कोहोल युक्त औषधी घेत नाहीत. नशा निषिद्धतेची जन्मजात देणगी लाभलेल्या मुस्लिम समाजातही अलिकडे नशा करणार्या लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे. शरई जीवनशैलीकडे दुर्लक्ष करून चंगळवादी जीवनशैलीकडे आकर्षित होत असल्यामुळेच ही वाढ होत आहे. चंगळवादी जीवनशैलीच्या मुलभूत रचनेतच ’नशा’ सामिल आहे म्हणून मुस्लिम व मुस्लिमेत्तर तरूण नशेच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात आहेत.
    भारतीय मुस्लिमांमध्ये तुलनेने नशा करणार्यांची संख्या कमी आहे. अनेक अशा मुस्लिमांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो ज्यांनी आपले दारू विक्रीचे परवाने स्वेच्छेने सरकारला परत करून तौबा केलेली आहे. एकीकडे श्रद्धावान मुस्लिम हे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता नशेपासून स्वयंस्फूर्तीने दूर राहतात तर दुसरीकडे राज्यसरकारे नागरिकांना यापासून लांब ठेवण्यास फारशी उत्सुक नसतात. दरवर्षी उत्पादन शुल्क विभागाला दारू विक्रीचे टार्गेट वाढवून दिले जाते. विशेष म्हणजे फारसे प्रयत्न न करता हे   -(उर्वरित लेख पान 2 वर)
टार्गेट पूर्ण केले जाते. 1 एप्रिल 2016 रोजी नितीशकुमार यांनी बिहार राज्यामध्ये दारूबंदीची घोषणा केली. महाराष्ट्राच्याही वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदी लागू आहे. गुजरातमध्ये तर अनेक दशकांपासून दारूबंदी लागू आहे. मात्र वर नमूद प्रत्येक ठिकाणी तितक्याच मुबलक प्रमाणात दारू मिळते, जितकी की ती दारूबंदी नसलेल्या ठिकाणी मिळते. उलट दारू बंदी लागू असलेल्या ठिकाणी सुरक्षा कारणांमुळे दारू घरपोच आणून दिली जाते.
    मागे मुंबईच्या मालाड मालवनीमध्ये विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूकांडानंतर दारूबंदीची मागणी केली गेली तेव्हा सरकारची बाजू मांडतांना तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, ”अल्कोहोल निर्मितीपासून मिळणार्या 18 कोटीच्या महसूलावर पाणी सोडणे सरकारला शक्य नाही.” म्हणजे हजारो लोकांचा बळी घेणार्या, लाखो लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम करणार्या, शेकडो कुटुंबांना देशोधडीला लावणार्या दारूला फक्त यामुळे तिलांजली देता येत नाही की, त्यामुळे राज्याला 18 हजार कोटींचा महसूल मिळतो. तरी सुद्धा आपण महाराष्ट्र हा पुरोगामी, कल्याणकारी राज्य असल्याचा अभिमान बाळगतो. ही किती मोठी स्वयंफसवणूक आहे, याचा निर्णय वाचकांनी स्वतः करावा.
    फक्त एका राज्यात 18 हजार कोटींचा महसूल मिळतो तर देशातील एकूण 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात किती महसूल मिळत असेल याचा सहज अंदाज करता येईल व यामुळे देशातील नागरिकांच्या आरोग्याला किती नुकसान होत असेल याचाही अंदाज करता येईल.
    जगात सर्वाधिक अल्कोहोल निर्मिती व त्याचा वापर भारतात केला जातो, असे एका सर्वेक्षणातून पुढे आलेले आहे. केरळ देशातील पुढारलेल्या राज्यांपैकी एक राज्य. 2015 च्या आकडेवारीनुसार या राज्यात सरासरी 8 लिटर प्रमाणे सर्वाधिक दारूचे सेवन केले जाते. महाराष्ट्रात तर अन्नधान्याचा तुटवडा इतका आहे की, मेळघाट व पालघरमध्ये शेकडो मुले अन्नाअभावी दरवर्षी मरतात तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने 2009 साली मका, ज्वारी व बाजरी सारख्या जीवनावश्यक जिन्नसांपासून दारू निर्मितीची परवानगी दिलेली आहे. आता राज्यात उत्पादित होणार्या 45 पैकी 23 धान्यांपासून दारू निर्मिती करणार्या उद्योगांना सरकारी मंजूरी मिळालेली आहे. यातील बहुतेक उद्योग बड्या राजकारण्यांचेच आहेत, हे ही ओघाने आले.
    2015 साली माजलगाव जिल्हा बीड येथे बंदोबस्तात असतांना माझ्या एका शिवसैनिक मित्राने सांगितले होते की, माजलगाव येथे दरवर्षी गणपती उत्सवात किमान 500 तरूण नव्याने दारू पिण्यास सुरूवात करतात. भारतात किमान 21 टक्के पुरूष नियमित दारू पितात, अशी माहिती विकीपिडीयावर उपलब्ध आहे. डॉ.अभय बंग यांच्या म्हणण्यानुसार 40 टक्के पुरूष दारू पितात. महाराष्ट्र शासनाने एक क्रांतीकारी निर्णय घेत 2016 साली मद्यपिंचा कोटा दोन बाटल्यापासून 16 बाटल्यापर्यंत वाढविलेला आहे. शिवाय, 100 गावात 10 अधिकृत दारूची दुकाने असावीत, या नियमाचेे उल्लंघन करत उरलेल्या 90 गावात याच दुकानातून उघडपणे अवैध पुरवठा केला जातो व त्याकडे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस फारश्या गांभीर्याने पाहत नाहीत.
    2016 मध्येच बेंगलूरच्या राष्ट्रीय मेंदू व मानस संस्थेंने अभ्यासाअंती असे घोषित केले होते की, भारतातील सर्व राज्यांचे दारूचे एकत्रित वार्षिक उत्पादन 216 अब्ज रूपये तर दारूमुळे उत्पन्न झालेले नुकसान 244 अब्ज रूपये एवढे होते. एका अंदाजाप्रमाणे रस्त्यावरील निम्म्यापेक्षा जास्त अपघात दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे होतात. शिवाय, निम्म्यापेक्षा जास्त फौजदारी गुन्हे, मग ते चोरीचे असो, खुनाचे असोत की बलात्काराचे, साधारणपणे नशेमध्येच केले जातात.
    महाराष्ट्र सरकारचे दोन जनहितार्थ घेतलेले निर्णय म्हणजे एक मुबलक दारू पुरवठा व दूसरा डान्सबार. हे आगामी काळातील युवा पिढीपैकी अनेकांना गारद करण्यासाठी पुरेसे आहेत. राज्यात उत्पादन शुल्क विभाग व दारूबंदी विभाग दोन्ही अस्तित्वात आहेत. म्हणजे एकाच राज्यात एक विभाग दारूविक्री व सेवनांचे परवाने देतो व दूसरा विभाग दारू पिऊ नका असे सांगतो. यापेक्षा मोठा विनोद तो कोणता.
    समान नागरी कायदा देशात लागू करावा म्हणून हिरहिरीने ओरडणारे लोक, घटनेच्या चौथ्या भागातील 44 व्या अनुच्छेदाचा दाखला छातीठोकपणे देतात. मात्र ह्याच लोकांना त्याच चॅप्टरमधील 47 व्या अनुच्छेदाचा सोयीस्करपणे विसर पडतो. ज्यात म्हटले आहे की, औषधी व औद्योगिक कारण वगळता अल्कोहोलची निर्मिती राज्यांनी बंद करावी. आता वाचकांनी स्वतः निर्णय घ्यावा की, समान नागरी कायदा न केल्याने होणारे समाजाचे मोठे नुकसान आहे की दारूबंदी न केल्याने होणारे नुकसान मोठे आहे.
    बरे! ही चर्चा सर्व वैध दारूची आहे. याशिवाय, गावागावातून होणारी अवैध दारू निर्मिती व तिचे सेवन या संबंधीची कुठलीच आकडेवारी उपलब्ध नसल्याने ह्याचा हिशोबच वेगळा. त्यापासून होणारे नुकसानही आकलनापलिकडचे.
    शरद पवारांना गुटखा खाल्यामुळे तोंडाचा कर्करोग झाल्यामुळे महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात आली. ती किती परिणामकारकपणे राबविली जाते, यासाठी जवळच्या पानपट्टीवर जावून गुटखा घेवून अनुभव घेता येतो. गुटखाबंदीमुळे अन्नभेसळ व औषध प्रशासन तसेच पोलीस अधिकार्यांचा फायदा झालेला आहे, जनतेचा नाही. एरव्ही एमआरपीवर मिळणार्या गुटख्याच्या पुड्या आता बंदीमुळे वाढीव दरांमध्ये घ्याव्या लागतात.
    याशिवाय, एनडीपीएस अॅक्ट ज्याला मादक पदार्थ विरोधी कायदा म्हटले जाते, या कायद्याअंतर्गत येणार्या पदार्थांची दैनिक उलाढाल आपल्या देशात अब्जावधी रूपयांची आहे. यात एमडी, कोकेन, हेरॉईन, गांजा, एलएसडी, म्याऊं, मारफाईन इत्यादी महाघातक पदार्थांचा समावेश होतो. हा नशा, ”अॅव्हान्स्ड्” नशा समजला जातो. या पदार्थांची विक्री अभिजात वर्गात केली जाते. मात्र मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमधील महाविद्यालय आणि विद्यालयांपर्यंत या पदार्थांनी पाय पसरलेले आहेत. नियमितपणे होणार्या रेव्ह पार्ट्या, पब्समध्ये होणार्या उच्चभ्रू लोकांतील पार्ट्या ह्या ड्रग्सशिवाय होऊच शकत नाहीत. त्यांच्या लेखी दारू पिणे हे प्रतिगामीपणाचे लक्षण होऊ पाहत आहे.
    दारू असो का इतर अंमलीपदार्थ त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे पुण्यकर्म चित्रपटांनी केलेले आहे, यात वाद नाही. रील लाईफमध्येच नव्हे तर रिअल लाईफमध्ये सुद्धा या पदार्थांचे सेवन करून अनेक चित्रपट तार्यांनी आपल्या समाजासमोर मोठा आदर्श ठेवलेला आहे. दारूबंदी कायद्याखाली जरी कडक शिक्षेची तरतूद नसली तरी एनडीपीएस कायद्याखाली अतिशय कठोर शिक्षेची तरतूद आहे. या पदार्थांचा शोध घेण्यासाठी आणि यांच्या विक्रीचे जाळे मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये एटीएसप्रमाणेच वेगळा विभाग स्थापन केलेला आहे. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशिष्ट अशी पद्धत ठरवून देण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर अशा खटल्यांची सुनावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सत्र न्यायालयात विशेष न्यायाधिशांच्या नेमणुका सुद्धा करण्यात आलेल्या आहेत.
    म्हणजे विशेष कायदे, विशेष पोलीस आणि विशेष न्यायालये असतांनासुद्धा दिवसेंदिवस नशा करणार्यांचे प्रमाण वाढतच आहे, हे जागतिक सत्य आहे. हे असे का घडत आहे? तर त्याचे उत्तर उर्दू कविंनी मागेच देऊन ठेवलेले आहे.
1.    लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूं नादां
    हाय कंबख्त तू ने कभी पी ही नहीं
2. तुम क्या जानो शराब कैसे पी जाती है
   खोलने से पहले बोतल हिलाई जाती है
फिर आवाज लगाई जाती है, आ जाओ टूटे दिलवालो
यहां दर्द-ए-दिल की दवा पिलाई जाती है
    साधारणपणे समाजामध्ये एक समज प्रचलित आहे की, दुःख विसरण्यासाठी लोक नशा करतात, पण हे खरे नाही. पोलीस अधिकारी म्हणून मी नशा करणार्या अनेक लोकांना जवळून पाहिलेले आहे. त्यावरून एक कताअ मीच लिहिलेला आहे. तो खालीलप्रमाणे
पहले पीये थे गम में, कल था खुशी का मौसम, फिर आज घटा छाई है, हमने हर रंग में पीने की कसम खाई है
    वाढत्या नशेची नक्की कारणमिमांसा जरी करता येत नसली तरी समाजात सोशल ड्रिंकिंगला जी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे हेच नशेचे प्रमुख कारण आहे. मित्रांच्या संगती आणि आग्रहामुळेच बरेच लोक पहिल्यांदा मद्याचा पेला तोंडाला लावतात.
    इस्लाममध्ये नशाबंदी संबंधीचे आदेश
    1. ” हे (लोक) तुम्हाला दारू आणि जुगाराविषयी विचारतात. त्यांना सांगा की दोन्हीमध्ये मोठा अपराध आहे. जरी त्यामध्ये लोकांसाठी काही लाभ आहे परंतु, त्यांचा अपराध (नुकसान) त्यांच्या लाभापेक्षा अधिक मोठा आहे.”(सुरे बकरा आयत नं. 219)
    2. ” सैतानाची तर अशी इच्छाच आहे की, दारू व जुगारामध्ये तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टींपासून अलिप्त रहाल?” (सुरह अल्मायदा आयत नं.91).
    3. ”खजुराच्या झाडापासून व द्राक्ष्यांच्या वेलीपासून आम्ही एक पदार्थ तुम्हाला देतो. ज्यापासून तुम्ही मादक पदार्थही बनविता आणि शुद्ध अन्नदेखील. निश्चितच त्यांच्यात एक संकेत आहे बुद्धीचा उपयोग करणार्यांसाठी” (सुरह अल्नहल आयत नं. 67)
    कुरआनमधील वरील आदेशांचे अवलोकन केल्यानंतर आपण हे पाहू की प्रेषित सल्ल. यांनी या संबंधी काय आदेश दिलेले आहेत.
    1. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी फरमाविले की, ” प्रलयाच्या चिन्हांपैकी एक चिन्ह हे असेल की, दीनी (इस्लामिक) ज्ञान काढून घेतलं जाईल आणि उघडपणे दारू सेवन केली जाईल तसेच व्याभिचार केला जाईल” (सही बुखारी ह.क्र. 80).
    2. जेव्हा सुरह बकरा मध्ये व्याजाला निषिद्ध करणार्या आयतींचा साक्षात्कार प्रेषित सल्ल. यांना झाला तेव्हा त्यांनी मस्जिदीमध्ये प्रवेश केला आणि त्या आयातीचे पठन लोकांसमोर केले. त्यानंतर फरमाविले की, ” दारूचा व्यापारही हराम आहे” (सही बुखारी हदीस क्र. 459).
    3. अब्दे कैस या कबिल्याचे एक शिष्टमंडळ प्रेषित सल्ल. यांना भेटायला आले होते व त्यांनी प्रेषित सल्ल. यांना काही उपदेश करण्याची विनंती केली. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, ” मी तुम्हाला चार गोष्टी करण्याचा आणि चार गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा आदेश देतो. 1. एक अल्लाहवर श्रद्धा ठेवा. 2. अल्लाहशिवाय दूसरा कोणीही पूजनीय नाही याची साक्ष द्या 3. मला अल्लाहचा प्रेषित माना. 4. नमाज कायम करा, जकात अदा करा आणि युद्धात मिळालेल्या वस्तूंचा पाचवा हिस्सा बैतुलमाल (सार्वजनिक कल्याण निधी) मध्ये जमा करा. आणि 1. तुनबडी 2. खंतुम 3. खसार आणि 4. नखीर च्या वापरापासून दूर रहा. (लक्षात घ्या या चारही वस्तू त्या काळी दारू तयार करण्यासाठी वापरात आणल्या जात होत्या) (बुखारी हदीस नं.523).
    जगातील कुठल्याही व्यवस्थेमध्ये नशाबंदी संबंधी एवढी कडक भूमिका घेण्यात आलेली नाही. जेवढी इस्लामी व्यवस्थेमध्ये घेण्यात आलेली आहे. दुसर्या व्यवस्थांमध्ये नशेचे उलट समर्थन करण्यात आलेले असून, त्याला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी अवतरित झालेला असल्यामुळे ही भूमिका त्याच्या मूळ हेतूशी सुसंगत अशीच आहे. किमान मुस्लिमांनी तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सूर्यप्रकाश हवा, पाण्याची जेवढी गरज आहे तेवढीच इस्लामी आदेशांच्या पालनाची गरज आहे. ज्याअर्थी इस्लामने नशा हराम केलेला आहे त्याअर्थी कुठलाही किंतू मनात न बाळगता प्रत्येक मुस्लिमाने नशेपासून स्वतः तर लांब रहावेच शिवाय, प्रत्येक देशबांधवाला नशेपासून दूर राहण्यासंबंधी शक्य तेवढे प्रयत्न करावेत. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, प्रत्येक भारतीयाला नशेपासून दूर राहण्याची सद्बुद्धी मिळो. (आमीन.)


- एम.आय.शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget