Halloween Costume ideas 2015

मुठभर असंतोषींमुळेच देशाचे वातावरण दुषित


अहमदनगर (प्रतिनिधी) : 

माझ्या बायपासच्या सर्जरीप्रसंगी एका मुस्लिम बांधवांने रक्तदान केले, त्यामुळे मला जीवनदान मिळाल्याचे भावनिक उद्गार काढत राष्ट्रसंत हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले, श्रीगोंद्यांचे संत शेख महंमद महाराज व तुकोबांची घनिष्ठ मैत्री होती. तसेच संत शेख अंनुगढशाह फकिर व तुकोबांचे देखिल घनिष्ठ संबंध होते. तर सावित्रीमाई फुले व फातेमा शेख यांनी एकत्रित मुलींची शाळा सुरु केली. सद्भावनेचा एवढा प्रचंड वारसा असूनही काही मुठभर असंतोषी लोकांमुळे देशाचे वातावरण प्रदुषित होत आहे. मात्र तरीही बहुजनांमधील सद्भावना अबाधित असल्याचा दाखला आजचा कार्यक्रम देत असल्याचे महाराज म्हणाले.

सैनिक लॉन, अहमदनगर येथे जमियते उलमा-ए- हिंद, जमाते इस्लामी हिंद व सद्भावना मंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्म सदभावना संमेलन नुकतेच पार पडले. यावेळी ते बोलत होते. 

मंचावर हभप अजय महाराज बारस्कर, फादर ख्रिस्टन ब्रिटो, डॉ. रफिक सय्यद पारनेरकर, भाऊ ग्यानी पद्मसिंहजी खालसा, संत निरंकारी मंडळाचे शिवाजी भोसले, भिक्कू पद्मशिल, पोलिस उपाधिक्षक अनिल कातकडे, प्राचार्य रुपनर, डॉ. इक्राम काटेवाला आदींची उपस्थिती होती. 

यावेळी हभप अजय महाराज बारस्कर यांनी तुकोबांनी वडिलोपार्जित सावकारीची कागदपत्रे इंद्रायणीत बुडविल्याचा दाखला देत, पैगंबारांनीसुद्धा व्याज घेणे - देणे व त्यासाठी साक्षीदार होणे सुध्दा हराम असल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

फादर ख्रिस्टन ब्रिटो यांनी माणसांनी स्वत: सारखेच इतरांवरही प्रेम केल्यास सद्भावना वृद्धींगत होईल, असे नमुद केले. डॉ.अलोकऋषीजी म.सा. यांनी प्रत्येकाने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवून इतरांची मने दुखवणार नाहीत, असे बोलण्याचे आवाहन केले. 

डॉ.सय्यद रफिक यांनी समस्त मानवजात एकाच माता-पित्यांची संतान आहे, अशी कुरआनची स्पष्ट भुमिका असल्यामुळे इतर धर्मियही आपले बांधव आहेत ही साक्षात अल्लाहची आज्ञा असल्याचे नमुद केले. अध्यक्षीय भाषणात जमियते उलमाये हिंद, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष मौलाना ईर्शादुल्लाह मखदुमी कासमी यांनी ‘मजहब नही सिखाता आपसमेें बैर रखना.. हिंदी है हम वतन है.. हिंदुस्ता हमारा...’ हा महान संदेश सर्वधर्मगुरुंनी आपआपल्या धर्मियांना दिल्यास. समता, सद्भावना व एकता निश्चितपणे नांदेल, अशी आशा व्यक्त केली. 

डॉ.इकराम खान व हभप प्रा.अशोक महाराज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सद्भावनेसाठी विशेष कार्य केल्याबद्दल इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, पत्रकार सुधीर लंके यांना सद्भावना सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतात सद्भावनेची नितांत गरज असल्याचे विषद केले. कार्यक्रमास हभप सोपानकाका औटी महाराज (पारनेर),  शिर्डी संस्थानचे सचिन गुजर, करण ससाणे, प्रहार अ‍ॅकॅडमीचे संतोष पवार, निवृत्त कॅप्टन विनोदसिंह परदेशी, सत्यसोधक समाजाचे अ‍ॅड.संभाजी बोरुडे, पवन नाईक, कॉ.प्रा.डॉ. महेबुब सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा.माणिक विधाते, अनंतराव गारदे, धन्वंतरी फौंडेशनचे रेहान काझी, जमाते इस्लामीचे मुश्ताक सर, अख्तर शेख, अमिर सय्यद, मुबीन खान, मुस्ताफा लांडगे, जमियते उलमाचे शहर अध्यक्ष मौलाना शफिक कासमी, निसार बागबान, अल्ताफ भाई, जमियतचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद खलिल, मौलाना अब्दुल रऊफ आलमगिरी, आय.बी.शाह, जमियत राहुरीचे अध्यक्ष सय्यद इम्रान, हाफिज अन्वर, अ‍ॅड.हाफिज भाई, राहता तालुक्याचे राजू भाई, श्रीरामपुर जमियतचे तकी बिलाल, हाफिज अन्वर व इतर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांची लक्षणीय उपस्थिती

यावेळी कार्यक्रमास सर्वधर्म समाजातील महिलांचीही मोठी उपस्थिती होती. अशा कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे असा सूर महिलांमधून उमटला. त्या म्हणाल्या, अशा कार्यक्रमांनी एकमेकांबद्दल आदर व सन्मान वाढतो. एकात्मता वृद्धींगत लागते, विचारात प्रगल्भता येते, असे त्या म्हणाल्या. यावेळी समाजबांधव उपस्थित होते. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget