Halloween Costume ideas 2015

बिहारची लढाई कोण जिंकेल?

 


वेळेसच्या बिहारच्या निवडणुका कोण जिंकेल? याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात असले तरी शेकडो किलोमीटर पायी चालून घरी आलेले मजूर, गप्प असलेल्या महिला हे दोन घटक काय भूमिका घेतात यावर निवडणुकींचे निकाल अवलंबून आहेत. लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान सारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत बिहारच्या निवडणुका होत आहेत. बिहारमध्ये सरळ लढत नसून प्रामुख्याने चौकोनी लढत होत आहेत. एनडीए ज्यात भाजपा आणि जेडीयू प्रमुख घटक असून, महागठबंधन काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष आहेत. ओवेसी यांची एमआयमएम आणि मायावतींची बहुजन समाज पार्टी एकत्र लढत असल्याने चूरस वाढलेली आहे. चौथे गठबंधन सीपीआय, सीपीएम आणि भारतीय कम्युनिस्टपार्टी लेनीनवादी यांनी सीपीआयएम सोबत गठबंधन केलेले आहे. याचे नेतृत्व  कन्हैय्या कुमारकडे करत आहेत. हे सर्व कमी होते म्हणून की काय लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी आपल्या पक्षाची स्वतंत्र टीम निवडणुकीत उभी केली आहे. एकापेक्षा एक दिग्गज नेते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उतरलेले असून, तेजस्वी यादव आणि कन्हैय्याकुमार यांच्या सभांना होत असलेली गर्दी पाहून भल्याभल्यांच्या तोंडाचे पाणी पळालेले आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये लालूप्रसाद जिंदाबादच्या घोषणांमुळे चिडून मुख्यमंत्र्यांनी ’मत द्यायचे तर द्या नसेल तर देवू नका पण गोंधळ घालू नका’, अशी असहाय्यतेची भाषा बोललेली आहे. एनडीए, महागठबंधन, ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट आणि प्रगतीशील लोकतांत्रिक गठबंधन असे एकापेक्षा एक लांबलाचक नावं असलेली गठबंधने निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे एवढी किचकट नावे मतदारांना लक्षात राहतील काय? याबद्दल संशय आहे. स्पष्ट आहे या निवडणुकांमध्ये उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचे नेते यांच्याकडेच बघून मतदान होईल, असे झाल्यास त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येण्याचीच जास्त शक्यता दिसत आहे. स्पष्ट आहे विभिन्न विचारधारांवर आधारित या गठबंधनांच्या गडबडीमध्ये वैचारिक मुद्दे मागे पडून आर्थिक आणि सामाजिक मुद्देच तसेच जातीय समीकरण हेच प्रबळ ठरण्याची शक्यता आहे. 

जातीय समीकरण बसविण्यामध्ये नितीश कुमार यांचा हतखंडा आहे. त्यामुळेसुद्धा ओपीनियन पोलमध्ये त्यांनाच वाढ मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, ज्या नेटाने तेजस्वी यादव आपले मुद्दे पुढे रेटत आहेत आणि त्यांना लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे तो ही भल्या-भल्यांना चक्रावून सोडणारा आहे. तेजस्वी यादव आणि राहूल गांधी या जोडगळीकडे येत्या विधानसभेच्या चाव्या असतील आणि हे दोघेही या स्पर्धेमध्ये डार्क हॉर्स ठरतील, असा काही लोकांचा अंदाज आहे. असे असले तरी निवडणुकानंतर कसे समीकरण बनतात यावर बरेच काही अवलंबून आहे. एवढे मात्र नक्की की या निवडणुकांमध्ये एनडीएला सहज विजय मिळणे शक्य नाही याचा अंदाज त्यांना आलेला आहे. म्हणूनच मोफत कोरोना वॅक्सिनचे अशक्यप्राय असे गाजर निर्मला सितारामन यांनी बिहारच्या मतदारांपुढे केलेले आहे. असे करून भाजपा स्व:च स्व:च्या जाळ्यात अडकली आहे. लगेच लोकांन प्रश्‍न विचारायला सुरूवात केली की, लस बिहारच्याच लोकांना का? बाकीच्या राज्यातील लोकांना का नाही? याचे उत्तर देणे भाजपाला शक्य नाही. प्रसिद्धी माध्यमे जरी भाजपच्या बाजूने असली तरी प्रत्यक्ष निकाल आश्‍चर्यचकित करणारे राहतील, एवढे मात्र खरे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget