Halloween Costume ideas 2015

डॉ. ईलाहीपाशा मासुमदार यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

लातूर (सालार शेख)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या महाविद्यालयीन स्तरावरील (शहरी) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार लातूर येथील स्वायत्त असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. ईलाहीपाशा उस्मानसाब मासुमदार यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
    स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत विविध पुरस्काराचे वितरण दि. 19 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई दिल्ली) माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा याच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते. मंचावर शिक्षणतज्ज्ञ व जीवन साधना गौरव पुरस्कारप्राप्त माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, प्र.कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे उपस्थित होते.
    याप्रसंगी कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण व संशोधन, सामाजिक कार्य, कृषी, उद्योग व व्यापार इत्यादी क्षेत्रापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये उल्लेखनिय योगदान देणार्‍या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील व्यक्तीची जीवनसाधना गौरव हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूरचे अध्यक्ष माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच याप्रसंगी उत्कृष्ट विद्यापीठ संकुलीय शिक्षक पुरस्कार डॉ. रमजान मुलानी, उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक ग्रामीण विभाग पुरस्कार प्रा.डॉ. एन.टी. कांबळे, उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभाग पुरस्कार श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय लातूर, उत्कृष्ट महाविद्यालय ग्रामीण विभाग पुरस्कार श्री गुरूबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा, उत्कृष्ट प्राचार्य (शहरी विभाग) प्राचार्य डॉ. वसंत भोसले व उत्कृष्ट प्राचार्य (ग्रामीण विभाग) पुरस्कार प्राचार्य डी.बी. इंगळे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे होते.
    ’शोधन’शी बोलताना डॉ. ईलाहीपाशा मासुमदार म्हणाले की, विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षात प्राप्त झालेल्या या पुरस्काराने मी हर्षोल्हासित झालो असून, या पुरस्काराचं श्रेय माझ्या महाविद्यालयास व कुटुंबियास देऊ इच्छितो. विद्यापीठाने पुरस्कार वितरणाची सुरूवात करून आदर्श शिक्षक निर्माण करण्याची प्रक्रिया गतिमान केलेली पहावयास मिळते. निवड करत असताना अतिशय निरपेक्षपणे केली जाते. त्यामुळे हाडाचा शिक्षक म्हणून काम करणार्‍या शिक्षकाला पुन्हा नव्यानी काम करण्याची ऊर्जा अशा पुरस्कारातून नक्कीच प्राप्त होत असते व त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक गतीमान पद्धतीने तो आपले अध्यापनाचं कार्य करत विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी पार पाडतो. याच प्रकारची नवसंजीवनी प्राप्त झाल्याने मला मनस्वी आनंद झालेला आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget