Halloween Costume ideas 2015

राज्यात पुन्हा तेच; विरोधक मात्र मजबूत

नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकीत भाजपाला 105, शिवसेनेला 56, काँग्रेसला 44, राष्ट्रवादी काँग्रेसला 54, एमआयएमला 2, मनसेला 1 आणि इतरांना 26 जागा मिळाल्या. मागील विधानसभेचे जे चित्र होते त्यात  बदल झालेला असून, एकतर्फी निकाल नाहीत. गतविधानसभेपेक्षा यावेळी विरोधक चांगलाच मजबूत झाला आहे. मात्र विरोधकांनी गतकाळात जशी भूमिका निभावली तशीच यंदाही निभावली तर महाराष्ट्राचा बिहारच होईल? मात्र आता तसे होणार नाही असे वाटते. कारण ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या हाती घेतली होती. त्यांचे राज्यातील बारीक सारीक घडामोडीवर बारीक लक्ष असेल आणि जनतेची ते फरफट होऊ देणार नाहीत, असे चित्र आहे. 
    सध्या सेना-भाजपा सत्तेवरून शीतयुद्ध आहे.  असे असले तरी सरकार परत सेना-भाजपचेच येईल मग त्यांच्यात कितीही आपसात भांडणे होवो. एव्हाना फडणवीस यांची भाजपा गटनेते म्हणून निवडही झालेली आहे. सगळे काही व्यवस्थित जरी झाले असले तरी सरकारी धोरणात काही बदल होईल किंवा सामान्य माणसांच्या हाल अपेष्टा  कमी होतील, याची शक्यता कमी दिसते. नवीन सरकार बनविण्यामध्ये एवढी ओढाताण झाली की पुढे एकमताने सरकार काम करील की नाही याबद्दल शंका निर्माण होते. अशातच परतीच्या पावसाने महाराष्ट्राच्या बळीराजाला जाता-जाता असा तडाखा दिलाय की, हातातोंडाला आलेले खरीपाचे पीक अनेक ठिकाणी अक्षरशः पाण्यात गेले तर अनेक ठिकाणी उतारा कमी आला. सरकारचे चटकन गठन झाले असते आणि शेतकर्‍यांना पीकविमा किंवा इतर शासकीय मदत लवकर मिळाली असती तर शेतकरी सुखावला असता. परंतु, जनतेच्या सेवेच्या नावाखाली सत्तेची साठमारी अशीच चालू राहिली तर येणारा काळ महाराष्ट्रासाठी कठीण राहील, यात शंका नाही. मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसलाय. अनेक लघूउद्योग बंद पडलेत. अनेक उद्योग आजारी आहेत. प्रचंड प्रमाणात नोकर कपात झालेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक मुंबई-पुण्याकडे धाव घेत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आपल्या गावीच रोखून धरण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावशाली अमलबजावणी जितक्या लवकर करता येईल, तितकी करणे गरजेची आहे. लवकरच सरकार स्थापन होईल आणि आपल्या कर्तव्य पूर्तीला सुरूवात करील अशी अपेक्षा बाळगूया. लेख लिहिपर्यंत तर सरकार बनले नव्हते.  

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget