Halloween Costume ideas 2015

वडाचे तेल वांग्यावर

मागच्या आठवड्यात लखनऊमध्ये हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली. या हत्येसंबंधीचे सत्य आणि तपासाची दिशा या दोहोंमध्ये पूर्व आणि पश्‍चिम एवढे अंतर असल्याचे एकंदरित या संबंधीच्या बातम्या पडताळून पाहिल्यावर सहज लक्षात येते.
    2015 साली उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आजमखान यांनी संघाच्या काही लोकांवर अश्‍लाघ्य शब्दात टीका केली होती. प्रत्युत्तरादाखल कमलेश तिवारी यांनी तेच वाक्य प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याविषयी उद्गारले. यामुळे एकच गहजब झाला होता. देशभरातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा कमलेश तिवारीच्या विरूद्ध प्रदर्शने झाली होती. अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. उत्तरप्रदेशमधील एक-दोन उलेमांनी कमलेश तिवारीची हत्या करणार्‍याला 51 लाखाचे बक्षीसही जाहीर करून टाकले होते. परंतु तत्कालीन समाजवादी पक्षाच्या सरकारने कठोर कारवाई करत कमलेश तिवारीवर रासुका लावून त्यांची तुरूंगात रवानगी केली होती. ते अनेक महिने तुरूंगात खितपत पडलेले होते. त्यामुळे जनक्षोभ शांत झालेला होता.
    दरम्यान ते तुरूंगातून बाहेर आले आणि लखनऊ येथील आपल्या कार्यालयात व्यस्त झाले. अचानक मागच्या आठवड्यात त्यांची हत्या झाल्यामुळे परत हा विषय प्रकाशझोतात आला.
    समाजमाध्यमांमुळे आजच्या काळामध्ये कुठलीच गोष्ट लपून राहणे शक्य नाही. त्याच माध्यमातून कमलेश तिवारी यांच्या आईने केलेल्या विलापाच्या आणि विधानाच्या अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या, आजही त्या उपलब्ध आहेत. त्यात त्यांनी विष्णू गुप्ता नावाच्या भाजपच्या एका स्थानिक नेत्याचे तसेच गोरखपूर पिठाचे मठाधीश व मुख्यमंत्री योगी यांचे नाव घेतले. हत्येला विष्णू गुप्ता हाच जबाबदार असून, पोलीस प्रशासनाने जाणून बुजून हत्या करणार्‍यांना सवलत व्हावी म्हणून कमलेश त्रिपाठींची सुरक्षा काढून घेतली होती, असा त्यांनी आरोप केला. हत्येच्या वेळी फक्त एक वृद्ध पोलीस कर्मचारी त्यांच्या कार्यालयाखाली उभा होता. - (उर्वरित पान 8 वर)
हत्या झाल्यानंतर आरडा-ओरडा झाल्यावर तो विचारत होता की ’क्या हुआ?’ हे स्पष्ट आरोप कमलेश तिवारी यांच्या आईने केले आहेत. असे असतांनासुद्धा गुजरात, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश मधून अनेक मुस्लिम तरूणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक करून तपासाची दिशाच बदलून टाकलेली आहे.
    लखनऊच्या नाका चौकमधील खालसा इन नावाच्या हॉटेलच्या खोलीनंबर जी-103 मध्ये दोन मुस्लिम तरूण थांबले होते. ज्यांची नावे शेख अशफाक हुसेन आणि पठाण मैनोद्दीन असे असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यांनीच कमलेश तिवारी यांची हत्या केली व परत हॉटेलमध्ये गेले आणि अंगावर धारण केलेले भगवे वस्त्र, जीओ कंपनीच्या मोबाईल फोनचा रिकामा डबा, एक चार्जर आणि गुजरातमधून आणलेल्या मिठाईचा डबा तेथे सोडून परत आपल्या ठिकाणी निघून गेले. लगेच दुसर्‍या दिवशी उत्तर प्रदेश पोलिसांनी मिठाईच्या डब्यावरील पत्यामागून माग काढत जाऊन 11 तासाच्या आत गुजरातमधून त्या दोघांनाही अटक केली. त्यांच्या लक्षात हे सुद्धा आलेले नाही की उत्तर प्रदेश ते गुजरात हे अंतर विमानाशिवाय इतक्या लवकर कापणे शक्य नाही.
    गुजरात पोलिसांनी दिलेल्या या माहितीमध्ये अनेक त्रुटी आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर कोणताही आरोपी आपल्या मूळ गावी जात नाही किंवा हॉटेलमध्ये एवढे पुरावे सोडत नाही हे क्रिमीनॉलॉजीचे मूळ तत्व आहे. तरीपण उत्तर प्रदेश पोलिसांना यामध्ये काही वावगे वाटत नाही. शिवाय त्या मौलांनानाही अटक करण्यात आलेली आहे ज्यांनी 2015 साली कमलेश तिवारी यांच्या हत्या करणार्‍याला 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केलेली होती.
    एकीकडे कमलेशची आई ओरडून विष्णू गुप्ताचे नाव सांगत आहे आणि कारणही सांगत आहे की, एका मंदीराच्या जमिनीच्या वादातून दोघांमध्ये जीव घेण्याइतपत टोकाचा वाद निर्माण झाला होता. शिवाय, कमलेश तिवारी यांचा स्वतःचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. ज्यात त्यांनी स्वतःच्या हत्येची शक्यता वर्तवून त्यांची हत्या कोण करू शकतो, त्यांच्या नावासह सविस्तर माहिती दिलेली आहे. कमलेश तिवारीची आई आणि स्वतः कमलेशचा व्हिडीओ हा लिडिंग पुरावा असतांनासुद्धा त्याकडे साफ दुर्लक्ष करून फक्त योगी यांना समाधान वाटेल अशा पद्धतीने उत्तर प्रदेश पोलिसांनी तपास करून वडाचं तेल वांग्यावर काढणे या म्हणीला प्रत्यक्षात उतरविले आहे. यामुळे केवळ उत्तरप्रदेश पोलिसांच्या सचोटीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले नसून, समाजमाध्यमातून जागतिक स्तरावर त्यांची बदनामी झालेली आहे. मुख्यमंत्री योगी यांच्याशी तिवारी यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट झाल्यानंतर कमलेश तिवारीच्या आईने समाधान व्यक्त केलेले आहे. त्यात कमलेश तिवारीच्या मोठ्या मुलाला सरकारी नोकरी, लखनऊमध्ये सरकारी निवासस्थान, 25 लाख रूपये नगदी देण्याचे ठरले आहे. असे वाटते की, या भेटीदरम्यान दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील. परंतु, असेही वाटते की, अलिखित अट एकच असेल ती ही की, त्यांनी यापुढे गुप्ता आणि योगीचे नाव घेऊ नये.
    उत्तर प्रदेशामध्ये अनेक मॉबलिंचिंगच्या घटना झालेल्या आहेत. ज्यात अल्पसंख्यांक लोकांचा बळी गेलेला आहे. त्यांच्या परिजनांना असा भरभक्कम पॅकेज देणे तर दूर योगींनी त्यांच्या नातेवाईकांची भेट सुद्धा घेण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. एवढा उघड भेदभाव स्वतंत्र भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी पाहिला नव्हता. समाधानाची बाब एकच आहे ती ही की, अनेक सहिष्णू हिंदू बंधूंनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या या भूमीकेचा नुसता निषेधच केला नसून त्यांच्या कार्यशैलीवर टोकाची टीका केलेली आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget