Halloween Costume ideas 2015

31 डिसेंबर आणि आपण

इक्बाल को उस देसमें पैदा किया तूने
जिस देस के बंदे हों गुलामी पे रजामंद


1095 ते 1291 या काळात ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यात एकूण सहा मोठ्या लढाया झाल्या. इतिहासकार त्यांना क्रुसेड वॉर असे संबोधतात. या लढाया जेरूसलेम आणि कॉन्स्टीटिनोपल वर वर्चस्व गाजविण्यासाठी होत्या. शेवटची लढाई 1291 मध्ये कॉन्स्टीटिनोपल (आतचे इस्तांबुल) या शहराचा पाडावानंतर संपली. रोमन सम्राटाचा पराभव करून कुर्द मुस्लिम योद्धा ह. सलाहउद्दीन अय्युबी (रहे.) यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध जिंकले गेले. या युद्धानंतर पुन्हा कधी ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यात क्रुसेड वॉर झाले नाही. या पराभवानंतर इंग्लंडचा राजा एडवर्ड (पहिला) व फ्रांसचा राजा लुई (नववा) यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सोबत एक बैठक करून यावर व्यापक चिंतन घडवून आणले. त्यात पराजयाच्या कारणांवर चर्चा केली गेली. यात प्रामुख्याने एका प्रश्नावर चर्चा झाली. ती ही की, त्यांच्या तलवारी व आपल्या तलवारी सारख्याच. त्यांच्या सैनिकांची व आपल्या सैनिकांची संख्याही सारखीच. तरी सल्लाउद्दीन अय्युबी यांच्या लष्कराने आपला निर्णायक पराभव का केला? यावर जेव्हा गहन चर्चा झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हत्यार आणि मनुष्यबळ सम-समान असतानासुद्धा सलाहउद्दीन अय्युबी आणि त्यांच्या लष्कराकडे नैतिकशक्ती आपल्यापेक्षा जास्त होती व ही नैतिक शक्ती त्यांचे चारित्र्य आपल्या तुलनेत चांगले असल्याने त्यांच्यात आली. त्यांचे चारित्र्य चांगले असल्याचे एकमेव कारण कुरआन आहे. हे समल्यावर या संधीचा लाभ उठवत ख्रिश्चन धर्मगुरूंनी लोकांना बायबलकडे परतण्याचे आवाहन केले. परंतु, बहुतेक ख्रिश्चन बांधवांनी बायबलपेक्षा भौतिक शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले. विशेषतः त्यांनी तंत्रशिक्षणाकडे आपला मोर्चा वळविला आणि 400-500 वर्षाच्या कठीण परिश्रम व वैज्ञानिक संशोधनानंतर युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडवून आणली.
    या औद्योगिक क्रांतीचा मोठा परिणाम युरोपीय जनजीवनावर झाला. जगातील इतर देशात राहणार्या लोकांच्या तुलनेत युरोपमध्ये राहणार्या लोकांचे जीवनमान उंचावले. सुरूवातीला त्यांचे जीवन सुसह्य बनले. मात्र हळूहळू संपूर्ण युरोप आणि अमेरिका चंगळवादी बनत गेला. त्यांच्या जीवनामध्ये धर्माची जागा मनोरंजनाने घेतली. त्याने लवकरच एका उद्योगाचे स्वरूप घेतले. हे क्षेत्र माणसाच्या जीवाला सुखावणारे असल्याने लोकांना अधिकाधिक सुख देण्यासाठी मनाला भावणार्या कथा, कविता, कादंबर्या लिहिल्या गेल्या. त्यावर चित्रपटांची निर्मिती सुरू झाली. ते अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी त्यांना संगीताची जोड दिली गेली. या दोघांच्या मिलाफातून या क्षेत्राने एवढी मोठी भरारी घेतली की, आजमितीला भिकार चित्रपटसुद्धा काही कोटी कमवून जातात.
    मनोरंजनाचे क्षेत्र नाविण्याच्या पायावर उभे असते. कितीही उत्कृष्ट कलाकृती असो तिचा मूळ फार्म्युला चार-दोन चित्रपटांच्या पुढे जात नाही. नवनवीन कल्पनांच्या शोधात असलेल्या मनोरंजन उद्योगात मग स्त्री-पुरूष संबंध, प्रेम, अश्लिलता, इत्यादींचा शिरकाव झाला नसता तरच नवल. मनोरंजनाची जागतिक राजधानी हॉलीवुडमध्ये मग नवनवीन कल्पनांवर चित्रपटे निघू लागली. इतके की अल्पावधीतच त्यांनी  विकृत स्वरूप धारण केले. त्यातून पॉर्न इंडस्ट्रीचा जन्म झाला. अब्जावधींची उलाढाला सुरू झाली. या सर्व उद्योगांच्या केंद्रस्थानी साहजिकच महिला होत्या. त्यांचेच सर्वाधिक नुकसान या उद्योगामुळे झाले. महिलांना पुन्हा-पुन्हा आई बणून सुसंस्कारित पिढी घडवून देशाला जबाबदार नागरिकांचा पुरवठा करण्याच्या त्यांच्या मूळ जबाबदारीतून काढून त्यांना नाचण्या-गाण्या आणि व्यक्तीमत्त्वाला न झेपणार्या व न शोभणार्या व्यवसायामध्ये चलाक युरोपिय पुरूषांनी जुंपले. प्रतिष्ठेच्या नावाखाली त्यांची अप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे असंस्कारीत आणि बलात्कारी पुरूषांच्या झुंडीच्या झुंडी तयार झाल्या. त्यांच्या वाईट वर्तणुकीला कोर्ट, कचेर्या, पोलीस आणि कायदा, कोणीही प्रतिबंध घालण्याच्या स्थितीत राहिलेले नाही, अशी एकंदरित स्थिती आहे. महिलांचे वर्षभर शोषण करून एक दोन दिवस उदाहरणार्थ वुमन्स डे आणि मदर्स डे सारखे दिवस साजरे करून त्यांना महत्व देण्याचा हा फक्त देखावा असतो.
    क्रुसेडवॉरमध्ये झालेल्या पराजयाने खचून न जाता ख्रिश्चन समाजाने भौतिक शिक्षण देणार्या संस्था उभ्या केल्या. मोठमोठी महाविद्यालये व विद्यापीठे उभारली. शिक्षणाचा दर्जा उंचावेल याकडे लक्ष दिले. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि पीएचडी धारकांची संख्या पाहता-पाहता लाखोत गेली. भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित इत्यादी शास्त्रांमध्ये त्यांनी अल्पावधीतच नेत्रदिपक अशी उंची गाठली. मात्र या शिक्षणाने युरोपीयन समाजाची दोन भागात विभागणी करून टाकली. एक - ख्रिश्चन धर्मगुरू आणि त्यांचे मुठभर समर्थक व दोन - उच्च विद्याविभूषित जनता.    एकीकडे चर्चमध्ये बसलेल्या धर्मगुरूंची अशी भावना झाली की भौतिक शिक्षणामुळे समाजाची मोठी हानी झाली व त्यामुळे लोकांची नितीमत्ता गेली. तर दूसरीकडे समाजातील भौतिकदृष्ट्या संपन्न लोकांची अशी भावना झाली की, धर्म ही अफूची गोळी आहे. एवढेच नव्हे तर धर्म विकासाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे. धर्मगुरूंकडे समाजाला देण्यासारखे काही नाही. त्यामुळे धर्मगुरूंचे ऐकण्यात काही फायदा नाही. धार्मिक गोष्टींपलिकडे त्यांना काही कळत नाही. म्हणून ते चर्चमध्येच शोभून दिसतात. त्याकरिता युरोपमध्ये सर्वप्रथम राजकारणाला धर्मापासून वेगळे केले. त्यामुळे युरोपमध्ये हळूहळू धर्मसत्ता कमकुवत झाली व राजकीय सत्ता मजबूत झाली. याचाच परिणाम आजमितीला युरोप आणि अमेरिकेमध्ये 60 टक्क्यापेक्षा जास्त लोक हे नास्तिक आहेत. थोडक्यात युरोप आणि अमेरिकेने आज जी भौतिक प्रगती साधलेली आहे ती धर्माचा बळी देऊन साधलेली आहे.
    कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आज मुस्लिम समाजाची आहे. आज समाजाची विभागणी उलेमा आणि भौतिक शिक्षण घेतलेले मुस्लिम यांच्यात झाल्याचे दिसून येते. या दोन्ही गटांची फारकत झालेली आहे. सामान्य माणसं जरी उलेमांसोबत आहेत असे वाटत असले तरी इंटरनेटच्या प्रचारामुळे उलेमांचा प्रभाव त्यांच्यावर दिवसागणिक कमी होत आहे. उलेमांचा समाजाशी आता संबंध फक्त नमाज, नमाजे जनाजा, हज, जकात इत्यादी संबंधी मार्गदर्शन करण्यापुरताच शिल्लक राहिलेला आहे. मुस्लिम समाजातील नवीन पिढी मोठ्या प्रमाणात इंग्रजी व अन्य भाषांमध्ये भौतिक शिक्षण घेत आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. तंत्रज्ञानाचे जगत्गुरू अमेरिका आणि युरोप असल्याकारणाने साहजिकच मुस्लिम समाजातील मोठा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झालेला आहे. त्यांच्या जीवन पद्धतीला प्रगतशील पद्धत म्हणत आहे. त्यांची कॉपी (अनुसरण) करण्यात धन्यता मानत आहे. त्याचे काही थेट परिणाम, मुस्लिम समाजावर झालेले आहेत. त्यातूनच मग पाश्चिमात्य देशात रूढ झालेल्या ’डेज’ साजरे करण्याची पद्धत भारतीय मुस्लिम समाजात रूढ होऊ पाहत आहे. आज अनेक परिवारामध्ये सर्व वयोगटातील लोकांचे वाढदिवस, अगदी केक कापून आणि मेनबत्या विझवून साजरे करण्याचे प्रमाण वाढत आहे. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, चॉकलेट डे, फ्रेंडशिप डे वगैरे डेज मोठ्या तत्परतेने साजरे होत आहेत. त्यातीलच एक प्रकार नवीन वर्षाचे स्वागत 31 डिसेंबरच्या रात्री जागून पश्चिमेप्रमाणे साजरे करण्याचे प्रमाण मुस्लिम समाजात वाढत आहे.
    ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे. जीचे वर्णन कवी इक्बाल यांनी पुढील प्रमाणे केलेले आहे - इक्बाल को उस देसमें पैदा किया तूने, जिस देस के बंदे हों गुलामी में रजामंद. आजमितीला स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्या अनेक मुस्लिम लोकांमध्ये या गोष्टीचीही समज राहिलेली नाही की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे की, ”जिसने भी जिस कौम की मुशाबेहत इख्तीयार की, वो उन्हीं में से हैं” (अबू-दाऊद - 4031). पाश्चिमात्य संस्कृतीपुढे आपल्या संस्कृतीची ही एका प्रकारची शरणागतीच आहे. याचे भानसुद्धा या लोकांमध्ये राहिलेले नाही.
    राजकीय गुलामगिरीपेक्षा मानसिक गुलामगिरी जास्त घातक असते. म्हणून मुस्लिम समाजामध्ये पाश्चिमात्य देशांच्या फाजिल अनुकरणाचे हे वाढते प्रमाण थोपवणे गरजेचे आहे. त्यासाठी तबलीगी जमात, जमात-ए-इस्लामी हिंद, एस.आय.ओ, जी.आय.ओ., जमियते उलेमा-ए-हिंद, अहले हदीस आदींसारख्या संस्था पाश्चिमात्य संस्कृतीचे हे आक्रमण थोपविण्याचे गेल्या अनेक दशकांपासून जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रतिसादसुद्धा मिळत आहे. मात्र आव्हान मोठे आहे आणि यांचे प्रयत्न छोटे आहेत.
    कालपर्यंत इस्लामी तत्वज्ञानाचे प्रसार करण्यासाठी आमच्या हातात मीडिया नाही म्हणून आम्हाला काम करता येत नाही, अशी तक्रार अगदी रेडिओच्या काळापासून मुस्लिमांची होती. आज ती तक्रार करण्यास जागा राहिलेली नाही. समाजमाध्यमांचे व्यासपीठ सर्वांना उपलब्ध आहे. त्यावर फालतू चित्रपट पाहण्यापेक्षा, एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा, इस्लामी तत्वज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला गेला तर मला खात्री आहे इन्शाअल्लाह काही वर्षातच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल व निकाह सोपा झाल्याशिवाय राहणार नाही.
    हे डेज साजरे करण्यामध्ये किती श्रम, पैसा आणि मानवी तास वाया जातात, याचा कोणालाच अंदाज लावता येणार नाही. यातून वाईटच वाईट निर्माण होते, यातही शंका नाही. व्हॅलेंटाईन डे व फ्रेंडशिप डे मधून युवापिढीमध्ये चारित्र्याचे स्खलन होते, हे ही निश्चित आहे. वाढदिवस साजरे करण्यामधून स्पर्धा आणि इर्षा निर्माण होते, हे ही नक्की. त्यातूनही अनेकवेळा गुंतागुंत निर्माण होते. स्त्री-पुरूषांचा अनावश्यक संपर्क वाढतो व त्यातून अनेक नाजूकप्रश्न निर्माण होतात. 31 डिसेंबरला रात्री कसा धिंगाणा घातला जातो आणि त्यातून काय निष्पन्न होते, याचे वर्णन शोधनच्या बुद्धिमान वाचकांसमोर करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. या डेज मधून निर्माण होणार्या विकृतीला यशस्वीपणे थोपविण्याचे सामर्थ्य इस्लामीक तत्वज्ञानात आहे, यात किंचितही शंका नाही. फक्त हे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. या संबंधीची माहिती आकर्षक आणि प्रभावशाली पद्धतीने समाज माध्यमांचा उपयोग करून जेव्हाची तेव्हा मुस्लिम समाजापर्यंतच नव्हे तर आपल्या देशबांधवांपर्यंतही पोहोचविणे हे आपले धार्मिकच नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्यही आहे, याचेही भान मुस्लिमांनी ठेवणे आवश्यक आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ मागतो की, ”ऐ अल्लाह आम्हा सर्वांना सद्बुद्धी आणि पाश्चात्य देशांच्या लोकांकडून फक्त त्यांचे चांगले गुण आणि ज्ञान घेऊन त्यांच्यातील वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शक्ती व युक्ती दे.” आमीन.

- एम.आय. शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget