Halloween Costume ideas 2015

आम्ही रझाकार होतो का?

हैदराबाद मुक्तिसंग्राम किंवा मराठवाड़ा मुक्तिसंग्राम हा विषय निघाला की आपण निजामाच्या जुलमी राजवटीतून ,रझाकारांच्या पाशवी जाचातून कसे मुक्त झालो याविषयी भरभरून बोलतो, लिहितो, ठीक आहे याला कुणाची पण हरकत असण्याचं कारण नाही, नसावी. पण...पण... पण... या स्वातंत्र्य लढ्याच्या आड किती दरोडेखोरांनी, चोरांनी, गुंडांनी, बदमाश लोकांनी धुमाकूळ घातला? सर्व सामान्य मुस्लिमांवर अत्याचार केले गेले त्याबद्दल कुणी चर्चा करीत नाही की काही बोलत नाही.
    17 सप्टेंबर ला एकच बाजू मांडली जाते. एक धर्म विशेष समाजाला आरोपीच्या पिंजर्यात बंदिस्त करण्याचे प्रयत्न केले जातात. अंबाजोगाई सारख्या शांततावादी शहरामध्ये जेथे रझाकारानी निमूटपणे शस्त्रे खाली ठेवली होती, कुठेही भारतीय सैनिकांना प्रतिकार झालेला नव्हता, त्या अंबाजोगाईत सर्वत्र राज्य प्रशासन कोलमडलेले होते. अधिकारी, पोलिस, रझाकार सारे पळून गेलेले होते. कुठेच कोणाचा पत्ता नव्हता. काही ठिकाणी गुंडांचे राज्य चालू होते. मुस्लिमांच्या कत्तली झालेल्या होत्या. लूटालूट, जाळपोळ चालू होती. याची असंख्य उदाहरण आहेत की हिंदूंनी पुढे येऊन हजारो मुस्लिमांची अब्रू,जीव वाचविला याला मीच काय कुणीही नाकारू शकत नाही. याच्याविषयी गौरवाने बोललं गेलं पाहिजे. लिहलं गेलं पाहिजे, यात दुमत नाही, पण निजामाच्या हैदराबाद संस्थानात एकूण 16 जिल्ह्यात 22,00 गाव होती. खेड्यापाड्यातून एकेकाळी -(उर्वरित लेख पान 7 वर)
जहागीरदार, जमीनदार असलेली मुस्लिम कुटुंबे रस्ता दिसेल तिकडे पळत होती. हयातभर परद्याच्या बाहेर न आलेल्या स्त्रियांना चिखलात, पावसात, नदीच्या पुरात जीव घेऊन अब्रू वाचविण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी लपावे व पळावे लागत होते. त्यांचा कुणीही त्राता नव्हता. अंबाजोगाई गावात खूपच लुटालूट झालेली होती. गुंड रात्रींचा फायदा घेऊन मुस्लिम मोहल्लयात जावून धुमाकूळ घालीत होते.
या सर्व परिस्थितीमध्ये मुस्लिम स्त्री-पुरुषांची दैना, त्यांची गावोगावी पडून असलेली मोकळी घरे, मोकळया घरातील मोकळी पडलेली संपत्ती हे सर्व भयंकर होते.
    केजचा अनुभव तर अत्यंत हृदय द्रावक होता. तेथे अफाट लुटालूट झालेली होती. बारव भरून प्रेते साठलेली होती. घराघरातून आणि गल्लीगल्लीतून हुंदके, आक्रोश या शिवाय कानावर काही येत नव्हते. एके घरी एका सासूने आपल्या 13 सुनांना आणून उभे केले. त्यांचे नवरे यामध्ये मारले गेले होते. ती स्फुंदुन-स्फुंदुन, आम्ही रझाकार होतो का? असा प्रश्न करीत होती. अश्रूंचे पाट वाहात होते आणि तिने सवाल केला या 13 जणीचे काय करू? या प्रश्नाचे कुणाजवळच उत्तर नव्हते. साश्रुनयनाने मान खाली घालण्याशिवाय कोणी काय करू शकणार होते?  या दृश्याने हृदय पिळवटून निघालेले नसेल असा कुणी असणे शक्यच नव्हते.
    येळंब आणि नांदूरघाट जवळच्या भागाला अमळाचा बरड म्हणतात. कळंबचे एक अति श्रीमंत कुटुंब महंमद शरीफ कळंब सोडून आश्रयासाठी फिरत होते. फिरत-फिरत या बरडावर आले. महंमद शरीफ कळंबचे कपड्यांचे व किराणाचे एक मोठे व्यापारी होते. लग्नाचे बसते मानवतनंतर त्यांच्याकडेच बांधले जातं. ते मोठे जमीनदार व सावकार होते. या कुटुंबात एकूण 13 माणसे होती. जीव वाचविण्यासाठी बरोबर ऐवज व पैसे घेऊन ते लोक फिरत होते. पैसे घ्या पण जीवदान द्या, असा त्यांचा घोषा होता. पण त्या पैश्यानेच त्यांचे प्राण धोक्यात आणले, प्रत्येका जवळ 1- 1 लाखाचे धन होते. हे सर्वच्या सर्व अमळाच्या बरडावर कापले गेले. आवरगाव, चिंचोली माळी आणि केजच्या गुंडानी त्यांना लुटले आणि खलास केले.
मराठवाड्यात या वेळपर्यंत झालेल्या लुटीमध्ये ही सर्वात मोठी लूट होती आणि ही लूट या भागातील आजूबाजूच्या प्रतिष्ठित लोकांनी केली होती. चिंचोली माळी व केजमध्ये त्यात धागेदोरे होते. आवरगावच्या गुंडांचा त्यात हात होता.
    वरील घटना या ऐकीव नाहीत. याचे लेखी पुरावे आहेत माझ्याकडे आणि हे लिहिणारे कुणी मुस्लिम नसून अंबाजोगाईतील प्रतिष्ठित आदरणीय स्वतंत्रतासेनानी आहेत. ह्या संवेदनशील लोकांनी जर हे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले नसते तर हे सत्य कधीच समोर आले नसते.
या दोन तीन घटनाच मुख्यतः मी इथे मांडल्या. अशा हजारो घटनांचा उल्लेख करता येईल. धारूर, उस्मानाबाद, नांदेड येथे प्रचंड प्रमाणात मुस्लिम समाजाचे शिरकाण करण्यात आले. संपत्ती लुटली गेली, हजारोंच्या संख्येने लोक देशोधडीला लागले. या पोलीस एक्शन वास्तविक पाहता ते मिलिट्री अॅक्शनमध्ये सरकारी आकड्यांचा जर आपण विचार केला तर जवळपास 40,000 हजार निष्पाप,माणसं मारली गेली होती असे हे आकडे सांगतात, कोट्यावधीची त्यांची संपत्ती लुटली गेली. हे सर्व काही रझाकार नव्हते.
    पण कुणी यांच्या विषयी चिकार एका शब्दाने पण बोलत नाही की लिहीत नाही. हैदराबाद मुक्तीसंग्राम वर लिहल्या गेलेल्या कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात तुम्हांला यावर एक ओळ सुध्दा सापडणार नाही. गुजरातलाही लाजवेल अस हे हत्याकांड आपल्या मराठवाड्यात घडलेले आहे. हा इतिहास आहे. यावर अभ्यास करून संशोधन करून अजून प्रकाश टाकता येईल. 17 सप्टेंबरची ही पण एक बाजू आहे जी मला आपल्यासमोर आणायची होती, मांडायची होती.


- मुजीब काझी
अंबाजोगाई 
80875 62875

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget