Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२०) आता हे पैगंबर (स.)! हे लोक जर तुमच्याशी भांडण करतील तर त्यांना सांगा, ‘‘मी आणि माझ्या अनुयायांनी तर अल्लाहसमोर मान तुकविली आहे.’’ मग ग्रंथधारक व बिगर ग्रंथधारी दोघांना विचारा, ‘‘काय तुम्हीही त्याची आज्ञाधारकता व दास्यत्व स्वीकारले?’’१८ जर त्यांनी स्वीकारले तर त्यांना सरळमार्ग प्राप्त झाला. जर त्यापासून पराङ्मुख झाले तर, तुमच्यावर फक्त संदेश पोहचविण्याची जबाबदारी होती. पुढे तर अल्लाह स्वत:च आपल्या सर्व दासांचे व्यवहार पाहणारा आहे. 
(२१) जे लोक अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचना मान्य करण्यास नकार देतात आणि त्याच्या पैगंबरांना हकनाक ठार करतात आणि अशा लोकांच्या जीवावर उठतात जे मानवमात्रापैकी न्यायनीती व रास्तपणाचा आदेश देण्याकरिता पुढे येतात, त्यांना दु:खदायक शिक्षेची शुभवार्ता ऐकवा.१९/
(२२) हेच ते लोक होत ज्यांची कर्मे इहलोकात व परलोकात, दोहोंमध्ये वाया गेली२० आणि त्यांचा साहाय्यक कोणी नाही.२१
(२३) तुम्ही पाहिले नाही की, ज्या लोकांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग मिळाला आहे, त्यांची अवस्था काय आहे? जेव्हा त्यांना अल्लाहच्या ग्रंथाकडे बोलाविले जाते, याकरिता की त्याने त्यांच्या दरम्यान निर्णय द्यावा,२२ तेव्हा त्यांच्यापैकी एक गट त्याला बगल देतो व त्या निर्णयाकडे येण्यापासून विमुख होतो.
(२४) त्यांची ही वर्तणूक या कारणास्तव आहे की, ते म्हणतात नरकाग्नी तर आम्हाला स्पर्शदेखील करणार नाही. आणि नरकाची शिक्षा मिळालीच, तर फक्त काही दिवस.२३ त्यांच्या मनघडत श्रद्धांनी त्यांना त्यांच्या धर्माच्या बाबतीत भयंकर चुकीच्या समजुतीत गुंतविले आहे.
(२५) मग काय ओढवेल त्यांच्यावर, जेव्हा आम्ही त्यांना त्या दिवशी एकत्र करू, ज्या दिवसाचे आगमन निश्चित आहे? त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कमाईचा बदला पुरेपूर दिला जाईल व कोणावरही अत्याचार होणार नाही.


१८) दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास ``मी आणि माझे अनुयायांनी तर अल्लाहसमोर मान तुकविली आहे.'' म्हणजे इस्लामला मान्य केले आहे जो अल्लाहचा मूळ धर्म ईशप्रदत्त आहे. आता तुम्ही दाखवून द्या की तुम्ही आपल्या स्वत:च्या आणि पूर्वजांच्या मनगढंत विचारसरणी आणि आस्थांवर चालण्याऐवजी या सत्य आणि मूळ जीवनप्रणाली (इस्लाम) कडे येणार आहात का?
१९) ही व्यंगपूर्ण वर्णनशैली आहे. ते आज आपल्या कर्मावर अतिप्रसन्न आहेत आणि समजून आहेत की स्वत: फार चांगले काम करत आहेत. त्यांना दाखवा की तुमच्या कर्माचे हे फलित आहे.
२०) म्हणजे त्यांनी आपले प्रयत्न आणि सामथ्र्य अशा मार्गात खर्च केले ज्याचे फळ याजगात आणि पारलौकिक दोन्ही जीवनात वाईटच आहे.
२१) म्हणजेच कोणतीच शक्ती अशी नाही जी यांच्या चुकीच्या आणि वाईट प्रयत्नांना सफल बनवू शकेल. किंवा कमीतकमी वाईट परिणामांपासून त्यांना वाचवू शकेल. ज्या ज्या शक्तींवर हे लोक विश्वास व श्रद्धा ठेवतात की ते सर्व या जगात आणि परलोकात अथवा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मदतीला येतील, खरे त्यांच्यापैकी कोणीच यांची मदत करू शकणार नाही.
२२) म्हणजे त्यांना सांगितले जात आहे की अल्लाहच्या ग्रंथाला अंतिम प्रमाण मान्य करा. त्याच्या निर्णयापुढे नतमस्तक व्हा. जे काही त्यानुसार सत्य आहे ते सत्य माना आणि त्यानुसार जे असत्य आहे त्यास असत्य माना. स्पष्ट आहे की येथे अल्लाहचे ग्रंथ म्हणजे तौरात आणि इंजिल आहेत. `ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग प्राप्त् करणारे' म्हणजे खिश्चन आणि यहुदी धार्मिक विद्वान लोक आहेत.
२३) म्हणजे हे लोक स्वत:ला अल्लाहचे प्रिय लोक (प्रियजन) समजतात. ते या भ्रमात आहेत की आम्ही काहीही केले व कसेही वागलो तरी स्वर्ग आमच्याचसाठी आहे. आम्ही ईमानवंत आहोत, अमक्याचे वंशज, अमक्याला मानणारे आणि आमक्याचे मुरीद (भक्त) आहोत. अमक्या अमक्याचे आश्रित आम्ही असल्यामुळे नरकाची काय हिंमत की आम्हाला स्पर्श करून दाखवावा. मान्य केले की नरकात टाकले जावू तरी अगदी थोड्या दिवसांसाठी तिथे ठेवले जाऊ जेणेकरून पापांच्या घाणीपासून स्वच्छ होऊन सरळ स्वर्गात जाऊ. या प्रकारच्या विचारसरणीमुळे ते अगदी उद्दाम आणि निडर बनले होते. परिणामत: ते लोक मोठमोठे अपराध सहज करीत आणि अत्यंत हीन पाप करीत होते. उघडपणे सत्याला सार्वजनिकरीत्या फेटाळीत असत. अल्लाहचे भय काडीमात्रसुद्धा त्यांच्या मनात नव्हते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget