Halloween Costume ideas 2015

मैं करू तो साला कॅरेक्टर ढिला हैं!


आज जवळपास वर्ष सव्वावर्षानंतर सकाळी लवकर उठून तयार झालो. (मागे वर्ष सव्वावर्षाआधी अशाच एका बंडखोर पहाटे उठून गनिमी कावा खेळलो होतो, पण - - - जाऊ द्या. नको त्या आठवणी.) मोठ्या साहेबांना भेटायला जायचं तर सक्काळी सक्काळीच जायला हवं की नको? याचक म्हणून कोणाच्या दारात जायचं असेल तर सक्काळी सक्काळीच जावं म्हणतात. तेव्हा माणसाचा मूड चांगला असतो, रिकाम्या हाती नाही यावं लागत म्हणे. ईश्वराला नमस्कार केला. आमच्या साहेबांना सद्बुद्धी द्या म्हणून विनंती केली. तसे आमचे साहेब मागचं विसरून पुढे जाणारे आहेत. (देवा नानांसोबत केलेली बोलणी विसरून ते उधोजीराजेंसोबत पुढे गेलेच की नाही?) माझ्याबाबतीतही ते मागचं विसरलेच असतील. केली असेल मी बंडखोरीला मदत, पण साहेबांची नाराजी कळल्याबरोबर आलो की नाही हातात पांढरे निशाण फडकवत छावणीत परत? आणि आताचीही माझी चूक कबूल करून मी चुकीची दोन्ही फळंही पदरात घेतली आहेत. मग कशाला दाखवतील ते मला 'कात्रजचा घाट'?

मला सांगा, अंगवस्त्र बाळगायची आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे की नाही? पूर्वीच्या राजामहाराजांना सारखी भटकंती करावी लागत असे, मग श्रमपरिहार करण्यासाठी, विरंगुळ्यासाठी ते आपल्या पदरी अंगवस्त्रे बाळगत. समाजाचीही त्याला मुकसंमती असे. आणि महत्वाचं म्हणजे तेव्हाही बोरूबहाद्दरांची आणि दांडकेधारकांची जमात उदयाला आली नव्हती, म्हणून तेव्हा नको त्या गोष्टींचा बोभाटा होत नव्हता. आता आम्हालाही लोकांना 'सामाजिक न्याय' देण्यासाठी गावोगावी फिरावं लागतं. जीव नुसता शिणून जातो. मग थोडा विरंगुळा म्हणून समजा आम्ही एखादं अंगवस्त्र बाळगलं तर त्यात गैर काय? लोकांना 'सामाजिक न्याय' देणाऱ्याने स्वतःला न्याय देऊच नये का? हा कुठला न्याय झाला? आणि आम्ही कोणावर अन्याय केलेला नाही. जे झालं ते दोघांच्याही संमतीने झालं आहे! शिवाय जे दोघांच्या संमतीने झालं त्याची दोन्ही फळं आम्हीच सांभाळतोय!

मग अजून काय हवंय? आणि या आधी अशाच प्रकरणात आमच्याच पूर्वसूरींना 'जब …… किया तो डरना क्या?' म्हणून पाठीशी घालण्यात आल्याचा इतिहास काही फार जुना झालेला नाही. म्हणजे '- - - - मैं करू तो साला कॅरेक्टर ढिला है!' असं का?

मोठ्या साहेबांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते अस्वस्थपणे दिवाणखान्यात येरझारा घालत होते. त्यांना तसे अस्वस्थपणे येरझारा घालतांना पाहून त्या एसी हॉलमध्येही मला दरदरून घाम फुटला. त्यांनी मला हातानेच बसायचा इशारा केला. त्यांची ती उग्र मुद्रा पाहून मी उभाच राहिलो. साहेबांच्या डोळ्यांतून, 'मार दिया जाय के छोड दिया जाय - - - - ?'चे सूर बाहेर पडत असल्याचा भास झाला!

'बोला, काही बोलण्यासारखं असेल तर बोला.' साहेबांचा धीरगंभीर आवाज उमटला.

'चूक झाली साहेब. पदरात घ्या.'

'तुम्ही घरचा पदर सोडून बाहेरचे पदर ओढायचे आणि वर आम्हाला सांगायचं की पदरात घ्या म्हणून!'

'चुकलो साहेब. माफी असावी.' शाळेतला मास्तरही असाच एका चुकीसाठी दहावेळा कान धरायला लावायचा.

'अरे, असे कसे चुकलात? लोक असलेली बायको लपवता आणि तुम्ही जिला लपवायची तिला लोकांसमोर आणता? मोठ्या लोकांकडून काही शिकत चला जरा.'

'तो पक्ष केव्हाच सोडला साहेब. चुकलो, पण दोन्ही मुलांची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे, साहेब.' 

'आधी अनैतिक कृत्यं करायची आणि मग नैतिक जबाबदारी स्वीकारायची! हे म्हणजे आधी सत्तेसाठी सेक्युलर पक्षांसमोर खांदे पाडायचे आणि नंतर मात्र खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा मिरवायचा अशातला प्रकार झाला. ते एक असू देत, पण आसपासचे सगळेच अणू-'रेणू' प्रेमाने भरून टाकण्याचा तुम्हाला कोणी कॉन्ट्रॅक्ट दिला होता का? प्रत्येक खुर्चीवर आपणच बसायला हवं का? दुसऱ्यांसाठी नको सोडायला काही जागा?'

साहेबांनी उठता उठता प्रश्न केला. उठतांना साहेबांचा उजवा हात आशीर्वाद दिल्यासारखा वर उठला होता आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होते. मी प्रसन्न मुद्रेने बाहेर पडलो.

जाता जाता - आपला पॉली (टिकल) वूडमध्ये एकदम वट आहे. कोणाला ब्रेक हवा असेल तर द्या पाठवून. 'काम' पक्कंच करून टाकतो.

-मुकुंद परदेशी

धुळे, मुक्त लेखक,

संपर्क-७८७५०७७७२८


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget