महाराष्ट्राची सत्ता जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून निसटली आणि ती उद्धव ठाकरे यांच्या हातात गेली तेव्हापासून ते विचलित झाले आहेत. इतके की विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या कामांवर नजर ठेवत त्यांच्यातील चुकांना सभागृहात उपस्थित करण्याऐवजी ते फक्त उद्धव ठाकरे यांनाच आपल्या टिकेचे लक्ष्य करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदी ”पुन्हा मीच”ची संधी मिळाली नाही ती उद्धव ठाकरेंमुळेच असे त्यांना वाटते.
मग जेव्हा मुख्यमंत्री पदी कार्यरत असताना उद्धव ठाकरे यांनी जे काही केले, करत आहेत, करत राहतील त्या सर्वांचा दोष त्यांच्यावरच असा का? असे त्यांना वाटते. त्यांचे कार्य पाहून शासनाच्या कारभारावर त्याच्या उणीवांवर टीका करण्याचे आहे की त्यांना शासनाचा कारभार कसा असावा याची माहितीच नाही कुणाला माहित. 5 वर्षे त्यांनी राज्याचा कारभार एकमुखी हाताळला. इतर पक्षांशी आघाडी करून त्यांचे सरकार सत्तेत आले नव्हते. शिवसेनेशी त्यांच्या वैचारिक आणि राजकीय संबंधांचा इतिहास होता तरी देखील त्यांनी आपल्या कार्यकिर्दित कोणते मोठे कार्य राज्याच्या विकासासाठी केले असल्याची कुठे नोंद नाही. जसे ठाकरे यांनी राज्याची सुत्रे हाती घेताच कोरोनाच्या महामारीशी सामना करावा लागला आणि त्यातून ते यशस्वीरित्या पार पडले. अशा कोणत्या भयंकर समस्येला त्यांना सामोरे जावे लागले नाही. बरे झाले ही देखील राज्याच्या जनतेवर एक प्रकारची दैवी कृपाच होती. फडणवीसांच्या काळात असे काही उद्भवले असते तर नागरिकांचे काय झाले असते याची कल्पनाच केली जावू शकते.
उद्धव ठाकरेवर इतर कोणते आरोप करता आले नसल्याने भ्रष्टाचाराचे जे सध्या केद्र सरकारचे शिष्टाचार झाले आहे, फडणवीस उद्धव ठाकरे यांनी कशी हिंदुत्वाची साथ सोडली फक्त हीच एकमेव टीका ते करत आले आहेत आणि करतही राहणार की काय असा प्रश्न पडतो. दुसरा प्रश्न असा की हिंदुत्व म्हणजे काय याचा अर्थ तरी त्यांनी आणि हिंदुत्ववाद्यांनी सांगायला हवे . नेमके काय केल्याने हिंदुत्व समजावे असा प्रश्न साहजिकच पडतो. उद्धव ठाकरे पूर्वीपासून हिंदुत्ववादी आहेत. आजही ते स्वतः म्हणत असतात की त्यांनी ती विचारधारा सोडलेली नाही तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काय करावे, ज्यामुळे त्यांच्यावर हिंदुत्व सोडण्याची टीका करता येणार नाही हे फडणवीसांनी स्पष्ट सांगावे म्हणजे सर्वांना देखील हिंदुत्व म्हणजे काय हे समजता येईल. उद्धव ठाकरे यांच्या आजवरच्या काळात राज्यात एकही सांप्रदायिक दंगा झाला नाही म्हणूनसाठी उद्धव ठाकरे यांना दोषी धरायचे काय? तसे पाहता फडणवीस यांच्या काळात देखील कुठे दंगा झाला नव्हता. मग हिंदुत्व सोडल्याचा आरोप त्यांच्यावरही लावायचा का?
आपल्या धर्म, संस्कृती आणि सभ्यतेचे रक्षण करणे, त्यांचे संवर्धन करण्याचा सर्व धर्मियांचा अधिकार आहे. जसा तो हिंदु बांधवांचा आहे. तसाच मुस्लिम, ख्रिस्ती, शीख सर्वांचा आहे. पण आपल्या संस्कृतीच्या भल्यासाठी आपल्या धर्माच्या शिकवणी जोपासण्यासाठी परधर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणं त्यांच्या शिकवणींची अवहेलना करणं. धर्माच्या कारणावरून परधर्मियांवर अन्याय अत्याचार करणं याला धर्म संस्कृती म्हणता येते काय? नकारात्मक विचारांनी कोणतेही काम करता येत नाही की उद्दिष्ट साकारता येत नाही. सकारात्मकतेबरोबरच कोणतीही विचारधारा सर्वसमावेशक असायला हवी. राष्ट्राच्या तमाम नागरिकांच्या हितासाठी सविस्तर कार्यक्रम असावा फक्त एकाच समाजाच्या संप्रदायाच्या हितासाठी कार्य करण्याने कोण नैतिक उद्दिष्ट साकार होत नसते. धर्माच्या बाबतीत अहंकार नाही कृतज्ञता असावी. अहंकाराचा शेवट हिटलर मुसोलीनी सारखा होतो. जिवांच्या भीतीपोटी लोक उघड बोलत नसले तरी ती हृदयात मानसिकतेत घर करून राहते.
दुसरे असे की हिंदुत्वाचा नेमका अर्थ म्हणजे काय? नागरिकांना राष्ट्राला देशोधडीला लावणे, शेतकर्यांना उपाशी ठेवून त्यांची कमाई धनदांडग्या उद्योगपतींना बहाल करणे, देशाला, राष्ट्राला, व्यवस्थेला, उद्योजकांच्या दावणीला बांधून, राष्ट्राची संपत्ती लुटारूंना बहाल करणं हे अभिप्रेत आहे काय?
न्यायव्यवस्थेला लाचारी पत्करायला, रोजगारांच्या संधी नष्ट करून कोट्यावधींना बेरोजगार करणे, आम जनतेवर हरप्रकारचे टॅक्स आकारणी करून कार्पोरेट जगताला कोट्यावधींची सूट देणे याला विकास म्हणतायत हिंदुत्वाच्या विचारधारेत म्हणजे एकंदर तमाम नागरिकांना गुलाम बनवणे असा तर याचा अर्थ होत नाहीना. उद्धव ठाकरे इथेच चुकले असतील त्यांनी असे काहीही केल नाही.
- संपादक
Post a Comment