हे गुलाबी कागदावरचं प्रेमपत्र (बघणाऱ्याला सरकारी वाटावं म्हणून) मुद्दामच खाकी पाकिटात टाकून पाठवतेय. आज आपल्या ब्रेकअप नंतरचा हा पहिलाच व्हॅलेन्टाईन डे ना! म्हणजे तसा दुसरा, पण पहिला आपल्या ब्रेकअपनंतर लगेच आला होता ना. मी तर धड त्या धक्क्यातून सावरलेसुद्धा नव्हते. त्या 'लॉ ऑफ ऍट्रैक्शन'वाल्यांचं ऐकून सारखं 'मी परत येईन. मी परत येईन.' घोकत बसले होते. काहीच उपयोग झाला नाही. मिसगाईड करतात मेले. बारामतीला राहतात की काय? जाऊ द्या. झालं गेलं 'मिठी'ला मिळालं! ('मिठी' म्हणजे 'ती' मिठी नाही काही. आपल्या गावातल्या नदीचं नाव आहे ते!) आता विसरा ना गडे मागचा राग. मी थोडीशी गंमत करायला गेले तर तुम्ही लगेच डोक्यात राख घालून दुसरा घरोबा केलात. किती ओढाताण होतेय तुमची त्या नवीन (नवीन कसले मेले, सगळ्यांचाच दुसरा घरोबा आहे!) संसारात! मला नाही बाई बघवत. बाहेर पडा बघू त्या त्रांगड्यातून. आपण आपला मोडलेला संसार परत सुरू करू. हा व्हॅलेन्टाईन डेचा मुहूर्त चुकवू नका. मला आठवतं ना तुम्हाला आणि मामंजीना या व्हॅलेन्टाईन डेची किती चीड यायची ते! पण आता मामंजी नाहीत आणि बाळराजेही वयात आलेत! आता नाईट लाईफ काय की व्हॅलेन्टाईन डे काय तुम्हाला चालवून घ्यावेच लागतील! जाऊ द्या. माणसाला थोडं बदलावंच लागत, थोडी तडजोड करावीच लागते. आपणही थोडं बदलू या, थोडी तडजोड करू या, व्हॅलेन्टाईन डेचा मुहूर्त साधून.
ता. क. - पाकिटात किनई एक कमळाचं फुल ठेवलं आहे. तुमच्यासाठी.
फूल तुम्हे भेजा है खत में
फूल नहीं मेरा दिल है।
तुमचीच
कमळा नागपूरकरीण
*********
कमळे,
तुझं पत्र आम्ही केराच्या टोपलीत फेकलं आहे (दोनदा वाचून). असं गुलाबी कागदावर दुसऱ्याची उचललेली गाणी लिहून मला परत नादी लावायचा प्रयत्न करू नको. ते असू देत, पण लक्षात ठेव संकट (कोव्हीडचं, आमच्या संसारावरचं नाही!) कमी झालं आहे पण अजून पूर्ण गेलेलं नाही. हात धुवत जा. तोंडावर मास्क लावत जा आणि अंतर राखत जा. तुझ्याशी परत संसार थाटण्याची मला (सध्यातरी) गरज नाही. किंबहुना मी तर म्हणेन की, (सध्यातरी) तो विषय नकोच.
उधोजीराजे
-मुकुंद परदेशी
धुळे, मुक्त लेखक,
संपर्क-७८७५०७७७२८
Post a Comment