ही त्या सर्व प्रतिक्रियांपैकी उत्कृष्ट होती जी या मोहिमेअंतर्गत बहुसंख्यांक बांधवांशी भेटी दरम्यान दिली गेली होती. हा एक तरूण होता व व्यसन सोडू इच्छित होता. माझे सहकारी निसार सिद्दीकी यांनी त्याचे थोडेशे समुपदेशन केले पण तो घाईत होता. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देवून व आमचा भ्रमणध्वनीक्रमांक घेवून तो अंबाजोगाईरोडच्या गर्दीत लोप पावला. तो पुन्हा भेटेल न भेटेल ही गोष्ट अलाहिदा पण त्याने माझ्या मनामध्ये विचारांचे एक वादळ अलगद सोडले होते, एवढे मात्र निश्चित.
अभियानामध्ये सर्वप्रकारच्या नागरिकांच्या भेटी घेण्याचा योग आला. आम्ही निस्वार्थ भावनेने समाज हितासाठी लोकांना भेटत असल्याचे लक्षात आल्याने अनेक नागरिकांनी आमच्यासमोर मन मोकळे केले. लोकं भरभरून बोलली. सर्वांच्याच मनामध्ये स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल काळजी होती. त्यांच्या चेहऱ्यावर सामाजिक मुल्यांच्या होणाऱ्या ऱ्हासाची चिंता स्पष्ट दिसत होती. नैतिक मुल्यांच्या ऱ्हासापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला कसे वाचवावे? हे त्यांना कळत नव्हते. एका पोलीस बांधवाने तर असे सांगितले की, ’’आम्ही समाजाचे रक्षण करतोय पण समाज आमच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल, असे वाटत नाही.’’
समाज खालपासून वरपर्यंत नासत चाललेला आहे व ह्या नासण्याच्या प्रक्रियेपासून समाजाला वाचविण्याचा कोणताच मार्ग दिसत नाहीये, हे ही खरे. कारण सरकार काही करत नाही. सेवाभावी संस्था, सांस्कृतिक संघटनांच्या लक्षात समाजाच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम व त्या दुष्परिणामाचा वाढता परीघ सर्वांनाच आपल्या कवेत घेईल. पुढच्या पिढ्यांना नासवत जाईल, ही बाब कोणाच्याच लक्षात येत नाहीये. ज्यांच्या लक्षात आलेली आहे ते हतबल आहेत. कारण ऱ्हासाची कारणे व्यवस्थेमधून निर्माण झालेली आहेत व मुठभर लोक व्यवस्थेशी लढू शकत नाहीत. म्हणून अशा निराशाजनक परिस्थितीमध्ये अंधारातून प्रकाशाकडे ही मोहिम तुम्ही हातात घेतली व आशेचा एक किरण निर्माण केला, याचे समाधान अनेक लोकांशी बोलतांना दिसून आले.
अभियाना दरम्यान, अनेक सामाजिक समस्यांना जवळून पाहता आले. या समस्यांमध्ये सर्व समाजघटक सारखेच पीडित आहेत. कोणी कमी आहे कोणी जास्त आहे एवढाच काय तो फरक. सर्वात मोठी समस्या तरूणांमध्ये अश्लील सामुग्रीच्या वाईट प्रभावाची आहे. ही समस्या आता विद्यापीठ, महाविद्यालयांतून झिरपत माध्यमिक शाळांपर्यंत येऊन पोहोचली आहे. पालक चिंतीत आहेत की, ऑनलाईन्नलासेससाठी मुलांच्या हाती मोबाईल देणे गरजेचे आहे परंतु त्या मोबाईलमधील अश्लील सामुग्रीच्या वाईट परिणामांपासून आपल्या मुला-मुलींना कसे वाचवावे, हे त्यांना कळत नाहीये. या सामुग्रीमुळे तरूणच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांच्या लैंगिक अभिरूची आणि वर्तनामध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून देशातील स्त्रिया असुरक्षित झालेल्या आहेत. या समस्येचे गांभीर्य ओळखून अॅड. कमलेश वासवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरनेटरवरून अश्लिल सामुग्री हटवावी यासाठी जनहित याचिका क्र. 177/2013 दाखल केली होती. तेव्हा केंद्र सरकारने न्यायालयात शपथ पत्राद्वारे ही सामुग्री हटविण्यास आपण असमर्थ असल्याचे कळविले होेते. यावरून या समस्येचे गांभीर्य ओळखता येईल. तसेच या समस्येचा सामना नागरिकांना स्वबळावर करावा लागणार आहे, ही अपरिहार्यताही आता लक्षात घ्यावी लागणार आहे. केवळ अश्लिलताच नव्हे तर इतर सर्व अनैतिक कृत्यांपासून तेच लोक सुरक्षित राहू शकतील ज्यांच्या ’नफ्स’ (स्व)वर त्यांचे पूर्ण नियंत्रण असेल. पण हे एवढे सोपे नाही. नफ्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. एका विशिष्ट पद्धतीने स्वतःचे मानसिक प्रशिक्षण करावे लागते. त्यासाठी जेवढी प्रभावशाली आचारसंहिता इस्लाम देतो तेवढी प्रभावशाली आचारसंहिता जगात दूसरी उपलब्ध नाही.
भेटीगाठी दरम्यान वर नमूद समस्येखेरीज अंधश्रद्धा, अज्ञानता, व्यसनाधिनता, भांडण-तंटे, स्वार्थ, विश्वासघात, गृहकलह, नात्यातील अविश्वास, भ्रष्टाचार इत्यादी जुन्या समस्यांसुद्धा कायम असल्याचा अनुभव आला. शिक्षणामुळे सुद्धा त्यात फारसा फरक पडलेला नाही आणि पडणार देखील नाही, हे ही उमजले. कारण जगात शिक्षणाच्या नावाखाली जे काही शिकविले जाते त्यातून विद्यार्थी पैसा कसा कमवावा? याचे कौशल्य तर आत्मसात करतात मात्र नैतिक वर्तन कसे करावे? याचे कौशल्य आत्मसात करीत नाहीत. कारण त्यांना ते शिकवलेच जात नाही. माणूस म्हणून कसे वागावे? दुसऱ्यांच्या प्रती दया,करूणा, त्याग व निःस्वार्थ प्रेम कसे करावे? यासंबंधीचे शिक्षण कुठल्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामील नाही. नैतिक वर्तनाचे महत्त्व त्यांना शिकविले जात नसल्या कारणाने समाजाचे सरळ दोन भाग पडलेले आहेत. एक - शोषक व दुसरा- शोषित.
भौतिक प्रगतीबरोबर नैतिक प्रगती साधता न आल्याने जो समाज तयार झालेला आहे त्यातील लोकांच्या जीवनात तणाव निर्माण झालेला आहे किंबहुना तणाव त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. जीवनशैलीच अशी विकसित झालेली आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांपासून वृद्धाश्रमातील वृद्धापर्यंत सगळ्यांना काही ना काही तणाव सोसावा लागत आहे. आरोग्यदायी समाजाचे हे लक्षण कदापि नव्हे. आज समाजामध्ये अनाचार माजलेला आहे. त्यातून समाजाचे नैतिक अधःपतन होवून त्याचा सर्वात जास्त फटका समाजातील स्त्रिया, मुले व अंतिम घटकाला बसला आहे व बसत आहे.
आज साधारणपणे तरूण-तरूणी जैविक रूपाने तर आई-वडिल बनत आहेत परंतु आपल्या मुलांवर नैतिक संस्कार करण्यात ते सपशेल अपयशी ठरत आहेत. कारण ते स्वतःच नैतिक मुल्यांनी रिकामे आहेत. परिणामी मूल्यहीन पिढी अस्तित्वात येत आहे व त्यांची संख्या पिढीगणिक वाढत आहे.
उपाय
शंभर टक्के आदर्श समाज कधीच अस्तित्वात येवू शकत नाही. तसे पाहता आदर्श समाज म्हणायचे कशाला? हे अगोदर ठरवावे लागेल. तर त्याचे उत्तर असे की, ज्या समाजामध्ये बहुसंख्य लोक सभ्य, दयाळू, निर्व्यसनी, शोषणमुक्त, प्रेमळ, त्यागी, दुसऱ्यांचे अधिकार देणारे, कमकुवत गटाचे रक्षण करणारे असतील तो समाज आदर्श. असा समाज निर्माण करण्यासाठी समाजामध्ये नैतिक मुल्यांची जोपासणा करणे अनिवार्य ठरते. तसे पाहता नैतिकतेला जगात सर्वच ठिकाणी चांगले समजले जाते. प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये नितीमत्तेचे उपदेश केलेले आहेत. परंतु वर्तनात नैतिकतेला प्रत्यक्षपणे लागू करण्याची जी परिणामकारक योजना इस्लाम देतो तशी दूसरी योजना जगात अस्तित्वात नाही. केवळ नैतिक आचरणाची महत्ता सांगितल्याने किंवा उपदेश केल्याने कोणताही समाज नैतिक होत नाही. इस्लाम त्यासाठी गल्लोगल्ली मस्जिदींची स्थापना करून दिवसातून पाचवेळा लोकांना त्यात बोलावून नमाजद्वारे तसेच रमजानचे 30 उपवास करवून घेऊन त्यांच्या अध्यात्मिकतेला बळ देतो. तेव्हा कुठे लोक नैतिक आचरणासाठी प्रोत्साहित होतात. तसेच अनैतिक आचरणातून मिळणारे लाभ सोडण्यास व नैतिक आचरणातून होणारे नुकसान सहन करण्यास तयार होतात. जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला या उंचीवर आणले जाणार नाही तोपर्यंत आदर्श समाज निर्माण होणार नाही. आदर्श समाजाच्या निर्मितीची जबाबदारी कोणा एका गटाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. फक्त एकच उदाहरण देवून थांबतो की आज समाजामध्ये वृद्धांची समस्या इतकी जटील झालेली आहे की, वृद्धाश्रमापलिकडे त्यावर उपाय जगाला सुचलेला नाही. पण ही समस्या मुस्लिमांमध्ये नाही. याची जगाला आश्चर्य कसे वाटत नाही, याचेच आश्चर्य वाटते.
मुळात मुस्लिम समाजामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी असणे, त्यांच्यात वृद्धांची समस्या नसणे, व्याजासारख्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या आर्थिक आतंकवादापासून दूर असणे, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी
(उर्वरित आतील पान 7 वर)
असणे,कन्याभ्रुण हत्येचे प्रमाण नगण्य असणे या आणि यासारख्या अनेक गुण वैशिष्ट्ये असणाऱ्या मुस्लिम समाजाचे आदर्श समाज निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या प्रिय देशाला महासत्ता बनवायचे असेल तर या आणि यासारख्याच आणखीन इतर गुणवैशिष्ट्यांना आपल्यामध्ये रूजवावा लागेल. त्याची सुरूवात आपल्या घरातून करावी लागेल. जेव्हा प्रत्येक घर अशा या गुणवैशिष्ट्यांनी संपन्न होईल तेव्हा आदर्श समाज आपोआपच निर्माण होईल आणि भारत नैतिकदृष्ट्या जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होईल, यात शंका नाही. जय हिंद.
- एम.आय. शेख
Post a Comment