Halloween Costume ideas 2015

सुखी कुटुंब सुखी समाज


मजबूत समाज हे मजबूत कुटुंबाच्या समुच्चयाचे नाव आहे. मजबूत कुटुंब मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत लोकांमुळे बनते आणि असे लोक ईशपारायणतेच्या माध्यमातून घडतात. जगात असे कुठेच आणि कधीच घडले नाही की मजबूत समाज हा व्यसनाने पोखरलेल्या दुराचारी लोकांमुळे अस्तित्वात आला. इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नेतृत्वाखाली सातव्या शतकात जरूर एक मजबूत समाज अस्तित्वात आला होता. पण त्यांच्यानंतर हळूहळू तो समाज लोप पावत गेला. परंतु, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या प्रक्रियेद्वारे अरबांसारख्या रानटी समाजाचे रूपांतरण नैतिकदृष्ट्या मजबूत समाजात केले होत. ती प्रक्रिया शरीयतच्या रूपाने आज देखील अस्तित्वात आहे. स्वतः मुस्लिम समाज बऱ्यापैकी शरियतवर आचरण करत असल्यामुळे त्यांची कुटुंब व्यवस्था इतरांच्या तुलनेत मजबूत आहेत. म्हणूनच की काय मुस्लिम तरूण-तरूणी यांच्यामध्ये आत्महत्येसारख्या आत्मघाती कृत्यापासून ते व्यसनाधिनतेचे व अश्लिलतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.

मात्र अलिकडे प्रगतीच्या नावाखाली जो काही भौतिकवाद समाजामध्ये बोकाळत चाललेला आहे त्यातून स्वार्थी समाज आकारात आलेला आहे. कुटुंबाचे अस्तित्व संकटात सापडलेले आहे. कुटुंबाला पर्याय म्हणून लीव इन रिलेशनशिपसारखी स्त्रियांवर अत्याचार करणारी अनैतिक पद्धत मोठ्या शहरात सुरू झालेली आहे. नव्हे रूढ झालेली आहे. पण ही पद्धत मजबूत कुटुंब तर सोडा लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या नात्याला सुरक्षासुद्धा पुरविण्यास सक्षम नाही. इस्लामच्या दृष्टीने कुटुंब म्हणजे जबाबदारी, नात्यांचे रक्षण होय. म्हणूनच शरियतने वैध लग्नाशिवाय इतर पद्धतीने अस्तित्वात येणाऱ्या कुटुंबांना निषिद्ध ठरविलेले आहे. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत अस्लम गाझी यांच्या मते मानवसमाजाचे सर्वांग सुंदर चित्र कुटुंबाच्या परिघामध्ये दिसून येते. यात पती-पत्नीचे एकमेकावरचे प्रेम, आई-वडिलांची कृपा, धाकट्यांवर प्रेम, मोठ्यांचा सन्मान, कुटुंबातील विवश किंवा दिव्यांग लोकांची मदत, वृद्धांचा आधार, अडी-अडचणींमध्ये एकमेकांच्या कामाला येणे, सर्वांशी चांगले संबंध ठेवणे, आनंद आणि दुःखाच्या क्षणात एकत्र गोळा होणे. थोडक्यात असे कुटुंब म्हणजे छोटा समाजच असतो. हा छोटा समाज जेवढा मजबूत आणि सुंदर असतो तेवढाच मोठ्या समाजासाठी उपयोगी आणि मदतीचा असतो. मानवी गरजा ह्या झुंडीतून पूर्ण होत नाहीत. त्यांना पूर्ण करण्यासाठी पावलो-पावली नातेवाईकांची गरज पडते. आणि मजबूत कुटुंबातूनच मजबूत नाती निर्माण होतात. ज्याप्रमाणे वर्षभर अभ्यास केल्यानंतर वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्याच्या क्षमतेचा कस लागतो तसाच संकटाच्या समयी कुटुंबातील सदस्यांचा कस लागतो. कुटुंब मजबूत असेल तरच एकमेकाच्या सहकार्याने कुटुंबातील सदस्य त्या संकटावर मात करतात. नाती ही माणसाची मुलभूत गरज आणि अधिकार दोन्ही आहेत. ते आनंद आणि दुःख दोन्ही समयी उपयोगाला येतात. मात्र अलिकडे कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत असतांना पाहतांना दुःख होते. 

ज्याप्रमाणे झाड आपल्या मुळांपासून तुटल्यावर वाळून जाते त्याचप्रमाणे कुटुंबाचे सदस्य कुठल्याही कारणांमुळे कुटुंबापासून लांब गेल्यामुळे वाया जाण्याची शक्यता वाढते. आज अनेक तरूण मुलं-मुली उच्च शिक्षणाच्या निमित्ताने आपले कुटुंब सोडून मोठ्या शहरात किंवा विदेशामध्ये राहतात. तेथे त्यांच्यावर कुटुंबाचे नियंत्रण नसते. त्यामुळे अशा मुलां-मुलींचे पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. कुटुंब हे समाजाचे मूळ घटक आहे म्हणून होता होईल तितके हे मजबूत कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. 

’’आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली,निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’ (सुरे अर्रूम : आयत नं. 21)

कोणत्याही श्रद्धावान कुटुंबाची सुरूवात एका मुलाच्या लग्नाच्या प्रस्तावाला एका मुलीने होकार दिल्याने होते. या प्रक्रियेद्वारे दोन कुटुंब एकत्र येतात आणि तिसऱ्या एका नवीन कुटुंबाची पायाभरणी होते. इस्लाममध्ये लग्नाची आवश्यकता पतीने पत्नीपासून संतोष प्राप्त करावा, या प्राथमिक हेतूने केलेली आहे. ज्याचे संकेत वर नमूद आयातीमध्ये दिलेले आहेत. याशिवाय, मानव वंशाचा विस्तार कुटुंब व्यवस्थेतून अपेक्षित आहे. वर नमूद आयातीमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेम आणि करूणा ही ईश्वरीय देणगी आहे. या मजबूत पायावर एका नवीन कुटुंबाची सुरूवात होते आणि लवकरच त्या कुटुंबामध्ये मुलांच्या स्वरूपात नवीन सदस्यांचा प्रवेश होतो. सुरूवातीला दोघांवर आधारित असलेले कुटुंब पुढे विस्तारत जाते आणि स्वतंत्र कुटुंबाचे स्वरूप धारण करते. या कुटुंबातून चांगले चारित्र्यवान आणि सभ्य स्त्री-पुरूष निर्माण होणे आवश्यक असते, असे तेव्हाच शक्य असते जेव्हा कुटुंब नावाची ही प्राथमिक ईकाई ही मजबूत तर समाज मजबूत. 

जमाअते इस्लामी हिंद महिला विभागातर्फे येत्या 19 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मजबूत कुटुंब मजबूत समाज या नावाने जी मोहिम सुरू झालेली आहे ती आजच्या काळाची गरज आहे. कारण कुटुंब व्यवस्थेचा ठिसूळ होत चाललेला पाया पुनःश्च मजबूत केल्याशिवाय आपला समाज मजबूत होणार नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश या मोहिमेतून जाणार आहे. या मोहिमेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!  

- मिनहाज शेख, 

पुणे (९८९०२४५५५०)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget