येवला (शकील शेख)
जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य च्या वतीने दि 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 अंधारातून प्रकाशाकडे हा अभियान सप्ताह साजरा करण्यात आला. येवला शहर जमाअत ए इस्लामी हिंद च्या वतीने सदर सप्ताह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
मस्जिद अल फुरकान मध्ये सदर सप्ताहाचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबादचे मौलाना नासिर पाशु, जमाअत ए इस्लामी हिंद नाशिक जिल्हा अध्यक्ष मौलाना फैरोज आजमी, डॉ मसररत अली शाह, मौलाना इस्माईल नदवी, शहर अध्यक्ष जमील अन्सारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अंधारातून प्रकाशाकडे अभियानाचे स्वरूप व जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य चे कार्यक्रम व उद्देश प्रस्तुत करण्यात आला.
कार्यक्रमच्या सुरवातीला मौलाना इस्माईल नदवी यांनी पवित्र कुरआनमधील सूरह (श्लोक) लोकांना सांगितले व त्याचे मराठी भाषांतर पत्रकार शकील शेख यांनी केले. मौलाना फैरोज आजमी यांनी जमाअत ए इस्लामीचे विविध अभिमान व उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच सध्याच्या धार्मिक तेढीमुळे निर्माण होणाऱ्या नुकसानीबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक धर्म हा शांती व सदभानेचे आचरण करण्यास शिकवतो. इस्लाममध्ये राष्ट्रप्रेम व इतर धर्माचा आदर करणे याला खूप महत्त्व आहे, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
राहुल लोणारी यांनी जमाअत ए इस्लामीच्या उपक्रमाचे कौतुक केले व देशाला आज खऱ्या प्रकाशाची गरज आहे त्यासाठी आपण सर्व एक होऊन काम करू या असे आवाहन केले. सचिन सोनवणे यांनी कोरोना काळात ज्या प्रकारे मुस्लिम समाजातील लोकांनी मदत केली व इतर सर्व समाजाने जे काम केले ते फक्त माणुसकीचे दर्शन देणारे होते. समाजात जमाअत ए इस्लामीसारख्या संघटनेचा प्रसार जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला हवा व आज मला मस्जिद परिचय या माध्यमातून माहीत झाले, असे सांगून त्याबद्दल आयोजकांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
प्रकाश भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मी माझ्या आयुष्यातील 25 वर्ष महावितरणमध्ये वायरमन या पदावर मुस्लिम भागात काम केले. परंतु ज्या प्रकारे आज मुस्लिम समाज जगासमोर दाखविला जातो तसे काही नाही. मुस्लिम समाज हा खूप भावुक व संस्कारी आहे. मला कधीही हिंदू म्हणून त्यांनी भेदभाव केला नाही. नेहमी सहकार्य केले व आदरही दिला.
अध्यक्षीय भाषणात मौलाना नासिर पाशु यांनी अंधारातून प्रकाशाकडे अभियान म्हणजे काय याचे विश्लेषण केले. अजानमध्ये काय पुकारले जाते आणि त्याचा मराठी अनुवाद काय आहे, लोकांना त्याबद्दल काय गैरसमज आहे याचे त्यांनी विश्लेषण करून त्यांनी अजानचे मराठी भाषांतर करून वर्णन केले. तसेच मस्जिदमध्ये काय काय होते, नमाज कशा पद्धतीने होते, इस्लाममध्ये पवित्रतेला काय महत्त्व आहे, नमाजसाठी शरीर कसे हवे, मन कसे हवे याचे विस्तृत वर्णन त्यांनी करून दिले.
याप्रसंगी रवींद्र करमासे, सुनील गायकवाड, मुकुंद आहिरे, वसंत घोडेराव अहिरे, बाबा मुशरिफ शाह आदींसह इतरही राजकीय, सामाजिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमच्या शेवटी सचिन सोनवणे, सुनील गायकवाड, रवींद्र करमासे, राहुल लोणारी यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अजहर शाह यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष जमिल अन्सारी, शकील शेख, मुशताक अन्सारी, इम्रान शेख, मकसूद महेवी, फैसल अन्सारी, शफिक अन्सारी व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment