Halloween Costume ideas 2015

भारतीय मुस्लिम समाज धैर्यशील समाज आहे

ये काम नहीं आसां, इन्सान को मुश्किल है
दुनिया में भला होना, दुनिया का भला करना


कुठल्याही लोकशाहीप्रधान देशात काही गटांसाठी विशेष फायदे असतात तर काही गटांसाठी विशिष्ट अडथळे असतात. आपल्या देशातही असेच आहे. बहुसंख्य समाजासाठी अनेक फायदे आहेत तर अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक अडथळे आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या 71 वर्षात अल्पसंख्य मुस्लिम समाजाच्या प्रगतीमध्ये अनेक शासनमान्य अडथळे आणले गेलेले आहेत. सर्वात मोठा अडथळा तर सरकारचे अल्पसंख्यांकांविषयीचे धोरण आहे. हा समाज, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार नाही यासाठी सर्वपक्षीय एकमत झाल्याने, अनेक दृष्य आणि अदृश्य अडथळे मुद्दामहून आणले गेलेले आहेत.
    ज्याचे उदाहरण आरक्षण आहे. बहुसंख्य समाजातील समर्थ घटकांनासुद्धा आरक्षण दिले गेले परंतु, सर्वार्थाने पात्र असतांनासुद्धा मुस्लिम समाजाला जाणून-बुजून आरक्षणापासून वंचित ठेवले गेले. म्हणजे अगोदर असे धोरण अवलंबविण्यात आले ज्यामुळे मुस्लिम समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास होईल आणि ठरल्याप्रमाणे हा समाज जेव्हा मागास झाला तेव्हा त्यांना आरक्षण नाकारण्यात आले. म्हणून ते आणखीन मागास झाले. इतके की, न्या. राजेंद्रसिंह सच्चर यांना नाईलाजाने म्हणावे लागले की, ” भारतीय मुस्लिम समाज हा मागासवर्गापेक्षाही अधिक मागासलेला आहे.” आश्‍चर्य म्हणजे 2006 मध्ये सच्चर समितीचा हा अहवाल आला आणि अल्पसंख्यांकांची स्थिती स्पष्ट झाली, तरीही त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कोणत्याही पक्षाच्या सरकारने केलेले नाहीत. यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशाएवढी  स्पष्ट आहे की, अल्पसंख्यांकांची प्रगती व्हावी, असे कुठल्याही राजकीय पक्षाला वाटत नाही. त्याची कारणे काय आहेत? हा विषय अलाहिदा. मात्र सत्य हेच आहे की, अल्पसंख्यांकांनी              येथे रहावे तर विपन्न अवस्थेतच रहावे, हे सर्वमान्य गृहितक आहे.
    ज्या प्रमाणे वाळवंटात सर्व प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करूनही काही झाडे हिरवीच राहत नाहीत तर भरपूर फलदायकही ठरतात, अगदी त्याचप्रमाणे अल्पसंख्यांकांनी गरीबीतच रहावे याची ठोस व्यवस्था करूनही काही शहरातील मुस्लिमांनी आपल्या अंगभूत गुण, स्थानिक परिस्थिती आणि संसाधनाचा उपयोग करून कष्टाने संपन्नता मिळविली, तरी  त्या-त्या शहरामध्ये ठराविक अंतराने दंगली घडवून त्यांच्या संपन्नतेच्या स्त्रोतांची राखरांगोळी केली गेली.
    मुंबई (व्यापार आणि लघुउद्योग), भिवंडी (कापड), मालेगाव (कापड), अलिगढ (कुलूप), भागलपूर (तुषार सिल्क), सहारणपूर (लाकडी कला कुसरीचे सामान), सूरत (कापड), मुरादाबाद (पितळी कलात्मक भांडी), फिरोजाबाद (बांगड्या), हैद्राबाद (व्यापार आणि कंगन उद्योग) या शहरामध्ये पुन्हा- पुन्हा झालेल्या दंगलींच्या पॅटर्न (रीती) चा अभ्यास केल्यावर ही गोष्ट ठळकपणे लक्षात येते की, अल्पसंख्यांकांच्या या उद्योगांना संपविण्यासाठीच पुन्हा-पुन्हा याच शहरामध्ये दंगली घडविल्या गेल्या.
    जेव्हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा प्रसार झाला. बातम्या देणाऱ्या वाहिन्यांची संख्या वाढली व हातात माईकचे दांडके घेऊन, मास मीडियाचे कोर्सेस करून, उत्साही तरूण मंडळी बातम्या गोळा करण्यासाठी, आपल्या पेशाशी इमान राखत गल्लोगल्ली फिरू लागली व त्यामुळे दंगली करणे अवघड झाले, तेव्हा आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली शेकडो मुस्लिम तरूणांना तुरूंगात डांबून अल्पसंख्यांकांचे नैतिक खच्चीकरण करण्याची व्यवस्था केली गेली. त्यासाठी जुन्या यु.ए.पी.ए. (अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हीटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट 1967) कायद्यात सुधारणेच्या नावाखाली अटक केेलेल्यांना जामीन मिळणार नाही, अशी तरतूद केली गेली व हे पुण्य कर्म त्यावेळी केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसने केले.
    दरम्यान, 2014 साली केंद्रात आणि देशातील बहुतेक राज्यात काँग्रेसची सत्ता जावून भाजपची सत्ता आली. तेव्हा आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्याचा पॅटर्न जुना झाल्यामुळे त्यात सुधारणा करून मॉबलिंचिंगचा नवीन पॅटर्न सुरू करण्यात आला. झुंडीला चेहरा नसतो आणि झुंडीने केलेल्या हिंसक कृत्याची जबाबदारीही कोणा नेत्यावर येत नाही. म्हणून गेल्या साडेचार वर्षांपासून अगदी ठरवून हा पॅटर्न अमलात आणला जातोय. मात्र प्रत्येक वेळी बहुसंख्य समाजातीलच भारतमातेच्या सच्या सुपूत्रांनी कधी हेमंत करकरेंच्या रूपाने तर कधी सुबोध कुमार सिंगच्या रूपाने आपल्या प्राणांची आहुती देऊन अल्पसंख्यांक समाजाच्या भाळी असलेला निष्ठेवरील संशयाचा कलंक आपल्या रक्ताने पुसलेला आहे. म्हणून अल्पसंख्यांक समाज अशा शहिदांचा कायम ऋणी राहील.
    अल्पसंख्यांक समाज पूर्वी फार प्रतिक्रियावादी समाज होता. परंतु, अलिकडे काही वर्षांपासून तो प्रतिक्रिया देईनासा झालेला आहे. तो नि:शब्द झालेला आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांचाही विरोधही तो आता करतांना दिसत नाही. त्याच्या भावनांची अभिव्यक्ती आता उर्दू माध्यमांच्या वर्तमानपत्रांपर्यंत किंवा फार तर सोशल मीडियापर्यंत मर्यादित झालेली आहे. तेेथेही तो फार जपून शब्द वापरतो आहे. हा समाज आता निश्‍चल समाज झालेला आहे. आपल्या समाज बंधूंवर आपल्या डोळ्यादेखत अत्याचार होत असतांनाही हा समाज हताशपणे पाहत राहतो. तेव्हा असा समज होतो की हा समाज भित्रा आहे, निष्क्रिय आहे, म्हणूनच विरोध करत नाही. मात्र वस्तुस्थिती अशी नाही. सावत्र बापासमोर आपल्या मागण्या मांडून फारसा फरक पडत नाहीये, हे लक्षात आल्यावर लहान मुले जशी गप्प होवून जातात अगदी तसाच अल्पसंख्यांक समाज गप्प झालेला आहे. त्याच्या या गप्प असण्याला काही लोक भित्रेपणा आणि निष्क्रियता समजतात, पण वस्तूस्थिती तशी नाही. हा समाज अजिबात भित्रा नाही तो फक्त समजदार झालेला आहे. शिवाय, इस्लामी संस्कारांनी त्याला साबिर (धैर्यवान) बनविलेले आहे.
    गेल्या 71 वर्षाच्या अनुभवाने त्याला गप्प राहण्यासाठी बाध्य केलेले आहे. गेली दोन दशके अल्पसंख्यांक समाज हिरहिरीने आरक्षण मागत आहे. 2016 पासून तर महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठा बांधवांच्या पावलावर पाऊल ठेवून, आरक्षणासाठी अगदी ”मराठा मोर्चा” सारखेच लाखोंचे शिस्तबद्ध मोर्चे काढून पाहिलेले आहेत. पण हाती काय आले? घंटा! म्हणजे शांतीपूर्ण पद्धतीने कितीही लाखाचे मोर्चे काढले तरीही सरकार त्याची दखल घेत नाही, हे लक्षात आल्यावर मोर्चे काढण्यामध्ये आपली ऊर्जा वाया घालविण्यापेक्षा तो आपली ऊर्जा काम धंद्यामध्ये लावतो.
    शिवाय, आक्रमक होऊनही (हिंसक नव्हे) त्याचा फारसा उपयोग होत नाही, उलट जास्त नुकसान होते. मुस्लिम जेव्हा आक्रमक होतात, तेव्हा त्यांचा समाचार घेण्यासाठी भाग्यश्री नवटाकेसारखे अधिकारी पोलीस विभागामध्ये भरपूर संख्येमध्ये असल्यामुळे त्यांच्या आक्रमक मोर्चोचे काय परिणाम निघतात याचे एक उत्तम उदाहरण बुद्धिजीवी वाचकांच्या लक्षात आणून देतो. 1989 मध्ये सैतान सलमान रूश्दी याची एक भिकार कादंबरी प्रकाशित झाली होती, जीचे नाव सटॅनिक व्हर्सेस (सैतानी वचने) होते. जगभरातून त्याचा विरोध होत होता. इराणचे अध्यक्ष आयातुल्ला खोमेनी यांनी तर रूश्दीच्या हत्येचा फतवाच काढला होता. जगभरात वातावरण तापलेले होते. अशातच 25 फेब्रुवारी 1989 रोजी शुक्रवारी, दक्षिण मुंबईमध्ये एका मस्जिदीमधून नमाज अदा करून दोन हजार लोकांचा मोर्चा मुंबईच्या ब्रिटिश वाणिज्य दुतावासावर जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यात मोर्चातील काही मंडळी अचानक आक्रमक झाली आणि मुंबई पोलिसांना संधी मिळाली. त्यांनी जनरल डायरसारखा बेछूट गोळीबार केला आणि घटनास्थळावरच 12 निरपराध लोकांना ठार केले.
    म्हणजे शांततेने मोर्चे काढूनही उपयोग होत नाही व आक्रमक मोर्चे काढूनही उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत शहाणपणाचा मार्ग एकच उरतो तो म्हणजे गप्प राहणे. अल्पसंख्यांक समाज तेच करीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना भित्रे किंवा निष्क्रिय म्हणणे कितपत योग्य आहे? उलट माझे म्हणणे तर असे आहे की, अल्पसंख्यांक समाज आता अधिक धैर्यशील समाज झाला असून, आपल्या प्रिय प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीच्या पायावर ठामपणे उभा आहे. ज्यात प्रेषित सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, “ कुशादगी का इंतजार भी अफजल इबादत है अर्थात परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहणे ही सुद्धा मोठी इबादत आहे.”
    स्वातंत्र्यानंतरच्या 71 वर्षात सर्वपक्षीय सहकार्याने ज्यात काँग्रेसचा मोठा सहभाग आहे, अल्पसंख्यांकांची स्थिती हलाकीची झालेली आहे. त्यामुळे गरीबी बरोबर बाय डिफाल्ट (आपोआप) पणे येणारे काही दुर्गूण उदा. आपसात शिवीगाळ, व्यसनाधिनता, अज्ञानता, हुंंडा, प्रौढी मिरविणे, नियोजन व समन्वयाचा अभाव इत्यादी अवगूण या समाजामध्ये आलेले आहेत. मात्र जमाते इस्लामी हिंद आणि तबलीगी जमात व अन्य धार्मिक  जमातींनी गेल्या अनेक वर्षापासून उपसलेल्या कष्टामुळे या समाजामध्ये इस्लामी स्प्रिट (आत्मा) निर्माण झालेला आहे. त्यामुळे पावलोपावली होणाऱ्या अघोषित भेदभावातून निर्माण होणाऱ्या विषमतेशी लढण्याची ऊर्जा त्यांच्यात निर्माण झालेली आहे. म्हणूनच ते घोर गरीबीतही आत्महत्यासारखी टोकाची पावले उचलत नाहीत.
    अशा या विपन्न अवस्थेत जगतांनाही देशबांधवांनी, अल्पसंख्यांकांना जेव्हा-जेव्हा, जेथे-जेथे आणि ज्या-ज्या क्षेत्रात संधी दिली तेव्हा-तेव्हा, तेेथे-तेथे आणि त्या-त्या क्षेत्रात त्यांनी आपली योग्यता आणि उपयोगिता दोन्ही सिद्ध करून दाखविलेली आहे. मुस्लिमांनी आपल्या प्रिय देशाला रक्तापासून ते क्षेपणास्त्रापर्यंत  सर्वच गोष्टी दिलेल्या आहेत व देत आहेत. अल्पसंख्यांकांनी फक्त एकच चूक केलेली आहे, ती म्हणजे इस्लामचा संदेश योग्य पद्धतीने त्यांनी आपल्या बहुसंख्य बांधवांसमोर ठेवलेला नाही. म्हणून त्यांचा मुस्लिमांबद्दलचा गैरसमज वाढलेला आहे. ते अल्पसंख्यांकांना देशावरील ओझे समजतात. वास्तविकपणे मुस्लिम तर देशाचे बीजभांडवल आहेत. परंतु, केवळ असे सांगून भागणार नाही. आपल्याला आपली वाणी आणि वर्तनाने हे सिद्ध करून दाखवावे लागेल की आम्ही देश आणि देशबांधव दोहोंसाठी खरोखर भांडवल आहोत.
    बहुसंख्यांकांमधील अनेक बांधवांमध्ये आपल्या विषयी असलेला आकस आणि भेदभावाची मानसिकता याची जाणीव असतानादेखील आपल्याला त्यांच्याशी बोलतांना आणि व्यवहार करताना प्रेम, दया आणि करूणेने वागावे लागेल. या गोष्टी वरवरच्या नाहीत किंवा कुठल्या भितीतूनही मी हे सांगत नाही. मुळात हीच कुरआनची मुलभूत शिकवण आहे. कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो की, ”लोक हो! अल्लाहने तुम्हाला एक पुरूष आणि एका स्त्रीपासून जन्माला घातले आहे आणि तुमच्या जमाती आणि टोळ्या बनविल्या आहेत. ज्या योगे (तुम्हास) एकमेकांना ओळखता यावे. परंतु, अल्लाहजवळ तुमच्यापैकी तोच प्रतिष्ठित असेल जो सदाचारी असेल. अल्लाह सर्वज्ञ आणि सर्वपरिचित आहे.” (सुरे हुजरात आयत नं.13). या आयातीला वर-वर वाचून जमणार नाही. या आयातीचा मतीतार्थ तेव्हाच समजेल जेव्हा आपण गांभीर्याने या आयातीवर विचार करू. तर चला पाहूया, या आयातींचा खरा अर्थ काय आहे?
    ज्याप्रमाणे आपण आपल्या सख्ख्या भावाने आपल्याशी भेदभाव केला, आपले नुकसान केले तरी ते सहन करून आपण त्याच्याशी सहानभूतीनेच वागतो ना? अगदी त्याचप्रमाणे या आयातीप्रमाणे जगातील सर्व लोक एकाच आई- वडिलांची लेकर आहेत. भारतीय बहुसंख्यांक लोक या अर्थाने अल्पसंख्यांकांचे बंधू आहेत व आपण सर्व भारतीय आहोत म्हणून आपसात भाऊ-बंध आहोत. म्हणजे आपले दुहेरी नाते आहे. एक मानव म्हणून दूसरे भारतीय म्हणून. म्हणूनच कुरआनला मानण्याचा दावा करणाऱ्या मुस्लिमांना एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवावी लागेल ती ही की, बहुसंख्यांकांचे सर्वकाही सहन करूनही आपल्याला त्यांच्याशी एकतर्फी सद्वर्तन करावे लागेल. कारण ज्या प्रमाणे रक्ताचे डाग रक्ताने धुता येत नाहीत, त्याचप्रमाणे घृणेचे उत्तर घृणेने देता येत नाही. तर ते प्रेमाणेच द्यावे लागते.
    या संबंधी अधिक स्पष्टीकरण पुढील आयातमध्ये आलेले आहे. ज्यात अल्लाहने म्हटलेले आहे की, ”आणि हे पैगंबर ! भलाई आणि दुष्टता एक समान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते तो जीवलग मित्र बनलेला आहे.” (सुरह हा-मीम अस्सजदा आयत नं.34) हीच कुरआन आणि प्रेषित यांची शिकवण आहे. मात्र आपल्याला या शिकवणीचा विसर पडलेला आहे. कारण की, के.जी. ते पी.जी. पर्यंत शेकडो पुस्तक वाचणाऱ्या आपल्या समाजातील बहुतेक लोकांमध्ये कुरआन समजून वाचण्याची जाणीव अजून निर्माण झालेली नाही. ज्या दिवशी सर्व मुस्लिम समाजामध्ये किंवा मुस्लिम समाजातील बहुतेक लोकांमध्ये वरील आयतींच्या विषयाची खरी जाणीव निर्माण होईल आणि समाजामधील उच्चशिक्षित आणि श्रीमंत घटकांना जर का यातील महत्व कळेल आणि ते संवेदनशीलता दाखवत आपल्या बांधवांची दामे-दिरहमे- सुखने मदत करावयास तयार होतील, त्या दिवशी असे म्हणता येईल की,
नही मायूस इक्बाल अपनी कश्ते विरां से,
जरा नम हो तो ये मिट्टी बडी ज़रखेज है साकी.
    आणि या ओळी सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाहीत. याचा मला तेवढाच विश्वास आहे जेवढा माझा ’सत्यमेव जयते’ या वचनावर विश्वास आहे.

- एम.आय. शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget