Halloween Costume ideas 2015

ब्रम्हपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ

मानवी समाजाचे भविष्य आणि वर्तमान इतिहासातील प्रेरणांच्या आधारे उभे असते. वर्तमान आणि भविष्याच्या गरजेतून इतिहासाचे नवनवे अन्वयार्थ समोर आणले जातात. समाजातील विविध घटक स्वतःच्या वर्गाला आधिक बळकटी देण्यासाठी इतिहासाचा अर्थ त्यांना अनुरुप तसा घेत असतात. भारतामध्ये उजव्या शक्ती इतिहासाच्या एकप्रवाही मांडणीतून मुस्लीम द्वेषाच्या आधारे स्वतःच्या राजकीय भविष्याची वाटचाल सुकर करु पाहताताहेत. इतिहासातील प्रतिकांची मोडतोड करुन त्यांच्या मुल्यांची उभारणी केली जात आहे. अनेक मध्ययुगीन वास्तूंविषयी याच गरजेतून अपसमज निर्माण करण्यात आले आहेत. मागील काही वर्षात देशामध्ये उजव्या प्रेरणांनी उचल खाल्ली आहे. पुरातत्व खात्यावर देखील या प्रेरणांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामूळेच अनेक मध्ययुगीन वास्तूंसमोर चुकीचे फलक उभारुन पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे. इसवी सन 1695 नंतर ब्रम्हपुरी येथे औरंगजेबाचे सहा वर्षे वास्तव्य होते. ब्रम्हपूरीच्या शेजारी माचणूर हे छोटेसे गाव आहे. तिथे समतावादी लिंगायत संत सिध्देरामेश्वरांचे मंदिर आहे. या मंदिराला औरंगेजेबाने ब्रम्हपुरी येथील वास्तव्यात देणगी दिली आहे. जी आजही शासनाकडून मिळत असते. मात्र या मंदिराविषयी नव्या तीन संदर्भांना उजव्या बाजूने आकार देण्यात आला आहे.
    देशातील सर्व ऐतिहासिक स्थळे केंद्रीय व राज्याच्या पुरातत्त्व विभागांतर्गत येतात. त्यांची सुरक्षा, त्या स्थळासंबंधी सर्व माहिती संग्रहित करणे, ती पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणे आणि त्या संबधी सर्व ऐतिहासिक माहिती पर्यटकांना देण्याची व्यवस्था करणे ही सर्व कामे या खात्याच्या अखत्यारीत येतात. परंतु तसे न होता जमातवादी इतिहासकारांनी रचलेल्या मनोरंजक आख्यायिका आणि संदर्भहीन माहिती असलेल्या इतिहासाचे फलक त्या ऐतिहासिक ठिकाणांच्या अवतीभोवती भालदार-चोपदाराची भूमिका या पुरातत्व विभागाच्या अप्रत्यक्ष परवानगीने चोखपणे निभावतात. तसेच येणार्या पर्यटकांनादेखील आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवतात. ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची आवड असल्याने, काही दिवसांपूर्वी मी , माझे बंधू सरफराज अहमद यांच्यासमवेत वर्तमानचे घाव झेलत उभ्या असणार्या ऐतिहासिक ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा जि. सोलापूर) येथे भेट दिली.
    निसर्गरम्य हिरवागार परिसर, संथ वाहणारा भीमेचा प्रवाह आणि तिच्या किनारी शतकांपासून उभी असणारी ऐतिहासिक स्थळे, सिद्धेश्वराचे मंदिर आणि ब्रम्हपुरीचा किल्ला. सिद्धेश्वराचे मंदिर विशिष्ट हेमाडपंथी शैलीतील तर ब्रह्मपुरीचा किल्ला तात्पुरत्या वास्तव्यासाठी कच्च्या स्वरूपात बांधलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांना मूठमाती देऊन या ठिकाणाचा इतिहास बदलावण्याचा तुटपुंजा प्रयत्न तथाकथित इतिहासकारांनी केलेला दिसतो. ब्रह्मपुरीत पोहचल्यानंतर आपल्या नाममात्र अस्तित्वाची ओळख जपणार्या भारतीय पुरातत्व विभागाच्या फलकाने या बदलवलेल्या इतिहासाच्या तथाकथित संदर्भ साधनांची सुरुवात होते. तर पुढे थोड्याच अंतरावर असलेल्या आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या मूकसंमतीने आपले स्थान घट्ट करणार्या अख्यायिकांनी गच्च भरलेला फलक आहे. हाच फलक ब्रह्मपुरीच्या मूळ इतिहासावर घाव घालत उभा आहे. या निमित्ताने ब्रह्मपुरीच्या या बदलावलेल्या इतिहासाचे तीन संदर्भ सापडतात ते कसे आहेत पाहुयात;
    बदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक एक - ब्रह्मपुरीचा ऐतिहासिक मनोरंजन करणारा फलक: आख्यायिका रचून जमातवादी इतिहासकारांनी ब्रह्मपुरीच्या ग्रामस्थांना जतन करावयास लावलेला खोटा इतिहासाच्या फलकावरील मजकूर पुढीलप्रमाणे, माचणूर येथील सिद्धेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. मंदिराच्या चहूबाजूंनी तटबंदी आहे. सिद्धेश्वर देवस्थान हे  हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले असून ते भिमानदीच्या तीरावर आहे. मंदिराच्या आवारातून थोड्या पायर्या उतरून गेल्यानंतर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ चार दीपमाला दृष्टीस पडतात. एक दीपमाला डाव्या बाजूस आणि बाकीच्या तीन उजव्या बाजूस आहेत. सभा मंडपाला अठरा स्तंभ असून त्यापैकी बरेच भिंतीमध्ये उभे केले आहेत. सभामंडपातून थोडेसे आत गेल्यानंतर शंकराचे लिंग दृष्टीस पडते व समोरच नंदी आहे. दक्षिण व उत्तरेस मराठ्यांच्या हल्ल्याला वैतागून सन. 1695 मध्ये औरंगजेबने प्रचंड फौजेसह तळ ठोकला व प्रमुख कोठाराची उभारणी केली. सभोवताली तटबंधी बांधून तो तेथे दरबार भरवू लागला. अशी अख्यायिका सांगतात की औरंगजेब धर्मवेडा असल्याने त्याने आपल्या काही सरदारांना मंदिरातील लिंग फोडण्याचा आदेश फर्माविला जेव्हा ते लिंग फोडण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा अचानक मधमाशांचे थवेच्या थवे त्या ठिकाणी आले. त्यामुळे त्या सरदारांना पळून जाण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तेव्हा औरंजेबाला हिंदूंच्या देवाची शांतिपूजा करणे गरजेचे वाटू लागले म्हणून त्यांनी गोमांसाच्या नैवेद्याचे ताट पाठविले त्या ताटावर वस्त्र झाकले होते व नैवेद्याचे ताट देवळात नेल्यावर त्यावरील वस्त्र काढताच त्या ताटात पांढरेशुभ्र फुले असल्याचे आढळले आणि त्या ठिकाणाला मासणूर म्हणून ओळखले जाऊ लागले. ही आख्यायीका ग्रामस्थांनी पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवली आहे. श्री सिद्धेश्वराच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. यात्रेला बहुसंख्येने भाविक येतात महाशिवरात्रीला दर अमावस्या व श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने देवाच्या दर्शनासाठी येतात. आधार- सोलापूर राजपत्र ” औरंगजेबाच्या ब्रम्हपुरी वास्तव्याचे दरबारी फारसी अखबारात मरहूम इतिहाससंशोधक डॉ. सय्यद शाह गाजीउद्दीन यांनी भाषांतरीते केले आहे. या फारसी अखबारात मध्ये किंवा अन्य तत्सम समकालीन साधनांमध्ये कोणताही आधार सापडत नाही. अशा परिस्थितीत शासकीय राजपत्राने मधमाश्यांचा हल्ला, मांसाची फुले होणे अशा दंतकथांना आधार मानून संदर्भनिर्मिती करणे निंदनीय आहे.
बदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक दोन - (औरंगजेब आणि गाझीऊद्दीन खान यांचा  पत्रव्यवहार) 1690च्या दशकात औरंगजेब दख्खनच्या दौर्यावर निघाला होता. या मोहिमेसाठी त्याने जो मार्ग निवडला होता तो मराठ्यांची राजधानी सातारा आणि आदिलशाही राजधानी विजापूरच्या दरम्यानचा होता. या मार्गावरून मोहिमेसाठी पुढे जाताना छावणीच्या थांब्याच्या दृष्टीने तसेच छावणीस लागणार्या सर्व आवश्यक गोष्टींची सोय होईल अशा ठिकाणाचा शोध घेण्याची जबाबदारी औरंगजेबाने त्याचा सरदार गाझीऊद्दीन खानवर सोपविली. या सर्व आदेशातील गोष्टी ध्यानात घेऊन गाझीउद्दीन खान या मार्गावरून अशा ठिकाणाच्या शोधात निघाला. गाझीऊद्दीन खानास छावणीसाठी पूरक अशा ठिकाणाचा शोध ब्रह्मपुरीच्या माध्यमातून लागला. त्यावेळी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा आणि त्याठिकाणी करावयाची व्यवस्था याची माहिती देण्यासाठी गाझीऊद्दीन खानने औरंगजेबास पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहारात गाझीऊद्दीन खानाने ब्रह्मपुरीस छावणीच्या निवारणासाठी एक तात्पुरत्या स्वरूपाचा किल्ला बांधण्याची परवानगी बादशहास मागितली. बादशाहने ती परवानगी दिली. त्यानंतर गाजीउद्दीन खान आणि बादशाहदरम्यान काही पत्रव्यवहार झाले आहेत. सुरुवातीच्या पत्रात गाजीउद्दीन खानने ब्रम्हपुरीचा उल्लेख ब्रम्हपुरी असा केला आहे तर नंतर त्याने ब्रम्हपुरीसाठी इस्लामपुरी हे नाव वापरल्याचे दिसते. उजवे इतिहासकार या पत्रांचा आधार घेउन औरंगेजेबाच्या काळात ब्रम्हपुरीचे नाव धर्मांधतेने बदलले असल्याचे सांगतात. मात्र यासाठी इतिहासातील एका महत्वाच्या संदर्भाचा अनुल्लेख करुन आपल्या सोयीची बाजू तेवढी ते मांडतात. वास्तविकतः गाजीउद्दीन खानाने ब्रम्हपुरीचे नाव बदलल्याचे लक्षात आल्यानंतर औरंगेजबाने स्वतः त्याचे नाव पुर्ववत करण्याची सुचना दिली होती. मात्र या गोष्टींचा उल्लेख सोयीस्कर टाळला जातो.
    औरंगजेब आपल्या सैन्यासह ब्रह्मपुरी या ठिकाणी सहा वर्षे वास्तव्यास होता. या सहा वर्षांमध्ये औरंगजेब आपल्या  साम्राज्याचा राज्यकारभार ब्रह्मपूरीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात दरबार भरवून करत होता. तब्बल सहा वर्षे साम्राज्याची राजधानी ब्रह्मपुरी होती. ज्या सिद्धेश्वर मंदिराला या तथाकथित इतिहासकारांनी आपल्या इतिहासाचा विपर्यास करण्याच्या धोरणातील केंद्रबिंदू बनवून औरंगजेबला धर्मवेडा ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, तो वरील संदर्भांच्या कसोटीवर खोटा ठरतो. परंतु मुसलमानी राजवट आणि राज्यकर्त्यांविषयी द्वेषभावना असणार्या इतिहासकारांनी या विषयी उपलब्ध असणार्या ऐतिहासिक संदर्भाकडे डोळेझाक करून एक मनोरंजक आख्यायिका रचून इतिहासाला उजवी किनार जोडली आहे.
बदलवेल्या इतिहासाचा संदर्भ क्रमांक तीन - (सोलापूर गॅझेट आणि ब्रह्मपुरीच्या ऐतिहासिक नोंदी) ब्रह्मपुरीच्या वास्तव्यास असताना औरंजेबाने श्री सिद्धेश्वराच्या मंदिरास वेळोवेळी देणग्या दिल्याचा संदर्भ इतिहासात आढळतो. औरंगजेबाने दिलेल्या या देणग्यांचा उल्लेख सोलापूर गॅझेटमध्येसुद्धा आहे आणि तो सन 1995 पर्यंत व्यवस्थित स्वरूपात होता. परंतु 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपच्या युती सरकारने इतिहासाशी आपल्या विचारधारेला साजेस वर्तन करून मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाबद्दल असणारा आकस बाळगत त्या नोंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढे सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने त्या ऐतिहासिक घटनांची पुनर्नोंदणी केली. ऐतिहासिक संदर्भ तपासल्यावर मुसलमान राज्यकर्त्यांनी आपल्या राजवटीदरम्यान वेळोवेळी  जातीय सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु केवळ मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाचे विपर्यास करण्याच्या धोरणातून अशा आख्यायिका जन्माला घातल्या जातात आणि समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न हे तथाकथित इतिहासकार करत असतात.
    ब्रह्मपुरीच्या बदलवलेल्या इतिहासाचे तिन्ही संदर्भ पाहिले असता असे लक्षात येते, की भारतातील मुसलमान राज्यकर्त्यांचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न भंपक संदर्भांची निर्मिती करुन केला जात आहे.

- इस्माईल जहीर
अॅड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget