Halloween Costume ideas 2015

त्याग आणि बलिदानाचा संदेश देणारा सण : ईद-उल-अजहा

कुर्बानीचा (बलिदानाचा) अर्थ सर्वसाधारणपणे ‘ईद-उल-अजहा’ म्हणजेच बकरीदच्या दिवशी बकरे, उंट वगैरे प्राणांच्या बलिदानाशी संबंधित आहे. हे जरी खरे असले तरी इस्लाम धर्माला  आपल्या अनुयायांकडून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात बलिदानाची अपेक्षा असते. यात संपत्ती व जीवनाचे बलिदान, दारिद्र्यात खितपत असलेल्या गोरगरीब लोकांच्या सेवेस जीवन वाहून  घेण्याचे बलिदान महत्त्वाचे ठरते. इतरांसाठी दिले जाणारे बलिदान हाच कुर्बानीचा खरा अर्थ आहे.
प्राण्याचे बलिदान हे फक्त एक प्रतीक आहे. प्रेषित इब्राहीम (अ.) यांनी अल्लाहकरिता प्रत्येक प्रकारचे बलिदान दिले. इतकेच काय आपल्या लाडक्या पुत्राचेदेखील बलिदान दिले, परंतु  ईश्वरकृपेने त्यांचा पुत्र जिवंत राहिला. प्रेषित इब्राहीम (अ.) यांच्या निष्ठेला सलाम करण्याचा सण म्हणजेच बकरीद होय. त्यांच्या या भावनेमध्येच संपूर्ण समाजाचे कल्याण आणि  पालनकर्त्याची प्रेरणा सामावलेली आहे. कुर्बानीचा मूळ अर्थ ‘संरक्षणासाठी सदासर्वदा तत्पर राहाणे’ असा आहे. अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, प्रत्येक व्यक्तीने आपले  कुटुंब, समाज, शहर अथवा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बलिदान देण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.
इस्लाममध्ये सर्व कर्म ईशनिष्ठेसाठीच केले जातात. परंतु बकरीदद्वारा सामाजिक एकता आणि समाजकल्याणाची कामना केली जाते आणि यात समाजाचे ऐक्य अबाधित राखण्याचे  कार्य पार पाडले जाते. इस्लाममध्ये ‘कुर्बानी’चा अर्थ आहे ‘आपला वेळ, आपली संपत्ती आणि इतकेच नव्हे तर स्वत:चे बलिदानदेखील ईशमार्गात देणे. ईशमार्गात खर्च करण्याचा संबंध सत्कर्माशी आहे. समाजकल्याण हाच याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे रमजान ईदसारखीच बकरीदलादेखील गरीब व गरजवंतांना मदत केली जाते. इस्लाम प्रत्येकास आपले कुटुंब,  आपला समाज व आपले राष्ट्राचे दायित्व पूर्णपणे पार पाडण्याचा आदेश देतो.
ईद-उल-अजहा हा सण प्रेषित इब्राहीम यांच्या  बलिदानाची आठवण करून देणारा आहे. सर्व जगातील मुस्लिम बांधव तो साजरा करतात. लाक्षणिक रूपाने ते जनावरांचे बलिदान करून  कृतीने ही गोष्ट सिद्ध करतात. प्रेषित इब्राहीम (अ.) यांच्या कुर्बानीच्या आठवणीने आमच्या आत्मिक मूल्यांची वृद्धी होते. ईशप्रेमाची भावना वाढत जाते आमि अल्लाहच्या मार्गात आपले  प्राण व धनसंपत्ती कुर्बान करण्याची भावना दृढ बनते. सर्वश्रेष्ठ अल्लाहचे काटेकोर आज्ञापालन करणे, त्याने दिलेली कर्तव्ये सच्च्या मनाने पार पाडणे आणि त्याचे नाव चिरकाल  राखण्यासाठी आपले अस्तित्व संपविण्याचाही निर्धार करणे; ही उपासनेची व आराधनेची सर्वोच्च श्रेणी ठरते. मानवी जीवन हे ईश्वराकडे मानवाने केलेल्या प्रवासाची गोळाबेरीज आहे. त्या  प्रवासाची अशी निकड आहे की जर वेळ आली आणि तशी गरज भासली तर सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या दिशेने हिजरत करावी. भौतिक जीवनाचे आस्वाद  सौंदर्य यांचे कसलेही आकर्षण बाळगू नये. एक अधिक शक्तिमान आकर्षण त्याला ईश्वराकडे ओढत नेत असावे. आपल्याला इच्छा-वासनांचा मोह घालून दिशाभूल करणाऱ्या शैतानाच्या  कारवायांवर मात करावी व त्याच्यावर विजय मिळवावा. कुर्बानी त्याग हा एक असा उच्चतम गुण आहे ज्यामुळे मानवी जीवन उन्नतीच्या, सफलतेच्या शिखरावर पोहोचू शकते. प्रत्येक  प्रकारच्या सफलतेसाठी कुर्बानी व त्याग यांची निकडीची गरज असते. ही एक अखंडनीय वास्तवता आहे. मग ती कुर्बानी ऐहिक उद्देशांसाठी दिलेली असो की आत्म्याच्या उद्धारासाठी  आणि पारलौकिक जीवनाच्या सफलतेसाठी असो. थोडक्यात म्हणजे जे कुर्बानी देतात, त्याग करतात त्यांनाच सफलता प्राप्त होते. ही गोष्ट आपण दररोज आपल्या डोळ्यांनी पाहात  असतो.
आपल्या सभोवतालच्या घटनांचे व परिस्थितीचे जेव्हा अवलोकन करतो, तेव्हा आपणास स्पष्टपणे दिसून येते की ज्या कोणी माणसांनी ज्या क्षेत्रात विकास व उन्नती प्राप्त केली आहे,  यशाच्या शिखरावर पोचले आहेत, ते त्यांच्या कुर्बानी व त्यागाचेच फळ आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हटले जाऊ शकते की कुर्बानी व त्याग हेच यशाचे मूळ आहे. माणूस  आपला व्यापारधंदा यशोशिखरावर नेण्यासाठी रात्रंदिवस सतत प्रयत्नशील असतो. एक दिवस असा येतो की आपल्या या सर्व त्यागांच्या फलस्वरूप, तो एक मोठा व्यापारी म्हणून  भरभराटीस येतो. आपल्या उद्दिष्टांत तो पूर्णत: यशस्वी होतो. हीच स्थिती विद्यार्जन करणाऱ्यांची, शेतकऱ्यांची, वर्तमानकाळातील वैज्ञानिकांची, धार्मिक व राजकारणी नेत्यांची असते.  मानवी जगामध्ये प्रेषितांचे स्थान व दर्जा सर्वापत उच्च आहे, म्हणून त्यांना अतिशय खडतर कसोट्यांतून व अग्निदिव्यांतून जावे लागते आणि त्यांनी जो असीम व अतुलनीय त्याग व  बलिदाने दिली, ती तितकीच आश्चर्यकारक आहेत. त्यांच्यापैकी प्रेषित इब्राहीम (अ.) यांचा त्याग व त्यांनी दिलेली बलिदाने अतुलनीय आहेत.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget