Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(८२) यानंतर जो आपल्या करारापासून पराङ्मुख होईल तो अवज्ञाकारी (फासिक)आहे.’’७०
(८३) आता काय हे लोक अल्लाहच्या आज्ञापालनाची पद्धत (अल्लाहचा दीन) सोडून इतर एखादी पद्धत इच्छितात? वास्तविक पाहता आकाश व पृथ्वीमध्ये जे जे काही आहे ते  आपणहून किंवा अपरिहार्यपणे अल्लाहला समर्पित (मुस्लिम) आहेत.७१ आणि त्याच्याकडे सर्वांना रुजू व्हायचे आहे
(८४) हे पैगंबर (स.)! सांगा , ‘‘आम्ही अल्लाहला मानतो, त्या शिकवणींना मानतो जी आम्हांवर उतरली आहे. त्या शिकवणीलादेखील मान्य करतो ज्या इब्राहीम (अ.), इस्माईल (अ.),  इसहाक (अ.), याकूब (अ.) आणि याकूब (अ.) च्या संततीवर उतरल्या होत्या आणि त्या आदेशांवरदेखील श्रद्धा ठेवतो जे मूसा (अ.) व इसा (अ.) आणि इतर पैगंबरांना त्यांच्या  पालनकर्त्याकडून दिले गेले. आम्ही त्यांच्यापैकी एकाच्यामध्ये भेदभाव करीत नाही.७२ आणि आम्ही अल्लाहच्या आदेशांच्या अधीन (मुस्लिम) आहोत.’’
(८५) या आज्ञाधारकते (इस्लाम)  शिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म (जीवनपद्धत) अंगीकारत असेल, त्याची ती जीवनपद्धत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये
तो अयशस्वी व विफल होईल.
(८६) कसे शक्य आहे की, अल्लाह त्या लोकांना मार्गदर्शन प्रदान करील ज्यांनी श्रद्धेची देणगी मिळाल्यानंतर पुन्हा द्रोहाचा (नाकरणे) अंगीकार केला. वास्तविक पाहता त्यांनी स्वत: या  गोष्टींची ग्वाही दिलेली आहे की हा पैगंबर सत्याधिष्ठित आहे. आणि त्यांच्याकडे उज्ज्वल संकेतवचनेदेखील पोहचली आहेत.७३ अल्लाह तर अत्याचाऱ्यांना मार्गदर्शन करीत नसतो.
(८७) त्यांच्या अत्याचाराची योग्य शिक्षा तर हीच आहे की त्यांच्यावर अल्लाह आणि दूत व समस्त माणसांचा शाप आहे.
(८८) अशाच स्थितीत ते सदैव राहतील, त्यांच्या शिक्षेत सूटही मिळणार नाही किंवा त्यांना सवडदेखील दिली जाणार नाही.
(८९) तथापि ते लोक वाचतील जे लोक यानंतर तौबा (पश्चात्ताप) करून आपल्या आचरणात सुधारणा करतील, अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आहे.
(९०) परंतु ज्या लोकांनी श्रद्धा ठेवल्यानंतर अश्रद्धेचा अंगीकार केला आणि अश्रद्धेतच पुढे जात राहिले७४ त्यांचा पश्चात्ताप कदापि स्वीकारला जाणार नाही, असले लोक तर पक्के  मार्गभ्रष्ट आहेत.
(९१) खात्री बाळगा, ज्या लोकांनी अश्रद्धेचा अंगीकार केला आणि अश्रद्धेच्या स्थितीतच प्राण सोडले, त्यांच्यापैकी एखाद्याने स्वत:ला शिक्षेपासून वाचविण्यासाठी पृथ्वी भरून जरी सोने  मोबदल्यात दिले तरी ते स्वीकारले जाणार नाही. अशा लोकांसाठी दु:खदायक शिक्षा तयार आहे आणि त्यांना आपला कोणीही साहाय्यक आढळणार नाही.
(९२) तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.७५ जे काही तुम्ही खर्च कराल त्याविषयी अल्लाह सर्वज्ञ आहे.




७०) याचा उद्देश ग्रंथधारक लोकांना सचेत करणे आहे की तुम्ही लोक अल्लाहच्या वचनाला तोडत आहात. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा विरोध करून आणि त्यांना अमान्य करून तुम्ही  वचनभंग करीत आहात, जे तुमच्या पैगंबरांकडून घेतले गेले होते. म्हणून आता तुम्ही विद्रोही बनून राहिला आहात आणि अल्लाहच्या आज्ञापालनाशी विमुख झाला आहात.
७१) अर्थात संपूर्ण सृष्टी आणि सृष्टीतील प्रत्येक वस्तूचा धर्म तर इस्लाम आहे. म्हणजेच अल्लाहचे आज्ञापालन आणि अल्लाहची बंदगी आता तुम्ही या सृष्टीत राहून इस्लामव्यतिरिक्त  दुसऱ्या कोणत्या जीवनपद्धतीला शोधत आहात?
७२) आमची पद्धत ही नाही की आम्ही एखाद्या पैगंबराला मानावे आणि एखाद्याला मानू नये. एखाद्या पैगंबराला खोटे ठरवावे आणि दुसऱ्याला खरे ठरवावे. आम्ही तर भेदभाव आणि  अज्ञानतापूर्ण पक्षपातापासून मुक्त आहोत. जगात कोठेही अल्लाहचा दास अल्लाहकडून सत्य घेऊन आला, आम्ही तो सत्याधिष्ठित असण्याची ग्वाही देतो.
७३) येथे पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली आहे ज्याला या अगोदर अनेकदा सांगितले गेले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात अरब यहुदी -जानकार पूर्ण ओळखून होते  आणि त्यांनी तोंडी ग्वाहीसुद्धा दिली होती, की मुहम्मद (स.) खरे पैगंबर आहेत आणि जी शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) देत आहे; तीच शिकवण पूर्वींच्या पैगंबरांची होती. तरीसुद्धा त्या  यहुदी विद्वानांनी जे काही केले ते पक्षपात, दुराग्रह आणि सत्याशी शत्रुत्वाच्या जुन्या सवयीचा परिणाम होता ज्याविषयी ते शतकानुशतके अपराधी बनून राहिले आहेत.
७४) म्हणजे केवळ नकार देण्यावरच थांबले नाहीत तर व्यावहारिकतेत त्यांचा कडाडून विरोध केला, अडथळे निर्माण केले. लोकांना अल्लाहच्या मार्गापासून (इस्लाम) रोखण्यासाठी जीवाचे  रान केले. शंकाकुशंका काढल्या व लोकांच्या मनात भ्रम निर्माण केला. त्यांनी (यहुदी) कुटिल डावपेच रचले, जोडतोड केली जेणेकरून पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मिशन कशाही प्रकारे  सफल होऊ नये.
७५) येथे त्यांची ही भ्रांति दूर केली गेली आहे जे हे लोक सदाचाराविषयी (नेकी) बाळगत होते. त्यांच्याजवळ नेक कामाची श्रेष्ठ कल्पना हीच होती की पूर्वजांच्या चालत आलेल्या  परंपरांतून जे बाह्य स्वरूप त्यांच्याजवळ होते त्यालाच पूर्णत: जीवनात उतरवावे. यांच्या धार्मिक नेत्यांच्या कायद्याचा कीस काढण्याच्या वृत्तीच्या परिणामस्वरुप एक भली मोठी  विधीव्यवस्था बनली त्यानुसार जीवनयापन करीत राहावे. अशा या मानवनिर्मित व्यवस्थेच्या प्रचलनामागे यहुदींच्या मोठमोठ्या धर्ममार्तंडाची संकुचित वृत्ती, लोभ, कंजूषी, सत्य  लपविणे आणि सत्य विकणे अशासारखे अवगुण लपविलेले होते आणि सर्वसाधारण लोक यास नेकी (सदाचार) समजत होते. हाच भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी त्यांना स्पष्टत: सांगितले  जात आहे की सदाचारी (नेक) मनुष्य बनण्याची कसोटी तुम्ही समजता त्यापेक्षा उच्च्तर आहे. नेकीचा (सदाचाराचा) मूळ आत्मा अल्लाहशी प्रेम आहे. असे प्रेम की अल्लाहला प्रसन्न  करण्याच्या मुकाबल्यात जगातील कोणतीच गोष्ट प्रिय नसावी. ज्या गोष्टीचे प्रेम मनुष्याच्या मनात इतके घर करून राहावे की जिला अल्लाहच्या प्रेमाखातर तो त्यागू शकत नाही. तर  हीच आसक्ती त्याचे दैवत आहे. जोपर्यंत मनुष्या या मूर्तीला दैवताला नष्ट करत नाही, सदाचाराचे द्वार त्याच्यासाठी बंद असते. या भावापासून रिक्त झाल्यानंतर बाह्य धार्मिकता तर  त्या चमकणाऱ्या रंगा सारखी आहे; ज्याने वाळवी लागलेले लाकूड रंगविण्यात आले आहे. मनुष्य अशा चमकदार गोष्टींनी धोका खाऊ शकतो परंतु अल्लाह कदापि अशा धोक्यात येऊ  शकत नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget