Halloween Costume ideas 2015

जमाअत-ए-इस्लामी हिंदची स्थापना, रचना व सिद्धांत

ऑगस्ट 1941 साली लाहौर येथे जमाअते इस्लामीची स्थापना झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी दुर्देवाने भारताची फाळणी झाली. त्यामुळे मूळ जमाअते इस्लामी पासून विभक्त होवून 16 एप्रिल 1948 रोजी अलाहाबाद येथे 240 सदस्यांच्या उपस्थितीत जमाअते इस्लामी हिंद नावाची नवीन संघटना स्थापन झाली. मूळ संघटनेच्या नावात ’हिंद’ या शब्दाचा समावेश करून जमाअतने आपण अस्सल भारतीय असल्याचा पुरावा जनतेसमोर ठेवला. जमाअते इस्लामी प्रमाणेच जमाअते इस्लामी हिंदने सुद्धा व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनामध्ये इस्लामचा एक जीवन पद्धती म्हणून स्वीकार केला, असे असले तरी जमाअतने भारतीय संविधान आणि भारतातील सर्व कायदे याचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय अगदी स्थापनेच्या दिवशीच केला. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे एक वैशिष्ट्य म्हणजे जमाअतचे सदस्य कायद्याचेच नव्हे तर नैतिकतेचे सुद्धा पालन करतात.
    आज 21 व्या शतकातही बहुतेक भारतीय मुस्लिमांचा असा समज आहे की, इतर धर्माप्रमाणे इस्लामसुद्धा एक धर्म आहे आणि तो विशिष्ट चालीरिती व इबादतीपुरता मर्यादित आहे. त्याचा संबंध माणसांच्या व्यक्तिगत जीवनाशी आहे. सामुहिक व सार्वजनिक जीवनामध्ये तो कदाचित 1438 वर्षापूर्वी रिलेव्हंट (लागू) असेल परंतु, आता नाही. म्हणून बहुतेक मुस्लिमांनी इस्लामला आपल्या व्यक्तिगत इबादतीपर्यंत मर्यादित करून सामुहिक व सार्वजनिक जीवनामध्ये धर्मनिरपेक्षतेचा किंवा साम्यवादाचा जीवनशैली म्हणून स्वीकार केलेला आहे.
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचा सिद्धांत
    जमाअते इस्लामी हिंदचा विचार नेमका याच्या उलट आहे. जमाअतची धारणा व श्रद्धा अशी आहे की, इस्लाम एक ईश्वरीय व्यवस्था आहे. तिचा स्विकार व्यक्तिगत, सामुहिक व सार्वजनिकरित्या केल्याशिवाय या जीवनात तसेच मरणोत्तर जीवनात कोणतीही व्यक्ती यशस्वी होणार नाही. इस्लामचा फक्त मनोमन स्विकार करून आचरणात दूसरीच जीवन पद्धती स्वीकारून जमणार नाही. इस्लामी तत्वांना वैयक्तिक व सामुहिक जीवनामध्ये प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेला जमाअते इस्लामीने ”अकामत-ए-दीन” अशी संज्ञा दिलेली आहे.” अकामत हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ विखुरलेल्या वस्तुंना एकत्रित करून त्यांची सुयोग्य मांडणी करणे असा होतो. ’दीन’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक धर्म अन् दूसरी व्यवस्था. जमाअते इस्लामीमध्ये दीन म्हणजे व्यवस्था या अर्थाने वापरला जातो. येणेप्रमाणे अकामत-ए-दीन या शब्दाचा अर्थ इस्लामच्या विखुरलेल्या सिद्धांतांना एकत्रित करून त्यांची सुयोग्य मांडणी करणे व त्यानुसार जीवन जगणे होय. जमाअतची अशी श्रद्धा आहे की, जीवनात इस्लामी तत्वांचा स्विकार केल्याशिवाय, घरात असो की समाजात, शांती, समता व न्यायाची स्थापनाच होवू शकत नाही. म्हणून जमाअतच्या उपक्रमांचा मोठा भाग व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनात इस्लामी तत्वांना लागू करण्यामध्येच खर्ची पडतो.
जमात-ए-इस्लामी हिंदची नियमावली
    1948 साली झालेल्या स्थापनेनंतर जमाअते इस्लामी हिंदने 13 एप्रिल 1956 रोजी स्वतःचे संविधान अर्थात नियमावलीचा लिखित स्वरूपात स्विकार केला. या नियमावलीमध्ये एकूण 75 कलमांचा समावेश केलेला आहे. कलम 3 मध्ये जमाअते इस्लामीच्या मूळ श्रद्धेचा उल्लेख केलेला आहे. या कलमाप्रमाणे जमाअतची श्रद्धा, ” लाईलाहा इल्लललाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह” अशी आहे. याचा अर्थ पूजनीय फक्त अल्लाहाच आहे आणि हजरत मुहम्मद सल्ललाहु अलैही व सल्लम त्याचे प्रेषित आहेत.
    कलम 4 मध्ये जमातचा ’नस्बुलऐन’ अर्थात उद्देश जाहीर करण्यात आलेला आहे.    तो म्हणजे, ”अकामत-ए-दिन” ज्याचा अर्थ वर स्पष्ट करण्यात आलेला आहे. व हा उद्देश फक्त अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठीच आहे. दूसर्या कशासाठीही नाही. अर्थात स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी, नेतृत्व, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी नाही. इस्लाम जो की पृथ्वी तलावर अवतरित झालेल्या पहिल्या व्यक्तीपासून (ह.आदम अलै.) प्रेषित मुहम्मद सल्ल. पर्यंत चालत आलेला आहे. हा एकमेव शुद्ध स्वरूपात असलेला दीन आहे. ज्याला की अल्लाहने समस्त मानवजातीसाठी पसंत केलेला आहे. हा दीन माणसाच्या व्यक्तीगत, सामुहिक आणि सार्वजनिक जीवनावर सारखेपणेच लागू होतो. घरात एक, बाहेर एक, पोटात एक, ओठात एक अशी दुटप्पी भूमिका जमाअते इस्लामी हिंदला मान्य नाही. जमाअतची अशी धारणा आहे की, इस्लाम ही जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. एवढेच नव्हे तर या पद्धतीचा स्वीकार न केल्यास माणसाचे जीवन तणावग्रस्त, विकारग्रस्त होवून जाते. शिवाय, जीवनात उत्पन्न होणार्या सर्व समस्यांचे समाधान केवळ इस्लामच देवू शकतो. याचा पुरावा म्हणून मी एका सत्याकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. ते सत्य म्हणजे अनेक मुस्लिम देशांमध्ये ज्या ठिकाणी बहुसंख्य लोकांनी इस्लामचा जीवनपद्धती म्हणून स्वीकार केलेला आहे. त्या ठिकाणी एक तर मनोरूग्ण व मनोरूग्णालय तथा वृद्धाश्रम नाहीत किंवा अत्यल्प संख्येत आहेत.
    कलम 5 मध्ये कलम 4 मधील उद्देशाला हस्तगत करण्याची पद्धती दिलेली आहे. त्यात म्हटलेले आहे की, अ) - कुरआन आणि हदिस हाच जमाअते इस्लामीचा पाया आहे. बाकी इतर गोष्टींना तेवढीच मान्यता दिली जाईल जेवढी की कुरआन आणि हदिसच्या प्रकाशात देणे शक्य आहे.
ब)- जमाअत आपले उद्देश्य गाठण्यासाठी अख्लाक (नैतिकता)ची पाबंद राहील. कधीच त्या मार्गाचा अवलंब करणार नाही जो वाकडा, अप्रमाणिक किंवा बेकायदेशीर असेल. ज्यामुळे जातीय घृणा पसरू शकेल किंवा आपसात गटतट पडतील व अशांती माजेल. क) जमात आपल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी सकारात्मक व शांतीपूर्ण मार्गाचाच अवलंब करेल. म्हणून जमाअत-ए-इस्लामी  हिंद इस्लामी मुल्यांचा प्रचार व प्रसार करूनच लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि त्याच दिशेने लोकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करेल. 
    अशा पद्धतीने जमाते इस्लामी हिंदचे कार्य लिखित संहितेनुसार चालते. कोणताही हिंसक मार्ग, भूमिगत चळवळ यावर जमाअतचा विश्वास नाही. सामाजिक क्रांती ही वैचारिक परिवर्तनानेच शक्य आहे, अशी जमातची धारणा आहे. यासंबंधी जमातचे संस्थापक मौलाना मौदूदी रहे. यांचे विचार खालीलप्रमाणे, ” इस्लामी तहेरिक के कारकूनों को मेरी आखरी नसिहत ये है के, उन्हें खुफिया तहेरिकें चलाने और अस्लहे (हथियार) के जरिए इन्क्लाब बरपा करने की कोशिश नहीं करनी चाहिए. ये भी दरअसल बेसब्री और जल्दबाजी की ही एक सूरत है और नतायज के ऐतबार से दूसरी सूरतों की बनिस्बत ज्यादा खराब है. इन्क्लाब (सामाजिक क्रांती) हमेशा अवामी तहेरिक (सामाजिक चळवळ) के जरिये से ही बरपा होती है.” (मक्का येथे अरबी युवकांच्या मेळाव्यास संबोेधित करतानांच्या मौलानांच्या भाषणातील अंश).
    जमाअत-ए-इस्लामी हिंदची रचना
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचे मुख्य कार्यालय डी-321, दावत नगर, अबुल फजल एन्क्लेव्ह, जामिया नगर, नवी दिल्ली. 110025. येथे आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे कार्य करण्यासाठी त्रिस्तरीय रचना करण्यात आलेली आहे. 1. केंद्रीय कार्यालय दिल्ली, 2. राज्यस्तरीय कार्यालय. भारताच्या जवळ-जवळ प्रत्येक राजाच्या राजधानीत जमाअतचे राज्यस्तरीय मुख्य कार्यालय आहे. 3. जिल्हास्तरीय कार्यालय.
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचे  आज पावेतो 4 अध्यक्ष झालेले आहेत. त्यांची नावे 1. अबुलैस इस्लाही 2. मुहम्मद युसूफ 3. सिराजुल हसन 4. डॉ. अब्दुल हक अन्सारी. सध्याचे  अध्यक्ष पाचवे असून त्यांचे नाव मौलाना जलालुद्दीन उमरी असे आहे.
जमाअतमध्ये कोणालाही कोणत्याही पदाची लालसा नसते. कोणताही सदस्य जर एखाद्या पदासाठी इच्छुक असेल तर त्याला ते पद कधीच मिळत नाही. प्रत्येक पदासाठी योग्य व्यक्तीची निवड सदस्यांच्या सल्ल्याने होत असते. त्यासाठी योग्यता, समज, त्याग, समर्पण आणि अनुशासन याचा विचार केला जातो. या सर्व गुणांमध्ये जो व्यक्ती योग्य वाटत असेल त्याची निवड पदासाठी केली जाते. म्हणूनच आजपर्यंत जमाअते इस्लामी हिंदमध्ये कधीही नेतृत्वासाठी भांडणे झालेली नाहीत. जमाअतचे कार्य शुराई निजाम म्हणजे सल्लागार मंडळाद्वारे चालते. त्यात अत्युच्च पारदर्शकता असते. नैतिकतेला जमाअतच्या कार्यात अतिशय महत्व देण्यात आलेले आहे. नियम 11 अनुसार जमाअतचे अध्यक्ष, प्रतिनिधीसभा, सल्लागार मंडळ व सचिव निवडले जातात. नियम 6 प्रमाणे जमाअतचा सदस्य होण्यासाठी भारताच्या कोणत्याही नागरिकाला चार अटींची पूर्तता करावी लागते. अ) कलमा लाईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह ला चांगल्याप्रकारे समजून घेवून या सत्याचा स्विकार करणे की, हीच माझी धर्मश्रद्धा आहे. (संदर्भ ः कलम- 3). ब) - जमाअतचा उद्देश्य चांगल्या प्रकारे समजून त्याचा स्विकार करणे की हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. (संदर्भ ः कलम -4). क) जमाअतची कार्यपद्धती (संदर्भ ः कलम 5) चा स्वीकार करण्याचा निर्णय करणे. ड) - जमाअतच्या नियमावलीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर हा प्रण करने की, या नियमावलीच्या आधीन राहून मी शिस्तबद्ध पद्धतीने काम करीन. वर नमूद शर्ती पूर्ण करणार्या कोणत्याही भारतीय नागरिकास जमाअते इस्लामीचा सदस्य होता येते. त्यसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शहराध्यक्षाकडे विहित नमून्यात अर्ज करावे लागतो. त्यानंतर त्याला जमाअतच्या उपक्रमांमध्ये सामील करून घेतले जाते. साधारणतः वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक काळ त्याच्या कामाचे व जीवन पद्धतीचे बारकाइने निरिक्षण केले जाते व तो जमाअतला पाहिजे असलेल्या नैतिक पातळीच्या स्तरापर्यंत पोहोचत असेल तर त्याला सदस्यता प्रदान केली जाते. सदस्य झाल्यानंतर त्याच्यावर ज्या जबाबदार्या येतात त्याचा उल्लेख कलम 8 मध्ये केलेला आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होण्यासाठी नैतिकतेचा जो स्तर आवश्यक आहेत त्याचा उल्लेख कलम 9 मध्ये केलेला आहे.
    जमाअत-ए-इस्लामी हिंदची एकंदरित अशी रचना आहे. थोडक्यात इस्लाम एक दीन (व्यवस्था) आहे. हा फक्त इबादतीपुरता सिमित नाही तर मुस्लिमांच्या वैयक्तिक आणि सामुहिक जीवनासाठी ही आवश्यक आहे. म्हणून जमाअत-ए-इस्लामी हिंद मध्ये सामील होणार्या लोकांनी आधी स्वतःमध्ये शुद्ध इस्लामी आचरणाचा अंगीकार करावा व तद्नंतर इतरांना त्या संबंधीचे मार्गदर्शन करावे अशी जमाअतची भूमिका अगदी सुरूवातीपासूनच राहिलेली आहे. म्हणूनच या जमाअतमध्ये प्रवेश देण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराला शुद्ध इस्लामचे प्रशिक्षण दिले जाते. त्याला वर्ष-दोन वर्षे प्रबोशनवर ठेवले जाते. त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो व तो खरोखरच जमाअतच्या मतलुबा मेआर (अपेक्षित स्तरावर खरा उतरत असेल तरच त्याला प्रवेश दिला जातो. ही कठिण परीक्षा उत्तीर्ण होणार्यांची संख्या फार कमी असते म्हणून जमाअतच्या सदस्यांची संख्याही कमी आहे.) 
    काँग्रेसच्या कारकिर्दीत जमाअतवर दोन वेळेस प्रतिबंध लादण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळेस सर्वोच्च न्यायालयाने ते प्रतिबंध रद्द केले. आज देशभरात जमाअतचे काम अनेक क्षेत्रामध्ये चालू आहे. जमाअतच्या कार्याची विभागणी 6 विभागामध्ये केलेली असून, त्याचे कार्य जमाअतच्या सदस्यांनी दिलेल्या निधीतून व देशभरातून गोळा केलेल्या जकात आणि देणग्यांच्या माध्यमातून केले जाते. गोळा झालेल्या सगळ्या निधीच्या पाईपाईचा हिशेब ठेवला जातो. नियमितपणे सीए कडून त्याचे ऑडिट केले जाते. जकातचा पैसा सुरे तौबा आयत क्र. 60 मधील दिलेल्या आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे खर्च केला जातो. कुठेही अनावश्यक खर्च केला जात नाही. विशेषतः दंगलग्रस्त भागातील हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांना आर्थिक मदत दिली जाते. अनेक शैक्षणिक संस्था जमाअत तर्फे देशभरात चालविल्या जातात. अनेक रूग्णालये चालविली जातात. प्राकृतिक आपदांच्या वेळेस जमाअतचे लोक देशातील इतर संस्था, संघटनांच्या खांद्याला खांदा लावून रिलीफ वर्क करीत असतात. जमाअत-ए-इस्लामी हिंदची अशीही धारणा आहे की, देशातील विषमतेमुळे जे लोक आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचे मुख्य कारण व्याज आहे. व्याजामुळे गरीबाची प्रगतीच होवू शकत नाही. हफ्ते फेडण्यामध्येच त्याचे आयुष्य निघून जाते. त्यातूनच आत्महत्या होतात. म्हणून जमाअतने देशभरात बिनव्याजी पतसंस्थांचे जाळे विनलेले आहे. त्यातून हिंदू, मुस्लिमांसह सर्व जाती धर्मातील गरजू लोकांना बिनव्याजी अल्प स्वरूपाचे कर्ज दिले जाते. एकट्या महाराष्ट्रामध्ये 11 बिनव्याजी पतसंस्थांमधून मागच्या आर्थिक वर्षात 102 कोटीची आर्थिक उलाढाल झालेली आहे. या पतपेढ्यांमधून कर्ज घेणार्यांना कुठल्याही प्रकारचे तारण ठेवावे लागत नाही. कुठल्याही प्रकारचे छुपे व्याजदर नसतात. कागदपत्रांची गुंतागुंत नसते. याचा लाभ शेकडो लोकांनी घेतलेला आहे व घेत आहेत. शिवाय, जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुद्रण आणि प्रकाशन विभागाकडून हजारो पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. जवळजवळ प्रमुख भाषेमध्ये जमाअतचे साहित्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 800 वर्षे राज्य करून कुरआनचे भाषांतर कोणी केले नाही जमाअततर्फे प्रत्येक प्रमुख प्रादेशिक भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. जमाअत तर्फे इंग्रजीमध्ये रेडियन्स, हिन्दीमध्ये कांती, उर्दूमध्ये दावत व जिंदगी नौ, मराठीमध्ये शोधन, मल्याळममध्ये माध्यम सारखे दैनिक वृत्तमानपत्र, साप्ताहिक आणि मासिके नियमाने प्रकाशित केली जातात. जमाअतचे एकूण 42 उपविभाग असून, त्यांच्या मार्फतीने जनकल्याणाची कामे केली जातात.

- एम.आय. शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget