Halloween Costume ideas 2015

उन्माद पोसला यांनी!

घरबसल्या टिव्ही चैनल्सवरून पैसे भरून मी पाहिलाय ’इमेजबिल्डींग’चा ’मिठी’चा खेळ! त्यानंतरच्या विश्लेषणांचा सवयीचा सोईस्कर सहेतुक गोंधळ सुद्धा ! मला ही ’भारतीय’ म्हणून बोलण्या-लिहिण्याचा उरला सुरला अधिकार वापरून साधा संवाद साधावा वाटतोय.
    अख्ख्या मिठी, मगरमिठी, गळा मिठी यावरच्या उत्साही, अभ्यासू चर्चेचा पूर आलाच. ट्रोलिंगची कुजकट मिजासी वाढलीच. नेत्रपल्लवीचा खोडकरपणा नजरेत बसला किंवा खुपलाही ! पण या मिठीला प्रतिसाद देणारे छद्मी हास्य, देहबोलीतून व्यक्त होणारा हुकमी घमेंडीचा उन्माद मात्र नजरेत भरला. देशाच्या मूळ समस्यांना बगल देत सर्कशी अभिनय कुशलता पुन्हा भाव खाऊन गेली. 2019 च्या राजकीय जागराची नांदी सर्वसामान्याला गाजर दाखवून झाली.
    एकूण सत्तेचा प्रचंड उन्माद आणि अतिप्रबळतेची दावेदारी सहज केली जात असताना या उन्मादी अवस्थेपर्यंत या व्यवस्थेला आणण्याचं पुरक काम प्रमुख विरोधी पक्षांनी मूकपणे केलंय हे ही दिसत होतं. अगदी सन्माननीय राहूल गांधी यांचे भाषण ऐकताना लक्षात आलेल्या काही मुद्द्यांचा संदर्भ देणे आवश्यक वाटते. ’आम्ही जोडण्याची भाषा करतो’. आपल्या भाषणात ’भारत’ ऐवजी वारंवार ’हिंदुस्थान’ या शब्दाचा उच्चार, उपरोधिकतेचा आभास निर्माण करीत ’मी हिंदू आहे, धर्म समजाविल्याबद्दल आपले आभार’ अशा वाक्याची पुनरावृत्ती म्हणजे एकूण सध्या कालोपयोगी हिंदुत्वाचा, सॉफ्टली काँग्रेसी वावर मान्य असल्याची उघड कबुली दिली.
    पंतप्रधान किंवा शहासाहेब यांना सत्तेशिवाय चैन नाही, त्यासाठी ते वाट्टेल त्या गोष्टी करू शकतात. याकडे निर्देश योग्य पण मिठीचा आग्रह धरून सत्तेची स्वप्नं यांनाही लपवता आली नाहीत. मात्र ’राहूलजी गांधी’ यांनी कोणत्या मुल्यांना नेमके भाव दिलेय याचे तर्कभाव करता येत होते. मिठाचा सत्याग्रह करणारे म. गांधी, राष्ट्रपिता म. गांधी, कट्टरतेतून झालेल्या हत्येचे बळी ठरणारे सहिष्णू गांधी, समतेचे मुल्य प्रस्थापित करत एकता सांगणारे म.गांधी की हे म.गांधी मुल्य त्यांच्या भाषणात अभिप्रेत होतं? की भाजपा प्रणित गांधी अर्थात पं.दिनदयाल उपाध्याय यांच्या मुल्यांची जाणते-अजाणते पखरण होत राहिली?
    अशा शंका बावचळत येण्याचे काही साधी कारणे संदर्भात येतात म्हणजे अगदी परवापर्यंत सेक्युलर सेक्युलर म्हणून ओरडत, धर्मकट्टरतेपासून दूर आहोत असे मिरवत राहणारे राजकीय पक्ष, सामाजिक चळवळी (काही दुर्मिळ तुरळक मोजके सन्माननीय अपवाद) केवळ धु्रवीकरणाचा अजेंडा पुढे रेटत आहेत. काँग्रेसच्या मुंबई खासदारांनी साधू-महंत सेल पक्षांतर्गत स्थापन केला. तरी अग्नीवेश हल्ल्यावर बोलणे नाही. अगदी राजीव गांधींच्या स्मरणार्थ राजीव गांधी फौंडेशनचा पुरस्कार 2004 ला सध्याचे प्रधानमंत्री यांना बहाल करण्यात आला होता. म्हणजे 2002 नंतरच्या उन्मादाला हळूहळू जोपासायचे काम कळत-नकळत सुरूच आहे. राजीव गांधींच्या प्रधानमंत्री पदाच्या भाषणामध्ये होणारं पं.उपाध्याय यांचे स्मरण किंवा अदी मानवता एकतेला कलंकित करणार्या ’बाबरी शहादतीं’च्या घटनेनंतर तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी अल्पसंख्यांकाना दिलेला उठवळ वचननामा. खरंतर माफी मागून नव्वदेक दिवसात मस्जिद बांधणीचं अभिवचन सहेतूकपणे स्मृतीभ्रंश करण्यात आले आहे. त्याच दशकातील रथयात्रेने आलेल्या कट्टर धार्मिक ध्रुवीकरण हे आजच्या म्हणजे 2014 नंतर दहशतवादी फॅसिस्ट दंगली, लिंचिंगाच्या निमित्ताने उन्मादी झालेय. हा उन्माद मग कुणी जोपासला? कोणी खतपाणी घातलं?
    संघ आणि संघप्रणित संस्थांना दुषण देत, राष्ट्रवादाचा कानमंत्र त्यांच्याच व्यासपीठावरून देणं हे कशाचं मुल्यभान? असो, उजव्या डाव्या प्रतिमा-प्रतिकांचा कॉम्बोपॅक करून मानवताविघातक संस्थांचे उदात्तीकरण होतेच आहे. आज कुठलाही अल्पसंख्यांक समुह असुरक्षिततेतून भितीच्या कोषात आहे. विशेषतः मुस्लिमांच्या बाबतीत हे रोज कुठेन कुठे घडताना दिसत आहे. रेल्वे/इतर प्रवासात बिनधास्त फिरता न येणं, काय खावं, प्यावं याच्यावरची सेन्सॉरशिप येणं, काय गुणगुणावं किंवा सिनेमा हॉलमध्ये कस वागावं? अशी अलिखित नियमावलींच्या ओझ्याखाली दबला जातोय तो सर्वसामान्य मुस्लिम. लिंचिंगच्या घटनांची प्रचंड वाढ छोट्या धर्मजात समुहाच्या मोर्चे एकत्रीकरणातून उपरे ठरण्याची साशंकता. या प्रश्नांवर राहूल गांधी बोललेच नाहीत. धर्माभिमुख शिक्षणपद्धती, सैलसर वक्तव्यांची दुफळी निर्माण करणारा अजेंडा, हे सगळं बाजूला का राहतं? याचाही विचार करायलाच हवा. संविधान बचावच्या नार्याने एकत्र येणारे सगळेच पक्षपंथ सॅफर्नएज्युकेशनचा साधा विरोध दर्शवित नाहीत. एकूण काय भाजपाने आपल्या आदर्शांत सजवलेले, मान्य केलेले गांधी वेगळे... आणि समता सांगणारे गांधी वेगळेच! ते त्यांच्या प्रतिकांना व्यवस्थित प्रवाहीत करताहेत. राहूल गांधी प्रवाहाविरूद्ध न जाता सामिलकीचा रंग दाखवताहेत.
    मा.राहूलजी आपण कोणत्या गांधीजींच्या मुल्यांना उजाळा द्याल? या उत्तरानेच मानवता-एकता मूल्ये अबाधित राहतील अशी तसूभर खात्री आहे. बाकी या मिठीकहाणीत मा. पंतप्रधानाच्या एकूण मिठ्यांचीही चर्चा मिठास देऊन जाते. आपल्या देहबोलीतून, नकलातूर, प्रगाढ वक्तृत्वातून सर्कशी सेम उत्तरे त्यांनी दिली. बाकी प्रश्न जैसे थे!! उन्माद-अहंकार तसाच. पूर्वापार सोईस्कर पोसत ठेवलेला हा अहंकार आता उन्मादाने भरगच्च भरलाय. त्याला तोडणे संपवणे अवघड होताना ’मिठी’, ’डोळा’ ही भावनिक हत्यारे काम करतील? हा उन्माद वाढत जाईल, जातोय.. पण हा उन्माद आपणच जोपासला, जतन केला हे ही सत्यच! मग तरीही मिठीचा प्रेम संदेश द्यायचाच असेल, मिठी मारायचीच असेल तर ’अलवर’  मधल्या नुकत्याच बळी ठरलेल्या मुस्लिमांच्या घरी जा, रोहितच्या घरी जा, मिठी द्यायचीच असेल नजिबच्या भावाला, मुजिबला द्या! पहलू, अख्लाक, मोहसीन अगदी शाहीद आजमीच्या भावापर्यंत जा.. नजर भिडवायची असेल तर नक्की निर्भया, आसिफा आणि पिडीतांच्या आई-वडिलांशी नजर भिडवा..
    तिकडची अपेक्षा नाहीच.. तुमच्याकडून नाही... पण तुम्ही ’माणसंजोडता’ असं म्हणालात म्हणून..!!
शेवटी रवंथ पुरे!! तुम्हा सार्यांच पॉलीटिकल प्रोजेक्शन आणि पोझिशनिंग सुरूच राहो, जय हो!

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) 
9923030668

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget