Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(७७) उरले ते लोक जे अल्लाहशी केलेला करार व आपल्या शपथा अल्पशा किमतीवर विकून टाकतात तर त्यांच्यासाठी पारलौकिक जीवनात कोणताही वाटा नाही. अल्लाह कयामतच्या  दिवशी त्यांच्याशी बोलणारही नाही, त्यांच्याकडे पाहणारही नाही आणि त्यांना पवित्रही करणार नाही६५ किंबहुना त्यांच्यासाठी तर अत्यंत यातनादायक शिक्षा आहे.
(७८) त्यांच्यात काही लोक असे आहेत जे ग्रंथ वाचताना अशाप्रकारे जीभ वेडीवाकडी वळवितात की तुम्ही समजावे जे काही ते वाचत आहेत ते ग्रंथातीलच मजकूर होय, वास्तविक  पाहता तो मजकूर ग्रंथातील नसतो.६६ ते म्हणतात की हे जे काही आम्ही वाचत आहोत हे अल्लाहकडून आहे. खरे पाहता ते अल्लाहकडून असत नाही, ते जाणूनबुजून असत्य गोष्टीचा  संबंध अल्लाहशी जोडतात.
(७९) कोणत्याही माणसाचे हे काम नव्हे की अल्लाहने त्याला ग्रंथ आणि विवेकपूर्ण निर्णय शक्ती व पैगंबरत्व प्रदान करावे आणि त्याने लोकांना म्हणावे की अल्लाहऐवजी तुम्ही माझे  दास बना. तो तर हेच म्हणेल की खऱ्या अर्थी रब्बानी६७ (धर्मोपदेशक) बना, जशी त्या ग्रंथाच्या शिकवणीची अपेक्षा आहे ज्याचे तुम्ही पठण करता व पाठ देता.
(८०) तो तुम्हाला कदापि असे सांगणार नाही की अल्लाहच्या दूतांना अथवा पैगंबरांना आपला पालनकर्ता माना. हे शक्य आहे का की एखाद्या पैगंबराने तुम्हाला ईशद्रोहाची आज्ञा द्यावी  जेव्हा तुम्ही मुस्लिम (आज्ञाधारी) असाल.?६८
(८१) स्मरण करा, अल्लाहने पैगंबरांकडून वचन घेतले होते, की आज मी तुम्हाला ग्रंथ, विवेक व बुद्धिमत्तेने उपकृत केले आहे. उद्या जर एखादा दुसरा पैगंबर तुमच्याजवळ त्याच  शिकवणीची ग्वाही देणारा आला जी शिकवण अगोदरपासूनच तुमच्याजवळ आहे तर तुम्हाला त्याच्यावर श्रद्धा (ईमान) ठेवावी लागेल आणि त्याला सहकार्य द्यावे लागेल.६९ असे  फर्मावून अल्लाहने विचारले, ‘‘काय तुम्ही हे मान्य करता आणि यावर माझ्यातर्फे कराराची मोठी जबाबदारी उचलता?’’ त्यांनी सांगितले, ‘‘होय, आम्ही मान्य करतो.’’ अल्लाहने  फर्माविले, ‘‘मग साक्षी राहा आणि मीदेखील तुमच्याबरोबर साक्षी आहे.




६५) कारण हे आहे की हे लोक (ज्यू) असे मोठमोठे नैतिक अपराध करूनसुद्धा समजून आहेत की प्रलयाच्या दिवशी हेच अल्लाहचे प्रियदास असतील व अल्लाहची कृपादृष्टी त्यांच्यावरच  असेल. जगात जे थोडे-फार पाप त्यांनी केले असतील ते सर्व बुजूर्गांच्या कृपेने धुवून निघतील जेव्हा की परलोकात अगदी विरोधी मामला त्यांच्याशी केला जाईल.
६६) याचा अर्थ असा जरी होतो की ते ईशग्रथांच्या अर्थात फेरबदल करतात किंवा शब्दांचे उलटफेर करून अर्थाचा अनर्थ करतात, परंतु याचा खरा अर्थ होतो की ते ईशग्रंथाला वाचतांना  एखाद्या विशेष शब्दाला किंवा वाक्याला जे त्यांच्या स्वार्थाच्या आड येते किंवा स्वयंरचित धारणा व सिद्धान्ताच्या विरोधात जाते; त्याच्या उच्चरात हेराफेरी करून अर्थाचा अनर्थ करतात.  याचे उदाहरण कुरआनला मानणाऱ्या ग्रंथधारकांतसुद्धा सापडतात. उदा. काही लोक जे पैगंबर मनुष्य असल्याचे नाकारतात ते या आयती मधील ``कुल इन्नमा अना बश रूम मिस्लुकुम''  `इन्नमा' या शब्दाचा उच्चर `इब्न-मा' करतात आणि त्याचे अनुवाद अशाप्रकारे करतात, ``हे पैगंबर! सांगा, नि: संदेह, मी तुमच्या सारखा मनुष्य नाही.''
६७) यहुदी (ज्यू) लोकांमध्ये विद्वान लोक धार्मिक पदाधिकारी होते. त्यांचे कार्य धार्मिक मामल्यात लोकांचे मार्गदर्शन करणे, इबादत व उपासनाचे आयोजन करणे आणि धार्मिक  आदेशांना लागू करणे होते, त्यांच्यासाठी शब्द `रब्बानी' वापरला जात असे. कुरआनात देखील हा उल्लेख आहे ``यांचे रब्बानी आणि विद्वान त्यांना अपराध करण्यापासून आणि हरामाचा  माल खाण्यापासून का रोखत नव्हते.''(५ : ४४) तसेच खिश्चनांच्या जवळ ’Divine' हा शब्द `रब्बानी' च्या समानार्थी आहे.
६८) हे त्या सर्व चूकीच्या गोष्टीचे व्यापक खंडन आहे जे जगातील विभिन्न समुदायांनी पैगंबरांना संबोधून आपल्या धार्मिक ग्रंथात समाविष्ट केले आहे आणि ज्यांच्या आधारावर  एखाद्या पैगंबर वा फरिश्त्याला येनकेनप्रकारे `ईश्वर' व `उपास्य' ठरविले जाते. या आयतीद्वारा हा मूलभूत नियम सांगितला गेला आहे, की अशी एखादी शिकवण ज्यात  अल्लाहशिवाय इतरांची बंदगी व उपासना करण्यास सांगितले जाते; तसेच दासाला दासत्वाऐवजी ईशत्व बहाल केले जाते; ती शिकवण पैगंबरांची कदापि असू शकत नाही. एखाद्या  धार्मिक ग्रंथात अशी चुकीची शिकवण आढळली तर समजून घ्यावे की हा पथभ्रष्ट लोकांच्या फेरबदलाचा परिणाम आहे.
६९) म्हणजे प्रत्येक पैगंबराकडून हे वचन घेतले जात होते आणि जे वचन पैगंबराकडून घेतले गेले ते अनुयायींवर अनिवार्यत: आपोआप लागू होते की जो पैगंबर अल्लाहकडून त्या  धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठविला जातो ज्याच्या प्रचार, प्रसार व स्थापना करण्यासाठी तुम्ही नियुक्त केले गेले आहात, त्याची तुम्हाला साथ द्यावी लागेल. त्याच्याशी पक्षपात करु  नये, स्वत:ला धर्माचा ठेकेदार समजून बसू नये, सत्याचा विरोध करू नये. परंतु जेव्हा कोठे एखादा मनुष्य आमच्याकडून सत्याचा ध्वज उंचावण्यासाठी पुढे आला तर झेंड्याखाली जमा  होऊन सर्वांनी त्याला सहकार्य करावे. येथे हेसुद्धा स्पष्ट जाणून घेतले पाहिजे की आदरणीय पैगंबर महुम्मद (स.) यांच्या पूर्वीच्या प्रत्येक पैगंबरांकरवी हे वचन घेण्यात आले आणि याच  आधारावर प्रत्येक पैगंबराने आपल्यानंतर येणाऱ्या पैगंबराची खबर आपल्या अनुयायांना दिली होती आणि येणाऱ्या पैगंबराला साथ देण्यास सांगितले होते. परंतु कुरआन आणि हदीसमध्ये  कोठेच असे नाही की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून असे वचन घेण्यात आले आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायांना आपल्यानंतर येणाऱ्या पैगंबराची खबर दिली  आणि येणाऱ्या पैगंबरावर ईमान आणण्यास सांगितले असावे. किंबहुना कुरआनमध्ये स्पष्ट शब्दांत पैगंबर मुहम्मद (स.) यांना `खातमुन्नबीयीन' म्हणजे `शेवटचे पैगंबर' म्हटले गेले  आहे. तसेच अनेक हदीसकथनांत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की त्यांच्यानंतर कोणी दुसरा पैगंबर येणार नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget