Halloween Costume ideas 2015

माणसांच्या रक्तात भेद नाही तर मनभेद का करावा : डॉ. रफिक पारनेरकर

आत्मा मालिक सर्वधर्मीय आत्मचिंतन सोहळा
कोपरगाव (शोधन सेवा) - जातीपातीच्या नावाखाली माणसांतील माणूसकी संपत चालली आहे. मात्र आत्मा मालिक ध्यानपीठाचे प्रमुख जंगलीदास माऊली सर्व जाती-धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम करीत आहेत. माणसांच्या रक्तात भेद नाही, तर मनभेद कशाला करावा. लोक चंगळवादात अडकल्याने माणसाला इतकी हाव निर्माण झाली आहे की, त्यांचे पोट मरेपर्यंत भरत नसल्याचे प्रतिपादन डॉ. रफिक सय्यद पारनेरकर यांनी येथे केले.
    कोपरगाव तहसील कार्यालयाच्या मैदानावर कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यान योग मिशनरी व सर्वधर्मीय समाज बांधवांच्या वतीने आत्मा मालिक सर्वधर्मीय आत्मचिंतन सोहळ्यात डॉ. पारनेरकर बोलत होते. मंचावर गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, आत्मा मालिक ध्यानपीठाचे प्रमुख जंगलीदास माऊली, संत परमानंद महाराज, संत देवानंद महाराज, आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, विविध धर्मांचे धर्मगुरू, जंगली महाराज आश्रमाचे विश्वस्त यांची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे बोलताना डॉ. पारनेरकर म्हणाले, समाजा-समाजांत भांडणे लावून जाळपोळ करून पेटवा पेटवी करणाऱ्यांना जर पेटवायचेच असेल, तर गोरगरीबांच्या चुली पेटवा. तिथे माणुसकीची गरज आहे. धर्माधर्मांमध्ये कोणीही तेढ निर्माण करू नयेत. माणसांची नीतिमत्ता तपासायची असेल, तर आई-वडिलांच्या सेवेतच विश्व आहे. ज्याला आई-वडिलांची ओळख नाही, त्याच्यापेक्षा पशुपक्षी बरे. हिंदूंनी इस्लाम धर्माचे कुरआन तर मुस्लिमांनी गीता, संत तुकारामांची गाथा नीट वाचावी. आज जातीवादाचे विष सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे आता समाजात एकोप्याची भावना राहावी, यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी केले.
    आत्मचिंतन व आत्मध्यानामुळेच आपल्या मूळ मालकाशी संबंध जुळतील असे ना. प्रकाश मेहता म्हणाले. यावेळी पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश म्हणाले, सर्वधर्माचा ईश्वर एकच आहे. मात्र त्याची नावे विविध धर्मात वेगवेगळी ठेवली आहेत. येशूख्रिस्त, मुहम्मद पैगम्बर, गुरूनानक, भगवान महावीर, गौतम बुद्ध या सर्वांनी आत्म्याचे ज्ञान, मानवजातीचे वेगवेगळे संदेश वेळोवेळी दिले. तोच संदेश घेऊन आत्मचिंतनासाठी समाजातील द्वेषाचा समूळ नाश करण्यासाठी आत्मचिंतन हाच एक राजमार्ग आहे. जात, धर्म, पंथ कोणताही असो सर्वांचा ईश्वर एकच आहे, असेही ते म्हणाले.     स्वागत व सुत्रसंचालन करताना परमानंद महाराज म्हणाले, ईश्वर निर्गुण निराकार असून, त्याच्या तत्वाने सर्व सृष्टी व्यापलेली आहे. आज समाजात असलेली अशांतता, मतभेद, वाद-विवाद, अराजकता, अनैतिकता याला एकच कारण असून, त्याला दूर करण्यासाठी मानवता हाच धर्म असून, माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवणे व त्यानुसार जगणे हेच स्वधर्माचे आचरण आहे.
    प्रारंभ सर्वधर्मीय आत्मचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरूवात सर्वधर्मीय संतांची सजलेल्या रथातून मिरवणूक काढून झाला. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
    यावेळी विविध धर्म-पंथांचे संतगण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत कबीरानंद महाराज यांचेही प्रवचन झाले. डॉ. रफिक सय्यद यांनी जंगलीदास माऊलींना कुरआन ग्रंथ भेट दिला. आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget