Halloween Costume ideas 2015

जीवनाचे रहस्य

- मुहम्मद फारूक खान
मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवनाविषयी गांभीर्याने विचार केलेला असेल. साधारणतः मानव हा समतल आणि नाकासमोर पाहून जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जीवनातील सखोल पैलूंवर विचार करण्यावर तो सहसा गांभीर्याने आपली विवेक शक्ती खर्ची करीत नसतो. याची काही स्पष्ट – अस्पष्ट कारणे आहेत.
   
मनुष्य ज्या वातावरण व परिवेशात जगतो आणि त्यातील प्रचलित क्रिया कलाप व भावना वगैरेत इतका मग्न होत जातो की, त्याची पावले आपोआपच त्या दिशेत उचलली जातात आणि मग जीवनाविषयी गंभीर आणि मौलिक प्रश्नांवर विचार करण्याची त्याला सवडच मिळत नाही. परिणामी, मानव हा प्राप्त जीवनाच्या आणि जीवनाविषयीच्या मौलिक प्रश्नांना सहसा गांभीर्याने घेत नाही.
जीवन म्हणजे काय?
    जीवनाचा अर्थ काय आहे? आपण आलो कोठून आणि कोठे जाणार? जन्मापासून मृत्यूपर्यंत मिळालेल्या या अल्पशा अवधीमध्ये आपल्याला काय करावयाचे आहे? काय व्हायचे आहे? जीवन हे अभिशाप आहे की वरदान आहे? योगायोग आहे की यांच्याशी एखाद्या दायित्व अगर कर्तव्याचा संबंध आहे? आपोआप प्राप्त होणारे आहे की शोधून सापडणारे आहे? परिपूर्ण आहे की अपूर्ण आहे? सुरवात आहे की आदि ते अंतापर्यंत सर्व काही आहे? या जीवनाचा कोणी दातासुद्धा आहे की नाही? या प्रश्नांचे उत्तर कोठे सापडेल? कोण देईल? जर एखादा जीवनदाता असेलच तर त्याने या प्रश्नाचे उत्तर सुद्धा दिले की केवळ जीवन प्रदान करून समाधान मानले?
    वस्तुतः या प्रश्नांचा मानव जीवनाशी अत्यंत दृढ संबंध आहे. जगात कोणीही या प्रश्नांना जीवनाशी पृथक समजू शकत नाही. एवढेच नव्हे तर जीवनाचा आरंभच मुळात या प्रश्नांवर आधारित आहे. म्हणून या प्रश्नांवर मानव पूर्वीपासूनच विचार करीत आला आहे.   
    जीवनासंबंधी असलेल्या या प्रश्नांवर विचार करणे म्हजणे हा केवळ दार्शनिक अभिरूची आणि कल्पना विलास नसून मानवाच्या जीवंत इच्छा, आकांक्षा, कामना आणि गरजांशी याचा दृढ संबंध आहे. कारण मानव प्रत्येक गोष्टीची उपेक्षा करू शकतो. परंतु, आपल्या मनाला तो कुठे घेऊन जाईल?
मानवी मनाची प्रबळ इच्छा
    मानवी मनाची एक अत्यंत प्रबळ इच्छा अशी आहे की त्याच्या जीवनाचा कधीही अंत होता कामा नये. त्याला आपण मरावे असे मुळीच वाटत नाही. हे कधीही न संपणाऱ्या वसंत ऋतूचे स्वप्न उराशी बाळगून असतो. एकदाचा जन्म घेऊन मातीत सदासर्वदा लुप्त होण्याची त्याची मूळीच इच्छा नसते. त्याला हे आवडतच नाही की त्याच्या जीवनाचा मृत्यूच्या रूपात अंत व्हावा. म्हणूनच तो मृत्यूच्याही पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, मृत्यूपलीकडील रहस्याविषयी चित्र, विचित्र, विलक्षण आणि नाना-प्रकारच्या कल्पना करीत असतो.
इस पार प्रिये मधु है तुम हो, उस पार न जाने क्या होगा
    जीवनाच्या सुख, चैन, आनंदात तो इतका मग्न झालेला असतो आणि आनंदाच्या मोहपाशात तो इतका गुरफटून जातो की, त्याला या गोष्टीचा विचार करण्याची कधी सवडच मिळत नाही की, हे आनंद, हा प्रमोद आणि हा विलास कोठून प्राप्त झाला आणि किती काळ टिकणार आहे? मात्र दुःख आणि कष्ट असेल तर मात्र परिस्थिती अगदीच भिन्न असते. दुःख आणि कष्ट असल्यास माणूस मात्र या गोष्टीवर विचार करण्यासाठी विवश होतो की हे काय झाले? जो आनंद, सुख आणि प्रमोद आपल्या जीवनात होता तो का निघून गेला, कोणी व का हिरावून घेतला, हे सुख आपल्याकडे कायमस्वरूपी होते की क्षणभंगूर होते आणि शेवटी गेले तर नेहमी करिता गेले की परत आपल्याला मिळेल? मानवाचे हेच दौर्बल्य आहे आणि याच्याच परिणाम स्वरूपी तो स्वतः विषयी आणि या सृष्टीविषयी विचार करण्याची सहसा तसदी घेत नसतो. आपल्या अस्तित्व-स्त्रोताविषयी विचार करण्याच्या भानगडीत पडत नसतो. तो अशाही भानगडीत पडत नसतो की आपल्याला हे जीवन कसे आणि कोठून मिळाले, मात्र जेव्हा तो आपल्या प्रियजनांना मृत्यूशय्येवर तडफडत मरताना पाहतो तेव्हा मात्र त्याला जाग येते. अशा दुःखद परिस्थितीत त्याची हरवलेली शुद्धी परत येते. मन मस्तिष्कावरील सुख आणि मौज मस्तीची झिंग क्षणार्धात लुप्त होते. अगदी कठोर व पाषाण र्‍हृदयी व्यक्ती सुद्धा मृत्यूशी झूंज देणाऱ्या आणि मृत्यूच्या कू्र जबड्यात जगण्याचा आक्रोष करणाऱ्याची केविलवाणी अवस्था पाहून तात्काळ भानावर येते. मानसिक समाधाना करिता तिला भौतिक सुखसाधने व्यर्थ आणि निरर्थक व अस्तित्वशुन्य वाटू लागतात. मग तिच्यासमोर एक वस्तुस्थिती प्रकट होते की ”या ठिकाणी आत्मशांती व आत्मसमाधानासाठी जगातील कोणत्याही भौतिक सुखसामग्री व्यतिरिक्त कोणत्या तरी अन्य गोष्टीची आवश्यक आहे.”
    मृत्यू आणि दुःखाच्या या प्रसंगी आणखीन बऱ्याच गंभीर बाबींकडे आपले लक्ष जाते आणि हे स्वाभाविक आहे. साधारणतः आपली विवेक शक्ती जड होते आणि जीवनाच्या गहन समस्या गहन विषयाकडे आपले लक्ष जात नाही. मात्र दुःख, यातनाआणिसमस्यांच्याअनुभवामुळेविवेकशुन्यबुद्धीतचैतन्यसंचारते आणि म्हणूनच दुःख आणि यातनांच्या आरशातच माणसाला जीवनाच्या गंभीर स्वरूपाचे दर्शन घडते. सुख-शांती आणि आनंद व मौजमजेच्या वातावरणात जीवनाचा खरा अर्थ उलगडतच नाही. संवेदशनशील माणसाला मात्र निश्चितच या गोष्टीची जाणीव होते की जीवनातील सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध असून सुद्धा आणखीन असंख्य इच्छा-आकांक्षा अशा असतात ज्या पूर्ण होणे शक्य नसते. शिवाय अशा कित्येक कामना इतक्या उलट आणि आकर्षक असतात की मानवी स्वभावास त्याची उपेक्षा करणे शक्य नसते. त्या पूर्ण न होणे हे माणसाला अत्यंत दुःखद वाटतात.
    आपले प्रियजनांचे आपल्याला सोडून जाणे आणि नेहमी करिता त्यांचे दूर होणे, ही एक अशी हृदयद्रावक घटना आहे. जी सहन करणेदेखील अशक्य असते. अशा प्रसंगी माणूस पूर्णतः खचून जातो. तो नैराश्य आणि वैफल्याच्या भयानक सागरात बुडून जातो. त्याचेअंतर्मनहीगोष्टस्वीकारण्यासतयारचनसतेकीमरणारीव्यक्तीत्यालानेहमीसाठीसोडूनजातआहे. आपल्या डोळ्यांसमोर सर्वकाही घडत असताना पाहून सुद्धा नकळत त्याच्या मनात मरणाऱ्या व्यक्तीच्या पुनर्मिलनाची आशा निर्माण झालेली असते.
    बरेच जण सत्कार्यात व्यस्त असतात. त्यांचा त्याग आणि समर्पण महान असतो. मात्र त्यांच्या वाट्याला दुःख आणि अनादराशिवाय काहीही येत नाही. याउलट असंख्य दुष्कर्मी, दुष्ट व दुराचारी जीवनभर इतरांवर अन्याय व अत्याचार करीत असतात. त्यांनी लावलेल्या अन्याय व अत्याचाराच्या भयंकर आगीत मानवतेचे हवन होत असते. हे दुराचारी या आगीत असत्य आणि दुराचाराचे असे इंधन टाकीत असतात की, ही भयानक आग शतकानुशतके विझत नाही. त्यात जळणाऱ्या अन्यायग्रस्त आणि अत्याचार पीडितांचे काळीज फाडणारे अवार्त टाहो युगायुगांपर्यंत ऐकावयास मिळतो. मात्र असे दुष्ट आणि दुराचारी नेहमी मौजमजाच करीत असतात. त्यांना साधा काटाही रूतत नाही. त्यांना जीवनाचे सर्व भोगविलास भोगायला मिळतात. सर्वत्र आनंदी – आनंद आणि जीवाचे अवास्तव मागणी पुरविण्याची सामग्री उपलब्ध असते. या ठिकाणी एक संवेदनशील माणूस विचार करू लागतो की, हे काय चालले आहे? आपण काय पाहतोय? ही काय अवस्था आहे? चांगले कर्म करणाऱ्यांना आणि सदाचाऱ्यांना त्यांच्या सेवा,  पुण्य आणि सदाचाराचे काही फळ मिळेल काय?  या जगामध्ये सद्गुण आणि सदाचाराची भावना हा केवळ एक धोका तर नव्हे? पाप आणि पुण्य, सदाचार आणि दुराचार, न्याय आणि अन्याय व अत्याचारात मुळात तात्विक आणि प्रभावी फरक आहे की नाही?
    मग अशा संवेदनशील आणि विचारशील व्यक्तीच्या मनात हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो की, हे जीवन आणि हे सृष्टीचक्र नेहमी व सदाकरिता चालू असेल काय? त्याला हे सुद्धा दिसते की, या जीवनसृष्टीत माणूस एकीकडे मरण पावतो तर दुसरीकडे मात्र माणसांच्या जन्माचा क्रम सुरू असतो. पशु-पक्षी आणि वनस्पतींची सुद्धा हीच अवस्था आहे. त्यांचा वंश सुद्धा चालू आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागते. जीवन असण्याचा भास होतो.  पूर्ण सजीवसृष्टीने प्रस्थान केलेले असते आणि त्या ठिकाणी परत इतरांचा जन्म होतो, सर्वत्र जीवन फुललेले, बहरलेले दिसते. येथील जीवनक्रम सतत सुरू असते. मात्र हा क्रम असाच सुरू राहणार काय? लोक याप्रमाणे मरतील, त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यांचा जन्म होत राहील, हा क्रम केव्हापर्यंत सुरू असेल की एकदाचा या क्रमाला कोठेतरी ब्रेक लागेल? वायु, जल, प्रकाश, ऊर्जा वगैरेंसारख्या भौतिक शक्ती अशाच प्रकारे नेहमी कार्यरत असतील का? की कधीतरी समाप्त होतील? ही विश्व व्यवस्था अशीच कार्यरत राहणार की एखाद्या निश्चित वेळेवर नष्ट होईल? मग यानंतर काय असेल? सर्वत्र फक्त पोकळीच असेल काय? की जगातील कार्यरत ऊर्जा शुन्यात विलीन होऊन नव्या जीवनाचा व नवीन विश्वाचा शुभारंभ होईल? अथवा या वर्तमान जीवनाचा मनोरम खेळ सदैवासाठी समाप्त होईल आणि मग कोणीही नसणार व काहीही नसणार? या करिता कोणीतरी बाकी राहणार काय, ज्याला या गोष्टीच्या आठवणी राहतील की या ठिकाणी एकदा कधीतरी जीवन नावाची बाब अस्तित्वात होती, येथे सजीवसृष्टी कार्यरत होती, जीवन बहरलेले आणि फुललेले होते, सुर्योदय होत होता, रात्र होताच चंद्र-ताऱ्यांची विलोभणीय चादर आकाशात मन आकर्षित करीत होती, पक्ष्यांचा कर्णमधूर चिवचिवाट होत होता, पाण्याचे खळखळणारे झरे वाहत होते. नयनरम्य दृष्य होते आणि जीवनाशी संबंधित मनोरम कथाराग-विराग व रूदन आणि हास्याची मैफल होती आणि हे सर्वकाही नेहमीसाठी नष्ट पावले.
    अथवा ही जीवनसृष्टी एकदाची अंत पावल्यावर परत एखादी प्रगतीशील व उच्चकोटीची जीवनसृष्टी अस्तित्वात येईल? जर अस्तित्वात आली तरी वर्तमान जगातील प्राणी यात दाखल होऊ शकतील काय की तेथे आपल्या व्यतिरिक्त इतर जनांचे वास्तव्य असेल? आणि जर या वर्तमान जगातील सजीवांना प्रवेश मिळालाच तर मग ते जीवन त्यांच्या वर्तमान जीवनाच्या एखाद्या पैलूचा ऋणी असेल काय? दुसऱ्या शब्दांत त्या जीवनामध्ये वर्तमान जीवनाच्या चांगल्या वाईट विचार, भाव, कर्म वगैरेंचाही आधार असेल किंवा नसेल?
    हे आणि अशाप्रकारची आणखीनही बरेच प्रश्न मानवीमन-मस्तिष्कात निर्माण होतात. मग या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सापडणे कठीण होते किंवा समाधान होऊन जाते अथवा न झाल्यास त्याच्या नशिबी नैराश्य येते. एखाद्या वैफल्यग्रस्त माणसाप्रमाणे त्याची मनोवृत्ती होत असते. या निराश मनोवृत्तीमुळे तो जीवनातील प्रत्येक चांगल्या वाईट बाबींशी समझोता करून जीवनाचा गाडा रेटत असतो. मिळेल ते स्वीकारीत असतो, न मिळाल्यास प्रयत्न करीत असतो आणि प्रयत्नानंतर ही मिळत नसेल तर मात्र समझोता आणि सबुरीने घेत असतो. म्हणूनच अशा मानसिक अवस्थेत अडकून तो याच वर्तमान जीवनावर आणि मिळेल त्याव समाधान मानून याच जीवनास प्रथम व अंतिम आणि सर्व काही समजून बसतो आणि याच विचार व समाधानाच्या आधारे जीवन जगत असतो, जीवनास आकार देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला याच वर्तमान जीवनाचे सुख-दुःख वाटतात. याच जीवनातील प्राप्त होणाऱ्या यशास अंतिम यश आणि अपयशास अंतिम अपयश समजत असतो त्याच्या दृष्टीत याच जीवनातील यशापयश, सुखः दुख आणि जीवनातील चढउतारा शिवाय आणखीन कोठेही कशाचेच अस्तित्व नसते.    
    भविष्याकडून निराश झाल्यावर सुद्धा माणसाच्या समस्यांचा अंत होत नसतो. हे जरी मान्य केलेकी, हेच जीवन अंतिम जीवन आहे आणि यानंतर काहीही नाही. तरी सुद्धा हा प्रश्न बाकी राहतोच आणि उत्तराची मागणी करतो की सद्भावना, पुण्य आणि सदाचारासारख्या गोष्टी एखाद्या कविचा कल्पना विलास आहे? येथे संपत्ती आणि धनाला किंमत आहे मात्र माणसाला कवडी किंमत नाही. मग त्या जगाची अवस्थाही अशीच दयनीय आणि शोचनीय असेल काय की यापेक्षा भिन्न असेल? अथवा ही भिन्नता वर्तमान जीवनाचे विरोधात्मक रूप नसून विकासात्मक रूप असेल काय? (क्रमशः)
(उर्दूतून मराठी भाषांतर सय्यद जाकीर अली)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget