Halloween Costume ideas 2015

वंशवादाचे पुनरागमन


वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यामागे अफगाणिस्तान आणि उसामा बिन लादेन यांना जबाबदार धरून त्यावेळच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी धमकी दिली होती की आम्ही अमेरिकेची धाक आणि धमक हल्लेखोरांना दाखवून देऊ. अमेरिकेच्या धमकीला अफगाणिस्तानने काहीच किंमत दिली नव्हती. उसामा बिन लादेनला अमेरिकेच्या स्वाधीन करण्याचा दबाव आणि दडपण आणल्यानंतरची ही गोष्ट, अफगाणिस्तानवर कितीही दडपण आणले तरी ते बिन लादेनला अमेरिकेच्या हवाली करणार नाही हे स्पष्ट केले होते.

अमेरिकेच्या त्या धाक आणि दपटशाला कुणी कवडीचीही किंमत दिली नव्हती, पण तिथल्याच राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची लक्तरे जगाच्या चव्हाट्यावर टांगली. आजवर कोणत्या सत्ताधाऱ्याने, राजाने आपल्याच सत्तेच्या केंद्रावर स्वतःच लोकांना हल्ला करण्याची चिथावणी दिली नसेल ती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आणि तिथल्या नागरिकांनी आपल्याच सत्ताकेंद्रावर म्हणजेच कॅपिटल हिलवर दहशदवादी हल्ला करून जगाला दाखवून दिले की महान दहशतवादी देश आणि प्रजा अमेरिकेशिवाय इतर कोणीही नाही. अमेरिकेतील गुन्हे तपासणी संस्थेने (FBI) अशी चेतावणी दिली आहे की अमेरिकेत सर्वत्र मोठ्या हिंसेच्या घटना घडू शकतात. म्हणजे फक्त कॅपिटल हिलवर हल्ला करून दहशतऴादी थांबणार नाहीत तर देशात सर्वत्र हिंसा आणि अराजकता माजवणार आहेत, हे स्पष्ट आहे. याचे कारण असे की ज्या लोकांनी ट्रम्प यांच्या सांगण्यावरून हिंसाचार माजविला आहे त्यांना सध्याच्या अमेरिकेतील लोकशाही व्यवस्था आणि तिथल्या राजकीय व्यवस्थेत, तिथल्या काळ्या लोकांची भागीदारी नको आहे. ट्रम्प यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले आहे की राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात त्यांची मते विरोधी पक्षाने चोरलेली आहेत, म्हणजे मतदान हा साऱ्या नागरिकांचा समान अधिकार नाही. तो फक्त वंशवादी गोऱ्या लोकांचा अधिकार आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना स्पष्ट सांगितले होते की तुमची पळवलेली मते तुम्ही परत आणा. यासाठी त्यांनी कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. 1861-64 पर्यंत गुलामी प्रथेचे समर्थक आणि विरोधक यांच्यात चाललेले गृहयुद्ध संपले. त्यात  लाखो लोक ठार झाले तरी गुलामी प्रथेच्या बाजूने असलेल्या मानसिकतेतून ट्रम्प यांनी पुन्हा स्पष्टच इशारा दिलेला आहे की भविष्यात तिथले देशभक्त आणखीन मोठ्या ताकदीने असे हल्ले करू शकतील.

आता अमेरिकेने आधी आपल्या देशाची घटना, लोकशाही, समता, उदारमतवादाकडे जास्त लक्ष द्यावे, इतर देशांवर या मूल्यांची जोपासना करण्याच्या बाता मारू नये. खरे पाहता अमेरिकेला या मूल्यांत काहीही रस नाही. त्याला इतर देशांना आधी उद्ध्वस्त करायचे आहे. कोट्यवधींची हत्या करायची आहे आणि मग त्यांना गुलाम बनवायचे आहे. त्यांनी आपल्या देशांतर्गत गुलामी प्रथेला थांबवले असले तरी ती प्रथा त्यांना जगभर रुजवायची आहे, हे साऱ्या राष्ट्रांनी समजून घ्यावे आणि आता तरी अमेरिकेच्या धमक्या, धाकाला भीक घालू नये.

या घटनेसाठी ट्रम्प यांनाच फक्त देशी धरता येत नाही. त्यांच्या कृत्यांना त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. हा ट्रम्प यांचा खाजगी अजेंडा नसून गोऱ्या वंशवादी राजकारण्यांचा तो भविष्याचा कार्यक्रम आहे, ज्याकडे ट्रम्प यांनी स्वतः बोट दाखवले आहे. भविष्यात तिथले देशभक्त म्हणजे गोरे वंशवादी आणखी ताकदीने हिंसक कारवाया करतील तेव्हा अमेरिकेने आता आपल्या देशभक्तांना आवर घालावा, जगभरातील राष्ट्रांची चिंता करू नये. ज्यांनी संसदेवर हल्ला केला होता त्यांनी आपल्या हातात जे ध्वज घेतलेले होते ते तिथल्या गुलाम प्रथेचे समर्थक होते आणि संसदेवर सशस्त्र हल्ला करत असतानाही कॅपिटल हिलवर पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कोणतीच कारवाई केली नाही. त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले नाही. म्हणजे त्यांना त्यांचेसुद्धा समर्थन होते हे स्पष्ट आहे. अशीच घटना आपल्या देशातही घटली होती. बाबरी मस्जिद उद्ध्वस्त होताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. याचा अर्थ अमिरका असो की भारत की आणखीन कोणते राष्ट्र साऱ्या जगात अशा मानसिकतेचे लोक आहेत ज्यांना असे वाटते की सत्ता आणि व्यवस्थेवर फक्त त्यांचाच अधिकार आहे. बाकीच्या सर्व लोकांनी त्यांची गुलामी पत्करावी.

याच मानसिकतेतून आज भारतात अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. ज्या देशातील 70 टक्के जनता फक्त कृषी आणि कृषिसेवांबर जगत आहे त्यांना त्यांच्या व्यवसायातून नामोहरम करण्यासाठी भांडवलदारांच्या सोयीसाठी कायदे केले जातात. त्यामागे अमिरकी वंशवादी भांडवलदारी परंपरेचीच मानसिकता आहे, हे उघड आहे. तसे नसते तर गेल्या दोन महिन्यांपासून लाखो लोकांनी आपली घरेदारे, व्यवसाय-धंदे, शेतीवाडी सोडून रस्त्यावर बसले आहेत त्यांची मागणी मान्य करायला आपल्या सरकारने नकार दिला नसता. आज जे अमेरिकेत घडले उद्या तेच भारतातही घडणार का अशी चिंता सर्वत्र व्यक्त केली जात आहे. तसे काही घडलेच तर मग देशाचे भवितव्य काय असेल याचा सर्वांनाच अंदाज असेल. म्हणून वेळीच याची दखल घेऊन शेतकरी आंदोलनाला साऱ्या नागरिकांनी समर्थन द्यावे. त्यांच्या बाजूने उभे राहावे यातच सर्वांचे हित आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget