Halloween Costume ideas 2015

बटर टोस्ट के साथ चाय


अपार प्रिय, पहाट स्मरणीय, आदरणीय दादासाहेब बारामतीकर  यांच्या --------कमली 'बारामतीकर (धाकटे) नमः' हा मंत्र अपार प्रेमाने अर्पण करतो. तुम्ही कधीतरी परत 'कमळा'वर कृपादृष्टी टाकाल या आशेने तुमच्याशी 'कमळ' हा शब्द जोडला आहे. रुजू करून घ्यावा. यंदाचे दोन दिवसांचे प्रदीर्घ हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आपल्याकडून फोन नाही, पत्र नाही. म्हटलं आपल्याला राग तर आला नाही ना? राज्याच्या राजकारणात बारामतीकरांना दुखावून कसं चालेल? आमचे (आणि तुमचेही बरं का!) देवा नाना नागपूरकर  तुमच्या नावाने गायत्री मंत्र तयार करीत आहेत. हल्ली ते ज्याही गोष्टीसाठी प्रयत्न करतात, ती सारखीसारखी लांबणीवरच पडत जाते. नुसतीच तारीख पे तारीख, तारीख पे तारीख!  तुमच्या वरचा गायत्री मंत्र ही असाच लांबणीवर पडत चालला आहे. तयार झाला की 'मी परत येईन' तुमच्या ----------कमली अर्पण करायला. असो.

तर काय सांगत होतो, की मी तुम्हाला पत्र लिहितोय हे कळल्याबरोबर आमच्या (आणि तुमच्याही बरं का!) देवा नानांनी सांगितले, की दादांनी सभागृहात चुकून झाला असं दाखवून, पण मुद्दामच माझा उल्लेख 'मुख्यमंत्री' म्हणून करून उधोजीराजे मातोश्रीकरांना चिडविल्याबद्दल माझ्यातर्फे त्यांचे अपार आभार माना. ( हो, हल्ली आमचं तुमच्यावर अपार प्रेम आहे, म्हणून आभारही अपारच मानावे लागतील ना?) हल्ली उधोजीराजेंना चिडवणे हा आमचा एकमेव आणि सयुक्तिक (म्हणजे पक्षातर्फेही आणि वैयक्तिक पातळीवरही) कार्यक्रम आहे. आम्ही ठरवलंय आता डिवचायचं नाही (कशाला उगाच परत विषाची परीक्षा?) आता चिडवायचं. आमच्या चंद्रपूरच्या गल्लीत एक भाडेकरू घरच खाली करत नव्हता. मालकाने वाट पाहिली. आज करेल रिकामं, उद्या करेल रिकामं, सहा महिन्यांत करेल, वर्षभरात करेल, पण कसचं काय? बाप तर राहतच होता रुबाबात, पण आता त्याचा मुलगाही मालकीहक्काने त्याच घरात कायमचा राहतो की काय असं वाटू लागलं. शेवटी मालकाने त्याला येताजाता चिडवायला सुरुवात केली; आणि त्या चिडवण्याला वैतागून त्या भाडेकरूने घर सोडले! प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. अहिंसक आहे म्हणून करून पहायला काय हरकत आहे असे आमच्या (आणि तुमच्याही बरं का!) देवा नानांच मत आहे. तुमचं काय मत आहे ते कळवावं. (गुप्तता पाळू. 'त्या पहाटे'सारखी.) हेही असो.

तर काय सांगत होतो, की माझ्या भाषणात अडथळा आणणारा पुढच्या वेळी निवडून येत नाही हे माझं परवाचं सभागृहातलं बोलणं तुम्ही असं अंगावर घ्यायला नको होतं आणि त्यासाठी मला आव्हान दयायला नको होतं. दादा, आमचं तुमच्यावर अपार प्रेम आहे. ('वरून' तसा आदेशच आहे!) कोणाचे कणभर जरी उपकार असले तरी त्याचे मणभर आभार मानावेत, अशी आमच्या पक्षाची संस्कृती आहे. आपले तर आमच्यावर ८० तासापुरते का होईना पण मणभर उपकार आहेत. त्यामुळे आम्ही आपले टनभर आभारी आहोत. यात कणभरही शंका ठेवू नका. (मागच्या उपकराबद्दल आभार मानतांना पुढच्या उपकारासाठी बीज पेरणी करून ठेवावी, ही आमची पद्धत आहे.) खरं तर आपण आजच्या राजकारणातले श्रीकृष्णच आहात. श्रीकृष्ण ज्यांच्या बाजूने असतो ते संख्येने कमी असले तरी जिंकतात. महाभारतात श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने उभा राहिला होता. पांडव जिंकले होते. आता  कालियुगातला श्रीकृष्ण कौरवांच्या बाजूने उभा राहिला. आता कौरव जिंकलेत! तुम्ही जरी तुमच्या आमदारांचा विश्वास ८० तासांपेक्षा जास्त टिकवून ठेवू शकला नाही, तरी आमचा तुमच्यावर अपार विश्वास आहे. देव कोणाला कोणत्या रुपात दर्शन देईल काही सांगता येतं का? आम्हाला 'रणछोडदास' भेटला. पुन्हा हेही असो.

तर काय सांगत होतो, की जेमतेम दोन दिवसांचं अधिवेशन आणि त्यातही आपण एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसलो. हे काही योग्य झालं नाही. पुढचे अधिवेशन आपण (म्हणजे तुम्ही आणि आम्ही मिळून बरं का!) चांगले महिनाभराचे घेऊ. घ्यायचं ना? तुमचं मत कळवा. फार घाई नका करू. आमचे (आणि तुमचेही बरं का!) देवा नाना दिल्लीला शिफ्ट होईपर्यंत थांबलात तर बरं होईल. कसं? पुन्हा हे ही असोच असो.

आपला

               सुधीरभाऊ चंद्रपूरकर

सुधीर भाऊ,

तुमचे 'बटर टोस्ट के साथ चाय' छाप पत्र मिळाले. वऱ्हाडी माणसं बोलण्यात आणि खाण्यात अघळपघळ असतात हे नुसते ऐकूनच नाही तर पाहूनही माहीत होते, (आता नावं सांगायला नका लावू त्या ठिकाणी.) पण त्या ठिकाणी ती पत्र लिहिण्यातही अघळपघळ असतात हे तुमचं पत्र वाचून कळलं. कशाला उगीच म्हागं पडता? आरं आपलं वय काय? आपण करतो काय? थोडा तर त्या ठिकाणी विचार करायचा. अशी पत्रं लिहून सत्ता मिळते का कुठं? उगाच आपलं कायतरी करायचं. तुम्हचा, काय तो गायत्री मंत्रही तिकडंच ऱ्हावू द्या म्हणावं तुमच्या (आणि तुमच्याच बरं का!) देवा नानांना. मी ज्या गोष्टी कम्प्लिट विसरलो आहे त्या गोष्टींची परत परत आठवण का म्हणून देता, त्या ठिकाणी?

मी पत्र संपवतो, तुम्ही विषय संपवा.

दादा बारामतीकर


- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक, 

संपर्क-७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget