Halloween Costume ideas 2015

Weekly Shodhan

Latest Post

गेली काही वर्षे सातत्याने महाराष्ट्र राज्यातून सर्व जिल्हाभर मराठा समाजाचे आरक्षणासह अनेक मागण्यासाठी अंदोलने सुरू होती, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात विराट मुक मोर्चे काढून  मराठा समाजाने शांततेने सरकारविरोधी अंदोलन कसे करावे याचा आदर्श घालून दिला. या महामोर्च्यांनी आजपर्यंतच्या सर्व आंदोलनांचे विक्रम मोडीत काढले. विशेष म्हणजे आजपर्यंत 
कोणीही एवढ्या प्रचंड संख्येने आणि ते ही न बोलता, घोषणाबाजी न करता एवढ्या महाप्रचंड संख्येचे मोर्चे काढल्याचे कधीही कुणीही आणि कुठेही पाहीलेले नव्हते. या संपूर्ण महामोर्चामध्ये मुस्लिम समाजाने मराठा समाजाविषयी बंधूभाव दाखवून सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे.गेली अनेक वर्षे मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी असून तेही सध्या रस्त्यावर आले आहेत. आपल्या देशाचा मुस्लिम समाज हा देखील एक महत्वाचा घटक असून त्यांची एकूणच सामाजिक परिस्थिती पाहता त्यांना आरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.
या महामोर्च्यांमध्ये मराठा समाजातील वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, उद्योजक, शेतकरी, तरूण वर्ग, महिला वर्ग प्रचंड संख्येने सामील झाले होते. मराठा समाजातील तरूण व तरूणींचा  जोश वाखणण्याजोगा होता. या महामोर्च्यांमध्ये सर्वच पक्षातील मराठा समाजातील राजकीय नेते-समाजबांधव एकवटून संघटीत झाले होते. मात्र प्रस्थापित राजकीय नेत्यांविषयी  कमालीचा असंतोष असल्यामुळे मराठा समाजातील नव्या नेतृत्वाने व कार्यकर्त्यांनी अशा राजकीय नेत्यांना या
मोर्च्याच्या पुढारपणापासून जाणिवपूर्वक दूर ठेवले होते. हे प्रस्थापित राजकीय नेते या अवाढव्य शक्तीसमोर निष्प्रभ झाल्याचे चित्र दिसत होते, सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच हे राजकीय  पुढारीही या मोर्च्यात सामील झाल्याचे दिसत होते. अशा पुढाऱ्यांना भाषणाची तर संधी दिलीच नव्हती, पण त्यांची नेहमी दिसणारी मिरवून घेण्याच्या वृत्तीला ही मुरड घालण्यात आली  होती, पाच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्याचा प्रघात पाडून एक वेगळीच स्वागतार्ह  कल्पना राबवली होती. एकंदरीत या ठिकठिकाणच्या लाखोंच्या संख्येने निघालेल्या शांतताप्रिय महामोर्च्याने महाराष्ट्रासह देशाला एक आदर्श घालून देऊन नवा विचार व नवी दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न  केला; पुढे मराठा समाजाच्या या महामोर्च्यांची इतर समाजानेही नक्कल करण्याचा प्रयत्न केला!
अर्थात शांत व संयम दाखवित आपल्या रास्त मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात महाराष्ट्रातील मराठा समाज यशस्वी झाला आहे; कुठलीही शेरेबाजी नाही, कुठलाही वादविवाद नाही,  इतरांना कुणाला त्रास होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेऊन काढलेल्या महामोर्च्यांचे अनेकांनी स्वागत केले, कधी नव्हे ते मराठा समाजाचे अनेकांनी कौतुक ही केले, मोर्चातील  शिस्त, संयम आणि त्यानंतरची स्वच्छता याची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली व संयोजकांचे अग्रलेखांतून कौतूकही केले, या सगळ्यांचा परिणाम असा झाला की, सरकारला याची प्रत्कर्षाने दखल घ्यावी लागली, ‘‘आता केलंच पाहिजे, अन्यथा पुढच्या निवडणुकीला सामारे जातांना या समाजाला आपण तोंड दाखवू शकणार नाही. ही भावना राज्यकर्त्यांमध्ये निर्माण  झाली होतीच. याचाच परिणाम म्हणजे सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहवाल मागविला होता, या आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक  मागासलेपणाचा अभ्यास करून गुरूवारी सरकारला आपला अहवाल सादर केला, या अहवालाद्वारे मराठा समाजास आरक्षणासंबंधी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलपेणाचे निकष लागू होत असल्याने मराठा समाजास आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात तशी आशयाची शिफारस केल्यामुळे १५ दिवसांत सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी (३० नोव्हेंबर)  खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजासाठी आरक्षणाची घोषणा करणार आहेत; अशी माहिती उच्च पदस्थ सुत्रांनी प्रसार माध्यमांना कालच दिली आहे;
सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाचा हा अहवाल तसा जाहीर केलेला नाही; मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला मागास प्रवर्गात समाविष्ट करत सरकार १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केलेली आहे असे समजते; इतर मागासवर्गाच्या (ओ.बी.सी.) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण  देता येईल असेही या आयोगाने सुचविल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
अर्थात या वृत्तामुळे मराठा समाजातील गरीबांची, वंचित घटकांची न्याय मागणी मान्य करून या आयोगाने एक प्रकारे सामाजिक समतेच्या दिशेने स्वागतार्ह पाऊल टाकले आहे. सरकारनेही आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा जपावा; गेल्या ४०-५० वर्षापासून मराठा समाजाची ही मागणी आहे. या न्याय व उचित मागणीला फडणवीस सरकारने तात्काळ मान्यता द्यावी आणि एका मोठ्या व महत्वाच्या घटकाच्या विकासाचे पाऊल उचलावे; सरकारने या मध्ये चालढकल केल्यास अथवा मराठा समाजाचा विश्वासघात केल्यास भवितव्यात त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळणार असून सत्तेतून पायउतार करण्याची ताकद एकट्या मराठा समाजात आहे, याची जाणीव ठेवावी आणि आरक्षणाची दीर्घपल्ल्याची लढाई सपुष्टात आणावी, तसचे तसचे गेली अनके वर्षे मुस्लिम समाजाचीही आरक्षणाची मागणी असून त्यांनीही सनदशीर मार्गाने आपल्या समाजाच्या  व्यथा सरकारसमोर मांडल्या आहेत. अलिकडेच मुस्लिम समाजसुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असून सरकारने त्याकडे सहानुभूतीने लक्ष घालून त्यांचाही प्रश्न निकाला  काढावा,असे आम्हास सुचवावेसे वाटते.

- सुनिल कुमार सरनाईक
7028151352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

सध्या देशात नामांतराचे वादळ खूप सोसाट्याने धावत चालले आहे. याचा आरंभ उत्तर प्रदेशच्या योगी महाराजांनी केला. इलाहाबादचे सरळ प्रयागराज करून टाकले आणि हे लोण आता महाराष्ट्र व गुजरातमध्येही आले आहे. याचा अर्थ सत्ता हातात आली की मनाला येईल ते करता येते! विशिष्ट वर्गाला वाटेल तशी वागणूक देऊन त्याचा उपमर्द करता येतो. तथापि हेच  ध्येय धोरण उराशी बाळगून सत्तेचा, उच्च पदाचा गैरवापर करून जर एखाद्याला मनसोक्त आनंद लाभत असेल तर तो थोड्या दिवसांचा आनंद ठरतो. कालचक्राच्या प्रवाहात केवळ  तेच टिकून राहते जे जनसामान्यांच्या हित-कल्याणाचे असते. अकबराने आपल्या शासनकाळात ‘दीने इलाही’ नावाचा धर्म स्थापन केला. जी हुजूरी करणाऱ्या लोकांनी अकबराला खूश  करण्यासाठी हा नवीन धर्म स्वीकारला, पण कालांतराने अकबराच्या निधनानंतर त्याने स्थापन केलेल्या धर्माचेही निधन झाले. आज तो नावालाही उरला नाही.
नामांतर करताना सत्ताधारी मंडळी एक गोष्ट खूप कटाक्षाने पाळतात ती म्हणजे मुस्लिमांचा नामनिर्देश करणारी नावे तेवढी बदलावीत. मुस्लिम राज्याकर्त्यांचे प्रतीक असलेली नावे म्हणून परकियांची नावे नकोत हा युक्तिवाद मांडून मनाजोगते करून घ्यायचे! मुस्लिमद्वेष इतका विकोपाला गेला आहे की मुस्लिम नावदेखील नकोसे झाले आहे. वस्तुत: देशाला आज  एकात्मतेची, एकसंघत्वाचेी नितांत गरज आहे. आर्थिकदृष्ट्या देश डबघाईला आलेला आहे. कष्टकरी सर्वसामान्य जनतेचे वाढत्या महागाईमुळे अतोनात हाल होत आहेत. नापिकी, पुरेसा  पाऊस न पडल्यामुळे आणि सावकारी कर्जाचा डोंगर शिरावर असल्यामुळे अगतिक झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी आणि वाईट व्यसनांच्या आहारी जाऊन  वाममार्गाला लागलेल्या तरुणांची वाढती गुंडगिरी, अवैध मार्गाने भरपूर पैसा कमविण्याची लालसा, स्त्रीयांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण, दुर्गम अशा पर्वतीय क्षेत्रात आदिवासी बालकांचे  होत असलेले कुपोषण, जातीधर्माच्या नावाखाली विभिन्न समाजांत वाढत जाणारे वैमनस्य व तिरस्काराची भावना, अराजकता वगैरे प्रश्न ज्वलंत समस्यांच्या रूपाने समोर उभे असता  उठसूट शहरांची नावे बदलण्याचा सपाटा चालवण्यात कोणते जनहित साध्य केले जाणार आहे? केवळ आपला धर्म, आपली जात वर्चस्वशाली राहावी, सर्वांवर आपले अधिपत्य गाजवले जावे यासाठी हा अट्टाहास तर नव्हे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आपल्या राजकारणासाठी, सत्ता हस्तगत करून शिवरायांच्या नावाचा सोयिस्कर वापर करून मुस्लिमद्वेषाला खतपाणी घालण्याचा उद्योग  करणाऱ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी की छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तित्व इतके उत्तुंग आणि उदात्त होते की मुस्लिमांचा अकारण द्वेष करण्याची भावना त्यांच्या  लष्करात मोठमोठ्या पदांवर मुस्लिमांची नियुक्ती त्यांनी केली नसती. स्वत: त्यांचा अंगरक्षक एक मुस्लिम होता, हे ऐतिहासिक सत्य आहे. एखाद्या विशिष्ट समुदायाला सतत पररका,  म्लेंच्छ आणि देशद्रोही संबोधून हिणवत राहिल्याने त्यांच्या मनात तुमच्याविषयीची आदरभावना टिकून राहील का?
जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपीयर च्या कथनानुसार ‘व्हॉट्स इन नेम?’ अर्थात नावात काय आहे? सूर्याला विविध भाषेत वेगवेगळी नावे आहेत. त्याला कोणी भास्कर म्हणतो,  कोणी इंग्रजीत ‘सन’ म्हणतो, कोणी शम्स म्हणतो. आता नावे भिन्न भिन्न असली तरी सूर्याचा चंद्र होत नाही. सर्वार्थाने तो सूर्यच गणला जातो.
आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या परंपरा याचा सर्वांनाच स्वाभिमान असतो आणि तो असायलाही हवा, कारण याच माध्यमान्वये आपली ओळख होत असते. तथापि याचा अर्थ  ‘आपलं ते बाळ अन् दुसऱ्याचं ते कार्टं’ या न्यायाने इतर जातीधर्मांच्या लोकांना सापत्न वागणूक देणे, त्यांच्यासाठी अवमानपूर्ण शब्दांचा प्रयोग करणे, किंबहुना त्यांना परके आणि देशद्रोही ठरविणे असा मुळीच नाही. भारत देश, जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की ज्यात फार पूर्वीपासून अनेकविध जातीधर्मांचे आणि पंथसंप्रदायांचे लोक गुण्यागोविंदाने हात  आले आहेत. सर्वांची आस्था आणि श्रद्धा भिन्न, आचरण भिन्न, विचारधारा भिन्न, भाषा भिन्न, धार्मिक विधी भिन्न; पण असे असले तरी सर्व भारतीय या नावानेच ओळखले जातात.  परदेशात गेलेल्या इसमाला कुणी त्याचे गोत्र, कुळ, जात, धर्म विचारत नाही. पुढे त्याच्या आचारविचाराने तो नेमका कोण ते कळतं, तरीही तो भारतीय आहे ही ओळख कायम राहते.
अवकाळी पाऊस पडावा तसं नामांतराचं अवकाळी घोंघावणारं वादळ, बहुसंख्यकांच्या भावनांना हात घालून आपल्या वर्चस्वाचा टेंभा मिरवण्याच्या हेतूने उठवलं गेलं आहे. अन्यथा  नामांतर केलेल्या आणि काही प्रस्तावित शहरांचे असंख्य हिदू बांधव पूर्वीच्या नावालाच पसंती देतात. ज्याप्रमाणे हिंदुस्थानात जन्मलेला आणि वास्तव्य करीत असलेला मुस्लिम,  खिश्चन धर्मिय, हिंदू ठरत नाही तद्वतच हैद्राबाद, उस्मानाबाद किंवा औरंगाबादमध्ये जन्मलेला, वास्तव्य करीत असलेला हिंदू हा मुस्लिम ठरत नाही. दुसऱ्यांना धर्मांध, जात्यांध ठरविणाऱ्या विवेकहन विद्वानांनी आपण स्वत: काय करतोय याचेही भान राखावे.
स्नेह सलोख्याने राहाणाऱ्या दोन भिन्न धर्मियांच्या दरम्यान अकारण वैर निर्माण करून आणि देशभरात द्वेषतिरस्काराचे वातावरण पसरवून सत्ताप्राप्तीचे शिखर सहजगत्या सर करण्याचे तंत्र ज्या सत्तापिपासू मंडळीला अवगत आहे, त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘‘देशाचा संसार आहे शिरावरी, ऐसे थोडे तरी वाटू या हो’’ ही उक्ती सदैव स्मरणात
राखावी.
सत्ताधाऱ्यांनी नको ते उपद्व्याप करण्यापेक्षा देशापुढे असलेल्या ज्वलंत आणि अतिमहत्त्वपूर्ण समस्या सोडविण्यास अग्रक्रम दिला पाहिजे. केवळ जातीधर्माचे राजकारण करून देशाला  उन्नतीच्या व सुखसमृद्धीच्या शिखरावर नेता येईल आणि आपला सत्ताधिकार कायम टिकून राहील अशी कल्पना करणे म्हणजे स्वप्नलोकात वावरणे होय.
खरे पाहता, आज देशाला एकजुटीची नितांत गरज आहे. आमच्या पूर्वजांनी हिंदूमुस्लिम, आपला-परका असा कुठलाही भेदभाव न पाळता एकजूट होऊन इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला  मुक्त केले. तद्वतच स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीत, उत्कर्ष व उन्नतीत सर्वांचाच सहभाग आहे. या संदर्भात कोणा एकाला डावलून चालणार नाही. हा देश सर्वांचाच आहे.  अर्थात सर्वांनी मिळून देशाला सर्वतोपरी समृद्ध करण्यासाठी, जगभरात भारताची मान उंचावण्यासाठी तन मन धन अर्पण केले पाहिजे. हितशत्रू आडवे येत असतील तर वेळीच त्यांचा  उपाय केला पाहिजे. कारण न्याय जर खऱ्या अर्थाने न्याय असेल तर शांती व सुबत्ता आपसुक येते, तथापि अन्यायाचा अतिरेक देशात अराजकता माजवितो.

-शफी अन्सारी, धुळे,
मो.: ९१५८९८२३१३

विजापूर रोडवरील संभाजी तलावनजीक संस्था काढून विटभट्ट्या आहेत. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी १९७५ साली ३ वर्षांच्या भाडेपट्ट्याने ७ एकर जागा दिली. परंतु भाडेपट्ट्याची मुदत कधीच  संपली आहे व लगतच्या १७ एकर जागेवर विटभट्टीवाल्यांची अतिक्रमणे आहेत. जागा, विटभट्टी माती रॉयल्टी-दंड वगैरे गेल्या १५ वर्षांपासून भरत नाहीत ते आजतागायत. कोट्यवधी रुपयांचा महसूल या संस्थेने बुडवला आहे. सहकार खात्यास माहिती न देता तीन पोटभाडेकरू ठेवून संस्था २० वर्षांपासून लाखो रुपये कमावत आहे. सहकार खात्याचे नियम संस्था  पाळत नाही. एकाच कुटुंबातील अनेकसदस्य नोंद संस्थेत आहेत. शर्तभंग संस्था आहे. सहकार खात्याने त्वरीत संस्था मान्यता रद्द करावी. तलाव प्रदूषित होत आहे. महापालिका आरोग्य  विभागाने याकामी लक्ष घालावे. अनाधिकृत नळजोडणी व वीजजोडणी गेल्या कित्येक वर्षांपासून खुलेआम सुरू आहे. अनेक गैरप्रकार या विटभट्ट्यांत घडतो. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी,  महापालिका आयुक्तांनी सदर विटभट्ट्या कायमच्या बंद कराव्यात, अशी जनतेची मागणी आहे.

- श्रीशैल पाटील, सोलापूर

देशाचा निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा अमूल्य वेळ, अयोध्याचा मुद्दा रेटून व्यर्थ घालवीत आहेत. संविधानाला मानणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनतेसाठी मंदीर- मस्जिदीचा तोडगा न्यायालयातून सुटावा, याहून अन्य पर्याय नाही. अयोध्येचे वादग्रस्त प्रकरण न्यायालयाबाहेर सोडविण्याचा प्रयत्नांचा कसा चोथा झाला आहे. शिवसेनेने महागाईत,  औषध व शिक्षणात सध्या होरपळून निघणाऱ्या गरीब व असहाय जनतेसाठी एखादा ठोस कार्यक्रम आपल्या पक्षाच्या विषयपत्रिकेवर घेण्याची गरज नाही काय? भावनिक मुद्द्यावर  कोणताही राजकीय सुज्ञ जनतेपुढे फार काळ टिकत नाही. म्हणूनच भाजपने ‘सबका साथ व सबका विकास’ या राष्ट्रीय ऐक्य साधणाऱ्या धोरणावर सत्ता संपादित केली नव्हती काय?

- निसार मोमीन, पुणे.

‘इमाम-उल-हिंद मौलाना अबुल कलाम आझाद’ हा लेख (शोधन, १६-२२/११/२०१८) वाचला. देशाची फाळणी झाली तेव्हा कुलीन, सधन, उच्चशिक्षित आणि सत्तेची गोडी चाखलेले  मुसलमान पाकिस्तानात गेले आणि हातावर पोट भरणारे बहुजनवर्गातून धर्मांतरित झालेले मुसलमान भारतात राहिले. पाकिस्तानकडे प्रयाण करणाऱ्या स्वार्थी मुसलमानांनी आपल्या  जहागिऱ्या, वतने, महाली सर्व संपत्तीचा त्याग केला. भारतात राहणाऱ्या उर्वरित बांधवांचा विचार केला नाही. काळ जातीय दंगलींचा होता. मौलाना आझाद यांनी फाळणी व स्वातंत्र्य  दोन्ही अनुभवले. बहुसंख्याक हिंदू बांधवांपुढे मुसलमानांची काय गत होईल, त्यासाठी मुसलमानांसाठी त्यांनी कोणतीच योजना आखली नाही. त्यांनी सीलबंद पाकिटात काही पाने लिहून  ठेवली, तीन दशकांनंतर त्यांच्या इच्छेनुसार ती उघडण्यात आली. त्यातही राजकीय हेवेदावे याशिवाय काहीच नव्हते. आंबेडकरांनी मुस्लिमांसाठी आरक्षणाची सोय केली होती व  मौलानांना तसे सूचित केले होते. पण मौलाना आझादांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नेहरूंच्या हाकेला हो भरत राहिले. मौलाना शिक्षणमंत्री होते तरीही मुसलमान मागास राहिले. काही मंडळी मौलाना आझादांना केवळ ‘शोपीस’ म्हणून हिनवितात याच कारणाने. मौलानांनी स्वातंत्र्यासाठी आणि भारतासाठी आयुष्य वेचले, यात शंका नाही. म्हणून तर ते भारतरत्न आहेत. मात्र  मुसलमानांची सध्याची अवस्था बघता ते पण जबाबदार नाहीत काय? असा प्रश्न पडतो.


- निसार मोमीन, पुणे.

‘पाश्चिमात्य देशांना इस्लाम का आवडत नाही’ हा लेख (शोधन, ९-१५/११/२०१८) एम. आय. शेख यांनी खूप चांगला लिहिला आहे. इस्लामी आणि पाश्चात्य संस्कृतीतला फरक त्यांनी  उत्तमरितीने मांडला आहे. हा लेख मुसलमान युवकयुवतींचे डोळे उघडणारा आहे. तसेच मुस्लिमांना इस्लामचे वैशिष्ट्य समजावून सांगणारासुद्धा आहे. पाश्चात्य देशात शुद्ध इस्लामची  विचारधारा मांडणारे मुस्लिम विद्वान असल्याने इस्लाम स्वीकारणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तर दुसरीकडे भारत-पाकिस्तान-बांगलादेश यासारख्या देशांत प्रचंड मुस्लिम  संख्या असतानाही इस्लामला अगदी अल्प प्रतिसाद आहे. याचे कारण इस्लामच्या शिकवणीत झालेली भेसळ व सरमिसळ आहे. पवित्र कुरआन आणि हदीसचा आधार सर्व विद्वान घेत  असले तरी स्वत:च्या सोयीच्या हदीसवचनांचा आधार घेताना दिसतो. बुखारी, मुस्लिम, तिर्मिजी, अबूदाऊद व इब्ने माजा यासारख्या सप्रमाण हदीसग्रंथांवर अंमलबजावणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा पंथाची व इमामांची आडकाठी लावली जाते. इस्लामच्या प्रगतीत हाच मोठा अडथळा आहे. संपूर्ण हदीसवचने न स्वीकारता पंथानुरूप व इमामसुसंगत हदीसींना  स्वीकारले जाते. मग संपूर्ण इस्लाम कळणार कसा? अर्धवट इस्लामच्या सादरीकरणाने समाजाची वाढ खुंटली आहे आणि इस्लामची सुद्धा. 

- निसार मोमीन, पुणे.

माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर (र.) कथन करतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्या पूर्वीच्या उम्मतचा (जनसमूहाचा) दुर्वर्तक आजार - कलह आणि इष्र्या - तुमच्यात  सुद्धा दाखल होईल. कलह तर मुळासकट उपटून फेकणारी वस्तू आहे; ती केसांचे नव्हे तर धर्माचे मुंडन करते. शपथ आहे त्या ईश्वराची - ज्याच्या ताब्यात माझे प्राण आहे, तुम्ही  जन्नतमध्ये (स्वर्गात) दाखल होऊ शकणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही ‘मोमिन’ (श्रद्धावंत) होणार नाहीत आणि तुम्ही ‘मोमिन’ होणार नाहीत जोपर्यंत आपसातील मेलमिलाप आणि प्रेम व  बंधूभाव असणार नाही. मी तुम्हाला सांगू की हे आपसांतील प्रेम कसे निर्माण होते? अस्सलामु अलैकुमच्या प्रचलनामुळे.’’ (तऱगीब व तरहीब)

स्पष्टीकरण-
‘सलाम’चा अर्थ ‘सलामती’ अथवा ‘कृपा’ असा होतो. जेव्हा आपण हे प्रेमळ व कृपाळू उद्गार लोकांसाठी काढतो, तेव्हा जणू असे म्हणतो व कामना करतो की, हे बंधू! तुमच्यावर  ईश्वराची सलामती (अर्थात कृपा व दया असो व तुम्हास प्रत्येक संकटापासून ईश्वर सुरक्षित ठेवो) तसेच या सलामच्या उत्तरादाखल तो सुद्धा तुमच्या सलामतीची कामना करतो. मग  विचार करा की मुस्लिम समाजात जर सलामची परंपरा प्रचलित असल्यास कलह निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच या उद्गाराद्वारे आपण याचे आवाहन करतो की, तुम्ही  माझ्याकडून आपले प्राण, संपत्ती व इभ्रतीच्या बाबतीत सुरक्षित आहात आणि सलामचे उत्तर देणारा देखील प्रती उत्तरात याच सुरक्षा जमिनीची हमी देतो.

मानवाधिकाराचे महत्व

सर्वांची माता माननीय आयेशा (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कर्म-सुची मध्ये नोंद होणारे पाप तीन प्रकारचे असतील. प्रथम हे की, असे पाप ज्याला ईश्वर अजीबात माफ करणार नाही. ते शिर्क (अनेक ईश्वरांना पूजणे) आहे. पवित्र कुरआन ग्रंथात सूरह- ए-निसाच्या आयत क्र. ४८ मध्ये सांगिलतले की, ‘‘निस्संदेह ईश्वर ते पाप कधीच  माफ करणार नाही की, (त्याच्या जातीत, गुणधर्मात व अधिकारात) कोणाला ही त्याचा वाटेकरी ठरविण्यात यावा.’’
द्वितीय प्रकारचे पाप असे आहे की ज्याचा संबंध माणसांच्या अधिकारांशी आहे. जोपर्यंत अत्याचार पिडीतास अत्याचारीकडून त्याचा पूर्ण अधिकार मिळत नाही, तोपर्यंत ईश्वर  अत्याचारीस मुक्ती देणार नाही.
आणि तृतीय प्रकारचे नोंदणीकृत पाप ते आहे ज्याचा संबंध ईश्वर व मानवाशी आहे. हे मात्र ईश्वराच्या हवाली आहे. (तो त्याच्या ज्ञान आणि तत्वदर्शितानुसार) वाटेल त्या पापीस शिक्षा  देईल किंवा वाटेल त्या अवज्ञाकारीस माफ करील.
(हदीस : मिश्कात)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget