Halloween Costume ideas 2015

१४ जुलै ते २० जुलै

संपादकीय
एक देश, एक टॅक्स आणि एकच गुन्हा ‘मॉब लिचिंग’
राष्ट्रपतींना कायदा व सुव्यवस्थेची चिंता आहे तर पंतप्रधानांना भ्रष्टाचाराची! देश मॉब लिचिंग आणि भ्रष्टाचारमुक्त कसा केला जाईल? याबाबत दिल्ली येथील ३० जून २०१७ च्या मध्यरात्री जी.एस.टी. (वस्तू व सेवा कर) लागू झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दोघांच्या भाषणांमध्ये संदेश होते. ‘एक देश, एक टॅक्स’ हे जी.एस.टी.चे स्लोगन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याला ‘गुड अँड सिंपल टॅक्स’ असेही म्हटले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील जी.एस.टी.बाबत वैयक्तिक आनंद व्यक्त केला असला तरी त्यांची चिंता मात्र वेगळीच आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून थेट आम जनतेशी संवाद साधला होता, तर पंतप्रधानांनी चार्टर्ड अकाऊटंटशी. देशात लोकांच्या समूहांद्वारे होत असलेल्या हत्याकाडांच्या विरोधात राष्ट्रपतींनी आपला राग व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘जमावाद्वारे हत्याकांडाच्या घटना वाढतात आणि अनियंत्रित होतात तेव्हा आम्हाला थांबून विचार करण्याची आवश्यकता आहे की खरचं आम्ही जागृत आहोत काय? हीच वेळ आहे की जेव्हा आम्हाला आणखीन सावध व्हायला हवे. आपल्या देशाच्या मूळ सिद्धांतांना कसे वाचविता येईल यावर विचार करायला हवा.’ मात्र मोदींना देशाची तिजोरी कशी भरता येईल याचीच फार चिंता लागल्याचे त्यांच्या भाषणावरून दिसून आले. त्यांनी देशात जी.एस.टी. लागू करून एक ऐतिहासिक पाऊल उचलल्याचा त्यांना अत्यानंद झालेला आहे. दुसरीकडे त्यांच्याच कार्यकाळात जमावाद्वारे होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांना दिसत नाही. राष्ट्रपती पुढे म्हणतात, ‘निरंतर सावध राहणे यातच स्वातंत्र्याचे मूल्य आहे. ही जागरुकता कधीही अदृश्य होऊ शकत नाही. आम्हाला सक्रीय व्हायला हवे. खरे तर जागरुकता हीच सद्यकाळाची गरज आहे.’ खरेच आहे. देशात सध्या जमावाचे रूपांतर एका क्रूर झुंडीमध्ये होऊ लागले आहे. त्यामुळे आमच्या अंतर्गत रक्षण कमी भीतीची भावना अधिक निर्माण होऊ लागली आहे. झुंड एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था निर्माण करू लागली आहे त्यास आपण ‘झुंडशाही’ म्हणू शकतो. या व्यवस्थेची कसलीही विचारधारा नसते. ती कधीही कुठेही आणि कोणत्याही गोष्टीवर आक्रमक होत असते. एखाद्याबाबत तिला घृणा वा द्वेष वाटू लागला तर ती तत्क्षणी त्यास शिक्षा देण्याचा निर्णय घेत असते. सध्या या झुंडशाहीने अनेक निरपराधांचे प्राण घेतले आहेत. या अराजकतेच्या वातावरणाची निर्मिती काही संधीसाधू असामाजिक तत्त्वांनी केली आहे. त्याद्वारे काहीजण आपला राजकीय फायदाही घेऊ इच्छितात. सध्या देशात विविध गटांना व समाजांना आपसांत लढविले जात आहे. राष्ट्रवाद, गोरक्षा यासारख्या भावनांना खतपाणी घातले जात आहे, जेणेकरून लोकांनी आपसांत भांडत राहावे आणि राजकीय पक्षांनी त्यांच्यावर राज्य करावे. हा खरे तर ‘फोडा आणि राज्य करा’ याचाच प्रयत्न आहे. लोकांचा जमाव कायदा हातात घेऊ लागला आहे. हे सर्व लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या दुर्लक्षामुळेच घडत आहे. या गंभीर आणि रोगग्रस्त मानसिकतेवर वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे. सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन देशातील एकात्मता अबाधित राखण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या आरोपीऐवजी पीडितावरच कारवाई होताना दिसत आहे. हा समाज व संविधानावरील हल्ला आहे, भारतीय परंपरेवर हल्ला आहे. आपल्या देशात द्वेषाबाबत सहमती नाही हा प्रत्येक धर्माशी विश्वासघात आहे. जेव्हा हिंसाचार माजतो तेव्हा दुष्टपणा आपोआप बाहेर येत असतो. लोकांना यशस्वी व सार्थक बनण्याचा मार्ग सापडेनासा झाला आहे. ते आपल्या वैयक्तिक जीवनात आर्थिक समस्या, अन्याय, भेदभावाला बळी पडले आहेत. आता त्यांना वाटते की आम्ही काहीही करू शकत नाही, तर मग एवढे तर करू शकतो, मग ते आक्रमक होतात आणि हिंसाचारात त्यांना त्यांचे प्रतिफळ दिसू लागते. भारतीय एकात्मकतेसाठी ही एक भयानक स्थिती आहे. न्यूयॉर्कमधील एका अध्ययनाद्वारे सिद्ध झाले आहे की जेव्हा आत्महत्येची बातमी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापली जाते तेव्हा त्याचे अनुकरण झाल्याचे दिसून आले. विध्वंसक बातम्यांची लोक लवकर कॉपी करतात. प्रसारमाध्यमेदेखील नकारात्मक बातम्यांना अगदी भडकाऊ बनवितात. सामान्य लोक मुख्य प्रवाहातील मीडियाला आपला आदर्श मानून, त्या बातम्या पाहून, वाचून अथवा एखाद्या बातमीला मिळालेला प्रतिसाद पाहून आपला आदर्श निवडतात. लोकांमध्ये स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची भावनादेखील याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे हा हल्लेखोर जमाव आगामी काळात आत्मघाती ठरू शकेल. ‘मॉब लिचिंग’वर अंकूश लावण्यासाठी, लोकांमधील अंतर्गत संवेदना जागृत करण्यासाठी देशातील सांस्कृतिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा. देशाची एकात्मता अबाधित राखण्यासाठी त्यांचे हे पाऊल निश्चितच सराहनीय ठरेल.
      -शाहजहान मगदुम

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget