Halloween Costume ideas 2015

व्यभीचार आणि समलैंगिकता

व्यभीचार हा फौजदारी गुन्हा नाही, समलैंगिकता हा पण फौजदारी गुन्हा नाही, मग कााय विवाह फौजदारी गुन्हा आहे?
6 सप्टेंबर 2018 ला सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधाला ’गुन्हेगार कृत्या’ बाहेर काढले. 27 सप्टेंबर 2018 ला, ”व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही” असा ऐतिहासिक निकाल दिला. या दोन्ही निकालांनी समाजासमोर असा प्रश्‍न उभा केला आहे की, जणू विवाह करणे हाच ”फौजदारी गुन्हा” आहे. ’व्यभिचाराला गुन्हा मानणारे कलम 497 भादंवि’ घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने म्हटले असून, ”स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हक्कावर’ शिक्कामोर्तब केले आहे. आयपीसीतील कलम 497 मुळे महिलेची स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख संपुष्टात येते आणि ती नवर्‍याची मालमत्ता बनते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. कलम 497 रद्द करतानाच, गुन्हेगारी दंड संहितेतील कलम 198 ही घटनाबाह्य ठरविण्यात आले आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्या.अजय खानविलकर, न्या.आर.एफ. नरीमन, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा या पाच न्यायाधिशांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
    जोसेफ शाइन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून, विवाहबाह्य संबंधा संदर्भातील या तरतुदीला आव्हान दिले होते. यास सरकारचा विरोध होता. सरकारचे म्हणणे होते की, व्यभिचार गुन्हाच गणला जावा अन्यथा विवाहाचे पावित्र्य संपुष्टात येईल आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होईल. 497 कलमामुळे देशातील विवाहसंस्था टिकून आहे. हे कलम काढल्यास विवाहसंस्था कमकुवत होईल, असे सरकारने सांगितले होते.
    लैंगिकता - विवाह, समलैंगिकता आणि व्यभिचार या तिन्ही कृतींमध्ये लैंगिकता हा कॉमन फॅक्टर आहे. प्रेम म्हणजे यौवन प्रेम (सेक्युअल लव्ह) आहे. जे स्त्री-पुरूषांना आकर्षणाचे आरंभिक कारण बनते आणि नंतर त्यांच्यात जवळीक निर्माण करते. करूणा म्हणजे तो आध्यात्मिक संबंध आहे जो दांपत्तीक जीवनात हळूहळू घट्ट होत जातो. यामुळेच विवाहसंस्थेस बळकटी येते. पती-पत्नी एकमेकांचे जीवलग बनतात व सुख-दुःखात सामील होतात. 
    लैंगिकता ही एक सहज प्रकृती आहे. भूख, तहान लागणे, मलमूत्र विसर्जन, याप्रमाणेच मानवामध्ये लैंगिकता ही सहज प्रवृत्ती आहे. यासाठी जगातील सर्व धर्म, जातीं आणि देशांमध्ये विवाहसंस्था अस्तित्वात आहे. असे असले तरी या ठिकाणी आपण मुख्यतः इस्लामिक विचारधारेतून याचा आढावा घेऊ.
    निकाह - इस्लामी कौटुंबिक कायद्याचा पहिला उद्देश शील व चारित्र्याचे रक्षण होय. व्यभिचाराला तो हराम ठरवितो. स्त्री आणि पुरूषांना आपल्या शरीर संबंधाची प्राकृतिक गरज ’निकाह’च्या आधीन राहून पूर्ण करण्यास भाग पाडतो. निकाहमुळे माणसाचे चारित्र्य अबाधित राहते. ते नग्नता व निर्लज्जपणापासून दूर राहतात. तसेच त्यापासून माणसांचे सांस्कृतिक बिघाडापासून रक्षण होते. म्हणूनच पवित्र कुरआनमध्ये ’निकाह’ साठी ’एहसान’ शब्द योजला गेला आहे, एहसान म्हणजे किल्लाबंदी (तटबंदी) ज्या ’स्त्री’शी निकाह केला जातो, ती ’मुहसना’ असते. म्हणजे ती त्या किल्ल्याच्या रक्षणात प्रवेश करते, जो निकाहच्या स्वरूपात तिच्या व तिच्या शिलाच्या रक्षणासाठी तयार करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होते की, निकाहचा पहिला उद्देश्य शील व चारित्र्याचे रक्षण करणे असा आहे.
निकाहसंबंधी कुरआनमध्ये म्हटले आहे की, ”मग तुम्ही त्यांच्या पालकांच्या अनुमतीने त्यांचेशी निकाह करा आणि उचित प्रकारे त्यांचा ’महर’ अदा करा. जेणेकरून त्या मुहसना बनतील आणि उघडपणे किंवा चोरून, लपून व्यभिचार कर्म करणार्‍या होणार नाहीत.” (कुरआन, सूरह निसा, आयात-25).
    पती-पत्नींना वैवाहिक बंधनात केवळ यासाठीच बांधले जाते की, अल्लाहने निर्धारित केेलेल्या ’सीमां’च्या आत राहूनच, त्यांनी आपली नैसर्गिक कामेच्छा पूर्ण करावी. तसेच त्यांचे हे संबंध प्रेम-जिव्हाळ्यावर आधारभूत असावेत, ज्यायोगे निकाह करून संस्कृती व सभ्यतेचे जे उद्देश निगडीत आहेत त्यांनी एकत्रितपणे पार पाडावेत. त्यांच्या कौटुंबिक जीवनात त्यांना आराम, संतोष, समाधान व शांती लाभावी.
    ”आणि तुम्ही त्याच्या चिन्हांपैकीच एक आहात की, त्याने तुमच्यासाठी खुद तुमच्यामधूनच जोड निर्माण केली आहे जेणेकरून तुम्हाला त्यांचेपासून शांती, समाधान लाभावे आणि त्यानेच दोघांत प्रेम, जिव्हाळा व करूणा निर्माण केली आहे. ”(कुरआन, सूर-अर-रूम 30, आयत 21).
    निर्माणकर्त्याच्या तत्वदर्शितेची क्षमता ही आहे की, त्याने मानवाच्या एकाच जातीचे रूप बनविले नाही तर त्यास दोन जाती (लिंग) मध्ये निर्माण केले, जे मानवतेत समान आहेत. त्यांच्या निर्मितीचे मूळ एकच आहे. परंतु, दोन्ही, एकमेकांपासून भिन्न शारीरिक बनावट, भिन्न मानसिक आणि मनोवैज्ञानिक वैशिष्ट्ये तसेच भिन्न भावना व इच्छा देऊन निर्माण केले गेले. त्यांच्यामध्ये आश्‍चर्यकारक अनुकूलता ठेवली की त्यांच्यापैकी प्रत्येक, एकमेकासाठी पुरक आहेत. तो तत्वदर्शी सृष्टा या दोन्ही जातींना सुरूवातीपासून एका विशेष अनुपाताने निर्माण करीत आहे. हे स्पष्टतः पुरावा आहे की, एक तत्त्वदर्शी निर्माता आणि एकमेव निर्मात्याने त्याच्या सामर्थ्याने या सर्वांचे प्रबंध करून ठेवले आहे.
    ”जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा”(दिव्य कुरआन) अर्थात हे प्रबंध पूर्ण इराद्याने केला आहे. पुरूषाने त्याच्या नैसर्गिक इच्छा व गरजा, स्त्रीजवळ आणि स्त्रीने तिच्या कामेच्छा व गरजा पुरूषांशी भागवाव्यात, ज्यास सृष्टी निर्मात्याने एकीकडे मानवी वंशाला बाकी ठेवण्याच्या आणि दूसरीकडे मानवी संस्कृती व सभ्यतेला अस्तित्वात आणण्याचे साधन बनविले आहे. जर स्त्री-पुरूषांत ते आकर्षण ठेवले नसते, जे त्यांच्या मिलनाने प्राप्त होते तर मानवी सभ्यता व संस्कृती अस्तित्वात येण्याचा प्रश्‍नच नव्हता. शांती आणि समाधानासाठी, दोघे मिळून घरोबा करण्यास विवश बनले. यामुळेच कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली आणि याचमुळे सभ्यता आणि संस्कृती विकसीत झाली. कोण बुद्धीमान व्यक्ती विचार करू शकतो की ही महान कृती, प्रकृतीच्या आंधळ्या शक्तीनिशी, संयोगवश, अॅटोमॅटिक अस्तित्वात आली आहे? किंवा अनेकाअनेक ईश्‍वराचे हे प्रबंध आहे? हे तर एका तत्वदर्शी आणि एकमेव तत्वदर्शीच्या, तत्वदर्शीतेची स्पष्ट निशाणी आहे, स्पष्ट पुरावा आहे.
    दाम्पत्य जीवनासाठी मार्गदर्शन करताना दिव्य कुरआन आदेश देतो, ” तुमची पत्नी तुमच्यासाठी शेती आहे. जेव्हा इच्छा होईल तेव्हा तिच्याकडे जा. परंतु, भविष्याची काळजी घ्या. आणि ईश्‍वरी कोपाचे भय बाळगा आणि जाणून असा की, तुमची त्याच्याशी भेट होणारच आहे. (सूरह बकरा-2, आयत - 223). याचा भावार्थ असा की, संतती उत्पादनासाठी पुरूषाने आपल्या पत्नीकडे जावे. पण एका ठिकाणी कुरआनमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, संतोष प्राप्त करण्यासाठीही पत्नीकडे जावे. एका ठिकाणी असेही सांगितलेले आहे की, ”त्या तुमच्यासाठी पोशाख आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोशाख आहात. (सुरह बकरा, आयात 187).
    जसे पोशाख आणि शरीरामध्ये काही एक पडदा नसतो तसेच पती-पत्नीचे आपआपसातील संबंध आणि मिलाफ, एक अभिन्न गोष्ट आहे. पोशाख माणसाचे शरीर झाकते आणि बाह्यवातावरणातील दुष्परिणामांपासून त्याचे रक्षण करते. दाम्पत्याला पोशाखाची उपमा यासाठीच दिली आहे की, पती-पत्नीमधील वैवाहिक बंधन त्याच स्वरूपाचे असावे, जसे शरीर आणि पेहरावाचे असते. त्यांची मने व आत्मे एकरूप झालेली असावीत. दोघांनी एकमेकांच्या दोषांवर पांघरूण घालावे आणि शील व अब्रुवर दुष्प्रभाव टाकणार्‍या गोष्टींपासून त्यांनी एकमेकांचे रक्षण करावे. प्रेम, जिव्हाळा आणि करूणाची हीच मागणी आहे. इस्लामी दृष्टीेने दाम्पत्यासंबंधाचा तोच मूळ आत्मा आहे. एखाद्या दाम्पत्यामध्ये ही भावना नसेल तर जीवन मृतवत होईल.
    इस्लामने वैवाहिक जीवनामध्ये जे कायदे बनविले आहेत. त्यामध्ये हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवला गेला आहे. एकमेकांतील संबंधात मनाची विशालता, औदार्य ते दाखवू शकत नसतील तर नाईलाजाने एकत्र राहण्यापेक्षा वेगळे होणे हेच अधिक उत्तम. कारण प्रेम व करूणारूपी आत्मा निघून गेल्यानंतर, दाम्पत्य संबंध एक निव्वळ ’प्रेत’च उरते. त्या प्रेताची विल्हेवाट लावली नाही तर दुर्गंधी निर्माण होईल आणि कौटुंबिक जीवनाचे संपूर्ण वातावरण ’विषमय’ होईल. म्हणून यासंबंधी कुरआन आदेश देतो, पती-पत्नींनी एकमेकांपासून फारकत (विभक्त) घेतलीच, तर अल्लाह आपल्या विशाल सामर्थ्याने, प्रत्येकाला दुसर्‍यावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करील. अल्लाहचे औदार्य अतिविशाल आहे व तो बुद्धिमान व दृष्टा आहे.”(सू. निसा 4, आयत नं.130). विवाहा संबंधी अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. म्हणतात, ह.अब्दुल्ला बिन मसऊद (रजि.) कथन करतात, ह. मुहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले, ”हे तरूणांनों! जो निकाहच्या जबाबदार्‍या उचलण्याचे सामर्थ्य राखतो. त्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा ’नजर’ (दृष्टी) खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो.” म्हणजे नजरेला इतस्तःत फिरण्यापासून आणि वासना शक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवितो.
    आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही. त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधुनमधून रोजा (उपवास) ठेवावा. (हदीस - बुखारी शरीफ).
    म्हणजे लज्जा हा गुण चांगूलपणा आणतो. लज्जा असा गुण आहे जो सत्कर्म आणि सदाचाराचा स्त्रोत आहे. हा गुण ज्या व्यक्तीच्या अंगी असेल तो दुष्कर्म आणि दुराचाराजवळ जाणार ही नाही उलट सत्कर्म आणि भलाईकडे प्रवृत्त होईल.
व्यभिचारासंबंधी कुरआन स्पष्ट आदेश देतो,
”व्यभिचाराच्या जवळपास फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग आहे” (सुरह बनी इस्राईल, आयत 32). व्याभिचारामध्ये समलिंगी संभोग, नग्नता, अश्‍लिलतेच्या सर्व गोष्टी येतात. व्यभिचाराच्या जवळसुद्धा फिरकू नका. हा आदेश प्रत्येक मानवासाठी आणि समस्त मानवजातीसाठी सुद्धा आहे. व्यक्तीसाठी हा आदेश म्हणजे केवळ व्यभिचार कार्यापासून दूर राहू नका तर व्यभिचाराला प्रोत्साहन देणार्‍या गोष्टीपासून सुद्धा रहावे. समाजासाठी या आदेशानुसार त्याचे कर्तव्य ठरते की, सामाजिक जीवनात व्यभिचार, व्यभिचाराला प्रोत्साहन देणार्‍या गोष्टी आणि व्यभिचाराच्या करणांना, कोणत्याही स्थितीत नष्ट करावे.
    सृष्टी निर्मात्याचे वरील प्रमाणे दिलेल्या आदेशाचे अवलोकन करून त्या कसोटीवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन्ही ऐतिहासिक निकालांविषयी विचार केला तर त्यात खालील गोष्टी आढळून येतात.
    ’6 सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार, ’समलिंगी संभोग’ गुन्हेगारी कृत्य ठरत नाही.’ समलिंगी संबंध निश्‍चितच निसर्गविरूद्धी आहे. सृष्टी आणि त्यातील सजीवांचा निर्माता अल्लाहने, सर्व सजीवांमध्ये नर आणि मादा निर्माण करून, वंश वाढविण्याची व्यवस्था केली आहे. स्त्री-पुरूष मिलनाने एक कुटुंब अस्तित्वात यावे व त्यायोगे एक सुसंस्कृत समाजनिर्मिती व्हावी. कुटुंब व्यवथेतच सभ्यतेचे व नैतिकतेचे बाळकडू पाजले जाते. याच उद्देशासाठी स्त्री, पुरूष असे दोन जाती बनिवल्या आणि त्यात एक दुसर्‍यासाठी आकर्षण ठेवले गेले. त्यांची शारीरिक आणि मानसिक रचना दाम्पत्य उद्देशाच्या पुर्तीसाठीच केली गेली. परंतु, मनुष्य प्रकृतीविरूद्ध कार्य, समलिंगी संभोग करून, त्यावेळी ते अनेक अपराध करणारा ठरतो.
    मानव समुहाशी असा मनुष्य उघड विश्‍वासघात करतो तो स्वतःला वंशवृद्धी आणि कुटुंब व्यवस्थेसाठी अयोग्य बनवितो. आपल्या बरोबरच दुसर्‍या एका पुरूषाचा आणि दोन स्त्रियांचे जीवन बरबाद करतो. हे कृत्य मानवी सभ्यतेच्या सीमा पार करणारे आहेत. हा उघड-उघड व्यभिचार आहे. जो अत्यंत वाईट कृत्य आहे. यासंबंधी कुरआन आणि मानसशास्त्रीय आधारांवर माननीय एम.आय. शेख यांनी शोधनमध्ये अंक 39 मध्ये एक अतिशय बोधप्रद लेख लिहिला आहे तसेच जहीर सय्यद यांनीही, समलैंगिकतेसंबंधी एक उत्कृष्ट लेख लिहिला आहे. (शोधन ंक 40) म्हणून पुनरूक्ती टाळून केवळ एवढेच म्हणतो की, मानवाने प्रकृतीविरूद्ध कोणतेही कृत्य करू नये.
    27 सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार, ” व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही” यामध्ये अतिशय चिंतनीय बाब म्हणजे, ”महिलांना विवाहबंधनात राहूनही, लैंगिक स्वायतत्ता दिली पाहिजे. विवाह याचा अर्थ एकमेकांची स्वायतत्ता संपणे नाही, लैंगिक पर्याय निवडणे हा मानवी स्वातंत्र्याचा आवश्यक घटक आहे. अगदी खाजगी बाबतीत स्त्रीच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे” असे मत निकालपत्रात नोंदविले गेले आहे.
    याचा आधार घेत एका विवाहित महिलेने, तिच्या पती-व्यतिरिक्त इतर पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवणे, आणि त्यामुळे तिला गर्भधारणा झाली तर, कोण पुरूष, दुसर्‍याच्या अपत्याला, स्वतःचे अपत्य समजून ते सर्वकाही करेल? जे तो स्वतःच्या अपत्याबाबत करील. यामुळे समाजात ’हरामी’ अपत्यांची फौज तयार होईल. मानवी स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन सर्वत्र स्वैराचार फोफावेल. कुटुंबव्यवस्था नितीमान समाज, संस्कृती बनण्याचे कार्य उधळून लावले जाईल.
    भारत सरकारचे कलम 497 बद्दलचे म्हणणे अत्यंत दुरूस्त आहे पण सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले आहे. समलैंगिकतेसंबंधी जो निकाल आला, त्यानंतर देशात जो ’उन्मादी’ वातावरण तयार झाले आता या निकालानंतर त्यात तुफानी वाढ होईल. कायद्याची कडक बंधने असतानाही  स्त्री-पुरूषांचे अनैतिक संबंध बलात्कार, विनयभंग याचे प्रमाण चिंताजनक इतके आहेत या दोन्ही निकालानंतर परिस्थिती किती वेगाने बदलेल हे येणारा काळच ठरवेल. पण.. समाज सुधारक व भारत सरकाने या दोन्ही निकाल, त्याचे दुष्परिणाम व त्यावर उपाययोजना, यासंबंधी गंभीरपणे विचार करावा. अन्यथा भारतीय सभ्यता, संस्कृतीचा र्‍हास होणार? ही मात्र काळ्या दगडावरील रेषाच ठरेल.

- वकार अहमद अलीम
9987801906

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget