Halloween Costume ideas 2015

आजाऱ्याची विचारपूस : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, ‘‘आजाऱ्याजवळ विचारपूस करण्याच्या बाबतीत गोंधळ घालू नये आणि अल्पकाळ बसणे ‘सुन्नत’ (पैगंबर मुहम्मद (स.) यांची परंपरा) आहे.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : हा उपदेश सामान्य आजाऱ्यांसाठी आहे परंतु जर एखाद्याचा जीवाभावाचा (संकोच न बाळगणारा) मित्र आजार पडला आणि त्याला असा अंदाज वाटत असेल की तो बसला तर त्याला आवडेल तेव्हा तो बसून राहू शकतो.
मुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या शेवटच्या हजप्रसंगी (यानंतर ते जगातून निघून गेले.) लोकसमुदायाला उद्देशून म्हटले,
‘‘ऐका! अल्लाहने तुमचे रक्त, संपत्ती व अब्रू प्रतिष्ठित बनविली आहे. ज्याप्रकारे तुमचा हा दिवस, हा महिना आणि हे शहर प्रतिष्ठित आहे. ऐका, मी तुमच्यापर्यंत पोहोचविला?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘होय, पैगंबरांनी पोहोचविले.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह, तू साक्षी राहा की मी लोकसमुदायापर्यंत तुझा संदेश पोहोचविला.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीन वेळा उच्चारले. मग म्हणाले, ‘‘ऐका! पाहा, माझ्यानंतर तुम्ही आपसांत मुस्लिम असूनदेखील एकमेकांच्या माना कापण्याइतपत सत्य नाकारणारे बनू नका.’’ (हदीस : बुखारी)
माननीय जरीर बिन अब्दुल्लाह (रजि.) यांनी सांगितले, ‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हातावर वचन दिले (बैअत केली) की नियमानुसार नमाज अदा करीन, जकात अदा करीन आणि प्रत्येक मुस्लिम व्यक्तीशी चांगुलपणाने वागेन.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘बैअत’चा मूळ अर्थ आहे विक्री करणे. म्हणजे मनुष्य ज्याच्या हातावर ‘बैअत’ करतो मुळात तो या गोष्टीचे वचन देतो की मी जीवनभर हे वचन पाळीन. माननीय जरीर (रजि.) यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना तीन गोष्टींचे वचन दिले, नमाजला तिच्या सर्व अटींनुसार अदा करणे, जकात देणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुस्लिम बंधुंशी कोणताही धोक्याचा व्यवहार न करणे, त्यांच्याशी कृपेने, सहानुभूतीने आणि दयेने वर्तणूक करणे. या हदीसवरून माहीत होते की मुस्लिमांनी आपसांत कशाप्रकारे राहिले पाहिजे.
माननीय नुअमान बिन बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू मुस्लिमांना आपसांत सहानुभूतीने वागताना, प्रेम करताना आणि एकमेकांकडे झुकताना पाहशील, जशी शरीराची स्थिती होते जेव्हा एका अवयवाला रोग होतो तेव्हा शरीराचे इतर अवयव सुंध होतात आणि तापाबरोबर त्याची साथ देतात.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शरीराचे उदाहरण देऊन मुस्लिमांनी शरीराच्या अवयवांसारखे असायला हवे असे न सांगता मुस्लिमांच्या एका निरंतर राहणाऱ्या गुणवैशिष्ट्यादाखल सांगतात की जेव्हा जेव्हा तू त्यांना पाहशील तेव्हा ते एकमेकांशी कृपा व सहानुभूती बाळगणारेच आढळून येतील.
माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमासाठी इमारतीसमान आहे जिचा एक भाग दुसऱ्या भागाला शक्ती प्रदान करतो.’’ मग पैगंबरांनी आपल्या एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून दाखविले. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये मुस्लिम समाजाला इमारतीची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे त्या इमारतीच्या विटा एकमेकांशी जुळलेल्या असतात त्याप्रमाणे मुस्लिमांना आपसांत जुळून राहिले पाहिजे आणि मग ज्याप्रकारे विटा एकमेकांना शक्ती व आधार देतात त्याप्रकारे त्यांनीदेखील एकमेकांना आधार दिला पाहिजे. ज्याप्रमाणे विस्कटलेल्या विटा एकमेकांना जुळून मजबूत इमारतीचे स्वरूप साकारतात त्याप्रमाणे मुस्लिमांच्या शक्तीचे रहस्य त्यांच्या आपसांत जुळण्यात आहे. जर त्या विस्कटलेल्या विटांसारखे राहिले तर त्यांना वाऱ्याची प्रत्येक झुळूक उडवून घेऊन जाईल आणि पाण्याची प्रत्येक लाट वाहून नेऊ शकते. शेवटी ही हकीकत एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून स्पष्ट करून सांगितले.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा आरसा आहे आणि मुस्लिम मुस्लिमचा भाऊ आहे. तो त्याला विनाशापासून वाचवितो आणि पाठीमागून त्याचे संरक्षण करतो.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमसाठी आरसा आहे.’ म्हणजे त्याच्या त्रासाला आपला त्रास समजतो. ज्याप्रमाणे तो आपल्या त्रासामुळे तडफडतो तसाच हादेखील तडफडेल आणि तो त्रास कमी करण्यासाठी बेचैन होईल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget