Halloween Costume ideas 2015

मराठीतील प्रसिद्ध कवी गणेश विसपुते : संमेलनाध्यक्षांचे भाषण (भाग ३)


अलीकडे गेली काही वर्षं आपण वाचत आहोत. तुर्कस्तानच्या समुद्रकाठावर वाळूत तोंड खुपसून पडलेल्या तीन वर्षांच्या मृत अॅलनचं चित्र आपल्या मनात थिजून बसलेलं आहे. महामारीच्या लाटेआधी आपण नागरिकत्व कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएए) विषयीच्या बातम्या, त्याविरोधातली देशभरातली आंदोलनं, शाहीन बागेतलं ऐतिहासिक आंदोलन आणि त्याविषयी गोंधळ निर्माण होईल अशा सत्यालाप करणाऱ्या बातम्या असं पाहिलं. असममध्ये निर्वासित होऊन तीन पिढ्या इथं राहिलेल्या लोकांपुढे नागरिकत्वाचा प्रश्न उभा ठाकल्यावर ते सैरभैर झाले. त्याआधीपासूनच त्यांना मियां म्हणून कशाप्रकारे हिणवलं जात होतं, त्यातून सत्तरच्या दशकात असमी कवितेत सशक्त असं मिया पोएट्रीचं आंदोलन कसं उभं राहिलं हे आपल्याला माहीत असेल. असममधल्या बंगाली मुसलमानांनी आपल्या अस्मितेवर स्वतः पुन्हा या कवितेच्या आंदोलनाद्वारे दावा केला. मियां हा उर्दुमधला सभ्यगृहस्थ या शब्दासाठी वापरला जाणारा आदरार्थी प्रतिशब्द आहे. पण तो हिणवण्यासाठी आणि अपमान करण्यासाठी वापरला जाऊ लागला तेव्हा तिथल्या कवींनी 'होय, आम्ही मिया आहोत,' असं म्हणत ठामपणे कवितेतून उत्तरं देत त्या शब्दाच्या अर्थाला पुन्हा सार्थ केलं. दमन आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवणारं कवितेचं हे आंदोलन होतं. मिया कवितेत या समूहाला एनआरसीतून वगळले जाण्याचे, आणि त्यातल्या भयाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. या कवींवर खटले भरले गेले. मिया कविता आंदोलनानं अनेक प्रश्न उभे केलेले आहेत. ते विस्थापनाचे आहेत, भाषिकतेचे आहेत, भौगोलिकतेचे, राष्ट्रीयत्त्वाचे, मानवीयतेचे आहेत. नागरिक आहोत की नाही आहोत या संभ्रमाचे ते प्रश्न आहेत. या आंदोलनानं राष्ट्रवादाच्या रेट्यात दाबल्या गेलेल्या भाषेचा प्रश्न पुढे आणला. त्या भाषेच्या दुःखाचा उद्गार उच्चारित केला. जोरकसपणे ते म्हणू लागले की, 'लिहा. लिहून घ्या/ मी एक मिया आहे / लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाचा नागरिक/ ज्याच्याजवळ कोणताही अधिकार उरलेला नाही.'

त्यातल्या अलीकडच्या काही कवितांचे मासले मी आपल्यापुढे वाचून दाखवतो.

रिजवान हुसेन नावाचा कवी (हिंदी भाषांतर) आपल्या कवितेत म्हणतोः

तुम्ही आम्हाला शिव्या द्या

हातातून नांगर ओढून काठ्यांनी मारा

पण आम्ही शांतपणे तुमच्यासाठी

महाल, रस्ते, घरं बनवत राहू

तुमच्या अस्वस्थ, घामानं भिजलेल्या चरबीयुक्त शरीरांना

रिक्षावर ओढतच राहू.

हा सगळा तळातला, श्रमिक वर्ग आहे. त्याच्या अस्तित्वावरच सवाल उभा राहिलेला असल्यानं तो हतबल झालेला आहे. त्याच दरम्यान ठिकठिकाणी डिटेन्शन कॅम्प्स उभारले गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. तिथं गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार कोणालाच कळणार नाही अशी फाशिस्ट काळातल्या कॅम्प्सची आठवण करून देणाऱ्या या गोष्टी आहेत. सान मियां नावाच्या कवीनं याबाबतीत आपली व्यथा व्यक्त करताना म्हटलं आहे की,

यावेळी डिटेन्शन कॅम्पमध्ये बसल्या बसल्या आठवलं

अरे देवा, आपणच तर ही इमारत बांधली होती

आता आमच्याकडे काहीही नाही

केवळ एक जोडी जुनाट लुंगी, अर्धवट पिकलेली दाढी

आणि आमच्या आजोबांच्या नावासोबत

शेवटच्या मतदार सूचीच्या अफेडिविटची प्रत. 

बस्स.

त्यांच्या मागण्या काहीही नाहीत. ते फक्त माणूस म्हणून आम्हाला जगू द्या, ज्या मातीत त्यांच्या पिढ्या श्रमल्या आणि मिसळल्या त्या मातीत काम करू द्या एवढंच मागताहेत. आज दुर्दैवानं हे घटित जगभरातल्या बहुतांश भागातलं वास्तव बनलं आहे. मरम अल-मसरी, नाजवान दरविश यांच्यासारखे आपला देशच न उरलेले कितीतरी पॅलेस्टिनी, अरबी, सीरिअन कवी हीच व्यथा मांडतांना आपल्याला दिसताहेत. सध्या फ्रान्समध्ये आसरा घेतलेली अनेक पुरस्कारप्राप्त सिरिअन कवयित्री मरम-अल-मसरीचे अनुभव वाचतांना आपण हादरून जातोः 

मिल्ट्रीतल्या दोन सैनिकांनी / आणि पुरुषांच्या जत्थ्यानं लॉराला मारून टाकलं

आधी तिच्यावर अत्याचार करून / कुणी तरी तिला पाहिलं 

तेव्हा ती जिवंत होती अद्याप / ज्यानं व्हिडिओ रेकॉर्ड केला

आणि पोस्ट केला तो युट्युबवर / दिङ्मूढ झालेल्या लॉराचा

आणि दिसत नाही / तिच्या तोंडातून रक्त ओघळतांना

आणि तिच्या ड्रेसवर मागच्या बाजूनंही.

लॉराचा होता एक देह / आणि एक नाव होतं तिचं / लॉरा द व्हरमॉन्ट, वय वर्षं १८ / जिचा खून / पुरुषांनी / राज्यसत्तेनं आणि आमच्या उदासिनतेनं-दुर्लक्षानं केला / शनिवारी.

कल्याणकारी राज्याचा ध्वंस

जगभर सध्या हे असं प्रखर राष्ट्रवादाचं आणि अमानुष विस्तारवादाच्या लालसेचं फलित दिसत आहे. राष्ट्रवाद जेव्हा त्याचं टोकाचं जहाल रूप दाखवतो, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत हिंसक आणि धोकादायक असतात. त्यातील अमानुष शोषणाच्या खातरीमुळे तो अनेक विचारवंतांनी नाकारला आहे. रवींद्रनाथ टागोरांनी त्यातले धोके ओळखले होते. स्वातंत्र्य मिळण्याअगोदर पंचवीस वर्षं आधीच १९२१साली टागोरांनी मित्राला लिहिलेल्या पत्रात ‘भारताची कल्पना’ किंवा आयडिया ऑफ इंडिया असा शब्दप्रयोग केला होता. आपल्याच लोकांपासून वेगळेपणाची जाणीव ही संघर्षाला निमंत्रण देणारी असते, त्या भावनेला भारताच्या कल्पनेत थारा नाही. वैविध्य असेल म्हणूनच त्यात सौंदर्य आहे, ते जिवंत आणि सळसळतं आहे, असं टागोर म्हणाले होते. म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादावर प्रखर हल्ले करणारी ती तीन प्रसिद्ध व्याख्यानं दिली होती. त्यात त्यांनी युरोपीय, जपानी राष्ट्रवादाची प्रारूपं आमच्यासाठी उपयोगाची नाहीत आणि भारताच्या संदर्भात लिहितांनाही ते म्हणतात की आपल्याला आपल्या कल्पनेतल्या भारताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला मानवतेच्या मूल्यांपेक्षाही राष्ट्र मोठं असतं या शिकवणुकीविरुद्ध लढावं लागेल. भारतातल्या अनेक समस्यांच्या मुळाशी असलेला मोठा धोका म्हणजे राष्ट्रवाद असं त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. त्यांची ही तीनही भाषणं वाचतांना लक्षात येतं की टागोर हे राष्ट्रवाद म्हणून जी काही सर्वसाधारण समजूत आहे तीपासून स्वतःला अलग करून शांतता, सुसंवाद आणि लोककल्याण या तत्त्वांशी स्वतःला जोडू पाहात होते. 

पंडित नेहरूंनी १४ डिसेंबर १९३२साली आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे लिहिलं होतं, की ''राष्ट्रवादाचा विचार किंवा भावना केवळ त्या विषयापुरती ठीक आहे, पण ती अविश्वसनीय आणि इतिहासलेखनात विक्षेप आणणारी आहे. अनेक घटनांकडे ती डोळेझाक करायला लावते आणि जेव्हा आपल्या स्वतःच्या इतिहासाचा संबंध येतो, तेव्हा या भावनेच्या तीव्रतेमुळे सत्याचाही अपलाप होतो. म्हणूनच भारताचा अलीकडचा इतिहास विचारात घेतांना आपण अत्यंत सावध असले पाहिजे.'' आजच्या काळात राष्ट्रवाद आणि भांडवलवाद हे परस्परांशी घट्टपणे संबंधित आहेत. भांडवलशाहीसाठी राष्ट्रवाद हे साधन आहे आणि ते त्याचं फलितदेखील आहे. बाजारी भांडवलशाही आणि राष्ट्रवाद ही हातात हात घातलेलीच भावंडं आहेत.

जगभरात आधी उल्लेख केला त्याप्रमाणे आज भांडवलशाही व्यवस्थांचा वाढत चाललेला जोर आहे त्यात उदारमतवाद आणि खुनशी फाशिस्टवाद बेमालूमपणे मिसळलेला आहे. भांडवली लोकशाहीतल्या संस्था आहेत, पण त्या सर्वंकषवादी सत्तांच्या हातातल्या कळसुत्री बाहुल्या बनल्या आहेत. न्यायालयं, केंद्रीय संस्था, विविध आयोग, पोलीस- सगळ्या संस्थांचं हे झालेलं आहे. लोकशाहीतल्या उदारमतवादाला नष्ट केलं गेलं आहे. कल्याणकारी राज्याची व्यवस्था संपवली गेली आहे. 

प्रत्येकाकडे मोबाईल फोन आला आहे तेव्हा तंत्रज्ञान घरोघरी पोहचलं आहे असं आपल्याला वाटतं. पण त्याच साधनांनी व्यवस्था, बाजार आणि कंपन्या तुमच्या प्रत्येक कृतीवर पाळतही ठेऊ शकतात हेही सत्य आहे. तंत्रज्ञानासोबतच विषमता, अस्थिरता आणि असुरक्षितताही निर्माण होते. असुरक्षिततेचा फायदा मूलतत्ववाद्यांना होतो. कारण मग 'आपण' आणि 'ते' अशी उभी विभागणी करता येते. माहिती, माहितीवरची मक्तेदारी जशी संपते त्याचप्रमाणे माहितीला तर्क आणि तथ्याचा पाया असेलच अशी शाश्वती देता येत नाही. 

असहमती दर्शवली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनं बोललं तर तुम्ही देशद्रोही असा दंडेलशाहीतला संदेश तिन्ही त्रिकाळ ऐकून लोक भयभीत झाले आहेत. विरोधातल्या कोणत्याही मुद्याला राष्ट्रभक्ती आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलं जात आहे. शेतकरी मरताहेत, लोक रांगांमध्ये मरताहेत, महागाईनं हैराण होताहेत-सगळ्यांवर एकच उत्तर दिलं जातं. देशासाठी, देशभक्तीसाठी एवढं कराच. प्रत्येक गोष्टीचा असा राष्ट्रवादाशी बादरायण संबंध जोडला की सगळ्या अत्याचारांवर पांघरुण घालता येतं. 

एक मोठा वर्ग आहे जो दिसत नाही. जो बहुसंख्य आहे आणि त्याची मतं विचारली जात नाहीत आणि ती माध्यमांपर्यंत पोहोचतही नाहीत. तो शहरी झगमगाटापासून दूर आहे. पण तो प्रत्यक्ष या बदललेल्या झगमगाटी खोट्या 'विकासा'ची झळ पोहोचलेला आहे. तो प्रत्यक्ष पीडित आहे. त्याच्या घरात आत्महत्या झालेल्या आहेत. मुलांना रोजगार नाहीत. त्याच्या गावात वीज, रस्ते नाहीत. त्याच्या जमिनी भांडवलदारांच्या खाणींसाठी, उद्योगांसाठी गिळल्या जात आहेत. बॅंकेसाठी त्याला तालुक्याच्या गावी जावं लागतंय आणि तिथं पोहोचूनही त्याच्या हातात काहीच पडत नाही. बेगडी घोषणांना-जुमलेबाजीला तो ओळखू लागला आहे. 

आमचे ज्येष्ठ कवीमित्र विजय कुमार यांनी हाना आरेन्ट या विदुषीवर लिहिलेली नोंद वाचण्यात आली. त्यांच्यामुळे चिकित्सक विचारवंतांविषयी नव्या गोष्टी कळत असतात. हाना आरेन्ट या तत्त्वज्ञ विदुषीनं साठ वर्षांपूर्वी अॅडॉल्फ आईख्मन या नाझी अधिकाऱ्यावर जेरुसलेममध्ये झालेल्या खटल्यावर एक ग्रंथच लिहिला होता. त्याचं उपशीर्षक होतं- 'दुष्कृत्यांच्या सामान्यीकरणाचा अहवाल'. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या आईख्मननं चार लाख ज्यूंना गॅस चेंबर्समध्ये पाठवलं होतं. आणि तरीही खटल्यादरम्यान त्याला काहीही पश्चाताप झालेला दिसत नव्हता. उलट ते कृत्य केवळ आदेशापोटी केलेली एक सामान्य घटना आहे हेच तो सांगत राहिला. त्यावर हाना आरेन्टनं जे म्हटलं आहे ते आजच्या काळालाही लागू होतं. ती म्हणते, '"सर्वंकषवादानं जाणिवेचं बधिरीकरण अशा हद्दीपर्यंत पोहचलं की घोर अपराध आणि विकृत हिंसेनं केलेली कृतीही एरवीच्या सामान्य क्रियांएवढीच साधारण वाटू लागली." पराकोटीच्या दुष्कृत्यांच्या अशा दैनंदिन कृतीसारखं होत जाण्याला हॅना आरेन्ट यांनी दुष्कृत्याचं सामान्यीकरण (बेनलिटी ऑफ इव्हिल) असं म्हटलं होतं. 

आधुनिक हुकूमशाहीचा प्रारंभ या ग्रंथात त्यांनी निरिक्षण मांडलेलं आहे की, "प्रगत होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबरच माणसं एकेकटी होत जातात. एकेकट्या माणसांचा एकमेकांना अनोळखी असा समाज झालेला असतो. आपल्याच समुदायापासून असं वेगळं पडणं पुन्हा एका बधिरपणाला आणि संवेदनाहीनतेला जन्म देतं. अशा वेळी हुकूमशाही सत्ता आपल्या यंत्रणेद्वारा दररोज होणारे अन्याय अत्याचार योग्य ठरवत असते. त्यासाठी नवनव्या कल्पना लढवणारे कारखाने काढून सगळीकडे आपला अंमल बसवणं हेच त्यांचं उद्दिष्ट बनतं. अशा सैतानी सत्ता निश्चित अजेंडा घेऊन आणि नवी चलनी रूपकं वापरून अंकूश ठेवतात. अशाप्रकारच्या यंत्रणा या आधुनिक काळातल्या भयानक दहशतीची नवी रूपं आहेत."

आज आपण हेच चित्र प्रत्यक्षात पाहात आहोत.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget