Halloween Costume ideas 2015

मराठीतील प्रसिद्ध कवी गणेश विसपुते : संमेलनाध्यक्षांचे भाषण


गेल्या दोन दशकांहूनही अधिक काळ कार्यरत असलेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं त्यांच्या यंदाच्या १६व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मला निवडून इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. दरम्यानच्या या दोन दशकात झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनांचे मातब्बर अध्यक्ष बाबुराव बागुल, वाहरु सोनवणे, तुळसी परब, यशवंत मनोहर, संजय पवार, जयंत पवार, प्रल्हाद लुलेकर यांच्यासह सर्व पूर्वाध्यक्षांचा मी आदरपूर्वक उल्लेख करतो. या सर्व संमेलनांमध्ये त्या त्या काळात समाजाला आणि लेखकाला पडणाऱ्या प्रश्नांची अर्थपूर्ण चर्चा झालेली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही गेली २३ वर्षं चालू आहे. त्यांच्या बोधचिन्हातच समतेला होकार, विषमतेला नकार हे सूत्र असल्याचं आपल्याला दिसेल. 

वर्चस्ववाद, पुरुषसत्ताकवाद, भांडवली मूल्यं यांच्या विरोधात ही सांस्कृतिक चळवळ आहे. म. फुल्यांनी साहित्य संमेलनाबाबत "त्यात अखिल मानवाचे हित सापडत नाही," असं म्हटलं होतं, त्यात त्यांना त्याकाळात जी सबळ कारणं दिसली होती, तीच आताही मौजुद आहेत असं मला वाटतं. समाजातल्या विविध स्तरांना, भाषा-बोलींना, जाती-जमातींना व्यापकपणे सामावून घेतलं गेलं पाहिजे. दुही आणि बेकीला विरोध करणं, एकसूरी अभिव्यक्तीला नाकारणं यासाठी दलित, भटके विमुक्त, आदिवासी, कष्टकरी, स्त्रिया आणि निराश झालेला तरुणवर्ग या सगळ्यांचे आवाज उमटवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध समांतरपणे प्रयत्न व्हायला हवेत. म्हणून अशी वेगवेगळी बहुआवाजांना सामावून घेणारी संमेलनं होत राहाणं गरजेचं आहे. आजचा काळ पाहाता मूलभूत मानवी मूल्यं, लोकशाहीची पायाभूत तत्त्वं आणि कल्याणकारी राज्याची कल्पना यांनी निगुतीनं विणलेल्या वस्त्राची वीण केवळ उसवलेलीच नाही तर त्याच्या चिंध्या-धांदोट्या होतांना आपण पाहात आहोत. हे सगळं बोलण्याचा अवकाशही उघडपणे आज संकोचत जात असतांना ती संधी मला मिळत आहे. म्हणून इथं येण्याचा आनंद अनेक पातळ्यांवरचा आहे. 

ज्या मराठवाड्यात हे संमेलन होत आहे तिथल्या भूमीशी माझी जन्मानं नाळ बांधलेली आहे. ज्या बहुरंगी संस्कृतीतलं इथलं वैविध्य पाहात आम्ही वाढत होतो त्यात मराठी गद्याला नवा चेहरा देणारे चक्रधरांसारखे महानुभाव होते, हिंदू-तुर्क संवाद लिहिणारे एकनाथ होते, ज्ञानेश्वर, जनाबाई, बहेणाबाई, नामदेव असे वारकरी परंपरेतले संत होते, मराठीच्या कवितेची अभिमानास्पद ओळख सांगता येईल असे शेख महंमद होते. सूफी संप्रदायातले थोर शायर आणि ज्यांनी दकनी उर्दूचा पाया घातला त्या वली औरंगाबादी यांच्याबद्दल तर आवर्जून सांगायलाच पाहिजे. ज्ञानेश्वरांनी संस्कृतविरुद्ध जसं बंड केलं तसंच वलीसाहेबांनीही दरबारी फारसी न वापरता आपली स्वतःची भाषा गढ़ली. त्यांच्या काव्यात मराठी, उर्दू, संस्कृत हिंदीचं मिश्रण होतं. दखनी उर्दूचा आणि भारतातल्या गझलचा पाया त्यांनी घातला असं म्हटलं जातं. त्यांना वली सूरती किंवा वली गुजराती या नावांनीही ओळखलं जातं. कारण नंतर ते गुजरातेत स्थायिक झाले होते. सर्व धर्मांनी परस्परांना आदर आणि प्रेम देण्याची तिथली पद्धत त्यांना इतकी भावली की ते गुजरातेच्या प्रेमात पडले. त्यांना एकदा दिल्लीला जावं लागलं होतं, तेव्हा आपल्या लाडक्या भूमीच्या विरहानं ते दुःखी झाले होते. ते त्यांनी "गुजरात के फ़िराक़ सूं है ख़ार ख़ार दिल । बेताब है सिने मिनी आतिश बहार दिल।" अशा शब्दांत मांडलं होतं. अर्थात ही वेगळ्या काळातल्या गुजरातची कथा आहे. २००२मध्ये या महान कवीची अहमदाबादेतली मज़ार एके रात्री गुपचूप उद्ध्वस्त करून रातोरात त्यावर सिमेंटचा रस्ता बांधला गेला. हा मला वलींशी गुजरातेशीला, आताच्या हिंसक असहिष्णू काळाशी जोडणारा दुवा आहे. आणि  त्याचप्रमाणे सिराज औरंगाबादी हे सुद्धा वलींनंतरचे १८व्या शतकातले श्रेष्ठ सूफी कवी होते. त्यांच्या ग़झ़लमधला हा शेर म्हणजे आजच्या काळातल्या उन्मादात बधिर झालेल्या आणि दृष्टी गमावून बसलेल्या लोकांसाठीच लिहिलेला आहे की काय असं वाटतं. त्या दोन ओळी अशा आहेतः

आलम-ए-दीवानगी क्या ख़ूब है

बे-कसी का वहाँ किसी कूँ ग़म नहीं

तर संस्कृतीच्या या महाप्रवाहात या सगळ्यांतून वाहात आलेल्या खनिजांच्या आणि मूलद्रव्यांच्या पाण्यावर आम्ही वाढत गेलो. अंबाजोगाईच्याच दासोपंतांनी संस्कृतच्या तुलनेत मराठी कशी विस्तारशील आहे हे सांगतांना, 'संस्कृतें 'घटु' म्हणती । आता तया घटांचे भेद किती।' असं म्हणत एका 'घट' या शब्दासाठी मराठीत हारा, डेरा, रांजणु, मुढा, पगडा, आनु, सुगड, तौली, सुजाणु, घडी, घागरी, घडौली, आळंदे, वाचिकें, बौळी, चिटकी, मोरवा, पातली असे अनेक शब्द आहेत हे सांगत-'एके संस्कृतें सर्व कळे । ऐसे कैसेन ?' असा प्रश्न विचारलेला आहे. १९२५सालानंतर भाषाशुद्धीवाल्यांना हे कळते तर मराठीचेही अधिक भले झाले असते. मराठवाडा हा विविध संप्रदायांचा समन्वय झालेला प्रदेश आहे. महानुभाव संप्रदाय, वारकऱ्यांचा भक्तिसंप्रदाय, सुफी संप्रदाय, वैष्णव, जैन आणि बौद्ध तसंच वचन साहित्याची धाराही तिथे नांदलेली आहे. इतिहासानं या भूमीला अनेक भाषा, धर्म, पंथ आणि विविध दर्शनांचं एकजीवीकरण करण्यासाठी निवडलं होतं. हा या सगळ्या गोष्टींचा मेल्टिंग पॉट होता. भक्ती आणि सूफी संप्रदायांतील विचारांचा इथं मनोरम समन्वय झालेला दिसतो. संत एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामीं हे शेख महंमदाचे गुरुबंधू होते. हे सूफी संत चांद बोधले यांचे शिष्य होते.  सूफी दर्शनाचा प्रभाव त्यांच्यावर झाला असणार. एकनाथांनी धर्मातील  कर्मकांड, विषमता यावर कोरडे ओढलेले आहेत. त्यांनी ‘हिंदू-तुर्क संवाद’ या स्फुटात ते अखेरीला हिंदू-मुस्लीम ऐक्याचं सूत्रच सांगतात. “ऐक्यवाक्य विवाद । विवादीं जाहला अनुवाद । एका जनार्दनीं निजबोध । परमानंद दोहींसी ॥” असं म्हणून ते कबीरवाणीशी आपलं नातं सांगतात. बीड जिल्ह्यातल्या धारूर येथे  जन्मलेले शेख महंमद मराठी संतकाव्यपरंपरेतले महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचे वडील म्हणजे जालन्याचे राज महंमद. त्यांचे शिष्य मलंग चांद बोधले. त्यांचं मूळ नाव चंद्रभट बोधले असं होतं. त्यांनी सूफी संप्रदायाची दीक्षा घेतली होती. शेख महंमद त्यांचे शिष्य. त्यांचे आणखी एक शिष्य होते जनार्दनस्वामी. संत एकनाथांचे गुरु म्हणजे हेच ते जनार्दन स्वामी. दौलताबादच्या किल्ल्यावर त्यांची समाधी आहे.

माझा एक आवडता ग्रंथ आहे बृहत्कथासरित्सागर. त्याची गोष्ट आपणांस माहीतच आहे की महादेवानं पार्वतीच्या हट्टाखातर अनंत काळपर्यंत चाललेली एक प्रदीर्घ गोष्ट एकांतात ऐकवली होती. कुतूहलापोटी ती गोष्ट महादेवाचा लाडका गण पुष्पदंतानं मायावी रूप घेऊन, चोरून ऐकली. हे पार्वतीला कळल्यावर तिचा कोप झाला आणि त्याचवेळी माल्यवान हा दुसरा गण पुष्पदंताची रदबदली करू लागला म्हणून तिने दोघांनाही पृथ्वीवर मनुष्यरूपात जाण्याची शिक्षा दिली. ही कथा पहिल्या लंबकात येते. पुढे पुष्पदंतानं कौशांबीत वररूचीच्या (कात्यायनाच्या) रूपाने जन्म घेतला तर माल्यवान हा गुणाढ्य बनून प्रत्यस्थानी (प्रतिष्ठानी) म्हणजेच इथल्या, मराठवाड्यातल्या पैठण या नगरात सातवाहनाच्या दरबारात प्रिय झाला होता. राजाला संस्कृत येत नाही म्हणून राणीनं हिणवल्यावर त्या राजानं संस्कृत शिकायचं ठरवलं. हे शिकण्यासाठी सहा वर्षं लागतील असं गुणाढ्यानं सांगताच दरबारातल्याच शर्ववर्मा या पंडितानं त्याला आव्हान देत हे काम सहा महिन्यात होऊ शकतं असं म्हटल्यावर गुणाढ्यानं म्हटलं की असं झालं तर मी संस्कृत, प्राकृत वा देशी भाषेतून अवाक्षरही बाहेर काढणार नाही. तिकडं शर्ववर्मानं चंडिकेला माझं म्हणणं खरं होवो अन्यथा मी जीव देतो असं म्हटल्यावर त्याच्या मनासारखं झालं, पण गुणाढ्याला पुढे मौन पाळणं भाग होतं. पैठण सोडून विंध्याचलात फिरतांना त्याला लक्षात आलं, तिथं यक्ष, भूत पिशाच्चं त्यांच्या पैशाची भाषेत बोलताहेत तेव्हा त्यानं ती भाषा शिकून बृहत्कथासरित्सागर लिहिला. तो त्यानं रक्तानं लिहिला. त्याच्या शिष्यांनी तो पैठणला नेऊन सातवाहनाला दाखवल्यावर त्यानं तो एकतर पैशाची भाषेत लिहिलेला म्हणून आणि तोही रक्तानं लिहिलेला म्हणून परत भिरकावल्यावर गुणाढ्यानं त्याचं एकेक पान वाचत आगीत जाळायला सुरुवात केली. जंगलातले पशू-पक्षी खाणं-पिणं विसरून ते स्तब्धपणे ऐकत होते. इकडे सातवाहनाला लक्षात आलं की भोजनात मिळणारं मांस हे सुकलेलं येतंय तेव्हा त्यानं चौकशी केल्यावर त्याला हा प्रकार कळला की रानातले प्राणीमात्र ग्रंथश्रवण करीत आहेत. त्यानं रानात येऊन गुणाढ्याची क्षमा मागितली. तोवर गुणाढ्यानं साठ लाख श्लोकांपैकी पन्नास लाख श्लोकांची पानं गुणाढ्यानं जाळून टाकली होती. नंतर आपल्याला उपलब्ध झालेला सोमदेवानं रचलेला बृहत्कथासरित्सागर हा ग्रंथ त्या उरलेल्या दहा लाख श्लोकांवरचा ग्रंथ आहे. या संपूर्ण कहाणीशी संबंधित असलेला पूर्वायुष्यातला महादेवाचा लाडका गण माल्यवान उर्फ या मौलिक ग्रंथाचा कर्ता असलेल्या गुणाढ्याची ही कथा आपल्या या मराठवाड्याच्या भागाच्या नेपथ्यात घडलेली आहे याचा मला आनंद झालेला आहे. त्याहूनही हा बृहत्ग्रंथाचा लेखक संस्कृत, प्राकृत आणि देशी भाषा नाकारून वेगळ्याच पैशाची भाषेत आपली कालजयी कृती निर्माण करतो हे मला त्याच्या बंडखोरीचं उदाहरणच वाटतं. पण त्याचबरोबर प्रस्थापितांच्या भाषाव्यवस्थेला लाथ मारून आपण आपलं कर्तृत्व घडवण्यासाठी लेखकाला मार्गदर्शक असं रूपकही वाटलेलं आहे. ह्याच कथासरित्सागरात आपल्याला गोष्टीवेल्हाळ अशा बहुजनांच्या ज्ञानपरंपरेचं मूळ सापडतं. 

विसाव्या शतकात महाराष्ट्रातील इतर बरेचसे प्रांत जसे ब्रिटिश अंमलाखाली होते, आणि त्यामुळे का असेना शिक्षण आणि इतर साधन सुविधा तिकडं उपलब्ध होऊ शकल्या तशा मराठवाड्यात होऊ शकल्या नाहीत. मराठवाडा हा १९४८ पर्यंत निजामीतला भाग होता. पण विसाव्या शतकाच्या मध्यापासून औरंगाबादला डॉ.आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय सुरु केलं. त्यांनी रुजवलेल्या शिक्षणाच्या विचारानं मराठवाड्यात हजारोंना प्रेरणा मिळाली. दलित कवितेचा आद्यस्वर असलेले नांदेडचे हरिहर सोनुले यांच्या कवितांनी विसाव्या शतकाच्या तिसऱ्या-चौथ्या दशकापासून मराठवाड्याच्या कवितेत खऱ्या अर्थानं आधुनिक कविता आणली असं म्हणता येतं. उर्वरित महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तेव्हा साहित्यव्यवहार रुळायला लागून अर्धशतक झालेलं होतं.

आजचा काळ आणि आपण

भारतात गेली शेकडो वर्षं इथल्या संस्कृतीतल्या या वैविध्यानं आपल्याला संपन्न आणि समृद्ध केलेलं आहे. आपल्याला एकरंगी होऊन गरीब होणं चालणार नाही. त्यासाठी आज बोलणं आणि विचार करणं या मूलभूत मानवी लक्षणांचा आपल्याला विसर पडता कामा नये. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजच्या काळाइतका हिंसेचा, द्वेषाचा, क्रौर्याचा, दहशतीचा आणि दमनाचा दुसरा काळ नाही. गेल्या काही वर्षांमध्ये माणसांच्या मरणांच्या इतक्या बातम्या आपण नियमितपणे ऐकतोय की आता बधीर होऊन त्या अक्षरांपलीकडचं क्रौर्य समजायची संवेदनाच नष्ट होऊन जाईल की काय असं वाटतं. ग़ालिब म्हणतो तसं, 'मुश्किलें इतनी पड़ी मुझपर की आसां हो गई' असं म्हणण्याची आपल्यावर वेळ न येवो. 

गेली काही वर्षं आपण किती विचारकांच्या हत्या पाहिल्या, पत्रकारांना मारलं गेलेलं पाहिलं, वस्त्या जाळल्या जाण्याच्या बातम्या वाचल्या, आदिवासी कार्यकर्त्यांच्या, माहिती अधिकाराची कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या वाचलं, खून बलात्कार, झुंडीनं एकेकाला गाठून मारल्याच्या बातम्या वाचल्या. निडरपणे प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना-विद्यार्थिनींना, निरपराधांना तुरुंगात डांबलं जाण्याच्या बातम्यांचे ओघ संपत नाहीत. गेल्या सहा-सात वर्षांत पुस्तकांवरची बंदी, विखारी प्रॉपोगंडा असलेली पुस्तकं शाळेत सक्तीची करणं, पेरुमल मुरुगन असेल किंवा बशीर अहमद अशा कितीतरी लेखकांवर दडपणं आणणं, सेन्सॉरशिप, गिरीश कार्नाड, यु आर अनंतमूर्ती, विजय तेंडूलकर अशा आवाज उठवणाऱ्या ज्येष्ठ बुद्धिमान लेखकांची किंवा अमर्त्य सेन यांच्यासारख्या विद्वानांची हेटाळणी आणि गुंड-माफिया-लुटारूंना संरक्षण आणि समर्थन मिळणं, निरपराध्यांच्या हत्येच्या आरोपात तुरुंगात असलेल्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करणं, हिंदू स्त्रियांनी किमान चार मुलं उत्पन्न करावीत असं म्हणणं, विज्ञानाच्या बाबतीत अतोनात हास्यास्पद विधानं करत राहाणं, जनविरोधी कायद्यांचा धाक दाखवत राहाणं अशा घटना घडत आलेल्या आहेत. एरवी न ऐकलेली झज्जर, दादरी, उधमपूर, मुझफ्फरपूर, उन्नाव, कठुआ, लखीमपूर, बुलंदशहर अशा गावांची नावं तिथल्या हत्याकांडांमुळे आपल्या स्मृतीत जाऊन बसली आहेत. कश्मिरमधल्या भटका धनगर असलेल्या बकरवाल समाजातल्या लहान मुलीवर अनेक जण मंदिरात नृशंसरित्या बलात्कार करून तिला मारून टाकतात. तिला न्याय मिळतो की नाही, कळत नाही पण ती जिवानिशी जातेच. लखीमपूर सारख्या गावातल्या मुलीवरच्या बलात्कारांच्या घटना, शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्याच्या गावातच त्याचा पक्ष विजयी होणं आणि गुन्हेगार मोकळे सुटणं हे पाहून असा प्रश्न पडतो, की- केवळ अराजकाचं टोक गाठलेल्या फाशीवादातच हे खरं तर होऊ शकतं ना. परंतु ते इथलं वास्तव बनलेलं आहे. रोहित वेमुलासारखे संवेदनशील तरुण आत्महत्या करतात. नजीबसारखा तरुण विद्यार्थी अदृश्य होतो, पत्रकारांच्या तर किती हत्या गेल्या काही वर्षांत झाल्या याची आकडेवारी पाहायची असेल तर ती युनेस्कोच्या वेबसाईटवर सहजी उपलब्ध आहे. त्यावरून आपण पत्रकारांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याच्या निर्देशांकांत जगातल्या देशांच्या यादीत कुठे पोहोचलो आहोत हे कळेल. ऑक्सिजनअभावी लहान लहान ७० मुलं मेली, अकराशे गर्भवती स्त्रियांना केवळ दवाखान्याची सुविधा मिळाली नाही, जीव गमवावे लागले. मदत करू पाहात होते ते डॉक्टर केवळ अन्यधर्मीय आहेत म्हणून त्यांना दीर्घकाळ तुरुंगात डांबले गेले. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन थंडी-पावसात-उन्हात वर्षभर रस्त्यावर ठेवलं गेलं. त्यांच्या वाटेत खिळे ठोकले आणि त्यांना देशद्रोही म्हटलं गेलं. जे हत्यारे आहेत, जे अत्याचार करताहेत त्यांचा सन्मान होत आहे, त्यांची तुरुंगातून लगेचच सुटका होते. 'मारेंगे काटेंगे' अशी उघड धमकी देणारे, 'शस्त्रं बाळगा आणि मारा' असं धर्मसंसदेत मग्रुरीनं म्हणणाऱ्यांची महिनाभरात तुरुंगातून सुटका होते तर 'द्वेषाचा मुकाबला आम्ही प्रेमानं करू' असं म्हणणाऱ्या तरूण मुलाला वर्ष-दोन वर्ष कोठडीत अडकवलं जात आहे. लोकशाहीची पायाभूत मूल्यं आणि संविधानातले निर्देश दिवसाढवळ्या पायदळी तुडवले जाताहेत. दडपशाही आणि सेन्सॉरशिपचं भय इतकं वाढवलं गेलं आहे की सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमधील अधिकारीवर्ग स्वतःहूनच रांगायला तयार झाला आहे. सगळ्या देशातली संपत्ती केवळ दोन-चार लोकांच्याच हातात असावी असे प्रयत्न होत आहेत की काय असा संशय घ्यायला भरपूर जागा आहे. भडकावू, भाडोत्री आणि भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य तर आहेच, शिवाय त्यांना सत्ता वर्तुळातल्या आतल्या दालनापर्यंत मुक्त प्रवेश आहे. बॅंका लुटा, देशाबाहेर पलायन करा आणि अभय मिळवा असा भ्रष्टाचाऱ्यांना संदेश मिळत आहे. भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांकडे आडदांडपणे दुर्लक्ष केलं जात आहे. शिक्षणाचा पूर्ण विध्वंस करण्याचं व्रत घेतल्यासारखं वागणं दिसत आहे. जगभरच्या भुकेच्या निर्देशकांच्या तालिकेतल्या ११६ देशांत भारत कधी नव्हे तो १०१वा क्रमांकावर आला आहे. दरवर्षी देशातल्या लोकांच्या सरासरी आनंदाचं मापन करणारी अशीच एक तालिका प्रसिद्ध होत असते. १४६ देशांच्या यादीत आपण १३६व्या क्रमांकावर फेकले गेलेलो आहोत. महामारीनं लक्षावधी माणसं मेली त्याहूनही अधिक मेली ब्रेकिंग न्यूजच्या फवाऱ्यानं, तुगलकी फर्मानांनी, टाळं लावून ठेवलेल्या गोदामांमुळे आणि अडवून ठेवलेल्या उपचारांमुळे. रांगांमध्ये, रस्त्यांवर आपल्याच देशात मूलभूत अधिकारांपासून बेदखल होत. आजचा काळ म्हणजे मुठभर लोकांच्याकडे अपरंपार संपत्ती आणि असीम शक्ती तर दुसरीकडे बहुसंख्य असे आहेत की विकलता आणि शबलता हेच त्यांचं आयुष्य झालेलं आहे. 

(भाग १)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget