Halloween Costume ideas 2015

माझा ‘‘मी’’आणि रोजा


एकेश्वरवादा वरील दृढ विश्वास व मृत्यू पश्चात आपल्या कर्माचा हिशेब द्यावयाचा आहे या संकल्पनेने प्रेरित मनुष्य जेव्हा रोजा धारण करतो तेव्हा तो स्वतःला आपल्या इच्छेच्या ताब्यात देत नाही तर त्याच्या इच्छा, आकांक्षा आणि लालसा त्याच्या ताब्यात येतात. 

‘‘इन्नल्लजी खलक़ल मौता वल हयाता लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला‘‘(सुरे मुल्क - आ.क्र.2) ज्याचा भावार्थ असा की, ’’ईश्वराने मृत्यु आणि जीवन यांची निर्मिती केली यासाठी की तुमची परीक्षा घ्यावी की तुमच्यापैकी कोण उत्कृष्ट अर्थात श्रेष्ठ सत्कर्म करतो.) मनुष्य या भुतलावार ईश्वराद्वारे निर्माण केल्या गेलेल्या सृष्टीच्या निर्मीतीत सर्वात श्रेष्ठ निर्मिती आहे. ‘‘ व कर्रमना बनी  आदम‘‘ (आणि आदमच्या संततीला आम्ही सर्वात श्रेष्ठ ठरविले.) परंतु तो किती लाचार आहे की आपल्या मर्जीने तो जन्माला येऊ शकत नाही त्याला कोणी विचारत ही नाही की बाबा या धर्तीवर जन्म घेतो किंवा नाही! तसेच कुणाकडे आणि संपूर्ण जगात कोठे जन्म घेऊ इच्छीतो. इतकेच नव्हे तर नैसर्गिक मृत्युही आमच्या अख्तियारीत नाही. तो कुठे केव्हा आणि कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मृत्यु अटळ आहे हे मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण अल्लाहने पवित्र कुरआनमध्ये तसे स्पष्ट केले आहे की, ‘‘कुल्लु नफ्सीन ज़ाईकतुल मौत ‘‘ (प्रत्येक सजीवाला मृत्युची चव चाखावीच लागेल.)

जीवन व मृत्युचा निर्मीक अल्लाहच आहे याचे आम्ही ज्ञान बाळगतो. निर्मीकच सांगतो की, जन्मानंतर मृत्यू पर्यंतचा काळ हा तुमच्या जीवनाची प्रश्नपत्रिका सोडविण्याचा काळ आहे. या परिक्षेसाठीच त्याने मानवाला ज्ञान, बुध्दी, विचार करण्याची शक्ती, बोलण्याची व कर्म करण्याची शक्ती देऊन स्वातंत्र्य दिले की त्याने स्वत: ठरवावे -(उर्वरित पान 7 वर)

की सत्य-सरळ मार्ग कोणता? सन्मार्गावर  आचरण करुन जगात शांती व समता स्थापित करावयाची आहे की स्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन उपद्रव निर्माण करावयाचा आहे? विश्वयुध्दाच्या उंबरठयावर आज आम्ही उभे आहोत. रशिया व युक्रेनमध्ये होणारा विध्वंस बघून पवित्र कुरआनचे हे कथन आठवते की, ज्याचा भावार्थ असा की, भू-तलावर आणि समुद्रात उपद्रव माजला मानवाच्या हाताच्या कर्तृत्वामुळे‘‘ मनुष्याचा ‘‘मी‘‘ अर्थात त्याच्या इच्छा, आकांक्षा, वासना या त्याच्या आधीन नसून तो त्यांच्या  आधीन आहे. मानवाची लगाम त्याच्या वासनेच्या हातात असल्यामुळे स्वतःचे वर्चस्व केंद्रस्थानी विराजमान आहे. आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी कितीही निष्पाप लोकांची कत्तल झाली तरी त्याला दुःख होता नाही. भु-तळावर न्याय समानता आणि शांती स्थापण्यास मानवाला श्रेष्ठत्व प्रदान करुन अल्लाहने त्याच्या प्रशिक्षाणाचा बंदोबस्त ही केला आहे. जेणेकरुन इच्छा वासना त्याच्या ताब्यात येतील. रोजा याचसाठी अनिवार्य करण्यात आला की ‘मी‘ वर मनुष्याने काबिज व्हावे. पवित्र कुरआनचे अवतरण यासाठीच झाले की मानवाच्या वर्चस्वाची ही इच्छा उपद्रव न माजवता शांती स्थापित करेल. पवित्र कुरआन ने यासाठी मनुष्याला या भू-तलावर त्याची स्थिती आणि त्याच्या जिवनाचा उद्देश्य जो त्याच्या निर्मिकाने सांगितला आहे तो स्पष्ट केलेला आहे. अमानवीय सामाजिक बेड्यात जखडलेल्या मानवाला त्याच्या जीवनाचा उद्देश्य मुळात माहीत नाही. तो हेच जाणत नाही की त्याला या भुतळावर मर्यादित काळासाठी कुणी पाठवले? का पाठवले? अर्थात पाठवणारच सांगेल की, या मागे काय उद्देश्य आहे. प्रश्न केवळ वैचारिक अगर तात्वीक नाही तर कार्यात्मक जीवनाशी त्याचा दृढ संबंध आहे. या प्रश्नाच्या अचुक उत्तरावरच मानवीय जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे. पवित्र कुरआन ने मानवाच्या या मुलभूत समस्येचे निरसनच केले नाही तर त्याला इहलोक व परलोकात यशस्वी होण्याचा ईश मार्गही दाखविला आहे. पवित्र कुरआन ने अगदी सुरुवातीलाच घोषणा केली आहे की, हा ग्रंथ जगाच्या निर्मिकाने समस्त विश्वाच्या मानवासाठी मार्गदर्शन म्हणून अवतरित केलेला आहे. अर्थात यावर कोणत्याची विशिष्ट समाजाची, जातीची अगर विशीष्ट भौगोलिक भुभागाची मक्तेदारी नाही. अशा या अप्रतिम ग्रंथाचे अवतरण रमजानच्या महिन्यात सुरू झाले. म्हणूनच रमजानला विशिष्ट असे महत्व प्राप्त झाले आहे. पवित्र कुरआन ने अंधारात आणि अमानवीय सामाजिक बेडयात जखडलेल्या मानवाला सत्य मार्ग दाखवून अंधःविश्वासातून ज्ञानाच्या प्रकाशात आणले. भुतलावार शांती, समता व बंधुत्व आणि न्यायाच्या स्थापनेसाठी अल्लाहच्या निर्मितीत श्रेष्ठत्व प्रदान केले व सांगितले की, मनुष्य या भुतलावर अल्लाहचा खलीफा (प्रतिनिधी) आहे. त्याचे कर्तव्य आहे की या भुतळावर त्याने शांती व समता स्थापित करावी. यासाठी अल्लाहने मार्गदर्शर्न करणारे ग्रंथ अवतरित केले. पवित्र कुरआन हा त्यातील अंतिम ग्रंथ होय. ज्यात केवळ मार्गदर्शनच केलेले नाही तर त्यावर आचरण करण्यास आवश्यक अशा गुणांना निर्माण करण्यासाठी वर्षातून एकदा तब्बल 30 दिवसाचे प्रशिक्षण शिबीरही अनिवार्य केले आहे. पवित्र कुरआन सांगतो ‘‘ऐ  श्रध्दावंतांनो ! तुमच्यावर रोजे अनिवार्य करण्यात आले आहे. जसे यापुर्वीच्या ईशग्रंथ धारकांवर अनिवार्य केले होते.‘‘ 

उपरोक्त कथन अगदी स्पष्ट करते की रोजे काही नविन नाहीत आणि पवित्र कुरआन ही काही नविन ग्रंथ नाही तर या पूर्वीच्या भिन्न-भिन्न भाषेतील ईशग्रंथाचा समापक ग्रंथ होय. मनुष्य हा इच्छा, आकांक्षा आणि लालसेचा पुतळा आहे. त्याचा ‘‘मी‘‘ जेव्हा त्याच्यावर काबीज होतो तेव्हा उपद्रव व विध्वंस उदयास येते. हा ‘मी‘च वर्चस्वाची भावना निर्माण करतो. वर्चस्वाचीच ही भावना त्याला उच्च-नीच या कप्प्यात विभाजीत करते. 

वर्चस्वाच्या याच भावनेनेच रशिया व युक्रेनमध्ये विध्वंस माजवित आहे. रोजा मनुष्याच्या या ‘मी‘ ला ताब्यात ठेवतो. अल्लाह सांगतो एकमेव अल्लाहने तुम्हा सर्वांना एकाच स्त्री व पुरुषापासुन निर्माण केले या अनुषंगाने तुम्ही आपसात भाऊ-भाऊ आहात. तुमचे हे जीवन क्षणभंगूर आहे जे केवळ तुमची परिक्षा घेण्यास देण्यात आले आहे. ही मुलभूत संकल्पना मानवाच्या मनावर बिंबविण्यासाठी त्याचे प्रशिक्षण केले जाते. रोजांद्वारे आपल्या लालसा व वासनेवर ताबा मिळविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे वर्चस्वाची भावना व लालसा मानवाच्या नियंत्रणात येते. याचा उपयोग शांती स्थापनेच्या प्रक्रियेत होतो. वर्चस्वाच्या  याच लालसेमुळे रशिया व युक्रेन दरम्यान युध्द सुरू आहे. एकेश्वरवादा वरील दृढ विश्वास व मृत्यू पश्चात आपल्या कर्माचा हिशेब द्यावयाचा आहे या संकल्पनेने प्रेरित मनुष्य जेव्हा रोजा धारण करतो तेव्हा तो स्वतःला आपल्या इच्छेच्या ताब्यात देत नाही तर त्याच्या इच्छा, आकांक्षा आणि लालसा त्याच्या ताब्यात येतात. दुसऱ्या शब्दात आकांक्षा आणि वासनारुपी घोडयाची लगाम त्याचा हातात येते. तो या घोडयाला मनसोक्तपणे समाजात धुमाकुळ घालू देत नाही. याच वासनारुपी घोडयावरील बंधन माणसामध्ये तक़वा (ईश्वराच्या भीतीतून निर्माण होणारे चांगले चारित्र्य) निर्माण करते. येथूनच सुविचार आणि ईशपरायणता आरंभ होते. हाच उद्देश्य रोजा मागे आहे आणि यासाठीच अल्लाहने रोजे कुरआनच्या अवतरण्यापूर्वीही अनिवार्य केले होते. वेगवेगळ्या धर्मांमध्ये माणसांमध्ये ईशपारायणता निर्माण करण्यासाठी भक्तिच्या वेगवेगळया प्रथांना प्रोत्साहन मिळाले जसे सन्यास, संसार त्यागून जंगलात भक्ती करणे, शरीराला अवास्तव आणि असाह्य त्रास देऊन आपल्या मनावर ताबा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी. आपल्या निर्मीक अल्लाहने पवित्र कुरआनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणि अगदी शेवटची संधी म्हणून आपल्यासमोर रमजानचे रोजे प्रदान केलेले आहेत.   

मित्रांनो ! चालू रमजानची संधी साधून आपल्या षड्रिपूवर नियंत्रण मिळवून आपल्या सर्वांच्या निर्मिकाचा संदेश जाणून घेऊया आणि त्यावर आचरण करुन शांती समता व न्याय स्थापित करुया. कारण आपण सर्व एकच आई-बाबाची संतती आहोत हे नका हो विसरू. (संदर्भ  : सुरे युनूस 19) ‘‘ अधी सर्व मानव एकच समुदाय होते. वेगवेगळया श्रध्दा आणि पंथ त्यांनी नंतर निर्माण केले‘‘ पवित्र कुरआन सांगतो ‘‘तो अल्लाहच आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही‘‘ तो बादशाह आहे अत्यंत पवित्र सर्वस्वी शांती अभयदान करणारा ‘‘तो पवित्र आहे लोकांच्या अवास्तव व अनेकेश्वर वादाच्या कल्पने पासून‘‘ ‘‘ त्याची मुर्ति प्रतिमा किंवा विशीष्ट भौगोलिक क्षेत्र नाही‘‘ तो रब्बुल आलमीन (समस्त विश्वाचा एकमेव स्वामी व पालनहार) आहे. तरी सर्वांनी या रमजानची संधी साधून चारित्र्य संवर्धनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करून थांबतो. 

- डॉ. यु.म. कहाळे, 

अकोला



Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget