Halloween Costume ideas 2015

अल्लाहवर ईमान : पैगंबरवाणी (हदीस)


(१) माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, (एका प्रवासादरम्यान) मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे उंटावर बसलो होतो आणि माझ्या आणि पैगंबरांच्या दरम्यान 'कज़ावा' (उंटाच्या पाठीवर घालावयाचा लाकडी हौदा. याच्या दोन्ही बाजूंस माणसे बसतात.) चा फक्त मागील भाग होता.

पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी म्हणालो, ''हुजूर, गुलाम हजर आहे, आदेश द्यावा.'' पैगंबर (स.) काही बोललेच नाहीत. मग काही अंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी तेच शब्द पुन्हा उच्चारले जे पहिल्यांदा म्हटले होते. (परंतु पैगंबर काहीच बोलले नाहीत.) मग काही अंतर पुढे गेल्यानंतर पैगंबर म्हणाले, ''दासांवर अल्लाहचा कोणता अधिकार आहे हे तुम्हाला माहीत आहे काय?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांनाच खरे काय ते माहीत.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचा अधिकार दासांवर असा आहे की त्याने (दासाने) त्याचीच उपासना करावी आणि त्याच्या उपासनेत कोणा दुसऱ्याला अजिबात भागीदार बनवू नये.'' मग काही अंतर चालल्यानंतर पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज!'' मी म्हणालो, ''बोला. हा गुलाम आपले वक्तव्य लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि प्रामाणिकपणे आपले आज्ञापालन करील.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''तुम्हाला ठाऊक आहे काय की दासांचा अल्लाहवर कोणता अधिकार (हक्क) आहे?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरांनाच उत्तमप्रकारे ठाऊक.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचे दासत्व करणाऱ्या दासांचा अल्लाहवर असा हक्क आहे की अल्लाहने त्यांची शिक्षा माफ करावी.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण : माननीय मुआज यांच्या कथनाचे स्पष्टीकरण असे आहे की मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अगदी जवळ बसलो होतो, ऐकणे व ऐकवण्यास कसलाही अडथळा नव्हता, पैगंबरांचे वक्तव्य अगदी सहजतेने मी ऐकू शकत होतो परंतु जी गोष्ट पैगंबर (स.) ऐकवू इच्छित होते ती अत्यंत महत्त्वाची होती, म्हणून पैगंबरांनी तीन वेळा हाक दिली आणि ती गोष्ट सांगितली. असे यासाठी केले जेणेकरून मला या गोष्टीचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळावे आणि मी अगदी लक्ष्यपूर्वक कान देऊन ऐकावे. पैगंबरांच्या वक्तव्याद्वारे 'एकेश्वरत्वा'चे महत्त्व स्पष्ट झाले की ते नरकाच्या यातनांपासून वाचविणार आहे. जी गोष्ट अल्लाहच्या क्रोधापासून वाचविणारी असेल आणि स्वर्गाचा (जन्नतचा) हक्कदार बनविणारी असेल, तिच्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट दासालाच्या दृष्टीने दुसरी कोणती असू शकते?

(२) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (अब्दुल कैस यांच्या कबिल्याची देखभाल करणाऱ्यांना) विचारले, ''एक अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय?'' त्यांनी उत्तर दिले, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरच उत्तमप्रकारे जाणतात.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''ईमान म्हणजे मानवाने या सत्याची ग्वाही द्यावी की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत आणि नमाज (प्रार्थना) योग्य पद्धतीने अदा करावी आणि जकात (दानधर्म) द्यावी आणि रमजान महिन्याचे रोजे (उपवास) करावेत.'' (हदीस : मिश्कात)

(३) माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा जेव्हा प्रवचन दिले, त्यात हे अवश्य सांगितले की ''ज्याच्यात ठेव नाही त्याच्यात ईमान नाही आणि ज्याच्यात वचनाचे संरक्षण व आदर नाही त्याच्याकडे दीन (जीवनधर्म) नाही.'' (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की जो मनुष्य अल्लाहचे हक्क आणि दासांचे हक्क, ज्यांची पूर्ण यादी अल्लाहच्या ग्रंथात आहे, अदा करीत नाही त्याचा ईमान परिपूर्ण नाही आणि जो मनुष्य एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन देतो, मग ती गोष्ट पूर्ण करीत नाही आणि ते वचन पाळत नाही, तो धर्मपरायणतेच्या ईशदेणगीपासून वंचित राहतो. ज्याच्या मनात ईमानची मुळे दृढ रुतलेली असतात तो सर्व प्रकारचे हक्क प्रामाणिकपणे अदा करतो. कोणताही हक्क अदा करण्यात कुचराई करीत नाही. अशाप्रकारे ज्या मनुष्यात धर्मपराणता असेल तो मरेपर्यंत वचनाचे पालन करील. लक्षात असू द्या की सर्वांत मोठा हक्क अल्लाहचा आहे, त्याच्या पैगंबरांचा आहे, त्याने अवतरित केलेल्या ग्रंथाचा आहे आणि एखाद्या मनुष्याने आपल्या अल्लाहशी आणि त्याने पाठविलेल्या पैगंबराशी आणि पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माशी केलेला करार सर्वांत मोठा करार असतो.

(४) माननीय अमर बिन अबसा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ''ईमान म्हणजे काय?'' पैगंबरांनी उत्तर दिले, ''संयम आणि दानशूरता म्हणजेच ईमान होय.'' (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : याचा अर्थ असा की ईमान म्हणजे मनुष्याने अल्लाहचा मार्ग स्वत:साठी पसंत करावा आणि त्या मार्गात जी काही संकटे येतील ती सहन करावीत आणि अल्लाहच्या आधारे पुढे पुढे जावे (हा संयम आहे) आणि मनुष्याने आपली मिळकत अल्लाहच्या वंचित व निराश्रित दासांवर अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी खर्च करावी आणि खर्च करून खुशी अनुभवावी (ही दानशूरता आहे).


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget