Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)


(१०४) काय या लोकांना माहीत नाही की तो अल्लाहच आहे जो आपल्या भक्तांचा पश्चात्ताप स्वीकारतो, आणि त्यांच्या दानधर्माला स्वीकृती प्रदान करतो, आणि हे की अल्लाह अत्यंत क्षमाशील व दयाळू आहे?

(१०५) आणि हे पैगंबर (स.)! या लोकांना सांगा की तुम्ही कर्म करा, अल्लाह आणि त्याचा पैगंबर व श्रद्धावंत सर्व पाहतील की तुमची कार्यपद्धती आता कशी राहते,९९ मग तुम्ही त्याच्याकडे परतविले जाल जो दृश्य आणि अदृश्य सर्व गोष्टी जाणतो, आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत राहिला होता.१००

(१०६) काही दुसरे लोक आहेत ज्यांचा मामला अजून अल्लाहच्या हुकूमावरून स्थगित आहे. वाटल्यास त्यांना शिक्षा करील आणि वाटल्यास तो पुनरपि त्यांच्यावर मेहरबान होईल. अल्लाह सर्वकाही जाणतो आणि तो बुद्धिमान व सर्वज्ञ आहे.१०१

(१०७) काही अन्य लोक आहेत ज्यांनी एक मस्जिद बनविली या हेतूपोटी की (सत्याच्या आवाहनाला) हानी पोहोचवावी, आणि (अल्लाहची बंदगी करण्याऐवजी) कुफ्र (अवज्ञा) करावा आणि श्रद्धाळूंमध्ये फूट पाडावी, व (त्या सकृतदर्शनी प्रार्थनागृहास) त्या व्यक्तीसाठी पाळतीची जागा बनवावी जो यापूर्वी अल्लाह व त्याच्या पैगंबराविरूद्ध युद्धरत राहिला आहे. ते निश्चितच शपथा घेऊन घेऊन सांगतील की आमचा हेतू तर भलाईखेरीज दुसरा कोणत्याही गोष्टीचा नव्हता, पण अल्लाह साक्षी आहे की ते पुरते लबाड आहेत.

(१०८) तुम्ही त्या इमारतीत कदापि उभे राहू नका. जी मस्जिद प्रथम दिनापासून ईशपरायणतेवर स्थापन करण्यात आली होती तीच यासाठी अधिक योग्य आहे की तुम्ही तिच्यात (उपासनेसाठी) उभे राहावे; तिच्यात असे लोक आहेत जे पवित्र राहणे पसंत करतात, आणि अल्लाहला पवित्र्य बाळगणारेच पसंत आहेत.१०२       




९९) येथे ईमानच्या खोटे दावेदारांचा आणि गुन्हेगार ईमानधारकांचा फरक स्पष्ट करण्यात आला आहे. जो कोणी ईमानचा दावा करतो परंतु वास्तवात अल्लाह आणि त्याने दिलेल्या त्या जीवनपद्धतीवर आणि ईमानधारकांच्या जमातवर निष्ठा ठेवत नाही; त्याचे अनिष्ठावान होण्याचा पुरावा त्याच्या आचारविचारातून मिळाला तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यासाठी तो काही देत असेल तर ते रद्द केले जाईल. मेल्यानंतर मुस्लिम त्याची जनाजा नमाज अदा करणार नाही आणि ईमानधारक त्याच्यासाठी क्षमेची प्रार्थना करणार नाही, मग तो त्याचा बाप किंवा भाऊ का असेना. जी व्यक्ती ईमानधारक आहे आणि त्याच्या हातून अनिष्ठापूर्ण कार्य घडते आणि तो आपल्या अपराधांची क्षमायाचना करील तर त्याची क्षमायाचना स्वीकारली जाईल. त्याने दिलेले दान स्वीकारले जाईल आणि त्याच्यासाठी मुक्तीची प्रार्थना केली जाईल. आता येथे प्रश्न पडतो की कोणत्या व्यक्तीला अनिष्ठापूर्ण नीती स्वीकारूनसुद्धा दांभिकांऐवजी केवळ गुन्हेगार ईमानधारक समजले जाईल. यासाठी तीन कसोट्या या आयतीत सांगितल्या आहेत. 

१) तो आपल्या अपराधाला एखादे अनुचित कारण आणि हेतू सांगत बसण्याऐवजी स्पष्टपणे सरळ मान्य करतो. 

२) त्याच्या  मागील  कार्यपद्धतीवर  दृष्टिक्षेप  टाकला  जाईल  की  हा  अनिष्ठेचा  सराईत  गुन्हेगार तर नाहीना? जर त्याची विचारसरणी आणि जीवनव्यवहार पूर्वी चांगुलपणाचा  आणि भलाईचा असेल तर मानले जाईल की ही त्याची विवशता आहे जी तात्पुरत्या स्वरुपात पुढे आली आहे.

३) भविष्यातील त्याच्या जीवनव्यवहारावर लक्ष ठेवले जाईल. त्याने आपली चूक तोंडीच कबूल केली की वास्तविकपणे त्याच्या अंतरंगात पश्चात्तापाची भावना वसलेली आहे. जर तो आपल्या अपराधाच्या क्षतिपूर्तीसाठी बेचैन असेल तर मान्य केले जाईल की तो खरोखरच लज्जित झाला आहे आणि ही लज्जाच त्याच्या ईमान व निष्ठेचे प्रमाण असेल.

हदीस विद्वानांनी या आयतींचा अवतरण हेतू स्पष्ट करताना ज्या घटनेचा उल्लेख केला आहे त्याने हा विषय स्पष्ट होतो. त्यांच्या मते या आयतीं अबू लुबाबा बिन अब्दुल मुंजीर (रजि.) आणि त्यांच्या सहा साथीदारांविषयी अवतरित झाल्या. अबू लुबाबा (रजि.) त्या लोकांपैकी होते ज्यांनी बैअते अक्बाच्या वेळी हिजरतपूर्वी इस्लाम स्वीकारला होता. नंतर बदर, उहुद आणि इतर युद्धात सामील होते. परंतु तबुकच्या युद्धाप्रसंगी त्यांच्यावर `स्व' स्वार झाला होता आणि ते विना योग्य कारणाने घरी बसून राहिले. असेच निष्ठावान त्यांचे दुसरे साथीदारसुद्धा होते आणि तेसुद्धा आपल्या इच्छा आकांक्षाच्या आहारी गेले. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) तबुक युद्धाहून परत आले आणि त्या लोकांना माहीत झाले की युद्धासाठी न जाता घरी बसून राहणाऱ्यांसाठी अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे काय मत आहे, ते सर्व अतिलज्जित झाले. चौकशी होण्याअगोदर त्यांनी स्वत:ला खांबाशी बांधून घेतले आणि सांगितले की आमच्यासाठी आता निद्रा  आणि खाणे-पीणे हराम आहे जोपर्यंत आम्हाला क्षमा केली जात नाही किंवा आम्हाला मृत्यू येत नाही. अशाप्रकारे अनेक दिवस काहीही न खाता-पिता आणि झोप न घेता त्यांनी खांबाला स्वत:ला बांधून ठेवले. शेवटी ते बेशुद्ध झाले. शेवटी जेव्हा त्यांना सांगितले गेले की अल्लाहने आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तुम्हाला क्षमा केली आहे, तेव्हा त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना निवेदन केले, ``ज्या घराच्या आरामाने आम्हाला कर्तव्यापासून रोखले होते म्हणून आम्ही आमची घरे आणि सर्व संपत्ती क्षमायाचनेत समाविष्ट करून अल्लाहच्या मार्गात अर्पण करीत आहोत.'' परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``सर्व संपत्ती देण्याची आवश्यकता नाही तर फक्त एकतृतियांश संपत्ती द्यावी हे योग्य आहे.'' त्वरित ती संपत्ती त्यांनी अल्लाहच्या मार्गात दिली. या घटनेवर विचार केल्यावर कळते की अल्लाहजवळ क्षमायाचना कोणत्या प्रकारच्या विवशतेसाठी आहे. हे सर्वजण अभ्यस्त अनिष्ठावान नव्हते. यांच्या जीवनातील मागील कारकीर्द ईमान व निष्ठेचे प्रमाण होते. यांच्यापैकी कोणीच बहाणा केला नाही तर आपल्या अपराधाला स्वत: स्वीकारले. अपराध मान्य करून त्यांनी आपल्या आचरणाने सिद्ध केले की ते अतिलज्जित आहेत आणि आपल्या अपराधाच्या क्षतिपूर्तीसाठी बेचैन आहेत.

१००) म्हणजे  शेवटी  निर्णय  अल्लाहच्या  हातात  आहे. त्याच्याकडे काहीच लपून राहू शकत नाही. एखादा मनुष्य जगात आपल्या द्रोहाला लपविण्यात यशस्वी झाला तरी त्याची ईशद्रोहाच्या शिक्षेपासून सुटका नाही.

१०१) त्या लोकांचा मामला संदिग्ध होता. ते दांभिक असल्याचा निर्णय होऊ शकत नव्हता की अपराधी मुस्लिम होण्याचा. या दोन्ही प्रकाराची लक्षणे स्पष्ट झाली नव्हती. गुन्हेगार ईमानधारक होण्याचे चिन्ह अद्याप पुढे आले नाही म्हणून अल्लाहने यांच्याविषयीचा मामला स्थगित ठेवला. अल्लाहसमोर हा व्यवहार संदिग्ध होता म्हणून नव्हे तर मुस्लिमांच्यासाठी किंवा मुस्लिमांच्या गटासाठी आपले मत आणि नीतीरीती तोपर्यंत निश्चित केली जाऊ शकत नाही जोपर्यंत त्यांची स्थिती परोक्ष ज्ञानाने नव्हे तर बुद्धीविवेकाने परखली जावी.

१०२) पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीनेला आगमन होण्यापूर्वी खजरज कबिल्यात एक अबू आमिर नावाचा व्यक्ती होता. अज्ञानताकाळात तो िख्र्तासी संन्यासी (पादरी) होता. ग्रंथधारक विद्वानांपैकी तो एक होता. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीना येथे आगमन झाले तेव्हा त्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाच्या दाव्याला आणि इस्लामच्या आवाहनाला आपल्या बुजुर्गी, मानसन्मानासाठी मृत्यूघंटा समजले आणि त्यांचा घोर विरोधक बनला. उहुदच्या युद्धापासून हुनैनच्या युद्धापर्यंत जितके युद्ध मुस्लिम आणि अरबच्या अनेकेश्वरवादींमध्ये झाले, त्या सर्वात हा िख्र्तासी पादरी इस्लामविरुद्ध अनेकेश्वरत्वाचा   खंदा   पुरस्करता  होता. शेवटी  तो  अरब  भूमी  सोडून  रोम मध्ये  स्थायिक  झाला जेणेकरून `कैसर'ला या `धोक्या'पासून सावध करावे. हा धोका अरब भूमीत डोके वर काढू लागला होता. हा तोच काळ होता जेव्हा कैसर अरबवर चढाई करण्याची तयारी करत होता. ही बातमी मदिना येथे येऊन धडकली. यासाठी पैगंबर  मुहम्मद (स.) यांना `तबुक'च्या मोहिमेवर जावे लागले होते. अबू आमिर संन्याशाच्या सर्व कारवायामध्ये मदीनेतील दांभिकांचा एक गट सामील होता. जेव्हा तो रोमकडे जाऊ लागला होता तेव्हा त्याच्यात आणि या दांभिकामध्ये एक करार झाला होता. तो म्हणजे मदीना येथे ते आपल्यासाठी एक वेगळी मशीद बांधतील. यामुळे सर्वसामान्य मुस्लिमांऐवजी दांभिक मुस्लिमांचा एक प्रबळ गट तयार होऊन त्यावर धर्माचा पडदा पडलेला असेल. कोणीही त्यावर शंका घेणार नाहीत. त्या ठिकाणी दांभिक संघटित होतील तसेच सल्लामसलती होतील आणि अबू आमिरच्या हेरांना थांबण्यासाठी सुरक्षित जागा होईल. हा एक अपवित्र षड्यंत्र होता ज्याच्यासाठी मशीद बांधली गेली होती. याचा या आयतमध्ये उल्लेख आला आहे. 

मदीनामध्ये त्या वेळी दोन  मस्जिदी होत्या,  एक मस्जिदे कुबा जी शहराच्या किनाऱ्यावर होती आणि दुसरी मस्जिदे नबवी जी शहरात होती. या दोन मस्जिदीपेक्षा तिसरी मस्जिद बनविण्याची काहीच गरज नव्हती. परंतु अशामुळे मुस्लिम समाजात फूट पडण्याचीच आशंका होती. दांभिकांनी मस्जिद बनविण्यापूर्वी तिची आवश्यकता पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितली. त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) समोर नव्या निर्माणासाठी गरजही दाखविली की सर्दी आणि पावसाळयात म्हातारे, आजारी व विवश लोकांना दोन्ही  मस्जिदीत पाच वेळा नमाजसाठी येणे कष्टप्रद आहे. म्हणून केवळ नमाजी लोकांच्या सोयीसाठी या नव्या मशीदीचे निर्माण आम्ही इच्छितो. अशाप्रकारे त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापासून नवीन मस्जिदीची परवानगी घेतली आणि आपल्या षड्यंत्रासाठी एक अड्डा बनविला. त्यांची इच्छा होती की पैगंबर मुहम्मद (स.) यांना धोका देऊन या मस्जिदीचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते करावे परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हे टाळले व त्यांना म्हणाले, ``या वेळी मी युद्धाच्या तयारीत मग्न आहे. एक मोठी मोहीम डोळयांसमोर आहे. या मोहिमेवरून परत आल्यावर पाहू या.'' या नंतर पैगंबर मुहम्मद (स.) तबुककडे रवाना झाले. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पाठीमागे हे लोक जत्थाबंदी करून षड्यंत्र रचू लागले. परत येताना पैगंबर मुहम्मद (स.) `जुअदान' या ठिकाणी आले. हे ठिकाण मदीना शहरालगतच होते. तेव्हा या आयती अवतरित झाल्या. त्वरित पैगंबर मुहम्मद (स.) यांनी काही साथीदारांना मदीना येथे पाठविले जेणेकरून स्वत: मदीना शहरात दाखल होण्यापूर्वी नुकसान देणाऱ्या जरार नामक मशीदीला ध्वस्त करून टाकावे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget