Halloween Costume ideas 2015

वास्तविक ज्ञानाकडे वाटचाल हवी


निर्मात्याने अज्ञान दूर करण्यासाठी अनेक पैगंबरांना ज्ञानासह पाठविले. त्यांच्या संदेशाचा सारांश हा की, या जगात प्रत्येक माणूस जबाबदार आहे ! प्रत्येकाला एका ठराविक वेळी निर्मात्यासमोर जाब द्यावाच लागेल ! दुनिया अंधेर नगरी नव्हे, पाहणारा आहे! कुरण, मोकळ रान नव्हे, परिक्षागृह आहे. हे जीवन खरे पाहता प्रत्येकाची परीक्षा आहे.

अंधार हा एक व्यापक अर्थाचा शब्द असून प्रामुख्याने त्याने ’अज्ञान’  अभिप्रेत आहे. तर प्रकाश हाही व्यापक अर्थाचा शब्द असून प्रामुख्याने त्याने ’ज्ञान’ अभिप्रेत आहे. साहजिकच समाजाला अज्ञानातून ज्ञानाकडे आवाहन करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ’अज्ञान’ हाही व्यापक अर्थाचा शब्द आहे त्याने अभिप्रेत भौतिक विषयांविषयी अज्ञान तर आहेच पण प्रामुख्याने सृष्टीच्या आणि खुद्द मानवाच्या निर्मात्याविषयीचं अज्ञान, जीवनाच्या मूळ व वास्तविक उद्दिष्टाविषयीचं अज्ञान, मृत्यु आणि मृत्युपलिकडील जीवनाच्या वास्तवतेबद्दल अज्ञानही अभिप्रेत आहे.

अद्वतच ’ज्ञान’ हाही  व्यापक अर्थाचा शब्द आहे. त्याने अभिप्रेत भौतिक ज्ञान तर आहेच पण त्याच बरोबर स्वत:ची खरी ओळख, निर्मात्याची ओळख, जीवनाच्या खर्‍या उद्देशाची जाणीव आणि मृत्यू व त्या पलिकडील जीवनाचे वास्तविक ज्ञानही अभिप्रेत आहे.

सद्य युगात मानव जातीने भौतिक ज्ञानाला सर्वाधिक महत्व दिले आहे. परिणामस्वरूप भौतिक प्रगती तर साध्य झाली. माणूस असमंतात भरारी घेऊ लागला. उभं जग ग्लोबल व्हिलेज मध्ये रूपांतरीत झाले. माणसं भौतिक दृष्टा तर जवळ आली. मात्र मनाने दुरावत गेली. माणूस ’माणूस’ राहिला नाही. तो पशूंपेक्षाही नीच वागू लागला. हिंस्त्र पशूंनी शरमेने मान खाली घालावी एवढं नीच तो वागू लागला. हे वृध्दाश्रम कल्चर, हा बोकाळलेला भ्रष्टाचार, ही बेईमानी, अगदी कोरोनासारख्या महामारीतही औषधांचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी रूग्णांची लूट, ही अश्‍लीलता, ही नग्नता ही हाथरसची आणि तत्सम इतरत्र घडणार्‍या अत्यंत निर्घृण, निर्दयी, मानवतेला, देशाला काळीमा फासणार्‍या घटना हे सर्व कशाचं द्योतक आहेत? प्रगतीचे? विकासाचे? प्रकाशाचे? ज्ञानाचे की अधोगतिचे? भकासपणाचे? अंध:काराचे? अज्ञानाचे? 

या दुर्दशेेचं मूळ कारण माणसांची स्वत:बरोबरच निर्मात्या विषयीचं अज्ञान आहे. जीवनाच्या वास्तविक उद्दिष्टाविषयीचं अज्ञान आहे. मृत्यू व मृत्यू पलिकडील जीवनाविषयीचं अज्ञान आहे. माणसाने असा गैरसमज करून घेतलाय की, मी या जगात गुराढोरांप्रमाणेच एक बेजबाबदार निर्मिती आहे. ना कोणी निर्माता ना कोणी पाहणारा आणि ना कोणी ऐकणारा. ही दुनिया अंधेर नगरी आहे! ही दुनिया एक कुरण आहे, चरण्यासाठी! मोकळं रान आहे! घ्या चरून! हवं तेथे, हवं तसं, हवं तेवढे! मेलं मातीत गेलं म्हणजे संपलं! कसला जाब नि कसला जबाब? कसला न्याय नि कसला निवाडा! जे काही आहे ते फक्त आणि फक्त सद्य जीवनच आहे ! मृत्यु पलिकडे काहीच नाही! अग्नि दिला राख झाली, दफन केलं माती झाली म्हणजे संपलं! हेच माणसाचं भयंकर अज्ञान आहे.

निर्मात्याने हे अज्ञान दूर करण्यासाठी अनेक पैगंबरांना ज्ञानासह पाठविले. त्यांच्या संदेशाचा सारांश हा की, या जगात प्रत्येक माणूस जबाबदार आहे ! प्रत्येकाला एका ठराविक वेळी निर्मात्यासमोर जाब द्यावाच लागेल ! दुनिया अंधेर नगरी नव्हे, पाहणारा आहे! कुरण, मोकळ रान नव्हे, परिक्षागृह आहे. हे जीवन खरे पाहता प्रत्येकाची परीक्षा आहे. आज तुला आचार विचारांचे स्वातंत्र्य जरूर आहे! पण हे स्वातंत्र्य स्वैराचारासाठी नव्हे, भ्रष्टाचारासाठी नव्हे, विध्वंस करण्यासाठी नव्हे तर सेवेसाठी, इमाने इतबारे कमावण्यासाठी, रचनात्मक, विधायक कार्य करण्यासाठी आहे.

      इथे मृत्यु अटळ आहे! काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र मृत्यु आला, अग्नि दिला, राख झाली किंवा दफन केले, माती झाली म्हणजे शेवट नव्हे. राख, मातीच्या पलिकडे जीवन आहे. निरंतर जीवन, अविनाशी जीवन! मात्र याद राख, त्या निरंतर जीवनाच्या यशापयाशाची धुरा आपल्या सद्य जीवनातील कर्मांवर आहे. ’यह दुनिया आखिरतकी खेती है - पैगंबर मुहम्मद (स.).’ बीज बोए बभूलके, आम कहाँसे पाए? - संत कबीर. पेरी कडू जिरे, मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती? - तुकोबा. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही विचार केला तर राख अथवा माती कुणाची होते? पेशंटची? कदापि नव्हे! अग्नी तर पेशंट गेल्यावर देतात! दफन तर पेशंट गेल्यावर करतात! पेशंट गेला आता राहिलं ते काय? डेड बॉडी, प्रेत, शव, मढं! आणि दफन करतात ते या डेड बॉडीला! पेशंटला कदापि नव्हे! मग पेशंंटची राख अथवा माती होण्याचा काय प्रश्‍न?

आता प्रश्‍न हा की हे जीवन परीक्षा असेल तर या जीवनात त्याग करणार्‍यांना, विधायक काम करणार्‍यांना, ईमाने इतबारे जीवन जगणार्‍यांना सदाचार्‍यांना त्यांच्या सत्कृत्यांबद्दल मोबदला मिळावा की नव्हे? आणि दुराचार्‍यांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा मिळावी की नाही? माणसाचं अंत:र्मन म्हणतं की हो! सज्जनांना त्यांच्या सत्कृत्यांबद्दल योग्य इनाम मिळायलाच हवा! आणि दुष्टांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा मिळायलाच हवी! हेच आहे वास्तव! मृत्यु पलिकडे जीवन आहे आणि त्याची धुरा सद्य जीवनातील आचार-विचारांवर,  बर्‍यावाईट कर्मांवर अवलंबून असणार आहे.

तात्पर्य हे की जीवनाविषयीचं हे ज्ञान अत्यंत मोलाचं आहे. मात्र आज बहुतेक लोक त्याविषयी अज्ञानी आहेत. त्यांना या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहचविण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात येत आहे. तर मग चला ’अंधारातून प्रकाशाकडे.’ 


- डॉ. सय्यद रफिक

(लेखक हे कुरआनचे व संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. मो. 9423161508)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget