Halloween Costume ideas 2015

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे नेमके काय?


जगात सगळ्यात जास्त घृणेचा सामना सत्य बोलणार्‍यांना करावा लागतो. इस्लाम सत्य आहे आणि त्या सत्याचा परिचय जगाला करून देणारे मुसलमान सत्य बोलतात म्हणून घृणेस पात्र ठरतात. 

कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि हा जगातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. समस्त मानवजातीला ”अंधारातून प्रकाशाकडे” नेण्याचा कुरआनचा उद्देश आहे. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे 22 ते 31 जानेवारी दरम्यान राबविल्या जाणार्‍या ”अंधारातून प्रकाशाकडे” या मोहिमेचा असा अर्थ काढला जावू शकेल की या मोहिमेदरम्यान, मानवाच्या अप्रगत अवस्थेतून प्रगत अवस्थेपर्यंतच्या आजपावेतोच्या स्थित्यंतराबद्दल चर्चा करण्याचा मानस असेल. परंतु येथे एवढा मर्यादित अर्थ नाही, कारण साधारणपणे प्रगती म्हणजे भौतिक प्रगती असा अर्थ काढला जातो. मात्र भौतिक प्रगती म्हणजेच सर्व काही नाही. मनुष्य जेव्हा भौतिक आणि नैतिक अशा दोन्ही प्रगती साध्य करतो तेव्हाच त्याचा सर्वांगीन विकास झाला अशी कुरआनची संकल्पना आहे. 

ही प्रगती साध्य करण्यासाठी खिलाफत अर्थात शासन ही संस्था उदयास आणली गेली. खिलाफत व्यवस्थेच्या अगोदर आणि त्यानंतर सुद्धा या व्यवस्थेव्यतिरिक्त शासनाचे अनेक प्रकार अस्तित्वात आले आणि लयास गेले. आज सर्वात जास्त लोकप्रिय शासन व्यवस्था म्हणजे भांडवलशाही लोकशाही व्यवस्था होय. यालाच कल्याणकारी लोकशाही असेही म्हटले जाते. या व्यवस्थेत संसाधनांची मालकी व्यक्तीची असल्या कारणाने याला सर्वश्रेष्ठ शासनप्रणाली समजली जाते. शीत युद्धानंतर जगात जवळ-जवळ सर्वच देशात ही शासन व्यवस्था अस्तित्वात आहे. मात्र कुरआनला अपेक्षित असलेली संतुलित प्रगती साध्य करण्यामध्ये ही व्यवस्थाही पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते. यात समग्र भौतिक आणि नैतिक प्रगती तर सोडा फक्त भौतिक प्रगती सुद्धा सर्वांची सारखी होत नाही. यात अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, गरीब, अतिगरीब अशी सामाजिक उतरंड अस्तित्वात आल्याचे दिसून येते. 

प्रेषितपूर्व काळातील अंधार

ये जब्र भी देखा है तारीख की नजरोंने 

लम्हों ने खता की थी सदीयों ने सजा पायी

आदिमानव अवस्थेपासून सातव्या शतकात येईपर्यंत जगात पूर्णपणे अंधार दाटलेला होता. राजे प्रजेला कस्पटासमान लेखत होते, ते प्रजेला स्व:ला सजदा (वंदन)  करण्यास भाग पाडत होते, माणसाची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत होती, स्त्रियांना कवडीची किंमत नव्हती, त्यांचा जन्मच अशुभ मानला जाई, त्यांना जन्म:च जीवंत पुरले जाई त्या काळात महिलांच्या बाबतीत ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे विचार अतिशय विकृत होते. तरतुलीयन नावाच्या ख्रिश्‍चन विचारकाचे महिलासंबंधीचे मत असे होते की, ”ती सैतानाची प्रवेशद्वार आहे. ती वर्जित वृक्षाकडे पुरूषाला घेऊन जाणारी आहे. ईश्‍वरीय कायद्यांना तोडणारी आणि पुरूषांना नष्ट करणारी आहे.”क्राईस्टोम नावाच्या ख्रिश्‍चन विचारकाचे स्त्रीच्या बाबतीत मत असे होते की, ती एक आवश्यक वाईटपण आहे. एक जन्मजात वासना, एक आवडणारे संकट, एक पारिवारीक संकट, एक नष्ट करणारी प्रिती, एक सजली सवरलेली आफत आहे” (संदर्भ : परदा, पृष्ठ क्र. 16). त्या काळात वेश्या व्यवसाय सुरू होता, छोट्या-छोट्या कारणांनी युद्धे होत होती, ती वर्षानुवर्षे चालत होती, अंधश्रद्धा प्रत्येक समाजात व्याप्त होती, मूर्तीपूजेचा जोर होता, पुरोहित वर्गाचे वर्चस्व होते, उच्चनीचतेची भावना प्रबळ होती, गरीबांना काडीची किंमत नव्हती, त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होत होते, बळी तो कानपीळीचे तत्व सर्वत्र समान पद्धतीने लागू होते. खोटे बोलण्याला चातुर्य समजले जाई, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार व्याप्त होता, भारतात तर अस्पृश्यतेसह चातुवर्ण व्यवस्था, सतिप्रथा आणि देविदासी प्रथा जोरात सुरू होती, दारू  पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त होती, समाजामध्ये जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जाई, त्यावर बायकोला डावावर लावण्याइतपर्यंत मजल जाई, लूटमार सामान्य बाब होती, विधवांचे हाल होते, पुनर्विवाहाला परवानगी नव्हती, तिला वारसा हक्क देण्याबद्दल कुठल्याच समाजात विचारसुद्धा करण्यात येत नव्हता.

इ.स.वी.च्या सातव्या शतकात जगात जेवढा अंधार दाटला होता तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच अंधार आज 21 व्या शतकातही दाटलेला आहे. हे खरे आहे काय? तसे पाहता सकृतदर्शनी तर जगात चोहिकडे रोशनाई आहे, प्रकाशाने जग उजळून निघाले आहे, घर, रस्ते, मॉल सगळे एलईडीच्या झगमगाटाने उजळत आहे, मानवाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स करण्यापर्यंत प्रगती साधलेली आहे, तंत्रज्ञानाने जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावलेले आहेत, एवढ्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत की, आज सामान्य माणसाला ज्या सोयी उपलब्ध आहेत, त्या पूर्वीच्या काळात राजा-महाराजांना सुद्धा उपलब्ध नव्हत्या. अन्नधान्यांचे अतिरिक्त उत्पादन होत आहे, कारखाने दिवसरात्र चालू आहेत, उद्योगधंद्यांनी चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनाचे पूर्वीचे सर्व किर्तीमान उध्वस्त केलेले आहेत, छोट्या दुकानापासून मोठ्या मॉल्समध्ये जीवनावश्यक वस्तूच काय चैनीच्या वस्तूंचीही रेलचेल आहे. एवढेच नव्हे तर मनोरंजनाची अत्याधुनिक साधने मानवाचे मन रिझविण्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत. महिलांना जमीनीपासून अवकाशापर्यंत मुक्त संचार करण्याची सोय आहे. त्यांना आर्थिकरित्या समर्थ करण्यासाठी समाजाने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. मग जमाअते इस्लामी हिंदला असे का वाटत आहे की आज समाजामध्ये अंधार दाटला आहे व समाजाला प्रकाशाकडे नेण्याची गरज आहे? 

या प्रश्‍नाचे उत्तर असे आहे की जग आज जरी दैदिप्यमान दिसत असेल तरी या डोळे दिपवणार्‍या प्रगतीमध्येच मानवतेची अधोगती लपलेली आहे. अंधार युगात राजे प्रजेला कस्पटासमान लेखत होते, आजही सत्ताधारी जनतेला कस्पटासमानच लेखत आहेत. याचे ताजे उदाहरण दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आहे. 40 दिवसांपेक्षा जास्त कडाक्याच्या थंडीत शेतकरी बसलेले असून, 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा या न त्या कारणाने बळी गेलेला आहे. तरी सुद्धा शासनकर्ते त्यांची दखल घेण्यास तयार नाहीत. म्हणजेच ते जनतेला कस्पटासमान लेखत आहेत. व्याजाच्या माध्यमातून गरीबांची कष्टाची कमाई भांडवलदार लूटत आहेत. माणसांची गुलाम म्हणून खरेदी विक्री जरी होत नसली तरी त्या गरीब मजुरांची अवस्था गुलामापेक्षा फारशी वेगळी नाही. स्त्रीयांना त्या काळातही कवडीची किंमत नव्हती आणि आजही नाही. त्या काळात वेश्याव्यवसाय सुरू होता आजही सुरू आहे. त्या काळात स्त्रियांना जन्मताच जीवंत गाडले जाई आजही भ्रुणहत्या केली जाते. किंबहुना त्या जन्म घेणारच नाहीत, याचे गर्भलिंग परीक्षण करून व्यवस्था केली जाते. त्या काळात युद्ध सुरू होती आजही युद्ध सुरू आहेत. ती वर्षानुवर्षे चालत होती आजही वर्षानुवर्षे चालत आहेत. तेव्हाही मनुष्यबळाची हानी होत होती आजही होत आहे. त्या काळी अंधश्रद्धा व्याप्त होती आजही व्याप्त आहे. त्या काळी मुर्तीपूजेचा जोर होता आजही आहे. त्याकाळी पुरोहित वर्गाचे वर्चस्व होते; आजही आहे, उच्चनीचतेची भावना प्रबळ होती; आजही आहे, गरीबांना किंमत नव्हती; आजही नाही. त्या काळी गरीबांवर अत्याचार होत होते; आजही होत आहेत. त्या काळी खोटे बोलण्याला चातुर्य मानले जाई आजही मानले जाते. त्याकाळी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार व्याप्त होता; आजही आहे. फरक एवढाच झालेला आहे की, भ्रष्टाचाराच्या आणि अत्याचाराच्या पद्धती ह्या सभ्य झालेल्या आहेत.  

मानवकल्याण म्हणजे काय? 

इस्लामचे पहिले आणि शेवटचे उद्देश मानवकल्याण आहे. या जगातही आणि परलोकातही माणसाचे कल्याण व्हावे यासाठी 1 लाख 24 हजार प्रेषितांना अल्लाहने पृथ्वीवर वेळोवेळी आपला संदेश देऊन पाठविले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी मानवकल्याण कशाला म्हणायचे हे अगोदर निश्‍चित केले गेले पाहिजे. कारण दारूविक्रीशी संबंधित व्यक्तींना दारूच्या व्यवसायात तर वेश्याव्यवसायाशी संबंधित व्यक्तींना वेश्या व्यवसायात तर सिनेसृष्टीतील व्यक्तींना सिनेसृष्टीत मानवकल्याण आहे असे प्रामाणिकपणे वाटत असेल. पण कुठलाही समजदार व्यक्ती याला मानवकल्याण म्हणणार नाही. मग मानवकल्याण म्हणजे शेवटी आहे तरी काय? तर त्याचे उत्तर असे की, इस्लाम केवळ धर्म नाही तर ती जीवन जगण्याची एक परीपूर्ण ईश्‍वरी व्यवस्था आहे व ईश्‍वरनिर्मित असल्यामुळे त्रुटीमुक्त आहे. या जीवन पद्धतीमध्ये दिल्याप्रमाणे ’साध्य’ म्हणजे मानवकल्याण आणि ’साधन’ म्हणजे शरियत होय. जगात सुरू असलेल्या सर्व मानवविरोधी कृत्यांचा त्याग करून अल्लाहने दिलेल्या पद्धतीचा अंगीकार करणे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडून जाणे होय. ती कृती कोणती आणि तो प्रकाश कोणता या प्रश्‍नाचे उत्तर कुरआनमध्ये खालीलप्रमाणे दिलेले आहे. 

”आणि घोषणा कर की, सत्य आले आणि असत्य नष्ट झाले. असत्य तर नष्ट होणारच आहे” (सुरे बनीइसराईल आयत नं. 81) 

  कोंबडा झाकल्याने उजाडायचे राहत नाही आणि कितीही खोटा प्रचार केला तरी इस्लाम सत्य धर्म असल्याची जाणीव प्रामाणिक लोकांना होतेच आणि ते त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत. जीवनाचा उद्देश न ओळखता सृष्टीकर्त्याच्या सृष्टीत निरूद्देश जगणे म्हणजे कृतज्ञ बणून जगणे होय. असे जीवन जगणारे लोक संतुष्ट राहूच शकत नाहीत. ते कायम असंतुष्ट असतात. अब्जावधींची संपत्ती, मोठमोठे बंगले, गाड्या, विमाने असून सुद्धा ते समाधानी राहत नाहीत. मरेपर्यंत चैनीच्या वस्तू गोळा करत राहणे आणि एक दिवस सगळे सोडून मरूण जाणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्देश असते. अशा परिस्थितीत सत्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय निरूद्देश जीवनाला सार्थकत्व प्राप्त होत नाही. सत्य लक्षात आल्याशिवाय, असत्याचा नाश होत नाही, अशा परिस्थितीत प्रश्‍न निर्माण होतो की सत्य काय आहे? तर त्याचे उत्तर आहे, सत्य अल्लाह आहे आणि त्याने ठरवून दिलेली जीवन पद्धती आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. 

याशिवाय, कुरआनमध्ये दुसर्‍या ठिकाणी म्हटलेले आहे की, ” जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांचा समर्थक व सहायक अल्लाह आहे आणि तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणतो आणि जे लोक द्रोहाचा मार्ग अवलंबितात त्यांचे समर्थक व सहायक तागूत (सैतानी पद्धत) आहेत. आणि ते त्यांना प्रकाशापासून ओढून अंधाराकडे घेऊन जातात. हे नरकाग्नीमध्ये जाणारे लोक आहेत जेथे हे सदैव राहतील.” (सुरे बकरा आयत नं. 257). जे लोक अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर श्रद्धा ठेवतात त्यांना अल्लाहकडून अदृश्य पद्धतीने मदत प्राप्त होते. त्यांच्या जीवनातून हराम आणि अपवित्र गोष्टी नष्ट होतात व त्या जागी हलाल आणि पवित्र गोष्टींचा समावेश होतो. म्हणजेच ते अंधकारातून प्रकाशाकडे येतात व आपले जीवन सार्थक करतात. जे अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांनी दिलेल्या जीवन पद्धतीचा इन्कार करतात आणि आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतात ते षड्रिपूंच्या आहारी जाऊन या जीवनामध्येही अयशस्वी होतात आणि मरणोपरांत नरकाग्नीमध्ये फेकल्या जातात. 

जगात सगळ्यात जास्त घृणेचा सामना सत्य बोलणार्‍यांना करावा लागतो. इस्लाम सत्य आहे आणि त्या सत्याचा परिचय जगाला करून देणारे मुसलमान सत्य बोलतात म्हणून घृणेस पात्र ठरतात. त्यांचा दुस्वास केला जातो. त्यांच्यावर आतंकवादाचे आरोप केले जातात. प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्रे काढली जातात. रात्रंदिवस प्रसार माध्यमातून त्यांची बदनामी केली जाते. मुन्शी प्रेमचंदनी यांनी म्हटलेले आहे, ”खुदगर्जी में इन्सान पागल हो जाता है.” इस्लाम सोडून इतर जीवन पद्धतीमध्ये जगणारी माणसं साधारणपणे खुदगर्ज अर्थात स्वार्थी जीवन जगत असतात. इतके की वेड्यासारखे वागू लागतात. आज जगामध्ये सकृतदर्शनी जरी प्रगतीचा प्रकाश दिसत असला तरी हे वरवरचे वेष्टन आहे आत डोकाऊन पाहता सर्वत्र अंधकार आहे. या अंधकाराला आपल्या जीवनातून घालवायचे असल्यास पूर्वगृह सोडून इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. 

मुस्लिमांची जबाबदारी

माणसाच्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी इस्लाम सक्षम आहे. हे जरी खरे असले तरी हा संदेश जगापर्यंत पोहोचविण्यात मुस्लिम समाज कमी पडलेला आहे. हे मान्य करावेच लागेल. जोपर्यंत मुस्लिमांमधील बहुसंख्य लोक सर्वप्रथम आपल्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा व्यवहारिकरित्या नायनाट करणार नाहीत तोपर्यंत त्यांना हा संदेश दुसर्‍या समाजापर्यंत प्रभावीरित्या पोहोचविता येणार नाही. प्रेषितांच्या जीवनाचा उद्देश नैतिकरूपाने श्रेष्ठ समाज निर्माण करणे हा होता. त्यासाठी मुस्लिम समाजाने आपल्यामधील नैतिक अ:पतनाची सर्व कारणे सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे. मात्र हे करत असतांनाच अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा ईश्‍वरीय संदेश जगाला देण्याचेही कर्तव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे. कारण कित्येकदा संदेश देणार्‍यांपेक्षा संदेश ऐकणारे जास्त सक्षम असतात आणि त्या संदेशाला स्वीकारताना व प्रत्यक्ष जीवनात राबविताना त्याला फारसे कष्ट करावे लागत नाहीत. शिवाय, कुरआनहाची ही शिकवण हीच आहे की, ”तथापि उपदेश करीत रहा कारण उपदेश श्रद्धावंतांसाठी लाभदायी आहे” (सुरे अज्जारियात आयत नं. 55) म्हणून कुरआनच्या शिकवणीचा हा उपदेश सतत करत राहिल्याने आपल्या जीवनातून अंधकार दूर करण्याबरोबर दुसर्‍यांच्या जीवनातूनही तो दूर जाईल, यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत. 



- एम.आय. शेख

(लेखक सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक असून, शोधनचे स्तंभलेखक आहेत. मो.9356727219 )


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget