Halloween Costume ideas 2015

जग मागतो शांती


21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. आज कोव्हीड 19 च्या कचाट्यात अडकलेले हे जग आणि त्यात सगळ्या बाजूंनी पसरलेली अशांतता ह्याचे विश्‍लेषण करणे आवश्यक आहे. आपत्तींचे शास्त्रीय स्पष्टीकरण असे आहे की जेव्हा कोणी नैसर्गिक व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतो, तेव्हा पृथ्वीवरील शांतता नष्ट होते आणि निसर्ग अश्या आपत्तींचा रूपात  बदला घेतो . बहुतेक वेळा जैवविविधता हॉटस्पॉट्सपासून (Biodiversity hotspot) रोग उद्भवतात आणि असे म्हणतात की यामागील वास्तविक कारण म्हणजे अत्याधिक औद्योगिक क्रियाकलाप (excessive industrial activity) आणि या भागातील पर्यावरणीय असंतुलन असते. पर्यावरणीय गडबडींमुळे प्राण्यांमध्ये मर्यादीत असणारे सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू लागतात  आणि नवीन आजार निर्माण करण्यास कारणीभूत होतात.

    तथापि, नैतिक आणि अध्यात्मिक कायदा  पृथ्वीवर शांतता आणि सुसंवाद राखण्यासाठी निसर्गावर त्याच्याहून  जास्त नियंत्रण ठेवतो. एक सुविचार आहे, ’जेव्हा आपण आणि ईश्‍वर यांच्यात ढग नसतो तेव्हा शांती येते.’ हिंसा, अन्याय, अत्याचार, हत्या, द्वेष, भ्रष्टाचार, खोटे प्रसार, बलात्कार, अश्‍लीलता, वंशविद्वेष यासारख्या मानवी कृती दहशतवादाचे प्रकार आहेत. ज्यांची ईश्‍वर निंदा करतो, तोच ईश्‍वर जो सर्व जगाचा निर्माता आहे आणि जो न्याय, प्रेम, आदर, सन्मान, समानता, शांती ह्यांना पसंत करणारा आहे आणि ज्याची मागणी आहे कि, ह्या जगाला  सुसंवादी जीवन लाभण्यासाठी हे नियम स्थापित करणे आवश्यक आहे.

    जेव्हा ह्या ठरविलेल्या ईश्‍वरीय नैतिकतेवरील मानवाची पकड सुटते तेव्हा त्याचा परिणाम अशा आपत्तींच्या रूपात समोर येतो. ज्यापुढेे मानवजात पूर्णपणे असहाय्य होते आणि त्याच्याजवळ सर्वसमर्थ ईश्‍वराच्या पुढे स्वतःला अर्पण करण्याऐवजी आणखीन काही पर्याय राहत नाही. ईश्‍वराच्या क्रोधाच्या रूपात आलेल्या ह्या आपत्ती मानवजातीला जास्त नुकसानापासून वाचविण्यासाठी आणि  योग्य वेळी योग्य मार्गाकडे वळण घेण्यासाठी  रचली जातात. सर्वात दयाळू ईश्‍वर मानवजातीवर प्रेम करतो आणि म्हणूनच एक काळजी घेणारी व प्रेमळ आई मुलाला त्याच्या दुर्व्यव्हारावर, त्याला सुधारण्यासाठी जसे क्रोधात येऊन शिक्षा करते, त्याचप्रमाणे ईश्‍वर सुद्धा मानवजातीला सुधारण्याचा इशारा देतो. ईश्‍वराला क्षमा करण्यास आवडते  परंतु जेव्हा जुलूम एखाद्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचतो ज्यामुळे इतरांना अमर्यादित वेदना होतात तेव्हा ईश्‍वराचा  क्रोध आपत्तींच्या रूपात येतो.

    बरेच लोक ही श्रद्धा ठेवतात की, ईश्‍वराचा त्यांच्या जीवनावर अधिकार आहे, संदेशवाहकांचा संदेश ईशवाणी आहे ज्याचे पालन झाले पाहिजे आणि परलोक जीवन एक वास्तव आहे ज्यात जगाच्या जीवनाचा हिशोब द्यावयाचा आहे आणि स्वर्ग आणि नरकाच्या रूपात त्याचे परिणाम  भोगायचेे आहेत.  हा विश्‍वास सर्व धर्मांचा पाया आहे आणि माणसात नैतिकतेचे  उत्थान आणि मानवतेला उभारी देणारा एक मजबूत स्रोत आहे.
 परंतु  हा विश्‍वास आज कृतीत कुठेही आढळत नाही.
प्राचीन काळात ईश्‍वराच्या आधिनतेवर आणि त्याच्यासमोर कर्मांचा हिशोब देण्याच्या जबाबदारीवर अवलंबून असलेली कारकीर्दीची व्यवस्था हजरत अबुबकर रजि.या खलिफांनी कशी पार पडली ह्याचे एक उदाहरण देत हजरत उमर रजि. या दुसर्‍या खलिफा यांनी घडलेली एक घटना सांगीतली  की मी उमर ! एका वृद्ध आंधळ्या स्त्रीच्या दिनचर्येची कामे रोज रात्रीच्या वेळा करत होतो. एका रात्री त्यांना समजले की कोणीतरी त्यांच्या अगोदर येवून सर्व कामे केलेली आहेत. दुसर्‍या रात्री जेव्हा त्यांना परत तसेच आढळले. तेव्हा त्यांनी ती व्यक्ती कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी ते लवकर आले आणि लपून बसले. जेव्हा तो माणूस आला, तेव्हा ह.उमर रजि यांनी त्याला पकडले आणि त्यांना आढळले की झाकलेल्या चेहर्‍या मागे खलीफा ह. अबुबकर रजि. शिवाय इतर कोणी नाही. ही घटना अधोरेखित करते की ईश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे  काम करणार्‍या आणि माणुसकीचे मुल्यमापन करणार्‍या नेतृत्त्वात अशी नैतिकता विकसित होते की, ज्यामुळे ते आपल्या प्रजेची काळजी वाहतात. जेव्हा जनतेची नेत्यांना चिंता असते आणि त्यातून ते त्यांच्यावर शासन न करता त्यांची सेवा करण्यास आपले कर्तव्य समजतात तेव्हा ते पण एक मालक आणि हुकूमशहा म्हणून नव्हे तर प्रजेचा एक सेवक म्हणून आपली भूमिका बजावता असतात.

    इतिहास साक्षी आहे की, जेव्हा ही मूलभूत श्रद्धा विसरली गेली किंवा तिला पाठीमागे घातले गेले तेव्हा मानवतेचे तुकडे तुकडे झाले. राष्ट्रशांती बिघडली, सामाजिक, आर्थिक संकटे आली, युद्धे झाली आणि शेवटी मोठमोठ्या साम्राज्यांचे पतन झाले. मग ते रोमन साम्राज्य असो, पोर्तुगीज, नाझी जर्मनी,  किंवा ब्रिटीश साम्राज्य असो. या सगळ्या साम्राज्यांचे राज्यकर्ते जेव्हा आपल्या योग्य मार्गापासून विचलित झाले, आपल्या निर्माता आणि निर्मितीच्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ ठरले, आपल्या जीवनाच्या हेतूला विसरले तेव्हा त्यांना जमिनीची धूळ चाटावी लागली. संपत्ती, सत्ता, जागतिकीकरण, मक्तेदारीची लालूच,  शक्तीसमवेत अभिमान ही सर्वात मोठी साम्राज्यांचा नाश होण्याची कारणे आहेत. परंतु या इतिहासाकडे लक्ष देऊन, त्यांच्यापासून बोध घेऊन, आपल्या जीवनात  श्रद्धा आणि मानवतेच्या आधारावर क्रांती  होण्याऐवजी  मानवजात त्याच चुका पुन्हा- पुन्हा करत आहे.  
    आज आपल्याला आढळते की, सत्यापेक्षाच खोटेपणाचा प्रबळ आहे. अधिकार आणि न्यायासाठी उभे राहिलेल्यांना शिक्षा केली जाते, निर्दोष लोकांना ठार मारले जाते, काहींना तुरूंगात टाकले जाते, परंतु  गुन्हेगारी करणार्‍यांना आणि दुष्टांची साथ देणार्‍यांना मोकळे सोडले जाते. तसेच त्यांना सुरक्षा ही दिली जाते. कोविड-19 च्या मुखवट्याखाली युएपीए सारख्या कठोर कायद्याअंतर्गत विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांना अटक केली जात आहे. गेल्या दशकात अनेक लढाया झाल्या. अनेक निरपराधांना तुरूंगात टाकले गेले. अनेकवर्षानंतर लक्षात आले की तुरूंगात असलेले निर्दोष होते. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे संपूर्ण लोकसंख्या तुरूंगात आणि नजरकैदेत आहेत आणि असेच जीवन जगण्यास त्यांना भाग पाडले गेले आहे. कित्येक पुरुष, स्त्रिया आणि मुलांची अपहरणे झाली आहेत आणि त्यांना कोणतेही स्वातंत्र्य अजून सुद्धा नाही. सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा एवढी सांप्रदायिकता आणि विष भरले गेले आहे  की ते एका विशिष्ट समुदायावर / वंशावर  सर्वात वाईट आरोप अगदी सहज बुद्धिमत्तेचा किंवा अक्कलेचा वापर न करता स्वीकारू शकतात. पुढे ह्या महामारीने वर्ग आणि जातीच्या विभाजनात आणखीन रुंदीकरण केले आहे. जे आधीच आर्थिक दृष्टीने वंचित आहेत त्यांच्यावर दु: खाचे आणखीन ओझे टाकले आहे.
    संपत्ती फक्त काही शक्तीशाली लोकांच्या हाती एकत्रित झाली आहे आणि गरिब अगदी अन्न मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. श्रीमंत-श्रीमंत होत आहेत आणि गरीब दारिद्र्य रेषेच्या खाली जात आहेत. अशा देशात शांती आणि समृद्धी कशी मिळू शकेल. जिथे काहीजण श्रीमंत असूनही इतरांना लज्जास्पद अमानुष वागणूक देऊन पण त्यांच्यापासून  अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजादेखील सोडल्या जात नाहीत. त्याचमुळे हे आश्‍चर्य वाटत नाही की आज जगातील बहुतेक विकसित देशांना  उच्च स्तराचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. ज्यात आपण सुद्धा सामिल आहोत.

    दडपशाहीच्या भट्टीमध्ये काही लोकांना ढकलून आपण शांती व सौहार्दाचा आनंद घेऊ शकत नाही. शांती आणि सौहार्दाचा फायदा सर्व मानवतेला झाला पाहिजे. सर्वांच्या गरजा पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत. सर्वांच्या अधिकारांचे रक्षण केले गेले पाहिजे. प्रत्येकास स्वातंत्र्य आणि आदर मिळालाच पाहिजे.
कोविड संकटाच्या या परिस्थितीतही जेव्हा सामान्य लोक जगण्यासाठी धडपडत आहेत, तिथेच असे बरेच लोक आहेत ज्यांना लोकांच्या जीवनाशी खेळून आपल्या व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळाली आहे, तर काहीजण आवश्यकतेकडे दुर्लक्ष करून आपले अजेंडे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत  आणि  सामान्य जनतेचे लक्ष निराधार घटना, अनावश्यक युक्तिवाद आणि रोमांचक चर्चेकडे वेधून घेतले आहे. अध्यादेश पारित केले जात आहेत आणि संसदेमध्ये चर्चा न करता मोठे धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. बातमी आणि समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर विष पसरले जात आहे ज्यामुळे देश अशांतमय होत चालला आहे.
    पर्यावरणीय व्यवस्था इतकी संयोजित आहे की मर्यादित पद्धतीने वापरल्यास गोड फळांचा उपहार मिळतो आणि सर्व प्राण्यांमध्ये समतोलपणा राखला जातो आणि सुसंवाद पण निर्माण होतो. हा समतोलपणा जेव्हा उधळपट्टीने भंग केला जातो आणि मर्यादा ओलांडल्या जातात -(उर्वरित आतील पान 3 वर)
तेव्हा जग विनाशाकडे जावू लागते. आमच्यात ज्या स्वार्थी इच्छा आहेत त्या अधिकाधिक मिळविण्यासाठी उत्तेजना देतात आणि  दडपशाहीला  वाढवतात. अशा परिस्थितीत जेव्हा जबाबदार नागरिक गप्प राहून दडपशाहीला अधिक वाव देतात तेव्हा तर अधिक नुकसान होते. आपल्या देशाच्या नुकसानीचे हे सुद्धा एक कारण आहे. दुष्ट प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे आणि त्याच्याविषयी  निष्काळजी वृत्ती बाळगणे हे दुष्टपणाला साथ देण्यासारखेच आहे आणि त्याचा प्रसार करण्यात तितकेच जबाबदार आहे.
    युद्ध हे कोणत्याही राष्ट्राच्या समृद्धीचे कधीही समाधान नव्हते. दोन महायुद्धांनंतरच्या घटना आणि त्यांचा लोक जीवनावर झालेला परिणाम याची साक्ष देतो. शांती हाच एकमेव तो उपाय आहे ज्याची आज जगाला गरज आहे आणि ती तेव्हाच साध्य होऊ शकते जेव्हा आम्ही त्या एका ईश्‍वराला, आपला निर्माणकर्ता, आपला स्वामी समजून त्याच्याकडे वळू आणि मानवजातीसाठी असलेला त्याचा संदेश जाणून घेऊन मानवतेच्या उत्कर्षासाठी कार्य करू.
    जमीन व समुद्रावर उपद्रव माजले आहेत, लोकांच्या आपल्या हातांच्या कमाईने जेणेकरून चव चाखावी त्यांना त्यांच्या काही कृत्यांची, कदाचित ते परावृत्त होतील. (कुरआन - 30:41)


- नजराना दर्वेष, पणजी
8975074456


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget