Halloween Costume ideas 2015

भगतसिंगांची भारत नौजवान सभा आणि शेतकऱ्यांविषयी कळवळा

Bhagatsingh

भारत देश हा एक प्राचीन देश असून तो अनादी अनंत काळापासून शेतीप्रधान आहे.या देशावर परकिय शत्रूंनी मोठी आक्रमणे करून येथील निसर्ग संपदा, अमूल्य संपत्ती लुटली आहे. आपआपसातील मतभेद, द्वेष, कुटुनिती, फुटीरवृत्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, आक्रमकधर्मवाद, समाजातील विषमता  वंशवाद, प्रांतवाद, भाषावाद, आणि अतिस्वार्थ, देशाविषयी प्रेम नसणे, संरक्षण यंत्रणेकडे दूर्लक्ष, कमीदर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, सैनिकांची उदासीनता, अयोग्य व कुचकामी युद्धनिती, प्रगतशस्त्राचा अभाव, राजेशाही, कर्तबगार व शुरविर राजाचा अभाव, कुटनितीचा अभाव, शस्त्रप्रबळ व  बुद्धस्थितीचा सखोल आढावा व सुसज्ज तयारी, योग्य निर्णय क्षमता यामुळे परकिय शत्रूंनी भारतीयांच्या अकार्यक्षमतेचा पूरेपूर फायदा घेवून भारतातील निष्क्रीय, विलासी, अतिस्वार्थी, राजांना पराभूत केले. काही परकिय शत्रूचा उद्देश भारतातील अमाप संपत्तीची लूट करणे हा होता तर काही  परकियांनी येथे आपली सत्ता प्रस्थापित करून राजकीय यंत्रणा स्थापन केली. मुख्यत्वे मूघल राजवटीतील राजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. कालांतराने मुघलांचा शेवटचा बादशहा बाहदूर शहा जफर याला इंग्रजांनी कैद करून दिल्ली काबीज केली. ज्याचे शस्त्र प्रबळ तसेच युद्धनिती, लढण्याची क्षमता व आत्मविश्वास, सैनिकी क्षमता, शस्त्राताचा मोठा साठा, कुशल सैनिक, तत्कालीन लालची भारतीय राजाची सत्तेसाठी फितूरी याचा वापर करून इंग्रजांनी भारतावर सत्ता प्रस्थापित केली. सुमारे १५० वर्षे इंग्रजांनी भारत देशावर सत्ता गाजवली. त्यामध्ये काही भारतीय राजांनी  इंग्रजांचे मांडलिकत्व स्विकारून इंग्रजापुढे शरणांगती पत्करली. तर काहींना इंग्रजांनी पराभूत करून त्याचा प्रदेश हस्तगत केला. अशा स्थितीत भारतीय जनता ही मोठ्या गुलामगिरीत अडकली होती. भारतीय जनता ही पारतंत्र्यात आपले जीवन जगत होती. त्यात इंग्रजांची सत्ता अधिक मजबूत  होवून भारतीयांवर अन्याय अत्याचार, करत होती. मोठ्या प्रमाणावर जुलमी राजवट प्रस्थापित झाली होती. त्यांना प्रजेविषयी कोणतीही आस्था नव्हती कारण भारतीय नागरीकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा, लाचारी, फुटीरवृत्ती, अनिष्ठप्रथा, कालबाह्य पंरपरा, चालिरीती यामुळे भारतीय जनतेतील  स्वाभिमान नष्ट झाला होता व त्याचबरोबर इंग्रजांचे अन्याय अत्याचार भारतीयांवर अधिकाधिक वाढत होते. अशास्थितीत इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याच्या उद्देशाने क्रांतीकारकांनी इंग्रजांच्या विरुद्ध मोठा लढा दिला. १८५७ चे परकियांच्या विरोधातील बंड हे ब्रिटीशांमध्ये एक प्रकारची दहशत  निर्माण करण्याचा श्रीगणेशा होता.१८५७च्या बंडानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग सहभागी झाला होता. महात्मा गांधींनी शेतीविषयक कर,भाडे, जमीन मालकांकडून शेतकऱ्यांवर होणारा अन्यायकारक दडपशाही आदी  मुद्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना स्वातंत्र्य चळवळीची जोड दिली. या अहिंसक पद्धतीने दिलेल्या लढ्यात अवघ्या १५ वर्षाचे भगतसिंग सामील झाले होते. त्यांच्या समवेत चंद्रशेखर आझाद, सूर्य सेन, भगवतीचरण बोहरा, यशपाल, शिव वर्मा, गयाप्रसाद हे शेतकरी कुटुंबातील तरुण मित्र होते.    या आंदोलनात उत्तर प्रदेशच्या चौरीचौरा गावात पोलिसांकडून गोळीबार झाला होता. त्यात अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्यात असंतोष पसरला.संतप्त जमावाने पोलिस चौकी जाळून टाकली.त्या चौकीत लपून बसलेले २२ पोलिस आगीत भस्मसात झाले.या  हिंसाचाराच्या घटनेमुळे गांधींच्या मनाला वेदना झाल्या.त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला व हे असहकार आंदोलन मागे घेतले. अचानक व अकारण आंदोलन मागे घेतल्याने अहिंसक सत्यागृहात झोकून देऊन काम करणाऱ्या युवा व आक्रमक स्वातंत्रवीरांमध्ये मोठे नैराश्य आले. त्यातूनच भगतसिंग  व त्यांच्या सहकाऱ्यांनी१९२६ साली मार्च महिन्यात ' भारत नौजवान सभा ' ही तरुण तडफदार कार्यकर्त्यांची संघटना स्थापन केली. भारत नौजवान सभा ही संपूर्ण भारतात शेतकरी व कामगारांसाठी काम करणारी संघटना म्हणून यांच्या नेतृत्वाखाली गणराज्य निर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले  होते. देशभरातील तरूणांना एकत्र करून राष्ट्रवाद, देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी या संघटनेने सर्व जातीव धर्मासाठी सामुदायिक भोजन, कविता, गायनाचे कार्यक्रम आयोजित केले.चर्चासत्र व नाटकांतून सामाजिक व राजकीय विषयांवर जनजागृतीचे व  लोकप्रबोधनाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले. लाहोरमध्ये मार्च १९२८ च्या शेवटी एक राष्ट्रीय सप्ताह आयोजित करण्यात आला.
भगतसिंग यांचा जन्म झाला तेव्हा १९०७ च्या काळात भगतसिंग यांचे काका सरदार अजितसिंग व लाला लजपतराय इंग्रजांच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध  जनजागरण अभियान चालवित होते. अजित सिंग यांनी "पगडी संभाल जट्टा"म्हणजेच "शेतकऱ्या, तुझी इज्जत सांभाळ, तुझी पगडी  उतरली जात आहे" हे गीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शोषणासंबंधी लिहिले होते. ब्रिटिश सरकारने या गीतांवर बंदी घातली होती.पुढे नॅशनल कॉलेजमध्ये शिकत असतांना भगतसिंग यांनी "कृष्ण विजय" हे शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेवर नाटक लिहिले.या नाटकात ब्रिटीशांना कौरव त्तर भारतीयांना  पांडव बनवून नाटकाची संहिता निर्माण केली होती. त्यात अजितसिंगांचे "पगडी संभाल ओ जट्टा" हे गीत बसवले होते.ब्रिटिशांना भगतसिंगांचा हा छुपा उद्देश लक्षात आला व या नाटकातील बऱ्याच सरकारविरोधी भागांना व गीतांना त्यांनी बेकायदेशीर ठरवले, तरीही भगतसिंगांनी लाहोर येथील  प्रांतीक काँग्रेस अधिवेशनात हे ब्रिटिश विरोधी नाटक बेधडक सादर केले. शेतकऱ्यांच्या दैन्य अवस्थेवर आधारित संघर्षाचे आव्हान करणाऱ्या या नाटकाची व त्यातील गीतांची तत्कालीन देशवासियांवर फार मोठी मोहिनी पडली होती. ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष निर्माण केल्याबद्दल भगतसिंग  यांना १९२७ साली सर्वप्रथम अटक करण्यात आली होती, त्यावेळी घरच्यांनी ६०हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करून घेतली होती. स्वातंत्र्याचे वारे वाहत होतेच. अशा वेळी घरातल्यांना भगतसिंगांच्या बंडखोर स्वभावामुळे हा स्वातंत्र्याच्या चळवळीत जाऊ नये असे वाटत होते,  म्हणून त्यांनी त्याला गावांत एक दूध डेअरी काढून दिली. तसेच घरच्या शेतीकडे लक्ष ठेवून शेतमजूर व त्यांच्या पगार तसेच हिशोब ठेवणे याकामी ठेवले. त्यादरम्यान रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचे साहित्य त्यांच्या वाचनात आले.त्यामुळे शेतमजूर पुर्णपणे कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या  आहे हे त्यांना माहीत झाले. त्याचा त्यांनी प्रत्यक्ष छडा लावला. त्यावेळी त्याना शेतमजूरांना मिळणारे वेतन अत्यल्प आहे हे लक्षात आले, तात्काळ त्यांनी सर्व शेतमजुरांची कर्जे माफ केली व कर्जखते जाळून टाकली. वडिलांनी जेव्हा कर्जखतांबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, ज्यांच्या कष्टातून  आपण प्रचंड फायदा कमावतो त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणून मी सर्व शेतमजुरांची कर्जे माफ केली आहेत. खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या "बुडती हे जन, न देखवे डोळा,म्हणूनी येतो रे कळवळा देवा" या उक्तीप्रमाणे आणि कृतीप्रमाणे भगतसिंगांच्या या उक्ती व कृतीमध्ये साम्य आढळते, तसेच सध्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येचा प्रश्न ऐरणीवर असताना भगतसिंगांच्या ऐन तारुण्यात घेतलेल्या या शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या निर्णयाचे कौतुक वाटते. भगतसिंग सारखे हजारो लाखो युवक राष्ट्रविचारातून क्रांतीसाठी ससज्ज झाले. अनेक   भारतीय युवक या स्वातंत्र्याच्या क्रांतीकारी चळवळीत सहभागी झाले. छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलून इंग्रजांना भारतीयांनी आपले शूरत्व दाखवून दिले. राष्ट्रासाठी प्राण हातावर घेवून स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी असणाऱ्या व आपल्या देशासाठी बलिदान देणारे कोवळे तरुण युवक पाहून  ब्रिटीशांनाही नवल वाटले.अनेक स्वातंत्र्यसैनिक स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या होमकुंडात आहुती द्यायला पुढे सरसावले. हे पाहून ब्रिटिश सरकार थक्क झाले.
भगतसिंग सारख्या असंख्य क्रांतीकारकांच्या त्यागाने व बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले,मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. सध्या हरित क्रांतीमुळे उत्पादन वाढले आहे व त्यामुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत  स्वयंपूर्ण झाला.हे खरे आहे,पण बळीराजाला त्याचा फार फायदा झाला नाही. कारण हरित क्रांती केवळ भ्रांती ठरली. हरित क्रांतीने उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे,रासायनिक खते,यंत्रे,अवजारे बाजारात आणली. उत्पादन वाढीची ही आयुधे खरेदी करण्यासाठी शेतकर् याला आधी स्वत:जवळचा पैसा खर्च करावा लागला. उत्पादन तर भरपूर येऊ लागले,पण खर्चाच्या मानाने योग्य दर मात्र मिळत नाहीत.कारण आवक वाढत राहिल्याने गरजेपेक्षा जादा माल बाजारात येऊ लागला. त्यामुळे गेल्या वीस-बावीस वर्षांत शेतीतले उत्पादन दुप्पट वाढले,पण शेतकर् यांचे उत्पन्न  वाढले नाही. उत्पादन वाढ म्हणजे मालाची आवक वाढ, आवक वाढ म्हणजे भाव कमी अशा चक्रात शेतकरी पिळला जात आहे. शेती विकसित करण्यासाठी करावयाच्या सुधारणांसाठी काढलेले कर्ज शेतीतील उत्पन्नातून कधीच फिटत नाही असे अभ्यासान्ती शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांनी म्हटले होते आज देखील हे समीकरण बदललेले नाही. शेतीच्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड होत नाही. अशातच दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशी नैसर्गिक आपत्ती आली, तर त्यातून सावरायला अनेक वर्षे लागतात. मग कर्ज फिटणार कसे? कर्जमाफी हे त्याचे उत्तर नाही. शेतकर्  याचे आर्थिक गणित त्याच्या शेतीभोवतीच फिरते. बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी, वाहतूक, कर्जावरील व्याज इत्यादीत तो पिचला जातो आहे.आज जिथे महिना 50 हजार वेतन मिळविणार् यांच्या हाती महिना अखेरीस काही उरत नाही, तिथे शेतीतील उत्पादनाची शाश्वती नसलेल्या शेतकर् याची अवस्था किती बिकट असेल,याची कल्पनाही करवत नाही. शेतातील उत्पन्न मासिक तर नसतेच,पण जेव्हा केव्हा येईल, तेव्हा ते स्वत:साठी वापरता येईल अशीही परिस्थिती नसते. मग कौटुंबिक खर्चासाठी तर त्याला बँक कर्ज देणार नाही. मग तो सावकाराचे दार ठोठावतो.  एकीकडे बँकेचे कर्ज फिटत नाही नि दुसरीकडे खाजगी सावकाराच्या कर्जाचा आकडा फुगत जातो.यातून निर्मा ण झालेला तणाव शेतकर् याच्या जीवनात अंधार निर्मा ण करतो.शेती हा पूर्णार्था ने निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे कधी कोणती नैसर्गिक आपत्ती येईल हे  सांगता येत नाही. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी,कधी वादळ तर कधी गारपीट. ही संकटे शेतकर् याच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. या संकटामुळे शेतकरी पार उद्ध्वस्त होऊन जातो. अलीकडच्या चार-पाच वर्षांत दुष्काळ,अतिवृष्टी आणि गारपीट एकामागोमागच्या वर्षात आली.त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला. मागील तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी मोडून पडला आहे.त्यात कोरोनाची आपत्ती म्हणजे शेतकर् याची खड्डा खोदणारी समस्या ठरली आहे. त्यापुढे सरकारने जाहीर केलेले पॅकेज काहीच नाहीत. गारपिटीने अतिवृष्टी दुष्काळाने नुकसान झाले तर  पंचनाम्यांबाबत तत्परता दिसून येत नाही. शिवाय झालेल्या नुकसानीच्या किमान 50 टक्के तरी मदत मिळायला हवी. परंतु हेक्टरी 3 हजार व 2 हजारच्या मर्यादेत दिली जाते. दुसरे वर्ष उलटले तरी जाहीर केलेली मदत अनेक शेतकर् यांना मिळालेली नाही. हे उदाहरण कापूस, ज्वारी उत्पादकांचे.  फळ बागायतदारांची अवस्थाही वेगळी नाही. पीकविम्याची स्थिती फारशी वेगळी नाही.देशाच्या संरक्षणाइतकेच शेतकर् याचे संरक्षण महत्त्वाचे मानणारे सरकार या देशात येईल आणि घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस येतील म्हणून भगतसिंगांसारखे अनेकस्वातंत्र्य सैनिक व  क्रांतीकारक यांनी आपल्या सर्वस्वाची आहूती स्वातंत्र्य लढ्याच्या होमकुंडात हसत हसत दिली,मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे,हे वास्तव आहे,हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठीचे भगतसिंगांनी पाहीलेले स्वप्न गेल्या ७३ वर्षात पूर्ण झालेले नाही; शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी झटणारे सरकार या देशात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने भगतसिंगांच्या बलिदानाला सर्व देशवासीयांची खरी आदरांजली ठरेल!


- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्काराने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.) 

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget